Thursday, October 10, 2013

सचिनचे ‘अवतार’कार्य



  गुरूवारी सकाळी सर्वच वाहिन्यांवर हैद्राबाद येथे उपोषणाला बसलेल्या जगन रेड्डी यांना पोलोसांनी ताब्यात घेऊन इस्पितळात हलवल्याच्या बातम्या चालू होत्या. सूर्य डोक्यावर येईपर्यंत तेच चालू होते. मग सकाळीच भाजपाचे बिहारमधले दोन नेते राष्ट्रपती भवनात जाऊन प्रणबदांना भेटले. या महिनाअखेर पाटण्यात नरेंद्र मोदी यांची जाहिरसभा आहे. तेव्हा राष्ट्रपती तिथे असल्यास सभेला परवानगी देता येत नाही, असे राज्य सरकारने सांगितल्याने हे नेते प्रणबदांना त्यांनी कार्यक्रम बदलावा म्हणून सांगायला गेले होते. प्रणबदांचाही आदल्या दिवशी तिथे कार्यक्रम व्हायचा आहे. पण रात्री पाटण्यात मुक्काम करून ते रविवारी सकाळी दिल्लीला परतणार होते. मग त्यांची सभेमुळे धावपळ होऊ शकते व पोलिसांचीही तारांबळ होऊ शकते. म्हणून त्यांनी रात्रीच दिल्लीला प्रयाण केल्यास तिढा सुटू शकतो, असे भाजपाच्या नेत्यांनी त्यांना पटवले व त्यांनी मान्य केले. सहाजिकच ती बातमी सर्वच वाहिन्यांवर ब्रेकिंग न्युज झालेली होती. दुपारच्या सुमारास उत्तरप्रदेशात दांडपट्टा फ़िरवलेले राहुल गांधी पंजाबला पोहोचले होते आणि तिथे चाललेल्या त्यांच्या कुठल्या भाषणाचे थेट प्रक्षेपण बर्‍याच वाहिन्यांवर चालू होते. काही वाहिन्या आसारामच्या शिळ्या कढीला ऊत आणण्यात गर्क होत्या. इतक्यात एक अशी बातमी आली, की नेहमीच्या तमाम राजकीय बातम्या टिव्हीच्या पडद्यावरून गायब झाल्या. सगळ्या म्हणजे सगळ्या भाषांच्या वाहिन्यांवर मग एकच बातमी सुरू झाली. बातमी तशी दोन ओळीची होती. पण मग तिचा इतिहास आळवून घोळवून सांगायची स्पर्धा प्रत्येक वाहिनीवर सुरू झाली. जुन्या मुद्रित मुलाखती, चित्रणे काढून दाखवल्या जाऊ लागल्या. सचिन तेंडूलकरने निवृत्तीची घोषणा केली होती.

   जेव्हा ही ब्रेकिंग न्युज आली, तेव्हा बहुतेक वाहिन्या राहुलच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण करीत होत्या. पण ते सोडून सचिनच्या निवृत्तीची बातमी दाखवायला सुरूवात झाली आणि पुन्हा मग गुरूवारी कुठल्या वाहिनीवर राहुल पुन्हा दिसलेच नाहीत. राष्ट्रपती व मोदींचा सभेची बातमीही गायब झाली. सचिनच्या शतकी व विक्रमी खेळीपेक्षाही त्याच्या निवृत्तीच्या घोषणेने जणू टेलीव्हीजनच्या इतिहासात नवा विक्रम घडवला. सगळ्या वाहिन्या त्याच्या दोन आठवड्यांनी व्हायच्या निवृत्तीचेच गुणगान व प्रवचन करू लागल्या. ही सचिनच्या कुठल्याही क्रिकेट सामान्यातील खेळीपेक्षा मोठी जादू म्हणावी लागेल. एका खेळाडूच्या निवृत्तीला भारतीय जनजीवनात इतके महत्व कशाला यावे? त्यासाठी क्रिकेटबाहेर सचिनने भारतीय समाजासाठी केलेल्या महान कार्याची नोंद घ्यावी लागेल. योगायोगाची गोष्ट असेल, पण सचिन भारतीय क्रिकेट संघात सामील होऊन आंतरराष्ट्रीय सामने खेळू लागला, त्याच दरम्यान भारतीय जनजीवन व सार्वजनिक जीवनात कमालीची अस्थिरता व घसरण यायला सुरूवात झालेली होती. बोफ़ोर्सच्या घोटाळ्याने त्याची सुरूवात झाली होती आणि आज भारतीय राजकीय सामाजिक जीवन भ्रष्टाचाराच्या रसातळाला जाऊन पोहोचले आहे. प्रथमच भारतीय संसदीय इतिहासात १९८९ सालात कुठल्याच पक्षाला बहुमत मिळू शकले नाही आणि जी राजकीय अस्थिरता सुरू झाली, तिथून सचिनची क्रिकेट कारकिर्द सुरू झालेली असावी, हा योगायोग मानता येईल काय? देशाला खंबीर नेतृत्व देणार्‍या व्यक्तीमत्वाचा काळ संपल्यापासून सुरू झालेली ही कारकिर्द आता पुन्हा देश कुणा व्यक्तीमत्वाभोवती राजकारण फ़िरू लागताना संपते आहे. सचिन निवृत्त होतो आहे, त्यालाही योगायोग मानायचा काय?

