Sunday, November 3, 2013

कलकलाट केला काकांनी



  लता मंगेशकर यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात जाहिरपणे नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत अशी नुसती सदिच्छा व्यक्त केली आणि स्वत:ला बुद्धीमान व शहाणे म्हणवणारा वर्ग त्यांच्यावत तुटून पडला आहे. ज्या गायिकेवर अतोनात प्रेम केले तिचीच विनाविलंब निंदानालस्ती करण्याची अशी स्पर्धा होताना पाहिल्यावर सामान्य माणसाला त्याचे आश्चर्य वाटले तर नवल नाही. पण त्याहीपेक्षा सामान्य माणसाला इतक्या असहिष्णू प्रतिक्रिया अपेक्षित नसतात. ज्यांना आपण बुद्धीमान वा विचारस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते मानतो; त्यांनी एका नावाजलेल्या गायिकेच्या मतस्वातंत्र्यावर असा हल्ला कशाला चढवावा, त्याचेच मग सामान्यजनांना कोडे पडते. देशात अनेक उद्योगपती, मान्यवरांनी आजवर मोदींना अशाच शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्या विरोधातही अनेक जाणकार नामवंतांनी मतप्रदर्शन केलेले आहे. अमर्त्य सेन नामक अर्थशास्त्रज्ञ किंवा नावाजलेले साहित्यिक अनंतमुर्ती यांनी मोदींच्या विरोधात आपली कडवी मते मांडलेली आहेत. तेव्हा मोदी समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला होता. मग त्यांच्या मतस्वातंत्र्याचे जे कोणी समर्थक होते, त्यांना आज लतादिदीच्या स्वातंत्र्याचे समर्थन करावेसे कशाला वाटलेले नाही? तर त्यांची बुद्धीमत्ताही मोदीभक्ताप्रमाणे एका भूमिकेकडे गहाण पडलेली आहे. असे लोक कधी विचारस्वातंत्र्याचे समर्थक पाठीराखे नसतात. ते आपापल्या सोयीनुसार नियम व तत्वांचा वापर करून घेत असतात. पण त्याच्याही पलिकडे अशा लोकांना एका भयगंडाने पछाडलेले असते; हे विसरता कामा नये. आत्मविश्वास गमावलेले असे लोक कुठल्या तरी एका बाजूला चिकटून बुद्धीवादाचा मुखवटा लावून वावरत असतात. मार्टीन ल्युथरने अशा भयगंडाची स्पष्ट शब्दात कबुली दिलेली आहे.

   ख्रिश्चन धर्मातील सुधारणावादी बंडखोर प्रोटेस्टंट पंथाचा संस्थापक मार्टीन ल्युथर म्हणतो, ‘परमेश्वराचे नाव घेण्याइतका उत्साह माझ्या मनाला वाटत नाही; तेव्हा मी माझ्या शत्रूच्या, पोपच्या आणि त्याच्या हस्तकांच्या दगलबाजीच्या, त्यांच्या ढोंगबाजीच्या आठवणी आठवतो. या आठवणी जाग्या होताच, माझा संताप आणि द्वेष फ़ुलून येतो, माझा नैतिक अहंकार खुलतो आणि नव्या उत्साहाने मी देवाचे नाव घेऊ लागतो. माझ्या संतापाचा पारा वाढताच; परमेश्वरा, तुझ्या नावाचा जयजयकार असो, या भूतलावर तुझे राज्य येवो, मी तुझ्या मनासारखे करीन, ही प्रार्थना मी दुप्पट जोराने म्हणू लागतो.’ मोदी विरोधकांची मानसिकता नेमकी अशाच दुबळ्या आत्मविश्वासाचे द्योतक आहे. मोदींना विरोध करणार्‍यांचा स्वत:च्याच भूमिकेवर पुरेसा विश्वास नाही आणि आपल्या विचार भूमिकेबद्दल त्यांना खात्री राहिलेली नाही. म्हणूनच त्या भूमिकेला यशस्वी करण्यासाठी कार्यरत होण्यापेक्षा मोदी विरोधाचे बुडबुडे उडवण्यापलिकडे त्यांच्या हाती काही उपाय उरलेला नाही. मग अशा माणसांना आपण मोदी विरोधक आहोत, यापेक्षा आपण मोदीभक्त नाहीत; हे सिद्ध करण्यास सातत्याने प्रयत्नशील रहावे लागते. आपणही मोदींना स्विकारलेले नाही, हे स्वत:लाच पटवत रहाणे ही त्यांची गरज बनलेली आहे. त्यासाठी त्यांना आपल्या विचार व भूमिकांचा प्रसार-प्रचार, समर्थन करण्यापेक्षा मोदींच्या विरोधात निंदानालस्ती करण्याखेरीज गत्यंतर उरलेले नाही. मोदींना अपशब्द वापरले, तरच मग त्यांना आपल्या तथाकथित सेक्युलर विचारांच्या सामर्थ्याची अनुभूती होत असते. म्हणूनच असे लोक सातत्याने मोदीं विरोधाची संधी शोधत असतात, नसेल तर निर्माण करून मोदींच्या नावाने शंख करीत असतात. लतादिदींवरची टिका त्यातूनच आलेली आहे.

