Tuesday, November 25, 2014

त्यांच्यातले ओंबळे जागवू या



आपापल्या कोशात जगताना आपण किती आत्मकेंद्री होतो ना? सहा वर्षे उलटून गेली आता त्या घटनेला. मुंबईवर झालेला कसाब टोळीचा हल्ला. २६ नोव्हेंबर म्हटला मग आपल्याला त्या भीषण प्रसंगाच्या आठवणी येतात आणि अंगावर काटा येतो. नुसत्या आठवणींनी आपल्या अंगावर शहारे येतात. मग ती घटना साक्षात घडत होती, तेव्हा आपली अवस्था काय होती? किती अगतिक व असहाय झाल्यासारखे आपण त्या सैतानांना सामोरे गेलो होतो? प्रत्येकजण आपापला जीव मुठीत धरून आडोसा शोधत होता. पण आपल्यातलेच काहीजण मोठ्या हिंमतीने त्या संकटाला थेट जाऊन भिडले होते. करकरे, कामथे, साळसकर यांच्यासारखे धीरोदात्त अधिकारी व तुकाराम ओंबळेसारखा पोलिस जवान हातात कसलेही हत्यार नसताना थेट कसाबच्या अंगावर धावला होता. त्याच्या बंदुकीतून सुटलेलया गोळ्या पोटात घेऊनही बाजीप्रभू देशपांडेसारखा तो झुंजला होता. त्या गोळ्यांनी जीव गेला तरी ओंबळेची कसाबला घातलेली पकड सुटली नव्हती. जगातला पहिला फ़िदायिन त्याने पकडून दिला. आपल्याला त्याचे किती कौतुक वाटले होते. पण त्या हुतात्म्याच्या पराक्रमाचे गोडवे गाताना त्याच्याच आप्तस्वकीयांवर कुठला प्रसंग ओढवला, त्याचे कितीसे भान आपल्याला होते किंवा आहे? असे जवान व अधिकारी आपल्यासाठी जीवावर उदार होतात, म्हणून आपण निश्चींत मनाने आपापल्या घरात जगू शकत असतो. त्यांची कुवत हिंमत आणि त्यांची बांधिलकी आपल्याला अशा प्रसंगामुळे कळते. पण अन्यवेळी आपण त्यांच्याकडे कुठल्या नजरेने बघत असतो? पोलिस खात्यातल्या कर्मचार्‍याची काय प्रतिमा आपल्या मनात असते? त्याचा गणवेश बघितला म्हणजे लाचखावू अशीच आपली मानसिकता झालेली आहे. त्यातच असलेला कोणी ओंबळे असतो किंवा करकरे-कामथे असतो ना?

हा एक दिवस असा येतो, की आपल्या मनातल्या अपराधी भावनेला बोचकारे काढतो. वर्दीतला पोलिस बघून आपल्या मनात अनेक शंका येतात, त्याला हा एक दिवस अपवाद असतो. कारण तुकाराम ओंबळे अशाच वर्दीतला होता आणि कदाचित कधीतरी आपण त्याच्याकडेही अशाच शंकास्पद नजरेने बघितले असेल काय? हौतात्म्य पत्करल्यावर त्याच्याविषयी आपल्या भावना खुप उचंबळून आल्या. पण त्याच्याआधी कुठल्या ना कुठल्या नाक्यावर रस्त्यावर आपल्यासमोर तो आलेलाच असेल. त्याला आपण कुठल्या नजरेने बघितले असेल? एक धाडसी पोलिस वा मुंबईवर हल्ला झाला तर आपले प्राण पणाला लावुन लढणारा, असा विचार आपल्या मनात आला असेल काय? की आपल्या मनातल्या पुर्वग्रहानुसार आपण त्याच्याकडेही एक लाचखोर म्हणुन बघितले असेल? कुठल्याही पोलिसाकडे बघण्याची आपली अशीच दृष्टी झालेली आहे. अशी वर्दीतली माणसे आपल्याच समाजातली आहेत आणि एक कर्तव्य म्हणून अशी नोकरी करीत आहेत. अंगातली वर्दी उतरवली, मग तेही एक सामान्य माणुस म्हणून जगत असतात आणि त्यांनाही आपल्यासारख्याच शेकडो विवंचना सतावत असतात. जगण्यातल्या हजारो समस्यांना आपण सामोरे जात असतो, तसेच पोलिस शिपाईसुद्धा सामान्य जीवन जगत असतात. आपल्या जगण्यात जशा अनेक चुका आपण सातत्याने करीत असतो किंवा कुठले नियम मोडत असतो, त्यातलेच आपले सहाध्यायी हे पोलिस असतात. मग आपल्यातलेच दुर्गुण त्यांच्यातही असतात. जगण्यातल्या समस्या टाळण्यासाठी आपण जशा अनेक तडजोडी करतो, तशाच त्यांनाही कराव्या लागत असतात. पण वर्दी अंगावर घातली मग त्याने सद्गुणांचा पुतळा असायला हवे, ही आपली अपेक्षा कितीशी प्रामाणिक असते? कुठल्याही माणसाच्या खर्‍या प्रामाणिकपणाची परिक्षा कसोटीचा प्रसंग ओढवतो, तेव्हाच होत असते.

