Friday, October 4, 2013

विनाशकाले विपरित बुद्धी

  कोणाकडून काही घेत असतो तेव्हा मजा वाटते. कारण तेव्हा उधारी फ़ेडायचे भान नसते. पण जेव्हा उधारी फ़ेडायची वेळ येते, तेव्हा घासाघीस किरकिर सुरू होते आणि भांडण लागते. तेलंगणा हे वेगळे राज्य करताना कॉग्रेसची जी तारांबळ उडाली आहे, ते प्रकरण काहीसे तसेच आहे. गेल्या दहा वर्षातल्या मतलबी राजकारणाला आलेली ती विषारी फ़ळे आहेत. २००४ सालात वाजपेयी सरकारला आव्हान देण्यासाठी व पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी सोनिया गांधींनी प्रथमच कॉग्रेस पक्षाचे अस्तित्व गुंडाळून विविध प्रादेशिक पक्षासमोर लोटांगण घातले होते. पाच वर्षे सत्तेवर असलेल्या भाजपाला आव्हान द्यायला कॉगेसवाल्यांना उभे करायचे; तर कुठूनही ताबडतोब सत्ता मिळवण्याला पर्याय नाही. आणखी पाच वर्षे सत्तेबाहेर बसायची वेळ आली, तर उरलीसुरली कॉग्रेसही विलयास जाईल; याची जाणीव झाल्याने तेव्हा सोनिया कोणाचेही उंबरठे झिजवून वाटेल त्या अटीवर पाठींबा मिळवायला धडपडत होत्या. तेव्हा त्यांनी आंध्रप्रदेशातील नेते राजशेखर रेड्डी यांच्या आग्रहाखातर तेलंगणा राज्य समितीशी तडजोड केली होती. त्यासाठी वेगळे तेलंगणा राज्य द्यायची अट मान्य केली होती. पण सत्ता मिळाल्यावर तीनचार वर्षे उलटून गेली, तरी तेलंगणा राज्य होत नाही; म्हणून समिती युपीए सोडून बाहेर पडली. मात्र त्याची राजशेखर रेड्डींना पर्वा नव्हती. कारण त्यांनी आंध्रच्या राजकारणावर पक्की मांड ठोकलेली होती आणि चंद्राबाबू नायडूंचा करिष्मा निकालात काढला होता. त्यांना मित्र पक्षांची गरज उरलेली नव्हती. म्हणूनच २००९ सालात त्यांनी स्वबळावर पुन्हा राज्यात सत्ता व लोकसभेत २७ खासदार निवडून आणले होते. पण लौकरच त्यांचे अपघाती निधन झाले आणि आंध्रप्रदेशात त्यांच्याअभावी कॉग्रेस पक्ष पोरका होऊन गेला.

