Sunday, October 6, 2013

एकविसाव्या शतकातला चमत्कार

   गेल्या दहा अकरा वर्षात गुजरातचा विकास झाला याबद्दल कुठे तक्रार नव्हती. आक्षेप होता तो दंगलीत मुडदे पाडून झालेला विकास काय कामाचा, असा होता. निदान मागल्या पाचसहा वर्षात मोदींनी जे विकासाचे दावे केले; त्यावर कोणी खोटेपणाचा शिक्का मारला नव्हता. आरंभीच्या काळात तर सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या राजीव गांधी फ़ौंडेशनने देशातील सर्वोत्तम प्रशासन व विकास करणारे राज्य; असे प्रमाणपत्रच मोदींना व गुजरातला दिलेले होते. अर्थात त्याविषयी कुठे गाजावाजा झाला नाही. कारण संस्था सोनियांची होती, त्यामार्फ़त मोदींना प्रमाणपत्र दिले म्हणायचे कसे? म्हणून कोंबडे झाकायचा उद्योग झाला होता. शिवाय तेव्हा विकासाला अर्थ नव्हता. दंगल म्हणजे मोदी हा सिद्धांत होता. म्हणूनच हे प्रमाणपत्र देण्यात आले, त्याची बातमीही मुख्यप्रवाहातील माध्यमात आली नाही. दुसरीकडे विकासाचे दावे फ़ेटाळण्यापेक्षा दंगलीतल्या मुडद्यांवर केलेला विकास; अशी संभावना केली जात होती. पण विविध मार्गांनी गुजरातच्या विकासाला लोकमान्यता व जगातील अन्य देशातून मान्यता मिळू लागल्यावर, त्याचप्रमाणे दंगलीच्या अपप्रचाराला प्रतिसाद मिळेनासा झाल्यावर; मोदींच्या विकासाच्या दाव्याला आव्हान देण्याची मोहिम उघडली गेली. त्यातला मोदी विरोधकांचा पहिला दावा असा होता, की गुजरातच्या विकासाचे श्रेय मोदींचे नाही. कारण ते आधीपासूनच विकसित राज्य आहे आणि आधीपासून कॉग्रेस राजवटीत राबवलेल्या योजनांच्या विकासाचे श्रेय मोदी लुबाडत आहेत, वगैरे. म्हणजेच विकास झालाच नाही, असा प्रतिदावा कोणी केला नव्हता; तर विकासाच्या श्रेयावर आक्षेप होता. की तेव्हा मोदी बरोबरच त्यांचे विरोधकही धडधडीत खोटे बोलत होते? खरे काय आणि खोटे कोण?

   अवघ्या दोनतीन महिन्यांपुर्वीचे कॉग्रेसच्या प्रवक्त्यांपासून सेक्युलर विद्वानांचे दावे तपासा. त्यांनी कधीच विकास झाल्याचा इन्कार केलेला नव्हता. तेव्हा हे लोक सत्य बोलत असतील, तर आज त्यांचे दावे खोटे म्हणायला लागतील. मोदींनी सत्तेवर आल्यापासून काहीच मोठे केलेले नाही, हेच आग्रहपुर्वक त्यांचे विरोधक सांगत होते. त्यात तथ्य असेल तर मग आजच्या बालकांच्या कुपोषणाचेही श्रेय मोदीपुर्व कॉग्रेस राजवटीला द्यावे लागेल. आज गुजरातमध्ये जे काही भलेबुरे झालेले आहे; त्याचे श्रेय मोदींच्या ऐवजी आधीच्या कॉग्रेस राजवटीचे असायला हवे. तर मग आज जो विचका, बोजवारा उडालेला दिसतो, त्याचेही श्रेय कॉग्रेसला द्यावेच लागेल. विकासा्चा धनी मोदी नसेल, तर विनाश वा समस्यांचेही श्रेय मोदींना कसे देता येईल? पण सध्या तेच चालू आहे. गुजरातमधल्या कुपोषणाचे खापर मोदींच्या माथी फ़ोडायचे आणि विकासाचे श्रेय मात्र कॉग्रेसचे. मोदींच्या विरोधकांचे विकास वा मागासलेपणाचे निकष नेमके काय आहेत, त्याचाच पत्ता लागत नाही. कारण त्यातला कुठलाही निकष वापरायला गेल्यास, कुठेतरी मोदींना थोडेसे श्रेय तरी द्यावेच लागेल ना? म्हणून मग सोयीनुसार त्यांच्या विरोधकांचे निकष बदलत असतात. मग विकास झाल्याचे नाकारता येत नसेल, तर तो विकास कॉग्रेसच्या राजवटीत झालेला असतो. आणि विकास झालेला नसेल व लोकांना समस्या सोसाव्या लागत असतील, तर त्या समस्या मोदींच्या राजवटीत निर्माण झालेल्या असतात. मग असा प्रश्न पडतो, की कॉग्रेसच्या राजवटीत गुजरातमधील बालके चांगली पोषक आहार खाऊन सुदृढ झालेली होती आणि मोदींचे राज्य आल्यावरच त्यांच्यावर उपासमारीची वेळ आले आहे का? की आधीपासूनच गुजरातच्या बालकांचे कुपोषण चालू होते?

