Sunday, October 27, 2013

रसातळाला गेलेले तारतम्य   रविवारी पाटणा येथे भाजपाने मोठा मेळावा योजला होता. त्याची तयारी कित्येक महिने आधीपासून सुरू होती. इतके असूनही तिथे जिहादी घातपात व स्फ़ोट झालेच. त्यासाठी मग कोणाच्या डोक्यावर खापर फ़ोडायचे? असे खापर कोणाच्या डोक्यावर फ़ोडून आपण म्हणजे भारतीय सुरक्षित होणार आहोत काय? आपल्याला समोर जे दिसते आहे आणि त्यातून काही सुचवले जात आह; त्याकडे डोळसपणे व समंजसपणे बघायची आपल्यात कुवत नसेल तर मग आपल्याला देवही वाचवू शकणार नाही. बाकीच्या तपशीलात नंतर जाऊ. स्फ़ोट किती झाले, कोणी केले, त्यामागची प्रेरणा कोणाची हे विषय बाजूला ठेवा. ही आग कोण लावतो आहे आणि त्यासाठी चिथावणी कोण देतो आहे; त्याचाच आधी विचार करू. त्यासाठी कुणा कुशाग्र बुद्धीमंताच्या विश्लेषणाची अथवा चतुर डिटेक्टीव्हची गरज नाही. दोन सभा आपल्यासमोर आहेत आणि त्यातली दोन भाषणेच आपल्या समोर आहेत. त्यातली विधाने व वक्तव्ये नुसत्या नि:ष्पक्ष दृष्टीने तपासली, तरी अशा हिंसाचाराचे चिथावणीखोर राजकारण कोणाला करायचे आहे; ते लपून रहात नाही. तीनच दिवस आधी राजस्थानात एका सभेत भाषण करताना अशा हिंसाचाराचे आपण व आपले कुटूंबिय बळी आहोत, असे भांडवल करताना राहुल गांधी काय म्हणाले होते? आधी माझ्या आजीला मारले. नंतर माझ्या पित्याला मारले. हे लोक उद्या मलाही मारून टाकतील. असे विधान त्यांनी करण्याची काय गरज होती? कारण मागल्या दहा  वर्षात राहुल गांधी सार्वजनिक जीवनात खुलेआम वावरत आहेत. पण त्यांना ठार मारण्याची धमकी वा शक्यता कुठूनही व्यक्त झालेली नाही. पण त्याच काळात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याच्या अनेक योजनांची माहिती पोलिस व गुप्तचरांनी कित्येकदा समोर आणली आहे.

   रविवारी मोदी यांची पाटण्यात भव्य सभा होती आणि त्यासाठी काही महिने तयारी चालली होती. त्याचवेळी त्या मेळाव्याला अपशकून घडवण्याचा जोरदार प्रयास तिथल्या सत्ताधार्‍यांनीच चालविला होता. आधीच ठरलेल्या त्या सभेला सुरक्षा व्यवस्था देण्याची जबाबदारी राज्यसरकार म्हणजे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची होती. त्यांनी मुद्दाम मेळाव्याच्या आदल्या दिवशी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना समारंभाचे आमंत्रण देऊन; एक दिवस पाटण्यात मुक्काम करायचा आग्रह धरला. मग राष्ट्रपती पाटण्यात असल्याने मेळाव्याला सुरक्षा देता येणार नाही, असा कांगावा सुरू झाला. म्हणजेच नितीशकुमार जाणीवपुर्वक मोदींना अपशकून करायला टपलेले होते. पण भाजपा नेत्यांनी राष्ट्रपतींच्या नजरेला सत्य आणून दिल्यावर त्यांनीच त्यातून अंग काढून घेतले आणि शनिवारी रात्रीच पाटणा सोडायचे मान्य केले. मुद्दा इतकाच, की मेळावा भव्य होणार आणि त्याला सुरक्षा नाकारायची इच्छा आधीच स्पष्ट झाली होती. त्याचे प्रतिबिंब मग पुढल्या घटनाक्रमामध्ये पडलेले आहे. पण तोही मुद्दा सध्या बाजूला ठेवू या. कारण मेळाव्याच्या दोनतीन तास आधी सभास्थानी व पाटण्यात बॉम्बस्फ़ोट मालिका घडलेली आहे. त्यात रंगेहात पकडलेल्या आरोपीने मोदी हेच आपले लक्ष्य असल्याचे व मुझफ़्फ़रनगरचा सूड म्हणून असे घातपात केल्याचे स्पष्ट सांगून टाकले आहे. पण इतक्या हिंसक घटनेनंतरही तिथे भाषण करणार्‍या मोदींनी आपल्या भाषणात कुठेही त्याचा उल्लेख केला नाही, की आपल्या जीवावर कोणी उठल्याचे भांडवल केले नाही. मात्र भाषणाच्या अखेरीस शांतपणे अपघातही होऊ न देता घरोघरी पोहोचण्याचे आपल्या चहात्यांना आवाहन केले. इथे राहुलसह तमाम विरोधक व खुद्द मोदी यांच्यातला जमीन अस्मानाचा फ़रक लक्षात येऊ शकतो.

