Thursday, November 16, 2017

पाच वर्षानंतर

thackeray के लिए चित्र परिणाम

आता त्याला पाच वर्षे होऊन गेलेली आहेत. तो दिवस ऐन दिवाळीतला महत्वाचा होता आणि ती नकोशी वाटलेली बातमी आली. अवघ्या मुंबई परिसरात त्या संध्याकाळी मग कुठल्याही घरावर आकाश कंदिल व रोषणाई असूनही दिवे लागले नाहीत. हो बाळासाहेब, तुम्ही त्याच दिवशी दुपारच्या सुमारास इहलोकीचा निरोप घेतला होता. खरे तर त्याची कुणकुण दोनतीन दिवस आधीपासूनच लागली होती आणि ती दिवाळी तशीच ओशाळवाणी होऊन गेलेली होती. मातोश्रीवर देशभरातल्या मान्यवरांची रांग लागलेली होती आणि जणू प्रत्येक मुंबईकराचा जीव टांगणीला लागलेला होता. काही होऊ घातले आहे आणि ते घडू नये, अशीच प्रत्येकाची इच्छा होती. पण नियतीसमोर कोणाचे चालले आहे? त्या दिवसाचा सूर्य मावळण्यापुर्वी डॉक्टर जलील पारकर यांनी दोन दिवसांपासून खोळंबलेल्या वाहिन्यांच्या कॅमेरासमोर कोणालाच नको असलेली बातमी दिली. तुमच्या निधनाची ती बातमी अपेक्षित असली तरी नकोशी होती आणि पुढल्या चोविस तासात देशाच्या कानाकोपर्‍यातून लक्षावधी लोकांची मुंबईकडे रीघ लागली. कोणी आदेश दिला नाही वा सूचनाही दिल्या नव्हत्या, तरी पुढले दोन दिवस मुंबई ठप्प झाली होती. ज्याच्या शब्दावर आणि इशार्‍यावर मुंबई बंद पडायची, त्याच्या तोंडचे शब्द विरून गेले आणि तोच आदेश समजून मुंबई आपोआप ठप्प झाली. त्या दिवशी पश्चीमेला मावळलेला सूर्य दुसर्‍या दिवशी पुर्वेकडून उगवला, तेव्हा त्यालाही मुंबई रडवेली वाटलेली होती आणि मुंबईभरचे रस्ते केवळ बाळासाहेबांना अखेरचा निरोप देण्यासाठी सज्ज झालेले होते. शिवाजी पार्कच्या मैदानात तुमच्यावर अंत्यविधी पार पडले आणि तिथून माघारी फ़िरलेल्या अमिताभ बच्चनने नेमकी प्रतिक्रिया दिलेली होती. मुंबई वा जग किती व कसे बदलून गेले, त्याची तीच साक्ष होती.