   ज्याला सेक्युलॅरिझमचे राजकारण म्हणतात, त्याचे गोडवे गाण्यासारखे काही उरलेले नाही. त्याचा फ़ोलपणा सामान्य जनतेप्रमाणेच आता त्या विचारधारेचे अवडंबर माजवणार्‍यांनाही लक्षात आला आहे. मागल्या दिडदोन दशकात सेक्युलर म्हणून जो राजकीय व सार्वजनिक जीवनाचा बट्ट्याबोळ करण्यात आला, त्याची अनुभूती खुद्द सेक्युलरांनाही आलेली आहे. म्हणूनच आग्रहपुर्वक त्या तथाकथित पुरोगामी राजकारणाचे ढोल पिटण्याची इच्छाशक्तीही हे लोक गमावून बसले आहेत. पण आपला मुर्खपणा किंवा चुका कबुल करण्याची दानत, प्रामाणिकपणा शहाण्यांकडे सहसा नसतो. म्हणुनच त्यांना पळवाटा शोधाव्या लागतात. तो उत्साह संपलेला असल्याने उसने अवसान आणावेच लागते. मग मार्टीन ल्युथर म्हणतो, तसा प्रतिक्रियेतून खोटा उसना उत्साह आणावाच लागतो. शत्रूचे नाव घेतले वा आठवले की असे उसने अवसान आणणे सोपे जात असते. म्हणूनच मग सभा मेळावे घेऊन आपले फ़सलेले विचार धोरणे लोकांना समजावण्याची हिंमत गमावलेले लोक मोदींच्या नावाने शिमगा करण्यात धन्यता मानू लागले आहेत. स्वत:विषयी चांगले उत्साहवर्धक काही शिल्लक उरलेले नाही, त्यातून मग मोदींनी काही करावे की ते कसे चुक आहे, तेवढेच पदोपदी सांगत बसण्यापलिकडे या लोकांकडे दुसरा उद्योगच राहिलेला नाही. मार्टीन ल्युथर जसा पोप वा त्याच्या हस्तकांच्या दगाबाजी ढोंगबाजीचे स्मरण करतो; तसेच भारतातले सेक्युलर गुजरातच्या बारा वर्षे जुन्या दंगलीचे स्मरण करतात. त्यातून त्यांचा नैतिक अहंकार फ़ुलून येतो. द्वेषाचा पारा चढला, की सेक्यु्लर विचारांचा जयजयकार शक्य असतो. आपल्या देशातील सेक्युलर राजकारण आता मोदी या एका व्यक्तीभोवती घुटमळून राहिले आहे. तेव्हा मोदीबद्दल चार शब्द कोणी खरे वा चांगले बोलला, तरी त्याच्यावर हल्ला करणे ही सेक्युलर अगतिकता आहे. मग ते चार शब्द लतादिदीच्या मधूर कंठातून का निघालेले असेनात, ते कर्कश व भेसूरच असल्याचे सिद्धांतही मांडले जाऊ शकतात. हा कावळ्यांनी कोकीळेला प्रमाणपत्र देण्य़ासारखाच उद्योग नाही का?

