Sunday, November 17, 2013

वर्ष उलटल्यानंतर



   शिवसेनाप्रमुखांच्या प्रथम स्मृतीदिनी मुंबईत त्यांना अभिवादन करायला जमलेली गर्दी अपेक्षितच होती. गेल्या वर्षी त्यांचे निर्वाण झाल्यानंतर झालेली अपुर्व गर्दी कित्येक पिढ्यांना स्मरणात रहाणारी आहेच. पण त्यानंतर त्यांच्या स्मारकाविषयी उठलेले वादळ आज थंडावले आहे. तेव्हा जिथे बाळासाहेबांचे अंत्यसंस्कार पार पडले, तिथेच त्यांचे स्मारक झालेले आहे; अशी भूमिका घेऊन वाद सुरू झाला होता. त्यावर नंतरच्या काळात पडदा पडला, मात्र जिथे त्यांनी आयुष्यातल्या सर्वच सभा गाजवल्या आणि तिथे अखेरची चिरनिद्रा घेतली; तिथे त्यांचे स्मारक व्हावे, ही अपेक्षा चुकीची म्हणता येणार नाही. परंतु ज्यांना मुंबईच्या विविधता व सौंदर्याची विशेष काळजी होती, त्या बाळसाहेबांनाही जागेपेक्षा जागेच्या सौंदर्याचे महत्व कळत होते. त्यामुळेच त्याच जागेवर स्मारकाचा अट्टाहास धरणे गैरलागू होते. त्यावरून असा वाद व्हायचे कारण नव्हते. प्रामुख्याने त्यांच्या निर्वाणाला काही दिवसही उलटले नव्हते आणि हजारो लोक त्यांच्या अस्थी कलशाचे दर्शन घ्यायला अजूनही येतच होते; तेव्हा तरी निदान असा वाद व्हायला नको होता. सुदैवाने त्यावर लौकरच पडदा पडला आणि आज वर्षाचा काळ लोटल्यावर तिथे पुन्हा त्यांच्या स्मृतीला अभिवादन करायला शिस्तबद्ध व शांततापुर्ण लोटलेली गर्दी बघायला मिळाली, त्याचे स्वागत करायला हवे. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे काय झाले, असा सवालही मध्यंतरी विचारला जात होता. त्यामागे उत्सुकता होती, तितकाच डिवचण्याचा हेतूही होता, हे नाकारता येणार नाही. पण जी माणसे मोठ्या लोकसंख्येचे जीवन प्रभावित करतात, त्यांची स्मृती कुठल्या इमारत वा जड वस्तूमध्ये नसते; तर त्यांच्या विचार व मार्गदर्शनात सामावलेली असते. त्याचे पुढे काय झाले?