   एकीकडे एक नेता आपल्याला मारले जाईल असे अकारण टाहो फ़ोडून सांगतो आहे आणि लोकभावना भडकवण्याचा जाणीवपुर्वक प्रयास करतो आहे. उलट दुसरीकडे दुसरा नेता आहे, ज्याच्या सभा मेळाव्यावर प्रत्यक्षात बॉम्बहल्ला झालेला आहे आणि त्यालाच लक्ष्य करण्यासाठी हल्ला झाल्याचे पुरावे हाती आले आहेत; असा नेता मात्र त्याबद्दल संयमाने मौन पाळतो आहे. आपल्यासमोर असे दोन नेते आहेत. त्यातून कोणाला हिंसा माजवायची आहे व त्यातून सत्तेची पोळी भाजून घ्यायची आहे, ते ओळखता येऊ शकते. दुसरीकडे कोणाला आपला जीव धोक्यात असला तरी त्यापेक्षा सामान्य जनतेची सुरक्षा व सामाजिक शांततेची अधिक फ़िकीर आहे; त्याचा स्पष्ट पुरावा मिळू शकतो. ज्या आवेशात राहुल राजस्थानात ‘मुझेभी मार डालेंगे’ असे म्हणत होते, त्यातून चिथावणी द्यायची होती, हे लपून रहाते काय? उलट मोदींच्या मेळाव्याच्या जागी नेमक्या वेळी प्रत्यक्ष स्फ़ोट घडवले गेले; तरी त्यांनी आपल्या जीवावर कोणी उठला आहे, असा आरोपही केला नाही. केला असता तर त्यांना कोणी नावे ठेवू शकले नसते. पण त्यापासून राजकीय लाभ उठवण्याचा मोह त्यांनी टाळलेला आहे. उलट राहुल गांधी वीस-तीस वर्षापुर्वीच्या आपल्या कुटुंबियांच्या हत्येचे भांडवल आजही करू बघत आहेत, याचीच साक्ष मिळते ना? अकरा वर्षापुर्वी झालेल्या दंगलीसाठी मोदींना अखंड धारेवर धरणार्‍या कुणाही बुद्धीमंत व पत्रकाराला हा लक्षणीय फ़रक का दिसू नये? त्याची वाच्यता कशाला होऊ नये? सातत्याने दंगलीसाठी मोदींना झोडण्यात बुद्धी खर्ची घालणार्‍यांकडे तेच मोदी अत्यंत कमालीचे संयमी व समंजस वागताना दिसले; तर पाठ थोपटण्याची दानतही राहिली नाही काय? राहुल हा पोरकटच आहे. पण इथल्या सेक्युलर बुद्धीचे दिवाळे वाजल्याचाच हा पुरावा नाही काय?

2 comments:

  1. Perfect analysis. As usual.

    ReplyDelete
  2. भाऊ,मोदीविरोधाची कावीळे झालेल्या मिडियाला अश्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायलाच आवडते,,नव्हे तर ते त्यांचे आद्य कर्तव्य ठरते.

    ReplyDelete