   तिथे राजशेखर यांनी आपले इतके समर्थक निर्माण केले होते, की कॉग्रेस पक्षावर दिल्लीतील श्रेष्ठींची हुकूमत उरलेली नव्हती. तिथला कॉग्रेस पक्ष ही रेड्डी कुटुंबाची खानदानी मालमत्ता होऊन गेली होती. त्यामुळेच पित्याच्या निधनानंतर राजशेखरपुत्र जगनमोहन याने आपल्या समर्थकांमार्फ़त रान उठवून थेट मुख्यमंत्री पदावर दावा केला होता. तो नाकारण्यातून आपले प्रभूत्व आंध्रच्या कॉग्रेसवर निर्माण करण्याचा जो डाव सोनिया खेळत गेल्या; तोच त्यांच्यावर मग उलटत गेला आहे. आज वेगळ्या तेलंगणा राज्याच्या निर्णयातून तिथे कॉग्रेसच जी धुळधाण होताना दिसते आहे, त्याची हीच पार्श्वभूमी आहे. जगनला शह देण्याच्या राजकारणाचे विपरित परिणाम आज दिसत आहेत. त्याला पंखाखाली ठेवला असता तर निदान त्याला श्रेष्ठींचे निर्णय नाकारता आले नसते किंवा स्वत:ची ताकदही उमगली नसती. पित्याच्या निधनानंतर त्याला संपवण्यासाठी जितकी त्याची कोंडी करण्यात आली; तितके कोंडी फ़ोडण्याचे प्रयत्न त्याला करावे लागले आणि त्याला आपल्या शक्तीचा साक्षात्कार होत गेला. त्याला सहानुभूतीही मिळत गेली आणि गांधी घराण्याची गुलामी करायची सवय जडलेल्या कॉग्रेसजनांना रेड्डी खानदानाचे गुलाम व्हायला वेळ लागला नाही. मग त्याला शह देण्यासाठी चिरंजिवी याचा प्रजाराज्यम पक्ष विलीन करून घेण्यात आला. त्यातूनही साधले नाही, तेव्हा तेलंगणा राज्य वेगळे करून तिथल्या मतांची बेगमी करण्याचा डाव खेळला गेला. तिथे तेलंगणा समितीने बाजी लावली असल्याने बदलते वारे ओळखून कॉग्रेसजन समितीत दाखल झाले. उरलेल्या आंध्रप्रदेशात रेड्डीपुत्र प्रभावी होत गेला. त्यात दुर्बळ झालेले चंद्राबाबू सेक्युलर टोपी उतरून मोदीकडे वळले. एकूण कॉग्रेसच्या चाणक्यांनी स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला आहे.

   आज तेलंगणाचा निर्णय कॉग्रेसच्याच मंत्रीमंडळाने घेतला असूनही बदल्यात मते मिळणे दूर; त्यांच्याच पक्षाचा त्यातून बोजवारा उडालेला आहे. त्यांचेच खासदार आणि आमदार त्या निर्णयाच्या विरोधात उभे ठाकले आहेत व पक्षाला रामराम ठोकत आहेत. दुसरीकडे तिथला कॉग्रेसचाच मुख्यमंत्री विभाजनाच्या विरोधात पक्षश्रेष्ठींना झुगारू लागला आहे. म्हणजेच विभाजनाचे श्रेय मिळवण्याच्या नादात कॉग्रेसने आपलेच नुकसान सगळीकडून करून घेतले आहे. ज्या मोदीमुळे आज पक्षासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे, त्याला तोंड देताना लोकसभेतील जागा वाढवण्याची गोष्ट दुर राहिली; आहेत त्याच टिकवणे अशक्य होऊन बसले आहे. कारण आंध्रात दुर्बळ असलेल्या भाजपाला म्हणजे पर्यायाने मोदींना तिथे दोन नवे समर्थक कॉग्रेसी चाणक्यांनी पुरवले आहेत. चंद्राबाबू तर सरळ मोदींच्या व्यासपीठावर जाऊन बसले आणि जगनमोहनने मोदींकडून अपेक्षा व्यक्त करण्यापर्यंत मजल मारली आहे. तिसरीकडे तेलंगणा राज्य मिळवणार्‍या चंद्रशेखर राव यांनी मागल्या खेपेसच भाजपासोबत जाऊन दाखवलेले आहे. म्हणजे ज्या आंध्राने मागल्या लोकसभेत कॉग्रेसची सत्ता मजबूत करण्याचे काम केले होते, तिथेच आज पक्षाला दुबळा करण्यात कॉग्रेसचे महत्वाकांक्षी चाणक्य यशस्वी ठरले आहेत. विनाशकाले विपरित बुद्धी म्हणजे नेमके काय, याचा अर्थ कोणाला समजून घ्यायचा असेल; तर त्याने गेल्या दहा वर्षाचे आंध्रातील व मागल्या दोन वर्षातील देशभरचे कॉग्रेसचे राजकारण अभ्यासावे. आपल्याच पायावर कुर्‍हाड मारण्याचे इतके अफ़लातून डावपेच दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाहीत. अन्य राज्यात आपले बळ वाढवणे अशक्य असताना, आपल्या एका मजबुत राज्याचा बोजवारा कॉग्रेसने आंध्रप्रदेशात उडवून दाखवला आहे.

No comments:

Post a Comment