Thursday, October 3, 2013

शौचालय आणि देवालय     काही काळापुर्वी कॉग्रेसचे नेते केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी जे शब्द वापरले होते, तेच आणि जवळपास तसेच शब्द गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी उच्चारले, तर त्याचे वेगवेगळे अर्थ होतात काय? मोदी यांनी देवालयापेक्षा शौचायलाला प्राधान्य असल्याचे सांगितले आहे आणि सहाजिकच मंदिरात अडकून पडलेला पक्ष अशी ज्याची दिर्घकाळ प्रतिमा झालेली आहे; त्याच पक्षाचे मोदी हे प्रमुख नेता असल्याने त्यांच्या विधानाने धुरळा उडाला, तर नवल नाही. त्यांच्या विधानाची रमेश यांच्या विधानाशी तुलना झाली वा सांगड घातली गेली तर आश्चर्य नाही. कारण रमेश जेव्हा असे बोलले, तेव्हा त्यांच्यावर भाजपाचेच नेते प्रवक्ते अधिक मोदी समर्थक तुटून पडले होते. मग आता तशाच विधानासाठी मोदींचे समर्थन कसे करायचे? जर रमेश चुकले असतील तर मोदीही चुकले म्हणावे लागणार. मोदी समर्थक व हिंदूत्ववाद्यांची तशीच गोची झाल्यास नवल नाही. कारण आजकाल भाषा व शब्दांचा असा विपर्यास ही नित्याची बाब झाली आहे. शब्द वा भाषेचा हेतूच विसरला गेला; मग यापेक्षा वेगळे काही होऊ शकत नाही. भाषा किंवा शब्दांचा हेतू परस्परांचा समजून घेण्याचा व काही संकेत देण्याचा असतो. म्हणूनच शब्द व भाषेचे संकेत व अर्थ त्या हेतूनुसार बदलत असतात. कुणा मुलाने विद्यार्थ्याने गुणवत्ता दाखवली पारितोषिक मिळवले, तर त्याचे पालक शिक्षक ‘शहाणा आहेस’ म्हणून त्याची पाठ थोपटतात. तेव्हा त्या मुलाची छाती अभिमानाने फ़ुगते. पण दुसर्‍या कुणा मुलाने मुर्खपणा केला वा अजागळ वागला, तर उपरोधाने ‘शहाणाच आहेस’ असेही म्हटले जाते. तेव्हा त्या मुलाला त्याचा अभिमान वाटतो की अवमान वाटतो? शब्द तेच असतात; पण त्यातून पोहोचलेले संकेत किती टोकाचे भिन्न असतात ना?

   बाकीच्या जगातली गोष्ट वा शब्द बाजूला ठेवा. खुद्द मोदींचाच किस्सा घ्या. पुर्वी केव्हातरी आपल्या भाषणात त्यांनी वारंवार पाकिस्तानचे तात्कालीन हुकूमशहा अध्यक्ष जनरल मुशर्रफ़ यांचा उल्लेख ‘मियॉ’ असा केला होता. त्याबद्दल आजही त्यांना अनेक सेक्युलर मंडळी दोषी मानतात. त्यातून मुस्लिम समाजाला हिणवायचेच होते, असे आरोप करतात. मग मियॉ हा अपशब्द आहे काय? कारण बहुतेक मुस्लिमांचा संवादात अमुकतमूक मियॉ असाच उल्लेख येत असतो. पत्नीही आदराने पतीचा मियॉ असाच उल्लेख करते. मग मोदींनी तो शब्द अपशब्दासारखा वापरल्याचा आरोप कशाला? तर मोदी मुस्लिमविरोधी आहेत, असे त्यामागचे गृहित आहे. सहाजिकच त्यांच्या शब्दांकडेच संशयाने बघितले जाते. तशीच नेमकी कॉग्रेसचे सेक्युलर नेते जयराम रमेश यांची स्थिती आहे. ते भाजपाबद्दल बोलताना जेव्हा मंदिर शब्द उच्चारतात, तेव्हा त्याचा गर्भितार्थ ‘अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर’ असाच होतो. कुठले तरी एक मंदिर असा होऊ शकत नाही. म्हणूनच रमेश जेव्हा मंदिरापेक्षा शौचालयाला प्राधान्य आहे असे बोलतात, तेव्हा गावातल्या संडासापेक्षा अयोध्येतले राममंदिर दुय्यम ठरवायचा त्यांचा हेतू असतो. सहाजिकच त्याचा राग येणे स्वाभाविक आहे. कुठल्याही गावातील संडासाची तुलना अयोध्येतील पुरातन राममंदिराची तुलना करण्यामागे श्रीरामभक्तांना दुखावण्याचाच त्यांचा हेतू असतो. पण तेच शब्द मोदी बोलतात, तेव्हा त्यांनी उच्चारलेले शब्दातील ‘देवालय’ शब्दाचा इशारा अयोध्येतील रामामंदिराकडे असतो काय? गावागावात मंदिरे बांधण्यावर लोक पैसे खर्च करतात आणि शौचालये बांधण्यात मागे असतात, हेच त्यांना सुचवायचे असते. त्याचा गावात मंदिर बांधण्यापेक्षा शौचालयाला प्राधान्य असा असतो.