12 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. माफ करा भाऊ तुमचे मत हे मला पटले नाही. विशेषतः लेखाचा शेवट आणि लताबाई यांनी केलेले मोडींचे समर्थन.

    गाण्याच्या क्षेत्रात आम्ही कावळे आहेत आणि त्या गान कोकिळा आहेत. त्या गाण्यातील master(सर्व श्रेष्ठ) आहेत, हे मान्यच आहे. पण राजकीय, सामाजिक क्षेत्रात, आणि त्यातील योग्य त्या मानवता अशा या विचारसरणीत लता मंगेशकर यांचे योगदान ते काय?

    भारतीय राजकारण क्षेत्रात मोडी हे master(सर्व श्रेष्ठ) आहेत की नाहीत हे आत्ताच सांगता येणार नाही. येणारा काळ त्यांच्या पुढील कर्तृत्वावर त्यांच्या श्रेष्ठत्वाचे उत्तर देऊ शकेल. पण ते गेल्या १२ वर्षातील गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून, त्यांची overall राजकीय कारकीर्द (भ्रष्टाचार आणि राज्यकारभार) म्हणून इतर राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर पक्षीय नेते यांच्याशी तुलना करताना या क्षणाला निश्चितच बरी आहे. पण गुजरात दंगलीचे/मनुष्य संहाराचे काय????? तो काळाकुट्ट इतिहास तर कुठल्याही संवेदनशील मनुष्याला विसरण्यासारखा नाही……

    तेंव्हा त्यांनी(मोडीनी) भारताचे पंतप्रधान व्हावेत हे मत जाहीररित्या व्यक्त करणे आणि ते पण अशा भारत रत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तीकडून होणे फारच अनुचित आहे. कारण भारत हा केवळ हिंदू विचारसरणीचा देश नसून विविध धर्मीय, विविध पंथीय, विविध वंशीय, विविध भाषिक लोकांच आहे. कारण हिंदुत्व विचारसरणी हे भाजप प्रणीत आणि RSS पुरस्कृत संघटना यांचा गाभा आहे. त्यामुळे तो गाभा, ती विचारसरणी संपूर्णतः सेक्युलर (खऱ्या अर्थाने निधर्मी)असू शकत नाही.

    आणि लता मंगेशकर या केवळ हिंदूहृदयसम्राट(स्वा. सावरकर) यांची मराठी देशभक्तीपर गाणी गात गान कोकिळा झाल्या आहेत असे नाही, तर त्यांच्या कारकिर्दीला इतर सर्व धर्मीय, पंथीय, भाषिक गीतकार, संगीतकार यांनी हातभार लावला आहे.

    केवळ हिंदूच नव्हे तर जगभरातील कोट्यावधी लोक(विविध राष्ट्रातील, विविध धर्मीय लोक) त्यांचे गाण्याचे चाहते आहेत.

    त्यांनी त्यांचे मत एक लोकशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क म्हणून जरूर मांडावेत. पण हे मोडींचे मार्केटिंग केल्यासारखे बिलकुल नको. NDA सरकारने दिलेल्या "भारत रत्न पुरस्काराच्या उपकाराची परतफेड" दबावाखाली अशी नको. मग उद्या सचिन तेंडूलकर सुद्धा आपले मत व्यक्त करेल की तरुण तडफदार युवा नेते राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी योग्य लायक व्यक्ती आहे. तेवढीच राज्यसभेतील खासदारकीची आणि भविष्यात मिळणाऱ्या "भारतरत्न" पुरस्कारांची उपकारांची अशी आगाऊ परतफेड……… :)

    बरे दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशातील हे सेलेब्रिटीज अमेरिकेतील किंवा पाश्चात्य देशातील सेलेब्रिटीज सारखे स्वतंत्र विचारांचे, नि:पक्षवादी, लोकशाही वादी , सामाजिक बांधिलकी वादी, निर्भयवादी नसून, केवळ शासकीय पुरस्कार आणि सवलती मिळाव्यात या लोचट विचारसरणीचे असतात.

