नुकताच कॉग्रेस पक्ष सोडून वेगळा स्वाभिमानी पक्ष स्थापन केलेले नारायण राणे, यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार म्हणून माजी मंत्री व महाराष्ट्र भाजपाचे ज्येष्ठ नेते नाथाभाऊ खडसे कमालीचे व्यथीत झाले आहेत. आजच्या पिढीला त्यांनी वा जुन्या पिढीतल्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी उपसलेले कष्ट माहिती नाहीत, अशी खडसे यांची व्यथा आहे. पण त्या व्यथेचा व इतिहासाचा आणि नारायण राणे यांच्या मंत्रीपदाचा काय संबंध, हे मात्र त्यातून स्पष्ट होत नाही. कदाचित आपण सत्तेबाहेर फ़ेकलो गेलो आहोत आणि कालपर्यंत कॉग्रेसमध्ये बसलेले राणे मंत्रीपद भूषवणार, अशी ती व्यथा असावी. तेही स्वाभाविक आहे. कधीकाळी खडसे व राणे एकाच सरकारमध्ये मंत्री होते आणि एकत्र त्यांनी सत्तापदे भूषवलेली होती. पण तेव्हाची गोष्ट वेगळी होती. तेव्हा राणे शिवसेनेत होते आणि काही काळ मुख्यमंत्रीही होते. पण खडसे मात्र मंत्रीपदाच्या पुढे कधी मजल मारू शकले नाहीत. मागल्या विधानसभा निवडणूकीनंतर तशी शक्यता निर्माण झाली होती. पण ऐनवेळी धाकटा भाऊ देवेंद्र दिल्लीच्या कृपेने मोठा झाला, म्हणून नाथाभाऊंची संधी हुकली. त्याचेच वैषम्य बहुधा त्यांना बोचत असावे. किंबहूना धाकटा व थोरला ही संकल्पनाच ज्येष्ठ म्हणून नाथाभाऊंनी राजकारणात आणली आणि आता त्यांनाच धाकटा होण्याची वेळ आल्यामुळे त्या संकल्पनेतले दु:ख त्यांना सतावत असावे. पण त्याचा राग राणे यांच्यावर कशाला? राणे यांनी नाथाभाऊंना धाकटे केलेले नाही, की त्यांना बाजूला करून कुठले पद बळकावलेले नाही. अजून खरे तर राणे यांची मंत्रीमंडळात वर्णीही लागलेली नाही. मग हे ताशेरे त्यांच्यावर कशाला? थोरल्या धाकट्याची जी थिअरी नाथाभाऊंनी आणली, त्याचा जरा फ़ेरविचार केला तर त्यांच्या मनाला थोडी शांतता लाभू शकेल. विधानसभा निवडणूकीत युती मोडण्याचे शौर्य आपण दाखवले, त्याची किंमत त्यांच्या लक्षात येऊ शकेल.
