Friday, August 30, 2013

लालबागच्या राजालाच नवस केला तर?






   गेल्या आठदहा दिवसात महाराष्ट्रामध्ये आस्तिक व नास्तिकांचे तुंबळ युद्ध पेटले आहे. त्यात बिचार्‍या डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्याकांडाचा तपास बाजूला पडला असून, या दोन गटातले वाद हातघाईवर येत आहेत. त्यात हस्तक्षेप करायची माझी योग्यता नाही, की इच्छा सुद्धा नाही. पण या युद्धात शस्त्रसंधी होऊ शकेल काय, असा विचार करताना मला काही कल्पना सुचल्या. त्यामुळे सर्वसाधारण वाचकांसाठी एक तडजोडीचा मसूदा तयार केला. शक्य असेल तर दोन्ही बाजूंनी त्याचा शांतपणे विचार करून पुढले पाऊल उचलावे अशी विनंती आहे. नसेल तर या मसुद्याकडे साफ़ पाठ फ़िरवून आपले युद्ध तितक्याच इर्षेने चालू ठेवावे. आस्तिक नास्तिकांची ही लढाई राज्य सरकारने जादूटोणा वटहुकूम काढल्यानंतरही तशीच जुंपलेली आहे. कारण आता त्यात वारकर्‍यांचे लढावू नेते ह. भ. प, बंडातात्या कराडकर उतरले आहेत. त्यांनी वटहुकूम काढणार्‍या सरकारवरच विश्वासघाताचा आरोप केला आहे. तर हा वटहुकूम निघाल्याने दाभोळकरांच्या चहात्यांना अंधश्रद्धा निर्मूलनाची लढाई अर्धी जिंकल्याचा आनंद झालेला आहे. अर्धा आनंद दाभोळकरांचे मारेकरी अजून मोकाटच फ़िरत असल्याने त्यांच्या वाट्याला येऊ शकलेला नाही. अशीच हमरातुमरी चालू राहिली, तर वटहुकूम काढणारे सरकार त्याची अंमलबजावणी स्थगीत करण्याचाही धोका संभवतो. म्हणूनच यातून सन्मान्य तडजोड व्हावी, असे मला वाटते. ती कशी निघू शकेल? लौकरच महाराष्ट्रातला फ़ेमस लालबागचा राजा आपल्या आसनावर स्थानापन्न होणार आहे. तो नवसाला पावणारा गणपती अशी त्याची जबरदस्त जाहिरात गेल्या दहा वर्षात विविध वाहिन्यांनी केल्याने त्याची लोकप्रियता जगाच्या कानाकोपर्‍यात जाऊन पोहोचली आहे. तेव्हा आस्तिक नास्तिकांच्या ताज्या युद्धाचे निवारण त्याच्यावरच सोपवले तर?

   म्हणजे असे, की अजून पुण्याच्या पोलिसांना दाभोळकरांचे मारेकरी सापडलेले नाहीत. महाराष्ट्र सरकार नुसतीच टोलवाटोलवी करते आहे. आठ दिवस उलटल्यावर पुण्याचे पोलिस आयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही हत्या सुपारीबाज लोकांनी केल्याचे सांगतात. पण कुठल्याही निश्चित दिशेने तपास पुढे सरकत नसल्याचेही सांगतात. म्हणजेच हे एक अजब कोडे होऊन बसले आहे. पोलिस निष्क्रिय वा नालायक आहेत, असे अनेक नास्तिक जाणकारांना वाटते आहे. तर त्यांनी पोलिसांना पुढे येऊन तपासाची दिशा दाखवायला हरकत नव्हती. पण तसेही झालेले नाही आणि पोलिसांकडे कुठली जादूची छडी सुद्धा नाही, की त्यांनी कसलाही दुवा हाताशी नसताना आपल्या हॅटमधून खरे मारेकरी शोधून काढावेत. आणि काढून तरी उपयोग काय वा काढणार तरी कसे? जादूवर तर दाभोळ्करप्रेमींचा विश्वासच नाही. पण दुसरीकडे तेच लोक पोलिसांनी काही जादू करून आरोपी पकडावेत असाच जणू आग्रह धरीत आहेत. मग व्हायचे कसे? कुणा ज्योतीष शास्त्रीकडे जाऊनही पोलिस खुन्यांचे धागेदोरे मागू शकत नाहीत. तसे केले तर पुन्हा या नास्तिकांच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिथे कुठलाच दुवा नसतो, तिथे भोंदूभगतांचे मार्गदर्शन मिळवण्याचाही पोलिसांचा मार्ग बंदच आहे ना? मग यातून मार्ग कशा काढायचा? तर एक उपाय मला असा सुचला, की त्यात अंधश्रद्धा निर्मूलन व आस्तिकांच्या श्रद्धेची खरी कसोटी लागून जाऊ शकेल. सगळ्यांनी आपापले विवाद बाजूला ठेवून नवसाला पावणार्‍या त्या लालबागच्या राजालाच साकडे घातले तर? तो नवसाला पावतो किंवा नाही, त्याचाही फ़ैसला होऊन जाईल. दाभोळकरांचे खुनी शोधून देण्याची जबाबदारी त्या राजावरच सोपवली तर?