    येथे बरीच उदाहरणे देता येतील. एक चांगले उदाहरण म्हणजे १९७१ सालच्या ऑस्कर पुरस्काराच्या वेळी "मार्लन ब्रान्डो" या श्रेष्ठ अभिनेत्याची अमेरिकेतील रेड इंडियन लोकांवर होणाऱ्या अत्याचारांचा निषेध व्यक्त करण्याची एक श्रेष्ठ पद्धत……

    मला खरेच वाईट वाटते की असे लोचट, अवैचारिक सेलेब्रिटीज पुरोगामी महाराष्ट्रातील बहुजन समाजातील मराठी असावेत.

    लता मंगेशकर या बहुजन समाजातील(उपेक्षित, गोमंतकातील देवदासी समाजातील) असून त्यांनी या वर्णव्यवस्थेवरील आधारित आणि त्या विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या संघटना आणि पक्ष यांची बाजू घ्यावी. यांनी आपला लहानपणाचा जातीय वादी अन्यायग्रस्त इतिहास विसरावा. अर्थात त्यांची येथे चुकी नाही. बहुसंख्य नवश्रीमंत(बहुजन समाजातून गरीब परिस्थितून आलेले, गेल्या ६० ते ७० वर्षातील तयार झालेले नवश्रीमंत आणि त्यांची पुढील पिढी किंवा तिसरी पिढी ) आपला इतिहास विसरून गेले आहेत आणि अर्थात मोडी हे सुद्धा बहुजन समाजातील आहेत हे विशेष……

    मी व्यक्तिगत संघ परिवारवादी फेकू मोडींचा चाहता नाही आणि नेहरू-गांधी परिवारवादी बुद्दू राहुल भक्त नाही. तसेच सो काल्ड निधर्मी स्युडो सेक्युलर (तिसरी आघाडी, मुल्ला, लालू, दोन शरद पवार-यादव , नितीश, समता, ममता, मायावती, मिडिया विचारवंत वेगळे, बगळे वगैरे पद्धतीचे लोक) नाही. मी खऱ्याखुऱ्या पद्धतीने, मला आलेल्या अनुभवाने, त्यांची कारण मीमांसा करून आपले निधर्मीवादी मत मी व्यक्त करत असतो.

    ज्या आतापर्यंतच्या मानवी संस्कृतीच्या इतिहासातील मानवी समाज संस्कृती "मोडणाऱ्या" ज्या काही विचारधारा आहेत ज्या दुर्दैवाने सर्व धर्मात काही थोड्या फार प्रमाणात आहेत . त्यापैकी एक जी विचारधारा आहे त्या विचारधारेचे आणि त्या विचारांच्या लोकांचे प्रतिनिधी हे नरेंद्र मोडी आहेत म्हणून मी नरेंद्र मोडी यांना "मोडी"असे नेहमीच उपहासाने म्हणतो.

    ReplyDelete
  3. tumhi uphasane ase mhanalyane kahi pharak padat nahi. modi cha uchchar kasa karayacha te tumachya jibhela tumachi buddhi kase valavate tyavar avalambun aahe. Lata didini bharat ratn cha upkar phedala he tumache mhanane lata didich khare ki khote sangu shakateel.tumhala tase vatale. vatanyalaa bandhan kase ghalata yeil. vatu dya.2002 chya manavi hatye baddal tumhi boltay ha mukhya mudda, majhya sathi. Paristhiti na janata ekhadyala aaropit kele pahije asa tumacha adhikar aahe ka? tumhi kon ahaaht. tumachya paiki kon sabarmati express madhye jalale? je jalaale tyanchya baddal kay tumacha vichar aahe.? tumachya kadil usane paise tumhi parat dile naahit tar tumachya bahinichi magani kelyaas ashi magani karanaryalaa tumhi premane jinku shakanaar aahat ka? tase asel tar tumhi khup mahan tari nahi tar napunsak tari aahat. Dangalichi parshva bhoomi na lakshyat gheta tumhi ase bolalat he railway madhye jalalelyaan var anyay naahi ka? tasech, je don hajar lok marale gele se tumhi mhanata, te kuni va ka marale? modi kimva police banduki ghevun phirat navate. mhanaje, tithehi juna khad khadat asanara , mi var varnan kelelaa, anyay hota.kimva tasach kanhi tari anyay hota. hindu ase ekatr ubhe rahile he jhalel naahi kadhi. Pudhe, muzaffar nagar baddal tumhi kay mhanata, dhulyat jhalelya dangalina kay mhanata, assam madhye jhalelya dangali baddal kay mat ahe tumache, kashmir madhye chalalelyaa nanganaacha baddal tumach akymat aahe? bhivandit police kapale tya baddal kay mat aahe, shevati azad maidanat, rashtriy smaraka var mutanare tumache priy bandhu aahet ka? tithe mahila policeanchi be abru karanare tumache kon aahet? Kon kay odala he tharavu naka. varnaashram mananre kon? dooshit chaturvarnashram "Lock Stock and Barrel" bajula kela pahije he rokh thok mhananre kon tyanchi olakh neet karun ghya.jyana tumhi modnare mhanata te jodnaare ahet. tumachayshi adhik parichay jhalyas anand hoil. tumhi jari mi he, te ani te nahi mhanata tech tumhi aahat ase vatate. aapal sneh vadhava yasathi mala adhik bolayala avadel. .. Subhash Patil.. 9892214119, pusubhash@gmail.com

