Thursday, August 8, 2013

तोयबांचे होयबा

   सत्तेवर असलेल्या पक्षाने वा सत्ताधार्‍यांनी देशहिताचे रक्षण करावे आणि देशहिताला बाधा येईल अशा गोष्टींच्या मुसक्या बांधाव्यात; अशी मुळात अपेक्षा असते. किंबहूना सत्ताधिकार तेवढ्यासाठीच त्यांच्याकडे सोपवलेला असतो. पण सत्ता म्हणजे आपल्या तुंबड्या भरण्यासाठीच मिळालेला विशेषाधिकार आहे, अशी बहुधा आजच्या कॉग्रेस नेत्यांची व नेतृत्वाची समजूत झालेली असावी. म्हणून की काय, त्यांनी मंगळवारी देशाच्या अब्रुवर आणि सुरक्षेवर घाला घातला जाण्याची घटना घडल्यावरही थेट शत्रू राष्ट्राची वकीली केल्याप्रमाणे संसदेत भूमिका मांडली. तेवढ्यावर न थांबता चुक झाली, तर ती वेळीच सुधारण्याचा शहाणपणाही केला नाही. अखेरीस दिर्घकाळ चाललेले सेक्युलर नाटक झुगारून तमाम लहानमोठ्या विरोधी पक्षांना एकजुटीने व एकदिलाने सरकारच्या विरोधात शड्डू ठोकून उभे रहावे लागले. तेव्हा सत्तेची मस्ती उतरली आणि संरक्षणमंत्र्यांनी आपले शब्द मागे घेतले. जणू आपण विरोधी पक्षावर उपकार केल्याच्या थाटात सत्ताधारी कॉग्रेसनेते दोन दिवस बोलत होते. कॉग्रेस पक्षात बुद्धीचे किती दिवाळे वाजले आहे, त्याचीच या निमित्ताने साक्ष मिळाली. कारण चुक कळत असूनही कोणी त्याबद्दल उघडपणे मतप्रदर्शन करायला घाबरत होता. उलट दुसर्‍या टोकाला जाऊन तमाम कॉग्रेसनेते संरक्षणमंत्री अन्थोनी यांच्या चुकीच्या विधानाचे समर्थन करत होते. त्यातून आपण पक्षाच्या हाती आलेली सत्ता व त्या सत्तेवर कब्जा करून बसलेल्यांच्या शब्दापेक्षा देशहिताला कवडीची किंमत देत नसल्याचे प्रत्येक कॉग्रेस नेत्याने यावेळी दाखवून दिले. वेळ आली तर सत्ता व सत्तेचे लाभ मिळवण्यासाठी आपण देशहितावर निखारे ठेवू शकतो, याचाही त्यांनी पुरावा दिला.

