Wednesday, November 6, 2013

लेकी बोले सुने लागे



   कॉग्रेस पक्षाचे एक अभ्यासू व व्यासंगी नेते, अधिक केंद्रियमंत्री जयराम रमेश यांची तुलना त्याच पक्षातल्या अन्य भाट मंडळींशी करता येणार नाही. म्हणूनच वरकरणी त्यांचे एखादे विधान वा वक्तव्य कितीही चमचेगिरीचे वाटले; म्हणून त्याकडे डोळेझाक करून त्याची हेटाळणी करण्यात अर्थ नाही. आपल्याकडे मराठीत एक उक्ती आहे, ‘लेकी बोले सुने लागे’. जयराम रमेश नेमके त्याच हेतूने कशावरून बोलत नसतील? ज्या कॉग्रेस पक्षात सोनिया वा राहुल-प्रियंका यांच्या चुका व मुर्खपणाबद्दल बोलणेच पक्षशिस्तीचा भंग होत असतो; तिथे सत्य बोलायची हिंमत कोण करणार? बिरबलानंतर आपणच मोठे चतुर आहोत, अशा थाटात भाष्य करण्याची रमेश यांना खुप हौस आहे. सत्य बोलायची हिंमत नसेल, पण सत्य बोलल्याशिवाय रहाताही येत नसेल, तर त्यांनी सुनेला ऐकवायचे शब्द लेकीला उद्देशून बोललेले कशावरून नसतील? म्हणूनच त्यांची विधाने समजून घेण्याची गरज आहे. आपल्या पक्षाचा राहुल व सोनिया गांधींनी योजलेला विनाश त्यांना कळत व जाणवत असेल, तर त्यांना असेच उपरोधिक बोलणे आवश्यक नाही काय? मध्यंतरी त्यांनी असेच एक सत्य बोलून दाखवले होते आणि त्यांना पक्षातुनच कानपिचक्या मिळालेल्या होत्या. म्हणूनच यावेळी त्यांनी अतिशय चतुरपणे आपले मत मांडलेले आहे. तेव्हा रमेश म्हणाले होते, ‘नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्योत्तर काळातील कॉग्रेस समोरचे सर्वात मोठे व खरे आव्हान आहे.’ त्यावर संतप्त प्रतिक्रिया देताना पक्षाचे प्रवक्ते व दुय्यम बिरबल सत्यव्रत चतुर्वेदी यांनी मोदींचे इतकेच कौतुक वाटत असेल तर रमेश यांनी भाजपात सामील व्हावे, असा सल्ला दिला होता. आज दोन महिन्यांनी रमेश यांचे शब्द खरे ठरत आहेत आणि बाकीचेही कॉग्रेस नेते, प्रवक्ते आडमार्गाने तेच सत्य कबुल करू लागले आहेत.

   अशावेळी जयराम रमेश यांनी २०१४ च्या सार्वत्रिक निवडणूकीविषयी नवे भाकित केले आहे. पक्षाचे अनेक बिनडोक प्रवक्ते जसे ठराविक पोपटपंची करतात, तसे रमेश यांनी मतप्रदर्शन केलेले नाही. त्यांनी मांडलेले मुद्दे काळजीपुर्वक समजून घेण्याची गरज आहे. शब्दापेक्षा त्यातला गर्भित अर्थ ओळखायची गरज आहे. काय म्हणालेत रमेश? ‘आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाल्यास त्यांचा खेळच खल्लास होईल. त्यांचा फुगा फुटेल. पण राहुल गांधींचा पराभव झाला तरी त्यांना फरक पडणार नाही. त्यांना भविष्यातही मोठी संधी असेल. कारण त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे. भविष्यातील ठोस योजना आहेत.’ यातून रमेश काय सूचित करीत आहेत? मोदींसमोर आगामी निवडणूका जिंकायच्याच असे आव्हान आहे. तेवढे राहुल समोर आव्हान नाही. याचाच दुसरा अर्थ असा, की राहुल आव्हान असल्याप्रमाणे मैदानात उतरलेले नाहीत. किंबहुना राहुलनी पराभूत होण्याची मानसिक तयारी ठेवलेली आहे.  म्हणूनच त्याच्याच पुढले वाक्य आहे, ‘राहुल गांधींचा पराभव झाला तरी त्यांना फरक पडणार नाही.’  म्हणजेच राहुल गांधी यांच्या सोबतच आगामी निवडणुकीत कॉग्रेसचा दारूण पराभव मोदी करू शकतील, याची ही कबुली आहे. आणि तसे झाले म्हणून राहुल राजकारणातून संपणार नाहीत, असे रमेश म्हणत आहेत. थोडक्यात मोदी हे अभूतपुर्व असे आव्हान असून प्रथमच कुठल्या अन्य पक्षाकडून कॉग्रेसचा एकहाती पराभव होऊ शकतो; हेच रमेशना सांगायचे आहे. तितकी क्षमता मोदींपाशी आहे आणि राहुलपाशी नाही, असाही त्याचा गर्भित अर्थ आहे. मात्र त्यामुळे राहुलना राजकारणातून निवृत्त होण्याची वेळ येणार नाही असाही निष्कर्ष आधीच काढण्य़ात आलेला आहे. रमेश आडमार्गाने तो कबुल करीत आहेत.

