Wednesday, November 5, 2014

शिवसेनेच्या आधीची शिवसेना



शिवसेनेकडे पक्ष म्हणून बघणार्‍या व त्या कसोटीवर सेनेचे विश्लेषण करणार्‍यांना आयोगाकडे नोंदलेली शिवसेना ठाऊक आहे. पण संघटना म्हणून शिवसेनेची स्थापना झाली, त्याहीपुर्वीची शिवसेना कितीजणांना माहिती आहे? १९६० सालात महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. त्यासाठी एक मोठा लढा झाला, त्याला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असे म्हणतात. त्यात जनसंघ हिंदू महासभेपासून समाजवादी व रिपब्लीकन पक्षही सहभागी झालेले होते. त्यांच्याखेरीज विविध क्षेत्रातल्या मराठी मान्यवरांचाही त्यामध्ये भरणा होता. प्रबोधनकार ठाकरे किंवा आचार्य अत्रे यांच्यासारखे दिग्गज पत्रकार लेखक त्यात उतरले होते. अशा मराठी दिग्गजांनी मराठी राज्यासाठी मोठे आंदोलन उभारले. त्याचे नेतृत्व अर्थातच विविध पक्षांनी एकत्र येउन स्थापन केलेल्या संयुक्त महाराष्ट्र समिती या आघाडीने केलेले होते. पण निवडणूका जिंकल्या आणि राज्य मिळाल्यावर या पक्षांना आपले राजकारण व पक्षस्वार्थ मोठे वाटू लागले व त्यांची आपापसात भाऊबंदकी सुरू झाली. त्यामुळे समिती भंगली. त्याचा धक्का त्यात सहभागी झालेल्या मराठी तरूणाला बसला. तो कुठल्या पक्षाचा अनुयायी म्हणून समितीत सहभागी झाला नव्हता, की त्याने पक्षीय राजकारणासाठी पोलिसांचे दंडूके अंगावर झेललेले नव्हते. त्यामुळेच समिती म्हणून इर्षेने कॉग्रेस विरोधात एकवटलेल्या मराठी तरूणाची समितीच्या दिग्गज राजकीय नेत्यांनी पुरती गोची करून टाकली. कारण मागणीप्रमाणे मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली होती आणि त्याच मुंबईत त्याच मराठी माणसाला व तरूणाला कोणी कवडीची किंमत देत नव्हते. राजकीय सत्तेत पुन्हा कॉग्रेस विराजमान झाली होती आणि विरोधातल्या मराठी तरूणांना कोणी नेता वा पक्ष संघटनाच उरलेली नव्हती. त्याच्या मनातली ती घुसमट म्हणजे मराठी अस्मिता होती आणि तीच पुढल्या काळात शिवसेना म्हणून अवतार घेऊन समोर आली.