    ReplyDelete
  4. tumache anubhav kalavlyas baryach sudharana hou shakateel.

    ReplyDelete
  5. love jihad che naavahi aikale nahi ka tumhi?

    ReplyDelete
  6. Subhashji,it is futile to convince such people.They will parrot the same line.Modi .Gujrat 2002.Best ignore them.

    ReplyDelete
  7. DnyaneshParab,

    आपला इथला प्रतिसाद वाचला : http://jagatapahara.blogspot.com/2013/11/blog-post_3.html?showComment=1383556498551#c323381680870283893

    मला काय वाटलं ते लिहितो.

    १.
    >> पण राजकीय, सामाजिक क्षेत्रात, आणि त्यातील योग्य त्या मानवता अशा या विचारसरणीत लता
    >> मंगेशकर यांचे योगदान ते काय?

    फारसं नाही. म्हणूनच लताबाईंचं मत हे एका सामान्य माणसाचं मत म्हणून विचारात घेतलं पाहिजे. त्या सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करतात.

    २.
    >> पण गुजरात दंगलीचे/मनुष्य संहाराचे काय????? तो काळाकुट्ट इतिहास तर कुठल्याही संवेदनशील
    >> मनुष्याला विसरण्यासारखा नाही……

    मोदींनी अवघ्या ३ दिवसांत दंगली शमवल्या. हे न्यायालयानेही मान्य केले आहे. मोदींवर साधा आरोप दाखल करून घ्यायला न्यायालयाने नकार दिला आणि तुम्ही चक्क त्यांना गुन्हेगार ठरवताय! कमाल आहे तुमची !! मोदींचे दंगलीकाळचे वर्तन जाणून घेण्यास तुम्हाला भाऊंचा (तोरसेकरांचा) हा लेख वाचवा लागेल : http://bhautorsekar.blogspot.co.uk/2013/04/blog-post_24.html

    ३.
    >> तेंव्हा त्यांनी(मोडीनी) भारताचे पंतप्रधान व्हावेत हे मत जाहीररित्या व्यक्त करणे आणि ते पण अशा
    >> भारत रत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तीकडून होणे फारच अनुचित आहे.

    आजिबात अनुचित नाही. अनंतमूर्तींना मोदीविरोधी मत व्यक्त करायचा अधिकार आहे तसेच मोदींच्या बाजूने सकारात्मक बोलण्याचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य लताबाईंनाही आहे.

    ४.
    >> कारण भारत हा केवळ हिंदू विचारसरणीचा देश नसून विविध धर्मीय, विविध पंथीय, विविध वंशीय, विविध
    >> भाषिक लोकांच आहे.

    हे काय कारण झालं का? लताबाईंनी मोदींच्या बाजूने न बोलण्याचे हे कारण? नक्की काय म्हणायचंय तुम्हाला?

    ५.
    >> कारण हिंदुत्व विचारसरणी हे भाजप प्रणीत आणि RSS पुरस्कृत संघटना यांचा गाभा आहे.