   मंगळवारी अन्थोनी यांनी केलेली चुक गुरूवारी दुरुस्त करण्यात आली. पण दरम्यान संपुर्ण कॉग्रेस पक्षाच्या लहानथोर नेत्यांनी आपली विवेकबुद्धी निकामी झाल्याचेच जगाला दाखवून दिले नाही काय? हीच चुक मंगळवारी विरोधी पक्षांनी आक्षेप घेताच दुरूस्त केली असती; तर संसदेचे कामकाज दोन दिवस वाया गेले नसते, की गदारोळ झाला नसता. प्रत्येक घोटाळा, गैरकारभार व गुन्हा सेक्युलर विचारांच्या मुखवट्य़ाआड लपवण्याची कॉग्रेसला आता इतकी सवय झाली आहे, की त्यांना भाजपा सोडून आपल्या चोरीमारी व भ्रष्टाचाराला कोणीच रोखू शकत नाही; याची पुरेपुर खात्री पटलेली आहे. भाजपाच्या जातीयवादाचा बागुलबुवा दाखवला; मग बाकीच्या लहानसहान सेक्युलर पक्षांना आपल्या समर्थनाला उभे करता येते आणि म्हणूनच मनमानी करायला आपण मुखत्यार आहोत, अशीच त्या पक्षाची ठाम समजूत झाली आहे. म्हणूनच थेट पाकिस्तानचा संरक्षणमंत्री असल्याप्रमाणे अन्थोनी यांनी सत्याचा अपलाप केला आणि तिथे बिगर भाजपा पक्षांनाही आपल्या सेक्युलर लाचारीची शरम वाटायची पाळी आली. त्या तमाम सेक्युलर पक्षांनाही मग भाजपाच्या सुरात सुर मिसळून सरकार विरोधात घोषणा देत कामकाज बंद पाडायची वेळ आली. जेव्हा हे तमाम सेक्युलर पक्ष विरोधात गेले, तेव्हाच कॉग्रेसला संरक्षणमंत्र्यांची गफ़लत मान्य करायची पाळी आली. लालू, मुलायम, पासवान, मायावती, डावे आणि बाकीचे पक्षही राष्ट्रहिताच्या बाजूने उभे राहिले आणि पाकिस्तानच्या हिताचा युपीए सरकारने घेतलेला पवित्रा हाणून पाडायला सिद्ध झाले, मुस्लिम मतांसाठी आता जिहादी, दहशतवादी व थेट पाकिस्तानच नव्हेतर तोयबांचेही समर्थन करण्यापर्यंत सत्ताधार्‍यांची मजल गेली असल्याचा हा पुरावा आहे.

   इशरत जहान चकमकीचे भांडवल असो किंवा अफ़जल गुरूला दिर्घकाल फ़ाशी देण्यात झालेली टाळाटाळ असो; त्यामागे केवळ मुस्लिम मते मिळवण्याचाच हेतू होता व आहे. पण आता हे खुळ थेट देशबुडव्या दिशेने सरकू लागले आहे. मुस्लिम मतपेढीसाठी मुस्लिमांचेही लांगुलचालन एकवेळ समजू शकते. पण जेव्हा माणुस विवेक सोडतो, तेव्हा त्याच्या वागण्याला ताळतंत्र उरत नाही. त्यामुळेच इथल्या मुस्लिमांना खुश करण्यासाठी तोयबांचेही समर्थन करण्यापर्यंत मजल जात असते. यातून कॉग्रेसला असा भ्रम झालेला दिसतो, की इथल्या मुस्लिमांचीही पाकिस्तानकडे सहानुभूती असून जिहादी हिंसेचे इथला मुस्लिमही समर्थनच करतो. म्हणून आपण तोयबा व जिहादींना पाठीशी घातले, तरच आपल्याला मुस्लिमांची मते मिळू शकतील. पण इथल्या भरकटलेल्या मुठभर तरूणांचा वापर पाकिस्तान घातपात घडवण्यासाठी करून घेत असला; तरी वास्तवात इथला बहूसंख्य मुस्लिम देशनिष्ठ आहे. पाकिस्तान बाबत त्याच्या मनात कुठलीही हळवी भावना नाही. त्यामुळेच पाकिस्तान वा तोयबांच्या समर्थनामु्ळे मुस्लिम मते मिळू शकणार नाहीत. मात्र असल्या खुळचट सेक्युलर नाटकामुळे बिगरमुस्लिम भारतीयांमध्ये कॉग्रेस व सेक्युलर राजकारणी संशय निर्माण करीत आहेत. अन्थोनी यांचे निवेदन त्यापैकीच एक मुर्खपणा होता. पण आज त्यातून बिगर भाजपा पक्षांचे डोळे निदान उघडले आहेत. मुस्लिमांचेही उघडलेले असतीलच. परिणामी मुस्लिम आता आपल्या देशप्रेमाची साक्ष देण्यासाठी कॉग्रेसकडे पाठ फ़िरवल्याशिवाय रहाणार नाहीत. पण या निमित्ताने एक प्रश्न विचारलाच पाहिजे. भारत सरकारचे निर्णय कोण घेतो? पक्षाचे धोरण कोण ठरवतो? खरेच पक्षाचे नेते करतात की तोयबांचे होयबा?

No comments:

Post a Comment