Thursday, August 15, 2013

भाषणांची लढाई


modi addressing from naqli redfort के लिए इमेज परिणाम


   राजधानी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनी देशाचे राजकीय म्होरके असलेल्या पंतप्रधानंचे भाषण, ही आपल्याकडे स्वातंत्र्यदिनाची एक परंपरा होऊन गेली आहे. त्यामुळेच त्याला एकप्रकारे महत्व प्राप्त झाले आहे. पण अन्य कुठल्यातरी भाषणाप्रमाणे तेही एक भाषण असून चालेल काय? देशाचा प्रमुख असलेल्या व्यक्तीने देशातल्या करोडो जनतेला सोबत घेऊन वाटचाल करीत असल्याचे दिलेले वार्षिक आश्वासन; असेच त्याचे महत्व असू शकते. केवळ वर्षभर आपण कसा व कोणता कारभार केला किंवा पुढे काय करणार आहोत; याची जंत्री वाचून दाखवणे, म्हणजे ते भाषण असता कामा नये. पण अलिकडल्या कालखंडात पंतप्रधान पदावर आरुढ झालेल्या व्यक्ती कर्तृत्वाने इतक्या खुज्या व नाकर्त्या आहेत, की त्यांच्या भाषणांनी लाल किल्ल्याच्या त्या भाषणाचे पावित्र्यच नव्हेतर महत्ताच संपवून टाकली आहे. त्याला एकप्रकारची औपचारिकता आलेली आहे. त्यातून आपण देभभरच्या जनतेत उत्साह व उमेद निर्माण करायची असते, याचे आजकालच्या पंतप्रधानांना भानच राहिलेले नाही. सहाजिकच गेली नऊ वर्षे पंतप्रधान म्हणून कार्यरत असलेले मनमोहन सिंग यांनी अत्यंत नीरस आवाजात समोरचे कागद वाचून दाखवण्याचा जो प्रघात पाडला आहे; तो याही वर्षी यथासांग पार पाडला गेला. असे म्हटल्यास वावगे ठरू नये. नाही म्हणायला पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, यांनी त्या भाषणाच्या निमित्ताने थेट मनमोहन सिंग यांना आदल्या दिवशी आव्हान दिल्याने त्यात थोडी जान आली म्हणायची. अर्थात सिंग यांच्या शब्दात वा भाषणात अजिबात जान नव्हती. पण निदान त्या प्रसंगामध्ये नवी जान फ़ुंकली गेली इतकेच.

   स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण होते हे सर्वच लोक जाणतात. कारण पुर्वी त्याचे रेडीओवरून व नंतरच्या काळात दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण होत असे. आता माध्यमांचा विस्तार झाल्यावर अशा घटनांना खास महत्व आलेले आहे. तात्काळ मग अशा भाषणांवर चर्चा होतात. यावेळी प्रथमच नरेंद्र मोदी यांनी आपणही मनमोहन सिंग यांचे भाषण ऐकणार असून नंतरच गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून भाषण करणार आहोत, असे जाहिर केले. सहाजिकच मोदी त्या पंतप्रधानांच्या भाषणाचा समाचार घेतील, असे उघड झाले होते. तेवढ्यावर न थांबता मोदी यांनी आपलेही भाषण लोक ऐकतील आणि त्याची तुलना होईल, असा इशाराही देऊन टाकला. थोडक्यात त्यांनी तुलना करायचे जणू माध्यमांना आवाहनच केले आणि सनसनाटीच्या मागे धावत सुटलेल्या आजच्या वाहिन्यांसाठी मग पर्वणीच झाली. पंतप्रधानांचा लाल किल्ल्यावरचा उपचार संपताच सर्व वाहिन्या भूज येथील मोदींच्या भाषणाकडे वळल्या. गुजरातच्या त्या मुख्यमंत्र्याचे भाषण आपल्या राज्यातील जनतेसाठी होण्याऐवजी मग भारतवासीयांसाठी होऊन गेले. अर्थात मोदी यांनी लोकांची व श्रोत्यांची अजिबात निराशा केली नाही. त्यांनी दिल्लीपासून हजार किलोमिटर्स दूर राहूनही देशाला उद्देशूनच भाषण केले आणि त्यातून विद्यमान युपीए सरकार व त्यांच्या एकूण नाकर्तेपणावर तोफ़ डागली. मोदींचे भाषण नेहमीच उत्स्फ़ुर्त व आवेशपुर्ण असते आणि त्याची तुलना मनमोहन सिंग यांच्याशी करायला गेल्यास ते अधिकच आवेशपुर्ण वाटल्यास नवल नाही. कारण मनमोहन सिंग हसणे व रडणे एकाच सुरात गातात, तेव्हा शब्दांचे महत्वच संपुन जात असते. सहाजिकच सादरीकरणाच्या बाबतीत बघितले तर मोदींनी बाजी मारली हे मान्यच करायला हवे.