सरकारी इतमामाने व तोफ़ांच्या सलामीने तुम्हाला अखेरचा निरोप देण्यात आला. पण तिथून माघारी जुहूला निघालेल्या अमिताभने माहिमच्या कोळीवाड्यापाशी एक मोठा भव्य फ़लक बघितला. त्यावर लिहीले होते, ‘बाळासाहेब अमर रहे’. कुठल्याही नेता वा मान्यवराच्या मृत्यूनंतर हे शब्द बोलले जातात. छापले वा घोषित केले जातात. पण त्याविषयी कोणी नाराजी कधी व्यक्त केल्याचे कोणी ऐकलेले नसेल. पण अमिताभने तात्काळ ट्वीट करून त्या शब्दाविषयी निराशा व्यक्त केलेली होती. त्याची प्रतिक्रीया खुप बोलकी व मुंबईसह कोट्यवधींच्या मनातली भावना व्यक्त करणारी होती. हे शब्द इतक्या लौकर ऐकायची इच्छा नव्हती की अपेक्षा नव्हती, असे अमिताभने नाराजीच्या सुरात लिहीले होते. ‘अमर रहे’ म्हणजे स्मरणात राहोत, त्यांची विस्मृती होऊ नये वगैरे काहीतरी अर्थ होतो. अमिताभला तेच मान्य नव्हते. आता बाळासाहेब नाहीत ही कल्पनाच त्याला असह्य झालेली होती आणि तीच अवघ्या मुंबई व मराठी माणसाची धारणा असावी. अन्यथा इतक्या लाखोच्या संख्येने लोक त्या अंतिम दर्शन वा संस्कारासाठी तिथे लोटले नसते. देशभरच्या वाहिन्यांनी दिवसभर दुसरा कुठला विषय प्रक्षेपित केला नाही, की अन्य कुठली चर्चा नव्हती. सर्वत्र एकच विषय व्यापून राहिलेला होता, तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या निर्वाणाची कथा. ती नुसती कथा नव्हती तर ते वास्तव होते आणि त्याची प्रचिती गेल्या पाच वर्षात पदोपदी व क्षणोक्षणी येत असते. राजकारणात, समाजजीवनात, मुंबईच्या नागरी जगण्यात. हा एक माणुस आज असता, तर असे झाले असते का? त्याच्या इच्छेशिवाय असे काही घडू शकले असते का? असे प्रश्न शेकडो प्रसंगी मुंबईकर व मराठी माणसाला सतावत रहातात. तुम्ही असण्यातला व नसण्यातला मोठा फ़रक अशा वेळी अंगावर चाल करून येतो.

राम कृष्णही आले गेले, अशी ओळ कुणा कवीने लिहीलेली आहे. त्यामुळे बाळासाहेब तुमच्याही निधनानंतर हे जग थांबलेले नाही वा थांबणारही नव्हते. पण चाललेल्या जगात व जीवनात तुमची त्रुटी जागोजागी जाणवते. काही लोकांना तुम्ही आपली जागिर वाटू लागलात व तुमच्या सर्वव्यापी अस्तित्वालाच त्यांनी वेसण घालण्यापर्यंत मजल मारलेली आहे. शिवसेनाप्रमुख वा बाळासाहेब म्हणजे एक भूमिका व पवित्रा होता. हे तुमच्या लक्षावधी चहात्यांना, अनुयायांना व भक्तांना आजही पक्के ठाऊक आहे. म्हणूनच मग जागोजागी व क्षणोक्षणी त्यांना तुम्ही असता, तर काय कसे घडले असते आणि कुठल्या बाबतीत तुम्ही कसा प्रतिसाद दिला असता, त्याचेही कोडे पडत असते. मुंबई म्हणजे बाळासाहेब आणि त्यांची शिवसेना असे एक समिकरण होते. ते पाच वर्षात विस्कटून गेले आहे. हा त्यातला मोठा फ़रक आहे आणि तो अनेकांना बोचतो आहे. तुमची शक्ती वा बळ आमदारात नगरसेवकात नव्हते. तुमचे अस्तित्व मातोश्रीत नव्हते तर अवघ्या मुंबईभर पसरलेले होते. विरार पालघर, ठाणे कल्याणपर्यंत आणि उरण पनवेलपर्यंत पसरलेले होते. ज्याला मुंबई म्हणतात, तिथपर्यंत बाळासाहेबांचे अस्तित्व होते. ते जिंकलेल्या निवडणुकीतल्या जागा वा सत्तेमध्ये नव्हते. तर कुठल्याही बाबतीतल्या तुमच्या पवित्र्यात तुमचे अस्तित्व होते आणि त्याची दखल घेतल्याशिवाय कोणी पुढे पाऊल टाकू शकत नव्हता. नुसत्या शब्दाचा उच्चार ऐकला की धावत सुटणारा शिवसैनिक, आवेशात येणारा मराठी माणूस; आज हरवून बसलीय मुंबई! मराठी वा अमराठी असे सगळेच तुमचे भक्त होते आणि प्रत्येकाला हा मुंबईचा बाप पाठीशी असल्याची एक खात्री सुखरूपतेची हमी देत होती. ती हमी आज कुठल्या कुठे विस्मृतीत गेली आहे. त्या जुन्या आठवणी चाळवल्या म्हणजे पाच वर्षे उलटून गेल्याची बोचरी वेदना अधिकच टोचू लागते.