   थोडक्यात असे, की गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंतच्या मुदतीत त्या नवसाच्या राजाने ह्या प्रकरणातले खुनी पुराव्यासहीत पोलिसांना सापडून दिले पाहिजेत. त्या मुदतीत त्याने ही जबाबदारी पार पाडली, तर आवेशात आलेल्या नास्तिकांनी आपले अंधश्रद्धा निर्मूलनाचे दावे सोडून द्यावेत आणि देवाचे अस्तित्व मान्य करून टाकावे. दुसरीकडे समजा तितक्या मुदतीमध्ये लालबागचा राजा त्याच्यावर सोपवलेली कामगिरी पार पाडू शकला नाही; तर जादूटोळा वटहुकूमाला असलेला विरोध गुंडाळून आस्तिकांनी त्याला निमूटपणे मान्यता देऊन टाकावी. त्याच्या विरोधात आंदोलन वगैरे करण्याचा धमक्या सोडून द्याव्यात. अजून तो नवसाचा राजा आपल्या मंडपात स्थानापन्न व्हायला आठवड्याच्या काळ आहे. तेवढ्यात दोन्ही बाजूंनी या मसूद्याचा सांगोपांग विचार करावा आणि पटत असेल तर पुढले पाऊल उचलावे. त्याचे अनेक फ़ायदे आहेत. खरोखरच नवसाला पावणारा राजा असेल, तर त्याला आपले कर्तृत्व सिद्ध करावे लागेल. करू शकला नाही तर निर्मूलनवाद्यांचा दावाच त्यातून सिद्ध होईल. दुसरा लाभ असा, की खरेच तो राजा नवसाला पावला तर निर्मूलनवाद्यांचे तोंड आपोआप बंद होईल. तिसरा फ़ायदा असा, की या तपासात पोलिसांना आळशीपणा वा गफ़लत करायचीही मोकळीक उरणार नाही. प्रसंग हातघाईवर न जाता इतक्या गंभीर विषयाची उकल सोप्या व शांततामय मार्गाने होऊ शकेल. यातले काहीच झाले नाही, तरी प्रतिवर्षी चॅनेलवाले ज्याप्रकारे नवसाला पावणारा म्हणून विविध राजांचे मार्केटिंग करतात; तेही तितकेच भोंदूभगत असल्याचे नक्कीच सिद्ध होऊन जाईल. दाभोळकर गेल्यानंतरही त्यांची अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ पुढे घेऊन जाण्याचे, एक निमित्त तरी नक्कीच साधले जाईल ना?

2 comments:

  1. भाऊ,

    तुमचा तोडगा वरपांगी चांगला भासतो. मात्र एक गंभीर त्रुटी आहे त्यात. गुन्हेगारांना पकडणं हे लालबागच्या राजाचं काम नाही. त्याचं काम लोकांना बुद्धी देणं आहे. त्यानुसार मिळालेल्या बुद्धीचा सदुपयोग करण्याची जबाबदारी त्या त्या माणसाची आहे. तुमचा तोडगा म्हणजे गणपतीला एक प्रकारची लाच दिल्यासारखं आहे. त्यानं काम होणारं नाही.

    आजून एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते. ती म्हणजे आस्तिकांचा अंधश्रद्धा निर्मूलनास विरोध नाही, तर त्यासाठी करण्यात येणार्‍या कायद्याला आहे. माझ्यासारख्या आस्तिकपंथी लोकांचा कायद्यापेक्षा प्रबोधनावर अधिक विश्वास आहे. थोडक्यात म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन न करीत बसता श्रद्धावर्धन करावं. त्यामुळे अंधश्रद्धा आपोआप नाहीश्या होतात.

    नवसाची लाच दिल्याने देव पावतो ही प्रचंड मोठी अंधश्रद्धा आहे, हे वेगळे सांगणे नलगे.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  2. लालबागचा राजा का ? दगडूशेठ हलवाई गणपती का नाही ?

    ReplyDelete