आधी त्या घुसमटीला कोणी विचारत नव्हते. कारण प्रत्येक राजकीय पक्ष आपापला अजेंडा घेऊन चालला होता आणि समितीला डोक्यावर घेऊन नाचलेला मराठी तरूण बेवारस झालेला होता. त्याला वाचा फ़ोडण्याचे काम प्रबोधनकार ठाकरे यांनी ‘मार्मिक’ या साप्ताहिकातून सुरू केले आणि त्याला त्यांचे पुत्र बाळ ठाकरे यांनी व्यंगचित्राने साथ दिली. तिथे मग ही घुसमट उघड होऊ लागली. त्यातली भावना अन्य राजकीय नेत्यांनी लक्षात घेतली नाही, की राजकीय विचारवंतांनी ओळखली नाही. मार्मिक या साप्ताहिकातून धुमसणार्‍या त्या अस्वस्थतेला संघटनातक रूप देण्याची पाळी खुद्द संपादक बाळासाहेब ठाकरे यांना उचलावी लागली. ती संघटना म्हणजे शिवसेना. ती संयुक्त महाराष्ट्र समितीच्या रुपाने आधी वावरली आणि पुढे समितीच्या नेतृत्वाने वार्‍यावर सोडल्यानंतर शिवसेनेचे रुप घेऊन अवतरली. खरे तर मराठी तरूणांची ती भावना समितीचे दिग्गज नेते एस एम जोशी, आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे इत्यादींनी ओळखली असती व तिची कदर केली असती, तर त्या तरूणाला शिवसेनेचे रूप धारण करावे लागले नसते, की त्या तरूणाचे शिवसैनिकात रुपांतर झाले नसते. अशी आहे शिवसेना, जी शिवसेनेच्या स्थापनेपुर्वीच अस्तित्वात होती. जितकी ती धारणा व भावना डिवचली गेली, तितकी ती उफ़ाळून येत गेली आणि चार दशकात राज्यातला पर्यायी राजकीय पक्ष बनून गेली. जर ती भावना समितीच्या दिग्गजांनी वेळीच ओळखली असती, तर शिवसेना अस्तित्वातच आली नसती. महाराष्ट्र राज्य ज्यांच्या नेतृत्वाखाली संपादन केले, त्याच समितीचे दिग्गज नेते जेव्हा शिवसेनेची व तिच्या अस्मितेची खिल्ली  उडवू लागले, तेव्हा त्यांनाही संपवायला त्या अस्मितेने मागेपुढे बघितले नाही. १९६० सालात मराठी तरूणाच्या गळ्यातला ताईत असलेले आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे १९६६ नंतर राजकारणात अस्तंगत त्यामुळेच झाले.

समितीच्या रुपातल्या शिवसेनेच्या अस्मिता व भावभावनांची कदर समितीच्या नेत्यांनी केली नाही, तर त्यांची थोरवी संपवून एका व्यंगचित्रकाराला त्या अस्मितेचा नेता व्हायला त्याच भावनेने भाग पाडले. मराठी अस्मितेची ही किमया विसरून चालणार नाही. शिवसेना स्थापन करून नेतृत्व करण्यापर्यंत बाळासाहेब यांनी कुठल्या पक्ष वा संघटनेत काम केलेले नव्हते. त्यांचा राजकीय संघटना कार्याचा अनुभव शून्य होता. पण त्याची फ़िकीर कोणाला होती? मराठी अस्मितेने भारावलेल्या तरूणाला नेतृत्व हवे होते आणि त्याने या राजकीय चेहराही नसलेल्या व्यक्तीला चक्क नेता बनवून टाकले. ज्यांना मराठी अस्मितेची ही किमयाच ठाऊक नाही, त्यांना शिवसेना म्हणजे एक राजकीय पक्ष वाटतो. अर्थात तो एक पक्ष आहे. पण तो संयुक्त महाराष्ट्र समितीसारखा भावनांनी जोडलेला पक्ष आहे. त्याने जर मराठी अस्मितेला जुमनले नाहॊ व सत्तेच्या जुगारात मराठी भावनेला झिडकारले; तर त्यांनाही समितीप्रमाणे संपावे लागेल. कारण शिवसेनेचा अवतार सत्तेचे राजकारण खेळण्यासाठी नसून मराठी भावना जपण्याला त्यात प्राधान्य आहे. त्याचा विसर पडला, तर आचार्य अत्रे वा डांगे यासारखे दिग्गज मराठी माणसाने झिडकारल्याचा इतिहास आहे. तो नेमका ठाऊक असल्याने बाळासाहेबांनी सतत ती अस्मिता जपली-जोजवली. राजकारण करताना त्यांनी कधीच त्या मराठी तरूणाला अगतिक झाल्याचे दिसणार नाही, इतकेच सौदे केले. तडजोडीही केल्या. पण सत्तेसाठी शिवसेना अगतिक झाली आणि तिने अस्मिता गहाण टाकली, असे मराठी तरूणाला वाटणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली. त्यातून मग शिवसेनाप्रमुख नावाचे अढळपद निर्माण झाले. त्यात सामावलेला अहंकार बाळासाहेब नावाच्या व्यक्तीमध्ये कधीच दिसला नाही, इतके त्याचे प्रतिबिंब शिवसैनिकात दिसायचे. कारण ती एक भावना, मनोवृत्ती व धारणा आहे, ज्याचे प्रताप शिवसेना म्हणून दिसतात.