   इथे एक मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. लालकिल्ला असो की आणखी कुठले पंतप्रधानाचे देशाला उद्देशून केलेले भाषण असो; त्यात त्याने कुठले मुद्दे उपस्थित केले यापेक्षा त्या भाषणाने जनमानसात किती उमेद व उत्साह निर्माण केला, याला महत्व असते. देशाला सोबत घेऊन जाणार्‍या नेत्याला आपल्या जनतेला उत्साही बनवता आले पाहिजे. म्हणूनच मुद्दे व शब्दांपेक्षा त्याचा जनमानसावर होणारा परिणाम अगत्याचा असतो. तिथे मनमोहन सिंग अजिबात निष्प्रभ आहेत. शोकसभा व सत्कारसभा यात त्यांचा सूर सारखाच असतो. त्यामुळेच शब्दांचा वा मुद्दे विषयांचा कुठेही उपयोगच नसतो. स्पष्टच सांगायचे तर लालकिल्ला येथून भाषण करायला. वक्ता कसा नसावा याचे उत्तम उदाहरण म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे बोट दाखवता येईल. सभा तापवणे वा श्रोत्यांना आवेशात आणण्यासाठी जाहिरसभा असतात. त्याचाच अभाव असलेल्या वक्त्याने अशी भाषणे देऊन उपयोग नसतो. मोदी यांनी पंतप्रधानांचा हाच दुबळेपणा ओळखून त्याचा राजकीय फ़ायदा या निमित्ताने उठवला. अर्थात त्याबद्दल अनेक तक्रारी होऊ शकतील. पण आपल्या आवेशपुर्ण भाषणातून मोदी यांनी आपण कसे जनतेला स्फ़ुरण चढवू शकतो, याची साक्ष दिलीच. पण त्याच निमित्ताने आजचे पंतप्रधान कुठे तोकडे व कमी पडतात, त्याचेही थेट प्रात्यक्षिक देशभरच्या जनतेला मोठ्या धुर्तपणे घडवले. त्यासाठी त्यांनी माध्यमांच्या उतावळेपणाचा मस्त वापर करून घेतला. निवडणुका व संसदीय कामात भाजपाला गेल्या नऊ वर्षात सत्ताधारी कॉग्रेसला जे आव्हान उभे करता आलेले नाही, ते मोदींनी अशी प्रत्येक संधी साधून ते आव्हान नेमके निर्माण केलेले आहे. स्वातंत्र्यदिनी भाषणांची लढाई त्याचाच आणखी एक अविष्कार होता.

2 comments:

  1. असे ऐकले आहे कि विद्यमान PM अर्थशास्त्रज्ञ आहेत , पण त्यांच्यात इतकीही प्रतिभा दिसत नाही कि ते स्वताच्या शब्दांचा वापर करून आयता पेपर न वाचता भाषण करू शकतात. जेवाही बघावे तेवा ते कागदी चिटोरा वाचतच बोलत असतात. (परीक्षेत ढ पोर कॉपी करतात तसेच) --Abhijit

    ReplyDelete
  2. भाऊ, नेहमीप्रमाणे अगदी मुद्देसूद विवेचन.
    कालच्या मोदींच्या भाषणावर काही पंडित "निदान आजतरी मोदींनी मनमोहनना टार्गेट करायला नको होती" अशी टीव टीव केली.
    पण आज मनमोहनांचा असा कोणता दिवस होता कि ज्यामुळे त्यांच्यावर टीका व्हायला नको होती?
    उलट रोजचे रटाळ सोडून आज काहीतरी उत्साहवर्धक त्यांनी बोलायला हवे होते हे जास्त सयुक्तिक नाही का वाटत ??

    ReplyDelete