आणिबाणीत अनेक कार्यकर्त्यांनी त्याग केला व कष्ट उपसले. म्हणून आज भाजपा देशाच्या सत्तेपर्यंत पोहोचला, असे नाथाभाऊ म्हणतात. तेव्हा त्यांचा रोख मुख्यमंत्री फ़डणवीसांवर असावा. कारण त्या कालखंडात फ़डणवीसांचा राजकारणात प्रवेशही झालेला नव्हता. म्हणूनच आज सत्ता उपभोगताना त्यांना पुर्वाश्रमीच्या नाथाभाऊंच्या कष्टाची जाणिव नसल्याची ही तक्रार असावी. पण खरेच आणिबाणी व त्यानंतरचे राजकारण खडश्यांना आठवत असेल, तर त्यांनी असली मल्लीनाथी केली नसती. कारण तेव्हा सुद्धा आणिबाणीत कष्ट उपसणारे बाजूला पडले होते आणि त्या काळ्या पर्वात सत्तेत मशगुल असणारे सत्तेत पुन्हा विराजमान झालेले होते. जगजीवनराम यांनी तेव्हा संसदेत आणिबाणीचा प्रस्ताव मांडून त्याविषयीच्या अध्यादेशाला कायद्याचे स्वरूप देण्यात पुढाकार घेतला होता. पण आणिबाणी उठली व पुन्हा कॉग्रेस जिंकणार नाही, अशी चिन्हे दिसू लागली; तेव्हा पक्षत्याग करून बाहेर पडणार्या कॉग्रेसजनांचे नेतृत्व बाबुजींनीच केलेले होते. अशा आणिबाणीवर विजय संपादन केलेल्या जनता पक्षाच्या त्या पहिल्या सरकारमध्ये बाबू जगजीवनराम ज्येष्ठ मंत्री म्हणून दाखल झाले होते. उलट १९ महिने तुरूंगवास भोगून लढा देणारे अनेकजण सत्तेच्या बाहेरच राहिलेले होते. फ़ार कशाला साधे आमदारकीचे तिकीट मिळाले नाही, म्हणून नारायण तावडे यांच्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला आणिबाणी समर्थक बी ए देसाई यांच्या विरुद्ध ताडदेव मतदारसंघात बंड करावे लागलेले होते. तर त्यांचीच पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे आणिबाणीचा इतिहास म्हणजे शुद्ध चारित्र्याच्या नेते व निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय देणारा होता, अशा भ्रमात खडसे आहेत काय? राजकारण असेच चालते. प्रामुख्याने सत्तेचे राजकारण सख्ख्या नात्याला जुमानत नाही. तिथे भावनिक संबंधांची काय कथा घेऊन बसलात नाथाभाऊ?
आणखी एक आणिबाणीची आठवण सांगण्यासारखी आहे. महाराष्ट्रात तेव्हा विधानसभा निवडणूका झाल्यावर जनता पक्षाला ९९ जागा मिळाल्या होत्या आणि बहूमत नाही म्हणून विरोधी पक्षात बसावे लागलेले होते. तर सत्तेतल्या शरद पवारांच्या अंगावरून अचानक साप सरपटून गेला आणि त्यांचे इतके शुद्धीकरण झाले, की जनता पक्षानेही त्यांचे नेतृत्व मान्य केले. आणिबाणीत त्याच पवारांनी विरोधी नेत्यांची व कार्यकर्त्यांची गृहमंत्री म्हणून धरपकड केलेली होती. तेच आणिबाणीनंतर जनता पक्षाचे मुख्यमंत्री झाले. उलट तुरूंगवास भोगणारे उत्तमराव पाटील, सदानंद वर्दे, जगन्नाथ जाधव किंवा हशू अडवाणी असे शूरवीर त्यागी लोक पवारांचे सहकारी मंत्री झालेले होते. हा सुद्धा इतिहासच आहे. त्या संयुक्त पुलोद मंत्रीमंडळात बहुतांश मंत्री आणिबाणी लादणार्या कॉग्रेसमधून आलेले होते. पण कोणी तक्रार केली होती काय? अगदी एसेम जोशी यांच्यासारख्या त्यागीपुरूषाने त्या सरकारला आशीर्वाद दिला होता आणि पवारांना पवित्र करून घेतले होते. हे सगळे इतक्यासाठी सांगायचे की, उगाच जुन्या इतिहासाची उजळणी करायची गरज नाही. राजकारणात कालचे दाखले व त्याग आज चालत नसतील, तर चार दशकापुर्वीचे कशाला सांगायचे? दोन दशकापुर्वीची युती व आजची भाजपा-सेना युती यात किती फ़रक पडला आहे? तो फ़रक कशामुळे व कोणामुळे पडला आहे? तेव्हा १९९५ सालात युतीमध्ये शिवसेना हा मोठा भाऊ होता. आज त्याला धाकटा म्हणून तरी सन्मानाची वागणूक मिळते आहे काय? त्याला कोण जबाबदार आहे? जुन्या गोष्टी वेगळ्या आणि आता परिस्थिती बदलली आहे, अशी युती तोडतानाची भाषा कोणाची होती? देवेंद्र फ़डणवीस नव्हेतर नाथाभाऊ तुमची होती ना? काळ व परिस्थिती बदलली, मग थोरल्या भावाचाही धाकटा होऊ शकतो, ही थिअरी मराठी राजकारणात तुम्हीच आणली ना नाथाभाऊ?