आज सत्तेसाठी उतावळ्या झालेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी वा सेनेच्या विरोधकांनी एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवावी. अशा रितीने सेना संपत नाही, की संपणार नाही. कारण ती बाळासाहेबांचा वारस म्हणून उद्धव ठाकरे यांची ओशाळी नाही किंवा सत्तेवर जाऊन बसणार्‍या सेना नेत्यांची लाचार नाही. उद्या ६३ मधले काही आमदार फ़ुटले, म्हणून सेना विधानसभेत रोडावलेली दिसेल. पण ती खरी सेनाच नाही. १९६६ पासून १९९० पर्यंतच्या चोविस वर्षात सत्तेबाहेरची शिवसेना फ़ोफ़ावली शाखांमधून. जोपर्यंत शिवसेनेच्या शाखा उत्स्फ़ुर्त मराठी तरूणाच्या गर्दीने भरलेल्या असतील, तोपर्यंत शिवसेनेला मरण नाही, की अंत नाही. मातोश्री वा शिवसेना भवनात दिसणारे नेते व नेतृत्व उर्जा मिळवते, ते त्याच शाखांमधून आणि तिथल्या गजबजलेल्या गर्दीतून. ती गर्दी आणि जनमानसातील बाळासाहेबांची खंबीर प्रतिमा, हीच सेनेची खरी शक्ती राहिली. त्याचा आजच्या सत्तालोलूप नेत्यांना वा सेनेच्या विरोधकांना विसर पडला असेल, तर जरूर त्यांनी शिवसेना नावाच्या भावभावनांशी खेळ करावा. सेनेचे आमदार फ़ोडावेत, सेना नेत्यांनी सत्तेसाठी अगतिक व्हावे. पण या प्रत्येकाने भुजबळ, राणे यांची आजची अवस्था जरूर बघावी. कुठल्याही सत्ता पदाशिवाय जगभरच्या लोकांना मातोश्रीवर यायला भाग पाडणारे बाळासाहेबही आठवावेत. हा माणुस येणार नाही वा येऊ शकत नाही, हे ठाऊक असूनही लोक तिथे बोलावणे घेऊन कशाला जायचे? मातोश्रीचे ते महात्म्य अहंकारातून आलेले नव्हते. प्रतिक्षेतून आलेले नव्हते. सत्तेतूनही आलेले नव्हते. कुणी फ़ुटण्याच्या भयापोटीही आलेले नव्हते. बाळासाहेबांचे बळ शब्दात नव्हते, इतके त्यांच्या आत्मविश्वासात होते आणि त्यांच्या शब्दाखातर जीव ओवाळून टाकणार्‍या शिवसैनिकात होते. नेत्यांमध्ये त्यांचा जीव गुंतला नव्हता इतका शिवसैनिकात गुंतला होता. म्हणून त्यांनी सत्तेची पदे वाटली, कुणाकडे मागितली नाहीत. त्याला शिवसेना म्हणतात.

1 comment:

  1. सत्तेची पदे वाटणे ती कुणाकडे मागणे नाही त्याला शिवसेना म्हणतात वा भाऊ पटले आणि ते खरे हि आहे बाळासाहेबांनी पदे वाटली स्वत कडे नाही ठेवली व घेतली आणि हाच शिवसेना नामक पक्षाचा स्वभाव होता आणि असला पाहिजे धन्यवाद

    ReplyDelete