   एकूण मोदीविषयक त्यांच्या विरोधकांची स्थिती बघितल्यास असे दिसते, की त्यांना मोदींना कुठलेच श्रेय द्यायचे नाही. एक गुजरातमध्ये दंगल झाली तिचे श्रेय मात्र प्रत्येकजण मुख्यमंत्री म्हणून मोदींना देत असतो. आता दंगलीचे श्रेय वा खापर मोदींच्या डोक्यावर फ़ोडायचे असेल तर तोही निकष मान्य करूया. पण मग त्याच निकषाने गुजरातच्या प्रत्येक दंगलीसाठी त्या त्या वेळचा मुख्यमंत्री व सत्तारुढ पक्षाच्या डोक्यावरच दंगलीचे खापर फ़ोडावे लागेल. पण तसेही कोणी मोदी विरोधक करणार नाही. जणू मोदी मुख्यमंत्री होण्याच्या आधी गुजरात नावाचे राज्यच भूतलावर अस्तित्वात नव्हते आणि असेलच तर त्याचा झालेला विकास मोदींच्या मुख्यमंत्री होण्यापुर्वीचा आहे आणि तिथे कधीच दंगल झालेली नव्हती. काही बिघडले असेल तर त्याला मात्र मोदीच जबाबदार आहेत, असाच एकूण विरोधी सूर असतो. मात्र गेल्या दहा वर्षात तिथे एकही दंगल झाली नाही, त्याचे श्रेय मोदींना असू शकत नाही. काही मुस्लिम विचारवंत म्हणतात, मोदींच्या कारकिर्दीत गुजरातमध्ये दंगल झाली नाही, त्याचे श्रेय मोदींना नाही. गुजरातचा मुस्लिम भयभीत आहे, दबलेला आहे, म्हणून ही शांतता आहे. त्याचा अर्थ काय घ्यायचा? मुस्लिमांना भयभीत ठेवले तर दंगली होत नाहीत आणि मुस्लिमांना निर्भय राहू दिले तर ते दंगल करतात, असे या मुस्लिम विचारवंतांना म्हणायचे आहे काय? नरेंद्र मोदी हा एकविसाव्या शतकातला असा एक अजब चमत्कार आहे की त्याच्याविषयी बोलणार्‍या त्याच्या विरोधकांचे निकष क्षणोक्षणी बदलत असतात. सामना संपल्यावर त्याच सामन्याचे नियम ठरवावेत आणि त्यानुसार सामान्यातला विजेता ठरवण्याचे हे अजब तर्कशास्त्र असते.

1 comment:

  1. एकदम बरोबर, भाऊ. कॉंग्रेसची ही जुनीच सवय आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या बाबतीतही जेव्हा एखादी चांगली गोष्ट घडते तेव्हा तिचे श्रेय गांधी घराण्याचे असते. पण वाईट नकारात्मक गोष्टींचे अपश्रेय मात्र गांधी घराण्याचे नसते, त्यासाठी कॉंग्रेसमधल्या दुय्यम किंवा तिय्यम दर्जाच्या नेत्यांना जबाबदार धरले जाते. आपली बहुतेक प्रसारमाध्यमेही कॉंग्रेसधार्जिणी असल्यामुळे त्यांनाही चांगल्या गोष्टींचे श्रेय कॉंग्रेसला व नकारात्मक गोष्टींचे अपश्रेय भाजपाला व मोदींना द्यायची सवय लागली आहे.

    स्वतःची बुद्धी गहाण ठेऊन गांधी घराण्याची चापलुसी करणाऱ्यांकडून दुसरे काहीच अपेक्षित नाही.

    ReplyDelete