तेव्हा किंवा नंतरही इतर कोणात हिंमत नव्हती युती तोडण्याची, हे छाती फ़ुगावून कोणी वारंवार सांगितलेले आहे? बाळासाहेबांच्या कालखंडातली शिवसेना मोठा भाऊ होता. पण मोदींचा जमाना आला आणि आता भाजपा मोठा भाऊ झाला आहे, असे ज्या आग्रहाने तुम्ही सांगत होता नाथाभाऊ, त्याच भूमिकेत गेलात, तर आजच्या राजकारणात व पक्षात तुम्ही वयाने ज्येष्ठ असूनही धाकटे झाला आहात, हे लक्षात येईल. किंबहूना युती तुटण्यापुर्वी वा त्यानंतरही शिवसेना नेतृत्वाचे दुखणे काय आहे, त्याचा अंदाज आता तुम्हाला येऊ शकेल. राजकारण क्षणाक्षणाला बदलत असते. थोडे दान इकडचे पडले की धाकट्याचा थोरला होत असतो आणि थोरल्याला धाकटा होण्याखेरीज पर्याय नसतो. विधानसभेचे उमेदवार ठरवताना तुम्ही नाथाभाऊ, अनेक पक्षातले उमेदवार आमदार उचलून आणलेले होते. त्यापैकी कितीजणांनी भाजपाला राज्यातला मोठा पक्ष बनवण्यासाठी कष्ट घेतलेले होते? तरीही त्यांना पक्षाची उमेदवारी बहाल करण्यात तुम्हीच पुढाकार घेतला होताना? उलट तिथे अनेक वर्षे पराभव पचवून निष्ठेने युतीचा उमेदवार म्हणून किल्ला लढवणार्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या तोंडाला पाने पुसणारे युक्तीवाद नाथाभाऊ तुम्हीच केलेले होते. त्यातून भाजपाला राज्यात व विधानसभेत सर्वात मोठा पक्ष बनवण्यात आले. त्याचा निष्ठावान कार्यकर्त्यांशी कुठलाही संबंध नाही. जी रणनिती तुम्हीच आणलीत व भाजपात प्रतिष्ठीत केलीत, त्यालाच आलेली ही फ़ळे आहेत. म्हणून मग तीनचार वर्षापुर्वी पक्षात आलेले मंत्रीपदे भोगत आहेत आणि नाथाभाऊ सत्तेबाहेर आशाळभूतपणे बसलेले आहेत. ही नियती असते. जिसकी लाठी उसकी भैस हाच तिथला निवाडा असतो. म्हणूनच इतिहासात जाण्याची गरज नाही. त्याचे खापर नारायण राणेंच्या माथी मारण्याचे काही कारण नाही. संधी शोधणार्यांनी साधूपणाचा आव आणण्याचे कारण नसते.
भाऊ,
ReplyDeleteआपण नाथाभाऊंची एवढी स्वच्छ कुंडली मांडली आहे की नाथाभाऊंची कीव येते."इस दुनीया मे भेजी गई हर एक चिठ्ठी जबाब लाती है"हे ओशो म्हणतात हे खरच आहे
करेक्ट आहे भाऊ
ReplyDeleteहे भाजप शिवसेना एकमेकांना समजून घेत नाहीत ते जनतेला किती समजून घेतील हे पण लोकांना कळालेच आहे, पुढील निवडणुकीत समजेल त्यांना.
ReplyDelete