   जयराम रमेश आणि नरेंद्र मोदी यांनी समान शब्द वापरले, तरी त्यांच्या हेतूप्रमाणे त्यांचे अर्थ बदलत असतात. म्हणूनच त्या हेतूकडे पाठ फ़िरवून मोदींच्या विरोधकांनी मुद्दाम त्या दोघांच्या शब्दांची तुलना करून विपर्यास केला तर बिघडत नाही. कारण तेच त्यांचे काम आहे. तोच विरोधकांचा हेतू असतो. परंतु स्वत:ला हिंदूत्ववादी वा मोदी समर्थक मानणार्‍यांनी अशा विपर्यासाच्या आहारी जावे किती, हा प्रश्न आहे. मोदींना खरेच रमेश यांच्या ‘अर्थाने’ तसे बोलायचे असते, तर आधी त्यांनी सावधानतेची भाषा केलीच असती. हिंदुत्ववादी असे बिरूद नावामागे लागलेले असताना आपण ‘धाडसी’ विधान करीत आहोत, असे मोदी अगोदरच बोलतात; तेव्हा आपल्या विधानाचा विपर्यास होणार याची ते पुर्वसुचनाच देत आहेत. म्हणजेच रमेश यांनी ज्या खोचक हेतू व अर्थाने शब्दांचा वापर केला, तसा आपला हेतू वा संकेत नाही; हेच त्यांनी सुचवले आहे. गावातल्या मंदिरापेक्षाही तिथल्या आरोग्याला म्हणजे ते आरोग्य जपणार्‍या शौचालयाला जास्त महत्व आहे, हेच त्यांना सांगायचे आहे. त्याचा विपर्यास विरोधकांनी करणारच. तेच त्यांचे काम असते. पण समर्थकांनी आपल्या नेत्याच्या विधानाचा विपर्यास करावा काय? राहुल गांधी यांनी आपल्याच सरकारला मुर्ख ठरवले, त्याचेही लज्जास्पद समर्थन व सारवासारव करणार्‍यांनी मोदींच्या ताज्या विधानाचा असा विपर्यास करावा काय? जेव्हा असे चालते आणि त्यालाच बौद्धिक वैचारिक युक्तीवाद समजले जाते; तेव्हा वास्तवात बौद्धिक अधोगतीच सुरू झालेली असते. मोदींच्या नेतृत्वाचा उदय झाल्यापासून त्या अधोगतीची चाहुल माध्यमे व चर्चांमधून लागलेलीच होती. ताज्या घटनेनंतर त्याचीच खात्री पटू लागली आहे. त्यात मोदी समर्थक व मोदी विरोधक समान पातळीवरच भरकटल्याची साक्ष मिळते.

3 comments:

  1. atishay marmik bhau aaj tumhi kamal karoon takli.

    ReplyDelete
  2. मोदी अजिबातच हिंदुत्ववादी नाहीत , पण ते १ खरे सेक्युलर आहेत असेही वाटत नाही . कारण मन्दिराबरोबर मशिदीचा व चर्च चा उल्लेख त्यांनी का केला नाही ? दिल्लीचे वारे भल्या भल्यांना बिघडवते हेच खरे .

    ReplyDelete
  3. मोदी फक्त म्हणतान vision हवं पण मी कधीच कोणताही vision त्यांच्या तोंडून ऐकलं नाही ..... आमच्या बारामती करांनी बारामतीच्या नावाखाली महाराष्ट्र लुटला ... आता हे गुजरातच्या नावाखाली देश लुटणार .... खोटं बोल खर रेटून बोल अशीच यांची पद्धत .... महाराष्ट्राने ५० वर्षात २६ मुख्यमंत्री केले आणखी गुजरात ने १४ ... तिथे पण BJP सत्तेत येण्यापूर्वी congress च होती ....मग त्यांना म्हणायचं आहे का कि महार्ष्ट्रातले सगळे मूर्ख आहेत .... मग महाराष्ट्र 1 नंबरचा राज्य कस आहे ... अहो आम्ही सहकारातून हे राज्य निर्माण केला .... सगळ्या देशाला साखर फक्त महाराष्ट्र पुरवू शके एवढा आम्ही साखरेच उत्पन्न घेतो ....म्हन्नोन आम्ही त्याचा धिंडोरा नाही पिटत ....बघेल तेंव्हा गुजरात असा आणि तसं ... तिथल्या आदिवासी लोकांना विचार की वाट लावली त्यांची .... कवडी मोल दराने त्यांच्या झामिनी घेवून उद्योगपतींच्या घशात घातल्या हे नाही सांगावसं वाटत त्यांना सभेत ... फक्त विकास केला ... देशाच की करणार आहात हे पण सांगा कि .....मोदी समर्थक तर height चा करतात फक्त नमो नमो करून ...

    ReplyDelete