    अगदी बरोबर. आहेच मुळी.

    ६.
    >> त्यामुळे तो गाभा, ती विचारसरणी संपूर्णतः सेक्युलर (खऱ्या अर्थाने निधर्मी)असू शकत नाही.

    सेक्युलर म्हणजे निधर्मी हे कोणी सांगितलं तुम्हाला? सेक्युलर हा शब्दच मुळी रिलीजस (religious) आहे. मध्ययुगीन चर्चचे अधिकारी लोक आपापसांत चर्चा करतांना जो विषय कॅथलिक परंपरांच्या बाहेरचा आईल त्यास सेक्युलर हे विशेषण चिकटवलं जाई. पुढे युरोपीय प्रबोधनाच्या (रेनेसां) काळी राज्यकारभार चर्चच्या हस्तक्षेपापासून मुक्त असेल तर हा शब्द वापरण्याचा प्रघात रूढ झाला. सेक्युलर हा शब्द पूर्णपणे शासकीय कारभारासाठी वापरला जातो. संस्कृती वा देश वा समाज कधीही सेक्युलर नसतो.

    ७.
    >> आणि लता मंगेशकर या केवळ हिंदूहृदयसम्राट(स्वा. सावरकर) यांची मराठी देशभक्तीपर गाणी गात
    >> गान कोकिळा झाल्या आहेत असे नाही, तर त्यांच्या कारकिर्दीला इतर सर्व धर्मीय, पंथीय, भाषिक गीतकार,
    >> संगीतकार यांनी हातभार लावला आहे.

    अत्यंत असंबद्ध विधान. लताबाईंच्या कारकीर्दीस सर्व पंथियांचा हातभार लागला म्हणून ती कारकीर्द सेक्युलर...? आणि त्यामुळे मोदींना लताबाईंनी मोदींना पंतप्रधानपदासाठी अनुमोदन देऊ नये ...?

    यात दुहेरी असंबद्धत्व दिसून येतं.

    ८.
    >> त्यांनी त्यांचे मत एक लोकशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क म्हणून जरूर मांडावेत. पण हे मोडींचे
    >> मार्केटिंग केल्यासारखे बिलकुल नको.

    अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणूनच मत मांडलंय की! तुम्हाला त्यात मार्केटिंग सापडलं तर तो तुमचा दोष आहे.

    ९.
    >> NDA सरकारने दिलेल्या "भारत रत्न पुरस्काराच्या उपकाराची परतफेड" दबावाखाली अशी नको.

    लताबाईंवर हा आरोप कशाच्या आधारे तुम्ही करताय? तसंही पाहता ही परतफेड करायची फुटक्या कवडीचीही गरज नाहीये. ना लताबाईंना, ना मोदींना. उचलली जीभ लावली टाळ्याला.

    १०.
    >> मग उद्या सचिन तेंडूलकर सुद्धा आपले मत व्यक्त करेल की तरुण तडफदार युवा नेते राहुल गांधी पंतप्रधान
    >> पदासाठी योग्य लायक व्यक्ती आहे.

    करू द्या की. आम्ही जागे आहोत. त्यावर जसं करायला पाहिजे तसं यथोचित भाष्य आम्ही करूच. आपण वृथा चिंता करू नये.

    ११.
    >> तेवढीच राज्यसभेतील खासदारकीची आणि भविष्यात मिळणाऱ्या "भारतरत्न" पुरस्कारांची उपकारांची
    >> अशी आगाऊ परतफेड……… :)

    हा आरोप आहे का?

    (पुढे चालू...)

    ReplyDelete
  8. (...मागील संदेशावरून पुढे चालू)
    १२.
    >> बरे दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशातील हे सेलेब्रिटीज अमेरिकेतील किंवा पाश्चात्य देशातील
    >> सेलेब्रिटीज सारखे स्वतंत्र विचारांचे, नि:पक्षवादी, लोकशाही वादी , सामाजिक बांधिलकी वादी, निर्भयवादी
    >> नसून, केवळ शासकीय पुरस्कार आणि सवलती मिळाव्यात या लोचट विचारसरणीचे असतात.

