Tuesday, November 18, 2014

राष्ट्रवादी चिंतन, भाजपाला चिंता


शिवसेना आणि भाजप एकत्र आले असते, तर राज्याला स्थिर सरकार मिळाले असते. मात्र तसे घडलेले नाही. पुढच्या सहा महिन्यानंतरही जर ही परिस्थिती कायम राहिली, तर पुन्हा निवडणुका घेण्याची वेळ येऊ शकते, असे धक्कादायक विधान ज्यांच्या भरवशावर भाजप सरकार स्थापन झाले आहे, त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. आपल्या पक्षाला नुकत्याच झालेल्या विधानसभा व पाच महिन्यापुर्वीच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशापयशाचे आत्मपरिक्षण करण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसने योजलेल्या चिंतन बैठकीत पवारांनी उपरोक्त विधान केलेले आहे. त्याचे मग अनेक अर्थ लावणे स्वाभाविकच आहे. कारण जगातले इतर लोक प्रस्थापित अर्थाने शब्दांचा वापर करतात, त्यापेक्षा नेहमीच वेगळ्या अर्थाने शरद पवारांनी भाषा व शब्दांना राबवले आहे. इथे ‘शब्दांना राबवले’ असे मुद्दाम जाणिवपुर्वक म्हटले आहे. कारण अनेकदा पवारसाहेब शब्दांच्या इच्छेविरुद्धही त्यांना ‘कामाला जुंपत’ असतात. तिथे इतर पक्ष वा आपल्याच सहकार्‍यांची ते काय अवस्था करीत असतील, त्याची नुसती कल्पनाच केलेली बरी. अशा सुहृदावर म्हणूनच त्यांच्या जुन्या मित्राने म्हणजे बाळासाहेबांनी कधी राजकारणात विश्वास ठेवला नाही. बाळासाहेब अगत्याने शरदबाबूंशी आपली जुनी मैत्री असल्याचे हवाले द्यायचे. पण त्यांनी व्यवहारी राजकारणात पवारांना सोबत घ्यायची ‘हिंमत’ केलेली नव्हती. शिवसेनाप्रमुख आपल्या राजकीय धाडसासाठी प्रसिद्ध होते. पण तरीही त्यांनी पवारांशी राजकीय मैत्री करायचे साहस केले नाही, यातच पवारांच्या राजकीय विश्वासार्हतेचा मुद्दा स्पष्ट होतो. त्यामुळे त्याच पवारांनी निकालही स्पष्ट झालेले नसताना बाहेरून पाठींब्याचे वरदान भाजपाला सत्ताग्रहणासाठी दिलेले असेल, तर त्या पक्षाला कोणाच्या शापवाणीची गरज उरलेली नव्हती. आता तसेच होताना दिसते आहे.