   १९८९ साली देशव्यापी प्रभावी राजकीय व्यक्तीमत्व असलेल्या राजिव गांधी यांचा पराभव होऊन जे आघाडीचे अस्थिर राजकारण सुरू झाले, त्यानंतर देशात कुठले समर्थ व्यक्तीमत्व सार्वजनिक जीवनात पुढे आले नव्हते, की कुणाकडे लोकांनी आशेने, अपेक्षेने बघावे असे व्यक्तीमत्व उदयास आलेले नव्हते. त्या संपुर्ण काळात लोक राजकीय व सामाजिक जीवनाच्या पलिकडे आदर्श व्यक्तीमत्वाचा शोध घेत राहिले, हिरो शोधत राहिले. सचिनने ती कामगिरी पार पाडली. आज १९८९ नंतर प्रथमच भारतामध्ये नरेंद्र मोदी नावाच्या राजकीय व्यक्तीमत्वाभोवती समाज व राजकारण घुटमळू लागले असताना सचिन निवृत्त होतोय; हा म्हणूनच एक चमत्कारिक योगायोग आहे. ज्याच्या कारकिर्दीचा आरंभच संसदेच्या राजकारणातील अस्थिरता व त्रिशंकू अवस्थेपासून झाला, त्याच्या निवृत्तीच्या दरम्यान कोणी एक पक्ष व नेता बहुमताच्या आकांक्षेने कामाला लागलेला आहे. सचिनच्या निवृत्तीची ही घटना राजकारणात स्थैर्य व एकपक्षिय बहुमताचा संकेत मानता येईल काय? योगायोग नेहमीच चमत्कारिक असतात. राजीव गांधींच्या पराभवानंतर दोनच वर्षात त्यांची हत्या झाली आणि देशव्यापी एकमुखी नेतृत्व देऊ शकेल; असे व्यक्तीमत्व कुठल्याच पक्षात मग उदयास आलेले नव्हते. त्याच्याच परिणामी आघाडीचे युग सुरू झाले असे मानले जात होते. आज निदान त्या समजुतीला छेद देऊ बघणारे एक व्यक्तीमत्व उदयास आलेले आहे. मोदी यांच्या रुपाने त्याची किमया देशभर दिसू लागली आहे. त्याच दरम्यान सचिनने अचानक आपल्या निवृत्तीची घोषणा करावी; हा म्हणूनच विचित्र योगायोग आहे. अनेकांना हे विधान हास्यास्पद वाटेल. सचिन तेंडूलकर क्रिकेट खेळला व त्याने त्यात अनेक विक्रमही केले. पण त्याच कालखंडात त्याने भारतीयांना जोडणारे देशव्यापी व्यक्तीमत्व असण्याची ऐतिहसिक भूमिका वा अवतारकार्य पार पाडले असेल काय? काळच त्याच्या खरेखोटेपणाची साक्ष देईल.

1 comment:

  1. Avtar -karya he nehmich asamanya asate......yda yda hi dharmasya glani......BHARAT

    ReplyDelete