    पाश्चात्य देशांत काय लोचट लोक नसतात की काय! तुमचं गृहीतक बाळबोध आहे. ओबामाला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला तो काय त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर का? उगीच काहीतरी बोलताय राव.

    इराकमध्ये जनसंहारक अस्त्रे सापडली का? नाहीना? मग कोण्या पत्रकाराने केलं का स्टिंग ऑपरेशन?

    १३.
    >> मला खरेच वाईट वाटते की असे लोचट, अवैचारिक सेलेब्रिटीज पुरोगामी महाराष्ट्रातील बहुजन समाजातील
    >> मराठी असावेत.

    तुम्ही त्यांचं प्रबोधन करू शकता. तुमचं म्हणणं आपण लताबाईंना प्रत्यक्ष सांगावं. त्यांचा प्रतिसाद काय आला तो सगळ्यांना सांगावात (शेअर करावात).

    १४.
    >> लता मंगेशकर या बहुजन समाजातील(उपेक्षित, गोमंतकातील देवदासी समाजातील) असून त्यांनी या
    >> वर्णव्यवस्थेवरील आधारित आणि त्या विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या संघटना आणि पक्ष यांची
    >> बाजू घ्यावी.

    लताबाई कोणे एके काळी जरी उपेक्षित समाजातल्या असल्या तरी आज त्या उपेक्षित नाहीत. शिवाय त्या स्वाभिमानीही आहेत. आपल्या उपेक्षेचं फुकट भांडवल करायला त्या उत्सुक नाहीत. तुम्ही त्यांना वंचितांच्या गोटात का ढकलता आहात?

    १५.
    >> यांनी आपला लहानपणाचा जातीय वादी अन्यायग्रस्त इतिहास विसरावा.

    माझ्या माहीतीप्रमाणे त्यांच्यावर जातीयवादी अन्याय झाला नाहीये. आणि जरी झाला असला तरी त्यांना त्याचं सोयरसुतक नाही. त्यांना फुकट सल्ले देणारे तुम्ही कोण? कृपया विषयाला धरून बोलावे.

    १६.
    >> बहुसंख्य नवश्रीमंत(बहुजन समाजातून गरीब परिस्थितून आलेले, गेल्या ६० ते ७० वर्षातील तयार झालेले
    >> नवश्रीमंत आणि त्यांची पुढील पिढी किंवा तिसरी पिढी ) आपला इतिहास विसरून गेले आहेत

    तर मग हाच इतिहास परतपरत उगाळून देण्यात तुम्हाला धन्यता का वाटते? जो काही अन्याय झाला आहे तो हिंदुत्ववाद्यांनी केलाय का?

    १७.
    >> मी खऱ्याखुऱ्या पद्धतीने, मला आलेल्या अनुभवाने, त्यांची कारण मीमांसा करून आपले निधर्मीवादी मत
    >> मी व्यक्त करत असतो.

    तुमच्या संदेशात तुमचा अनुभव तुम्ही कुठेही मांडला नाहीये.

    १८.
    >> ज्या आतापर्यंतच्या मानवी संस्कृतीच्या इतिहासातील मानवी समाज संस्कृती "मोडणाऱ्या" ज्या काही
    >> विचारधारा आहेत ज्या दुर्दैवाने सर्व धर्मात काही थोड्या फार प्रमाणात आहेत . त्यापैकी एक जी
    >> विचारधारा आहे त्या विचारधारेचे आणि त्या विचारांच्या लोकांचे प्रतिनिधी हे नरेंद्र मोडी आहेत

    या जावईशोधाबद्दल तुम्हाला काय पारितोषिक द्यायचं या विचारात मी पडलोय. ओबामाला मिळालेला शांततेचा नोबेल कसा वाटतो तुम्हाला?

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  9. @गामा पैलवान -- Mast :-)

    ReplyDelete
  10. गामा पैलवान तुम्हाला शवविच्छेदनाचा अनुभव असावा असे वाटते… तुमचा धोबी पछाड आवडला!

    ReplyDelete
  11. गामा यांचे उत्तर उच्च !!!!!

    ReplyDelete