अलिबाग येथे भरलेल्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबीरात पवारांनी आपण कोणती खेळी किती धुर्तपणे केली, त्याचेच प्रामुख्याने विवेचन केले आहे. शिवसेना आणि भाजपा एकत्र आले असते तर निर्वेधपणे पाच वर्षे स्थीर सरकार चालू शकले असते, असे पवार स्पष्टच सांगून टाकतात. पण ते एकत्र कशामुळे व कोणामुळे येऊ शकले नाहीत, त्याबद्दल साळसूद मौन पाळतात. आरंभीच उधृत केलेले पवारांचे वाक्य बघा. ‘सेना भाजपा एकत्र आले असते तर’, असे म्हणणार्‍या पवारांना ते दोन्ही पक्ष एकत्र येणार नाहीत, हे कधी कळले? निकाल अजून स्पष्ट झालेले नव्हते, तेव्हाच दोन्ही पक्ष एकत्र येणार नाहीत, असे भविष्य कळायला पवार कधीपासून भविष्यवेत्ते झालेत? नसेल तर त्यांनी निकाल लागून दोन्ही पक्षांमध्ये संवाद किंवा विसंवाद होण्यापर्यंत प्रतिक्षा कशाला केली नव्हती? भाजपाने न मागितलेला पाठींबा परस्पर देण्याच्या आधी त्या दोन पक्षात प्राथमिक बोलणी व्हायची सवड पवारांनी कशा ठेवली नाही? त्याचे कारणच स्पष्ट होते, की त्यांच्यात संवाद झाला व यशस्वी ठरला, तर राज्यात स्थीर सरकार स्थापन होऊ शकले असते आणि पुढली पाच वर्षे बिनधोक चाललेही असते. पण मग पवारांना राजकारणात कुठे कसली ढवळाढवळ करायची जागा वा संधी शिल्लक उरली नसती. त्यामुळेच आपले उपद्रवमूल्य कायम राखण्यासाठी सेना-भाजपा यांच्या संवादात पाचर मारणे आवश्यक होते आणि विनाविलंब पवारांनी तेच केले होते. त्यामुळे एकीकडे सेना रुसणार आणि दुसरीकडे भाजपाला सत्तेची भांग चढणार, असे पवारांचे मोजून मापून मांडलेले गणित होते. झालेही तसेच. आपल्या बिनमांगा पाठींबाच्या तालावर त्यांनी भाजपाला नाचवले आणि पर्यायाने सेनेलाही खेळवले. मग भाजपाला पुरता आपल्या कच्छपी लावल्यावर पवारांनी खरे डाव उघड करायला आरंभ केला आहे. अस्थीर सरकार आणि आपल्या इच्छेनुसार मध्यावधी निवडणूका अशी पवारांची खरी खेळी आहे.

चिंतन शिबीरात पवार म्हणाले, फ़डणवीस सरकार टिकवण्याचा व चालवण्याचा मक्ता आपण घेतलेला नाही. याचाच अर्थ असा, की त्यांनी आपल्या पाठींब्यावर विसंबून कुठले ठोस निर्णय घेऊ नयेत. तसे केल्यास आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. अर्थात राज्याच्या वा समाजाच्या हिताला बाधा येणारे निर्णय घेतल्यास पवारांचा पाठींबा रहाणार नाही, असे शब्द आहेत. पण हित कुणाचे व कुठले? धाडसी निर्णय घ्यायला विरोध नाही, तसाच घोटाळ्याचे आरोप आहेत, त्याच्याही चौकशीला विरोध नाही. मग धाडसी निर्णय कुठले उरतात? चौकशी आधीच झालेली आहे आणि आणखी चौकशी करायला हरकत नाही. पण त्याच्या पुढे जाण्याचे ‘धाडस करू नये. पुढे म्हणजे चौकशांचा खेळ मनसोक्त चालू द्यात. पण कुठलीही कायदेशीर वा फ़ौजदारी कारवाई करण्याची हिंमत नको. साध्या शब्दात पवार भाजपा सरकारला असे सांगत आहेत, की ज्या आरोप व प्रचाराने जिंकलात आणि भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा देण्याच्या वल्गना केल्यात, त्यांना हात लावलात तर याद राखा. तसे केल्यास पवार कुटुंब किंवा पवारांचे निकटवर्ति यांच्या हिताला बाधा आणलीत, तर पाठींब्याची हमी शिल्लक उरणार नाही. परिणामी मध्यावधी निवडणुकांची परिस्थिती येऊ शकेल. आपल्याला पाहिजे तेव्हा आपण तशी स्थिती आणू शकतो. तेव्हा आतापासून कार्यकर्त्यांनी आपापल्या मतदारसंघात तयारीला लागावे. आपल्याला पोषक स्थिती येईल तेव्हा आपण हे सरकार पाडून निवडणूका घेण्याचा डाव आपल्या हाताशी आणुन राखलेला आहे. म्हणूनच पवार पुढे म्हणतात, की राज्यात अस्थीरता आलेली आहे. ज्यांनी पहिल्या क्षणी अस्थीरता नको म्हणून बिनमांगा पाठींबा देऊन टाकला, त्यांनाच महिन्याभरात राजकीय अस्थीरता कशाला भेडसावू लागली आहे? तर आपणच आपल्या सोयीची अस्थीरता राज्यात निर्माण करून ठेवल्याची ती कबुली आहे.