   राहिला मुद्दा त्यांनी हत्ती व कोल्ह्याची सांगितलेली गोष्ट. कॉग्रेस हा सव्वाशे वर्षांचा जुना पक्ष हत्तीसारखा आहे. त्यामुळे तो संथगतीने चालतो, कोल्ह्याप्रमाणे तो चतुर, चलाख नाही, तर चक्क निर्बुद्ध आहे. म्हणूनच हत्तीप्रमाणे त्याला लगेच वळता किंवा पळता येत नाही, हेच रमेशना सांगायचे आहे. भाजपा किंवा मोदी कोल्ह्याप्रमाणे चतुर व चपळ आहेत. असे सांगणार्‍या रमेश यांनी त्यांच्या पक्षाची दुरावस्थाच कथन केली आहे. हत्तीसाठी सर्वच बाबतीत त्याचे प्रचंड वजन अडचणीचे असते. खड्ड्यात पडला तर त्याला आपल्या वजनामुळे उठून खड्ड्याबाहेर निघता येत नसते. धावता येत नसते. अगडबंब शरीर हेच हत्तीसाठी बळ असले; तरी तीच त्याची सर्वात भीषण दुर्बळता असते. रमेश यांना राहुलसह स्वपक्षियांचे लक्ष त्याच दुर्ब्ळतेकडे वेधून घ्यायचे आहे. पण ते स्पष्टपणे पक्षात वा नेते मंडळीसमोर बोलायची हिंमत कॉग्रेसवाला दाखवू शकत नाही. ज्याप्रकारे राहुलची वाटचाल व पोरकटपणा चालू आहे, तो कॉग्रेसला पराभवाच्या दिशेने घेऊन चालला आहे. पण हे दिसत असले तरी बोलायची मुभा नसेल, तर असेच आडमार्गाने सुचवणे भाग आहे. मोदी जिंकतोय आणि तुमच्याच मुर्खपणामुळे त्याचा विजय सोपा करताय; ही घंटा मांजराच्या गळ्यात बांधणार कोण आणि कशी? रमेश यांनी तेच सत्य भाजपाला टोमणे मारण्याचा आव आणून राहुलसाठी सांगितले आहे. आपला पक्ष हत्तीसारखा आहे, पण तो विविध घोटाळ्यांच्या खड्ड्यात जाऊन पडला व अडकलेला आहे. त्यातून बाहेर निघणे शक्य नसल्याने आपली शिकार करणे एखाद्या कोल्ह्यालाही सोपे झाले आहे, हेच जयराम रमेश सांगत आहेत. पण रमेश यांचे दुर्दैव असे, की भाजपाच्या समर्थकांना त्यामधले आपले कौतुक ओळखता आलेले नाही, की राहुलसह कॉग्रेसवाल्यांना त्यातील आपल्याला दिला जाणारा धोक्याचा इशाराही ओळखता आलेला नाही.

1 comment: