Friday, November 1, 2013

दिवाळी कोणासाठी?



   त्यांची रोजच दिवाळी असते, असे शब्द अनेकदा आपण पैसेवाल्या श्रीमंत वर्गाच्या बाबतीत ऐकत असतो. ती शब्दरचना उपरोधिक असली, तरी त्यातच दिवाळी शब्दाचा खरा अर्थ सामावलेला आहे. ज्यांना रोजच दोन वेळी पोटाची आग विझवताना तारांबळ होत असते; त्यांच्यासाठी नित्याच्या गरजांची पुर्ती करण्यातच आयुष्य़ खर्ची पडत असते. मग अशा लोकांना ऐषाराम किंवा चैनीचा विचारही करणे महाग असते. सुखसमाधानाच्या सुविधा किंवा साधनांबद्दल त्या गरीब वर्गामध्ये आकर्षण मोठे असते, तरी अशी साधने किंवा वस्तु आपल्याला परवडणार्‍या नाहीत, अशीच एक पक्की बोचणी त्या सामान्यजनांच्या मनात रुजलेली असते. सहाजिकच असा सुखवस्तूपणा म्हणजेच दिवाळी, असे तो वर्ग मानत असतो. म्हणूनच कुणा श्रीमंताची खर्चिक जीवनशैली बघितली मग तो गरीब म्हणतो, त्यांचे काय, त्यांची तर रोजच दिवाळी असते. थोडक्यात दिवाळी म्हणजे आपल्या खिश्याकडे किंवा उत्पन्नाकडे काणाडोळा करून आपापल्या पातळीनुसार उधळपट्टी करण्याचा मोसम. आकर्षण असलेल्या व अशक्य वाटणार्‍या सुखाच्या पुर्तीसाठी उचललेले पाऊल, म्हणून त्याला दिवाळी संबोधले जाते. म्हणून तर सामान्य माणूस त्या दिवाळीची आतुरतेने प्रतिक्षा करीत असतो. अर्थात उधळपट्टी करण्याइतके पैसे त्याच्यापाशी नसतात वा त्यला तितके पैसे मिळण्याचीही शक्यता नसते. पण तरीही थोडा धोका पत्करून किंवा धाडस करून माणूस आपल्या आवाक्याबाहेर वाटणारा आनंद भोगू पहातो, ती असते दिवाळी. अशी की सर्व दु;ख वा समस्यांचा विसर पडून साजरा केलेला विमुक्त आनंद. दिवाळी खरी त्यांच्यासाठी वर्षातून एकदाच येते. तिची महत्ता त्यांनाच कळत असते, कारण त्यांच्यासाठी रोजच दिवाळी नसते.

   कुठलाही सण उत्सव हा एकप्रकारे विरंगुळा असतो. नित्यजीवनातील गांजलेपणातून थोडी सुटका किंवा उसंत काढण्याचा प्रयास, म्हणजे सण असतो. दिवाळी तर वर्षभर प्रतिक्षा केलेला सण असतो. कारण त्या कालखंडात अधिक खर्च व मौज करण्यासाठी माणसे आधीपासून तयारी करीत असतात., सगळ्या गोष्टी व पैशाची जमवाजमव करीत असतात. स्वप्नातला आनंद उपभोगण्याची अतीव इच्छाच माणसाला दिवाळीबद्दल उत्सुक बनवित असते. सहाजिकच प्रत्येकाची दिवाळी वेगवेगळी असते. कुणा पैसेवाल्याची दिवाळी तसे बघितल्यास अधिकच कटकटीची असते. कारण त्याला सुबत्तेमुळे बहुतेक सुखे सुविधा उपलब्ध झालेल्या असतात. त्यामुळेच अशा वस्तु वा साधनांमुळे मिळणार्‍या आनंदाला श्रीमंत माणूस पारखा झालेला असतो. उलट ज्याच्यापाशी पैशाचा तुटवडा असतो, त्याच्यासाठी चैनीच्या वस्तू म्हणजेच स्वप्न असते. सहाजिकच अशा वस्तू संपादन करणे, हेच एक स्वप्न असते. पैसेवाल्यांसाठी सहज खरेदी करता येणारी वस्तु सामान्य गरीबासाठी अनमोल असले. म्हणून त्या वस्तुच्या खरेदीतही त्याला दिवाळी अनुभवता येते. त्यासाठी त्याला पैशाचे नियोजन, बचत करावी लागत असते. ते स्वप्न साकार करण्यासाठीची जमवाजमव व केलेली जुळवाजुळव, प्रत्यक्ष दिवाळी साजरी होण्याच्या आनंदापेक्षाही अधिक उत्सुकतेची म्हणून कौतुकाची असते. त्यासाठीचे प्रयास, केलेला विचार व स्वप्न साकारण्याची अतीव इच्छाच; सुखाची जाणिव असते. तितका दिवाळीचा आनंद आधीपासून सुरू होतो आणि दिवाळी संपल्यावरही टिकून रहातो. म्हणूनच कितीही कष्टाची वाटली तरी खरी दिवाळी गरीबाची असते. कारण त्यातून त्याला स्वप्नपुर्तीचा आनंद मिळवता येत असतो.

   साध्यासाध्या गोष्टी व वस्तुमधून त्या गरीबाला मिळवता येणारा दिवाळीचा आनंद श्रीमंत पैसेवाल्याला मिळवता येत नाही. कुणाला असे बोलणे च चमत्कारीक वाटेल. पण वास्तवात तीच स्थिती आहे. श्रीमंताला किंवा पैसेवाल्यांना आपल्या आनंद सुखापेक्षा दुसर्‍या कुणासाठी तरी कष्ट उपसावे लागत असतात. अन्य कुणापेक्षा आपल्याकडे काही अजोड आहे, हे दाखवण्यासाठी पैसेवाल्यांना उत्सव सणाच्या निमित्ताने काही वेगळे करावे लागत असते. त्यातून त्यांना इतरेजनांना खिजवायचे असते. आपले वेगळेपण दाखवण्याची खटपट करावी लागत असते. तसेच काही दुसर्‍याकडे असले, मग आपण खरेदी केले वा मिळवले, त्याचाही आनंद असे पैसेवाले उपभोगू शकत नाहीत. थोडक्यात त्यांचा आनंद स्वत:साठीचा असण्यापेक्षा दुसर्‍या कोणाला काही तरी दाखवण्यासाठी वा दुस‍र्‍याला खिजवण्यासाठीच असतो. उलट सामान्य माणसाची स्थिती असते. त्याला आपण आपल्याला अलभ्य दुर्लभ्य वाटणारे काही तरी साध्य केले वा मिळवल्याचा निखळ व्यक्तीगत आनंद उपभोगता येतो. कारण त्यासाठी त्याने नियोजन जुळवाजुळव करून ते उद्दीष्ट गाठलेले असते. आपण आयुष्यात कुठला महत्वाचा टप्पा गाठल्याचे समाधान त्याला आनंदी करीत असते. तितकेच नाही, तर जे काही घेतले मिळवले, त्याच्या उपयोगात त्याचा आनंद वृद्धींगतच होत जातो. म्हणूनच कुणा पैसेवाल्या श्रीमंताला किरकोळ वाटणार्‍या साध्या गोष्टीतही गरीबाची दिवाळी दडलेली असते. म्हणूनच दिवाळी मनापासून गरीबच साजरी करू शकतो. कारण दिवाळी हा प्रकाशाचा व आनंदाचा सण आहे. आपले जीवन प्रकाशमान झाल्याच्या अनुभुतीचा सण आहे. ज्याला तो पल्ला गाठता येतो, तोच खरी दिवाळी साजरी करू शकतो. दिवाळी खरी व त्यांचीच असते, ज्यांच्या रोजच्या आयुष्यात दिवाळी नसते. अशी दिवाळी तोच आनंद घेऊन प्रत्येकाच्या आयुष्यात यावी व साजरी केली जावी, हीच सर्वांसाठी शुभेच्छा.

No comments:

Post a Comment