१९ आक्टोबरला विधानसभेचे निकाल लागले आणि १८ नोव्हेंबरला अलिबागेत राष्ट्रवादीचे चिंतन शिबीर भरले. या ३० दिवसात शब्दांचे अर्थ किती बदलून गेलेत बघा. ज्यांनी पाठींबा देऊन भाजपा सत्तेची निश्चींती करून दिली होती, त्यांनी तितक्याच सहजतेने भाजपाच्या बोहल्यावर बसलेल्या नेत्यांना अनिश्चीततेच्या चिंतेत लोटलेले आहे. महिनाभर नैसर्गिक मित्रासारखी भाजपाची पाठराखण करणारे पवार, आता अकस्मात आपल्यासोबत नव्हेतर सेनेसोबतच भाजपाचे सरकार स्थैर्य देऊ शकेल अशी भाषा बोलू लागले आहेत. त्यामुळे इतके दिवस सकारात्मक चर्चेचा लपंडाव खेळणार्‍या भाजपाला आता ‘नैसर्गिक मित्र’ म्हणजे त्या शब्दांचा अर्थ नव्याने शोधायची वेळ येणार आहे. मोदीलाट ओसरण्यापर्यंत काही काळ सत्तेवर ठेवून भाजपाला कुठल्यही भ्रष्टाचाराच्या मामल्याला हात घालण्यापासून रोखणे, ही पवारांची धुर्त खेळी आहे. मग हे सरकार पाडले जाईल. तोपर्यंत कुठल्याही भ्रष्टाचाराला हात लागलेला नसेल, तर त्याला मध्यावधी निवडणूकीत पुन्हा मते मागताना भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडताही येणार नाही. उलट पवारच सत्तेला पाठींबा देऊन आम्ही कारवाईचे प्रतिआव्हान दिले, तेही भाजपा पेलू शकला नाही, म्हणत सगळा डाव भाजपावर उलटवू शकतात. पण त्याचा संपुर्ण राजकीय लाभ याक्षणी पवारांच्या पक्षाला मिळू शकणार नाही. कारण शिवसेना विरोधात बसलेली आहे, तिला मध्यावधीचा फ़ायदा होऊ शकतो. त्यापासून मुक्ती मिळवाण्य़ासाठी सेनेला सत्तेत पाठवणे आवश्यक आहे. तशी नामुष्की आता भाजपावर आणली जाईल आणि मग सेनेलाही निवडणूकीत राष्ट्रवादीच्या विरोधात बोलणे शक्य उरणार नाही. म्हणूनच वर्षभर सेनेने विरोधात बसले आणि सतत राष्ट्रवादी भ्रष्टाचाराच्या विरोधात कारवाईचा आग्रह धरणे, तिच्यासाठी मोठा गनिमीकावा असेल. कारण पवारांचे चिंतन स्पष्ट झाले आहे आणि भाजपाची चिंता सुरू झाली आहे. सेनेने फ़क्त संयम राखला तरी वर्षभरात युती वा जागावाटपासाठी गयावया करण्यापर्यंत भाजपाची घसरगुंडी शक्य होऊ शकेल. पवारांच्या चिंतन शिबीराचे बीदवाक्यच त्याची साक्ष देते. ‘वेध (भाजपाच्या) भविष्याचा’. वेध म्हणजे व्यवहारी भाषेत नेम किंवा टपोरी भाषेत गेम असतो ना?


2 comments:

  1. भाऊ, खरेच शरदबाबुंनी भाजपचा गेम केला आहे. भाऊ आपण शरद पवार यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहिर केला तेव्हाच लिहले होते की 'पाठिंबा देऊन शरद पवारांनी सरकार अस्थिर केले आहे'
    आपण जे जे निराक्षणे मांडता ते पुढे खरे होतात हा माझा अनुभव आहे.

    ReplyDelete