अखेरच्या दिवसात तुम्ही जवळपास शांत झाला होता आणि सार्वजनिक जीवनातून संन्यास घेतल्यासारखे अलिप्तपणे जगाकडे घडामोडीकडे बघत होतात. पण त्यावर्षी अखेरच्या चित्रित भाषणात तुम्ही नांदेडमध्ये शिरकाव केलेल्या ओवायसीच्या पक्षाच्या यशाचा धोका बोलून दाखवला होता. आज त्याच महापालिकेतून ओवायसी अंतर्धान पावलाय. एकप्रकारे तुमची इच्छा पुर्ण झाली. पण तुमच्याच किती अनुयायांना तुमचे ते शब्द आठवले? पण दु:ख इतकेच, की त्याच पाकिकेत आता तुमच्याच शिवसेनेचेही प्रतिनिधीत्व राहिलेले नाही. असो, अशा घटना तुमचे स्मरण ताजे करतात आणि काय गमावले त्याची जाणिव अधिक तीव्र होते. तेव्हाही अलिप्त राहुन तुमच्यात ज्या जाणिवा भावना तीव्र होत्या. क्रमाक्रमाने आता त्या अस्तंगत होत चालल्या आहेत. एल्फ़िन्स्टनची चेंगराचेंगरी असो किंवा फ़ेरीवाल्यांचा विषय असो, आज तुम्ही असतात, तर काय वेगळे घडले असते, त्याचे मराठी माणसाला कोडे पडते. कारण राजकारणात व सत्तेच्या स्पर्धेत असूनही तुम्ही खुप वेगळे होतात आणि तसेच राहूनही खुप काही करता येते; याचे मुर्तिमंत उदाहरण बनला होता. कुणाच्याही मृत्यूनंतर पोकळी निर्माण झाल्याची भाषा वापरली जाते. पण ती पोकळी जाणवण्याइतके मोठे व्यक्तीमत्व सहसा आयुष्यात अनुभवास येत नाही. बाळासाहेब तुम्ही खरे़च पोकळी निर्माण करून गेलात. ती कोण भरून काढेल, केव्हा भरून काढेल, त्याचे उत्तर नजिकच्या भविष्यात दिसत नाही. ज्यांच्या अशा स्मृती सदोदित व पदोपदी सामोर्‍या येत रहातात, त्यांचे स्मृतीदिन कसले साजरे करायचे? तुम्ही लक्षावधी कोट्यवधी लोकांच्या मनात इतक्या स्मृती जोपासून गेला आहात, की त्यांची इहलोकीची यात्रा संपण्यापर्यंत तुम्ही तसेच ताजेतवाने असणार मनामनात. कदाचित याही पिढ्या असा कोणी बाळासाहेब होऊन गेल्याच्या कहाण्या कथा पुढल्या पिढीला सांगत रहातील आणि त्यातून तुम्ही दंतकथा होऊन अजरामरच रहाणार आहात.

7 comments:

  1. अगदी मनातलं

    ReplyDelete
  2. खूप छान भाऊ....����

    ReplyDelete
  3. वाह!
    अप्रतिम भाऊ हे अगदी तुमच्या आमच्या मनातलं आहे..

    ReplyDelete
  4. अप्रतिम लेख...

    ReplyDelete
  5. Great. Bhau thanks. Balasahebana Roz dhyanat yetat. Te aamchte hrudayat aahe chatrapati Shivaji Raje sobat

    ReplyDelete