   साडेचार दशके मराठी मनावर आणि मराठी राजकारणावर बाळासाहेबांनी आपल्या उक्ती व कृतीची छाप सोडलेली आहे. त्याच त्यांच्या खर्‍याखुर्‍या स्मृती आहेत आणि त्यांची जपणूक कशी होणार व होते आहे? त्याची उत्तरे शोधावी लागतील. बाळासाहेबांनी मुंबईच्या मराठीपणाची जपणूक या विषयापासून आपल्या सार्वजनिक जीवनाला सुरूवात केली आणि अखेरच्या कालखंडात त्यांनी हिंदूत्वाची पताका आपल्या खांद्यावर घेतली होती. त्यासाठी राजकारणामध्ये त्यांनी आमुलाग्र परिवर्तन घडवून आणण्याचे प्रयास केले, हे कोणी नाकारू शकत नाही. स्वातंत्र्योत्तर काळापासून सुरू असलेल्या मराठी राजकारणाला, अधिक राजकीय कार्यपद्धतीला बाळासाहेबांनी नवा चेहरा बहाल केला. सामान्य घरात जन्मलेली तरूण मंडळी नेहमी कार्यकर्ता राहिली. त्यांना नेतृत्वाचे पाठ देऊन त्यांच्यामध्ये भावी नेतृत्व जोपासण्याची प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनी सुरू केली. तिथूनच सर्वसामान्य घरातले कार्यकर्ते राजकारणात पुढे आले. ज्यांच्या पिढ्यानु पिढ्या खुर्च्या मांडणे, फ़लक झळकवणे किंवा पोस्टर लावून लाठ्या खाण्यातच खर्ची पडल्या होत्या; त्याच वर्गातल्या तरूणांना नेता बनवून राजकारणात नवी पिढी आणायचे काम बाळासाहेबांनी केले. मंत्रालयात त्यांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम झाला; तेव्हा छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी त्याची स्पष्ट शब्दात कबुली दिली होती. बाळासाहेब नसते तर आमची नावे तुम्ही कधी ऐकली नसती आणि प्रसिद्धही केली नसती, असे राणे भुजबळ म्हणाले. ही तळागाळातली नेतृत्व उभारण्याची व त्या समाज घटकांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची प्रक्रिया साहेबांनी सुरू केली, ती भविष्यात कशी जपली जोपासली जाणार आहे? कारण तेच साहेबांचे खरे स्मारक असेल.

   एका व्यंगचित्र साप्ताहिकातूल चित्रांच्या व शब्दांच्या माध्यमातून एक चळवळ उभी राहिली. जनजागृती व संवादातून उभ्या राहिलेल्या त्या चळवळीचे पुढल्या काळात संघटनेत व राजकीय पक्षात रुपांतर झाले. ज्याने कधी कुठल्या राजकीय विचारधारेची गुलामी न करता प्रासंगिक व दिर्घकालीन समाजजीवनातील प्रश्नांना हात घालण्यापर्यंत मजल मारली, असा साहेबांचा वारसा आहे. तो वारसा म्हणजे केवळ शिवसेनेची संघटना नव्हे. मुंबईचे मराठीपण आणि भारताचा हिंदू आत्मा ह्यासाठी ज्याने आपले आयुष्य खर्ची घातले; त्याचे स्मारक त्यांनी वापरलेल्या वस्तू किंवा त्यांनी वास्तव्य केलेल्या इमारतीमध्ये असू शकत नाही. त्यांच्या भूमिका व विचारांमध्ये त्यांच्या स्मृती सामावलेल्या असतात. त्यांच्या पश्चात शिवसेनेने गेल्या वर्षभरात त्या दिशेने किती व कोणती पावले टाकली, याला म्हणूनच महत्व आहे. आज शिवसेनेची संघटनात्मक शक्ती कायम आहे आणि त्यांच्या मागेही शिवसेना तितकीच पाय रोवून राजकारणात उभी आहे. पण तिची कसोटी त्यांच्या पश्चात होणार्‍या निवडणूकातून लागणार आहे. आणि त्या निवडणूका आगामी सहा महिन्यात होऊ घातल्या आहेत. त्या निवडणूकांचेच निकाल साहेबांच्या स्मृती किती जपल्या, जोपासल्या गेल्या त्याचे उत्तर देणार आहे. राज्यातली प्रदिर्घ कॉग्रेस सत्ता बाजूला करून भगवा फ़डकवण्याचे स्वप्न त्यांनी आपल्या जिवंतपणी साकार केले होते. पण ते टिकवण्यात पुढल्या तीन निवडणूकातले अपयश त्यांना जिवंतपणी बघायला लागले. ती कालचक्रे उलटी फ़िरवून पुन्हा मंत्रालयावर भगवा फ़डकवण्यासारखे त्यांचे दुसरे स्मारक असू शकत नाही, हे त्यांच्या निष्ठावंत शिवसैनिकाला अन्य कोणी समजावण्याची गरज आहे काय? ती साहेबांची इच्छा पुर्ण करण्यासाठी काय चालले आहे?

No comments:

Post a Comment