Friday, October 18, 2013

मतचाचण्यांचा सावळागोंधळ



   याच आठवड्यात दोन वृत्तवाहिन्यांनी आगामी लोकसभेच्या दृष्टीने सामान्य माणूस कसा विचार करीत आहे, त्याचा नमूना चाचणी अहवाल सादर केला. त्य दोन्ही वाहिन्यांनी एकाच संस्थेकडून मतचाचणी करून घेतली होती आणि त्यानुसार आपापले मतांचे व जिंकल्या जाणार्‍या जागांचे अंदाज सादर करून त्यावर आठ महिन्यानंतर देशातली राजकीय स्थिती काय असेल; त्याबद्दल मतप्रदर्शन केले. मोठमोठे जाणकार अभ्यासक पत्रकार आणि विविध पक्षाचे प्रवक्ते त्या प्रदिर्घ चर्चेत सहभागी झालेले होते. मजेची गोष्ट अशी असते, की आपण सादर करीत आहोत ती निव्वळ मतचाचणी असून प्रत्यक्ष निवडणूकीचे इकाल लागलेले नाहीत; याचे भान यातल्या राजकीय अभ्यासकांना नसते. त्यामुळेच निकाल लागलेलेच आहेत आणि त्यात अमुक एका पक्षाला इतक्या जागा किंवा मते मिळालेलीच आहेत; अशा थाटात हे अभ्यासक बोलत असतात. मात्र प्रत्यक्ष राजकारणात वावरणार्‍या पक्षाच्या प्रतिनिधी वा प्रवक्त्याची गोष्ट संपुर्णपणे वेगळी असते. त्याच्यासाठी निवडणुका वा त्यासाठी कौल देणारा मतदार, हा अभ्यासाचा नव्हेतर व्यवहाराचा विषय असतो. म्हणूनच मग अभ्यासक व प्रवक्ते यांच्यात प्रत्येक आकडा किंवा मुद्दा, मतभिन्नतेचा होऊन जातो. त्यातून अनावश्यक खडाजंगी मात्र निर्माण होते. कुठल्याही विषयावर किंवा आकड्यावर त्या चर्चेतील अभ्यासक पत्रकार व पक्षाचे प्रतिनिधी यांच्यात एकमत व सहमती होत नाही. मग इतक्या गंभीर चर्चेचे स्वरूप उखाळ्यापाखाळ्या काढण्यापलिकडे जात नाही. याचे पहिले कारण, त्यात सहभागी होणार्‍या कुणालाही आपण चुकतो वा चुकलो, हेच मान्य नसते. सहाजिकच असे कार्यक्रम बघणार्‍यांसाठी केवळ मनोरंजनापेक्षा अधिक महत्वाचे उरलेले नाहीत.

   परवाच्या मतचाचणीची दुसरी एक गंमत आहे. सी-व्होटर संस्थेने केलेल्या मतचाचणीच्या आधारे वाहिन्यांवरील चर्चा रंगल्या होत्या. त्यातली एक वाहिनी होती ‘टाईम्स नाऊ’. त्याच वाहिनीच्या गटाचे एक वृत्तपत्र आहे इकॉनॉमिक टाईम्स. त्यानेही केवळ उत्तरप्रदेश व बिहार या दोन प्रमुख राज्यांपुरती मतचाचणी अन्य एका संस्थेकडून करून घेतली. एकाचवेळी दोन्ही चाचण्यांचे निष्कर्ष समोर आणले गेले आहेत. पण दोन्हीचे आकडे व निष्कर्ष भलतेच वेगळे आहेत. उदाहरणार्थ ‘टाईम्स नाऊ’च्या चाचणीनुसार त्या दोन्ही हिंदी भाषिक मोठ्या राज्यामध्ये मोदींचा प्रभाव दिसत असला, तरी मोदींच्या लोकप्रियतेची लाट वगैरे काही नाही. पण त्यांच्याच वृत्तपत्राने घेतलेल्या चाचणीनुसार त्याच दोन्ही राज्यात मोदीलाट उसळली आहे. त्या दोन राज्यात दोन चाचण्यात एकाच दिवशी भाजपाने जिंकायच्या दाखवलेल्या जागा किती फ़रकाच्या असाव्यात? एक चाचणी म्हणते दोन राज्यातल्या १२० पैकी भाजपाला फ़क्त ३१ जागा मिळतील तर दुसरी चाचणी म्हणते ४४ जागा मिळतील. खरेच मतचाचण्या शास्त्रशुद्ध असतील तर मग एकाच वेळच्या चाचणीत इतका फ़रक कसा पडतो? त्याचे कारण कोण चाचणी करतो, कसा नमूना घेतला जातो आणि मतदारांना कुठले प्रश्न विचारून त्यांचे मत अजमावले जाते; त्यानुसार आकडे हाती लागत असतात. शिवाय पुन्हा चाचणी घेणारे व त्यातून मिळालेल्या संकेताचे आकड्यात रुपांतर करणारे, किती पुर्वग्रहदुषित असतात त्यावरच मग निष्कर्ष अवलंबून असतात. हा फ़रक पडण्याचे कारण चाचण्या घेणारे पक्षनिरपेक्ष नसतात. त्यामुळे मग आकडे योग्य असले व टक्केवारी नेमकी असली, तरी त्यानुसारच्या जागांचे गणित फ़सत जाते.

   आजकालच्या अशा राजकीय अभ्यासक व चाचणीकारांची गल्लत खुप झाली आहे. आधीच्या मतदानाचे वास्तविक निकाल लक्षात घेतले, तर मतदाराचा कौल व कल यात सत्य शोधता येऊ शकेल. मतदार चाचणीमध्ये कल दाखवत असतो, तोच त्याचा कौल असू शकतो; असे अजिबात नाही. पक्षाचा वा नेत्याचा बांधील असा मतदार बदलत नाही. पण परिस्थिती, गरज व काळानुसार बदलणारा खुप मोठा मतदारवर्ग आहे आणि तोच कुठल्याही निवडणूकीच्या निकालांत उलथापालथ घडवित असतो. आज राजकारणावर व लोकमतावर नरेंद्र मोदी यांची जादू चालताना दिसते आहे. त्याचबरोबर आजच्या सत्ताधार्‍यांच्या बाबतीतली नाराजीही लोकमताला प्रवृत्त करीत असते. पण कॉग्रेसवर नाराज असलेला प्रत्येक मतदार मोदी वा भाजपाला मत देतोच असे नाही. तो विविध पर्यायातून निवड करीत असतो. मागल्या खेपेस नाराज असूनही कॉग्रेसला पर्याय नाही म्हणून राजकीय स्थैर्यासाठी भाजपाला मत नाकारणारा, आज मोदींसाठी भाजपाकडे वळू शकतो. तसाच अन्य लहानमोठ्या पक्षाकडे गेलेला मतदारही भाजपाकडे मोदींसाठी येऊ शकतो. म्हणूनच भाजपा म्हणून मिळणारी मते आणि मोदींची लोकप्रियता यांच्या टक्केवारीमध्ये फ़रक पडतो. कॉग्रेसला मिळणार्‍या मतांपेक्षा राहुल गांधींच्या लोकप्रियतेची टक्केवारी म्हणूनच कमी दिसते. नेत्याची लोकप्रियता पक्षाचे पारडे जड करू शकतात तशीच हलकेही करू शकतात. त्याखेरीज परिस्थितीची लाचारीही काही प्रमाणात मते फ़िरवित असते. भाजपा वा मोदींपेक्षा प्रभावी पर्याय नसल्यानेही काही मते त्यांना मिळू शकतात, तर राजकीय स्थैर्यासाठीही अप्रिय असूनही मोदींना लोक झुकते माप देत असतात. म्हणूनच चाचणीतून मिळणारा कल हा राजकीय संदर्भ, परिस्थिती व अलिकडल्या निवडणुकीचे निकालाचे निकष तपासून जागांची शक्यता शोधणे आवश्यक असते. तिथेच मतचाचण्यांचे आकडे फ़सतात.

No comments:

Post a Comment