सहा वर्षापुर्वी तसा प्रसंग आलेला होता. तेव्हा ओंबळे असो की अन्य पोलिस अधिकारी असोत; त्यांनी मुंबईला युद्धक्षेत्र बनवणार्‍यांशी प्राणपणाने लढा दिला हे विसरून चालणार नाही. आणि म्हणूनच आजचा दिवस पोलिसांच्या गौरवाचा आहे. तो मोजक्या हुतात्म्यांच्या आठवणीचा दिवस नाही. नित्यनेमाने आपल्याला गलथान वाटणार्‍या पोलिसांनी आपल्या कर्तृत्वाच्या दिलेल्या कसोटीच्या स्मरणाचा दिवस आहे. खरे तर ही लढाई पोलिसांची नव्हतीच. कारण समोर आलेले जिहादी पथक अस्सल युद्धसज्ज सैनिकांचे होते. समोर दिसेल त्याला तिथेच गोळ्या झाडणार्‍यांचे होते. तिथे पोलिस उपयोगाचे नसतात. कुठलीही चौकशी न करता थेट समोरच्याचा जीव घेण्याची ही लढाई होती. तिला जितका सामान्य माणूस गाफ़ील असतो, तितकाच पोलिसही निरूपयोगी असतो. पण त्या युद्धप्रसंगात मुंबईच्या प्रत्येक पोलिसाने आपल्या आवाक्यात नसलेल्या गोष्टी करण्याची हिंमत दाखवली हे विसरता येणार नाही. फ़िदायिन म्हणजे आत्मघाती सैनिक. तो मारला जाईपर्यंत लढत रहाणार आणि जितक्या निरपराधांना मारता येईल त्यांचे जीव घेणार. त्याच्याशी दोन हात करायचे प्रशिक्षण घेतलेल्यांनाच त्याला आवरणे शक्य असते. पण मुंवईच्या पोलिसांनी त्या दिवशी आपल्या अपुरेपणाला दाद दिली नाही आणि आवाक्याबाहेरच्या या संकटाला थेट भिडण्याची हिंमत केली. तिथे प्राणाचीही पर्वा न करता मुंबईचे पोलिस सरसावले. दिल्लीहून प्रशिक्षित कमांडो येईपर्यंत किल्ला लढवल्यासारखे हे पोलिस लढले. त्यात कोणी बळी पडला, तर कोणी जखमी जायबंदी झाला. त्यातल्या यशापेक्षा त्यांच्या हिंमतीला दाद देण्याची गरज आहे. किंबहूना त्यांच्यातल्या त्या झुंजण्य़ाच्या इच्छाशक्तीला आपण किती खतपाणी घालतो, याला अधिक महत्व आहे. कारण त्यातूनच आपल्याला गरज आहे, असे धाडसी व कर्तव्यदक्ष पोलिस उदयास येऊ शकतात.

गुणवत्तेला खतपाणी घालून प्रोत्साहन दिले तरच तसे लोक आपल्या समाजात वाढत जातील. आपण त्यांच्याकडे नाकर्ते म्हणून बघत राहिलो आणि त्यांच्यातल्या मुठभर भ्रष्ट वा नाकर्त्यांचाच गवगवा करत राहिलो, तर त्यात कुठली सुधारणा होऊ शकेल? त्या प्रत्येक पोलिसात किंवा अधिकार्‍यात आपण करकरे कामथे किंवा ओंबळे बघू शकलो, तर त्यांच्यातूनच आपल्याला हवे असलेले कर्तव्यदक्ष पोलिस जोपासले जाऊ शकतील. म्हणूनच आज त्या भयंकर दिवसाचे स्मरण करत असताना आपल्या आसपासच्या कुणाही पोलिसाला ओंबळेचे शौर्य सांगून त्याच्या स्मृती जागवून आपण त्याच्यातला ओंबळे प्रकट होण्यासाठी काही करू शकतो काय? म्हणजे असे, की आपल्या परिचयातील किंवा जवळपासच्या कुठल्याही पोलिसाशी त्या दिवसाच्या घटनांबद्दल चर्चा करावी. त्या दिवशी त्याच्या काय भावना होत्या, कोणत्या आठवणी आहेत, असे गप्पा करून बोलू शकतो का? त्या हुतात्मा पोलिसांनी आपल्या खात्याविषयी जनमानसात कसा अभिमान निर्माण केला, त्याबद्दल बोलू शकणार आहोत काय? पोलिस कसा हवा तर करकरे-ओंबळे सारखा, असे बोलण्यातून आपण आजच्या बदनाम पोलिस खात्याला नवी उभारी व प्रेरणा देऊ शकू. या दिवसाचे महत्व आपण जेव्हा पोलिसांना सांगू; तेव्हा त्याला त्याच्या कर्तव्याची थोरवी उमजायचा मदत करू. नकारात्मक बोलण्य़ाने अधिक निष्क्रीय होत चाललेल्या पोलिसांमध्ये नवी कर्तव्याची जाणिव जागवण्यापेक्षा त्या हुतात्म्यांसाठी कुठली मोठी श्रद्धांजली असू शकते? पोलिस खात्यात प्रत्येक अधिकारी करकरे-कामथे किंवा ओंबळे होण्याच्या प्रक्रियेला गतिमान करण्याने आजचा दिवस साजरा झाला, तर कुठल्या परक्या शत्रू देशाची इथे हल्लेखोर पाठवण्याची हिंमत होऊ शकेल? हुतात्म्यांच्या चित्राला हार घालण्यापेक्षा, जिवंत पोलिसातला पराक्रम व पुरूषार्थ जागवणे अधिक समयोचित ठरणार नाही काय?

1 comment:

  1. भाऊ, आपण म्हणता तसे पोलिसांशी बोलून त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. माहित नाही भाऊ का? परंतु लोक प्रत्येकाला एकाच तराजूत तोलतात. प्रत्येक क्षेत्रात वाईट आणि चांगल्या प्रवृत्ती असतातच. उत्तम आणि आजच्या काळात आवश्यक असा लेख आपण लिहला आहे.

    ReplyDelete