Thursday, November 23, 2017

अवसानघातकी रणनिती

rahul and three young leaders के लिए चित्र परिणाम

गुजरातमध्ये तीन तरूण नेत्यांना सोबत घेऊन कॉग्रेस व राहुल गांधी यांनी भाजपा व नरेंद्र मोदी यांना कसा घाम फ़ोडला आहे, त्याची रसभरीत वर्णने आपण मागल्या दोनतीन आठवड्यात सतत वाचलेली आहेत. पण तेव्हा निवडणूकांचे वेळापत्रक जाहिर झालेले नव्हते. आता ती निवडणूक घोषित झाली असून, पहिल्या फ़ेरीतील मतदानाला सामोरे जाणार्‍या उमेदवारांचे अर्ज भरण्याची मुदतही संपते आहे. मात्र इतकी कसोटीची वेळ येऊन ठेपली असताना कॉग्रेसच्या एकूण रणनितीचा पुरता बोजवारा उडालेला आहे. कारण भाजपाला धडकी भरवणारा पटेलांचा तरूण नेता हार्दिक पटेल याला ठामपणे आपल्या गोटात आणून उभा करण्यात कॉग्रेस अजून यशस्वी झालेली नाही. त्याचे कुठलेही वैषम्य राहुल गांधींना व कॉग्रेसनेत्यांना वाटलेले दिसत नाही. मात्र आरंभीच्या दोन आठवड्यात त्याच रणनितीचे खुप कौतुक करून बसलेल्यांना शहाण्यांना आता कपाळावर हात मारून घेण्य़ाची वेळ आलेली आहे. कारण निवडणूक ऐन रंगात येऊ लागलेली असताना कॉग्रेसी रणनितीचा जागोजागी बोर्‍या वाजताना दिसू लागला आहे. ज्या तीन तरूण नेत्यांना हाताशी धरून राहुल गांधींनी मोठी झेप घेतल्याची जोरदार चर्चा होती, तो विषय कुठल्या कुठे फ़ेकला गेला असून, हार्दिक पटेल व पटेल समाजाच्या पाठींब्याचा नामोनिशाण कुठे दिसलेला नाही. उलट त्याच पटेल आरक्षणाच्या प्रमुख कार्यकर्ते व नेत्यांनी कॉग्रेसी कार्यालयावर हिंसक हल्ले केल्याने त्या पक्षाला आपल्या घोषित उमेदवार यादीत फ़ेरफ़ार करायची नामुष्की आल्याच्या बातम्या झळकू लागल्या आहेत. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते, की राहुल वा त्यांचे निकटवर्तिय कुठलीही उपयुक्त रणनिती आखण्यात तोकडे पडले आहेत आणि अन्य कोणी रणनिती आखून दिलेली असेल, तर तिचा बोजवारा उडवून देण्याची आपली कार्यकुशलता त्यांनी समोर आणून ठेवलेली आहे.

युद्धनिती वा रणनिती ही तोपर्यंतच उपयुक्त असते, जोपर्यंत त्याविषयी प्रतिस्पर्धी व शत्रू गाफ़ील राहिलेला अ्सतो. उत्तरप्रदेशात योगींना मुख्यमंत्री म्हणून आणणे असो वा अखेरच्या टप्प्यात तीन दिवस मोदींनी वारणशीत मुक्काम ठोकणे असो, याविषयी एक दिवस आधी कोणा पत्रकाराला कानोकान खबर लागलेली नव्हती. प्रत्यक्षात घडले तेव्हा त्याचा माध्यमांना वा विरोधकांना अर्थ लागण्यापर्यंत वेळ निघून गेलेली होती. त्याला रणनिती म्हणतात, जी समोरच्याला थक्क करून लढण्याचे त्याचे अवसानही गळून जायची वेळ आणते. राष्ट्रपती निवडणूकीसाठी सोनिया विरोधकांच्या बैठका दिड महिना आधीपासून घेत होत्या. पण भाजपाच्या गोटात त्याविषयी कोणी अवाक्षर बोलत नव्हता. उलट विरोधकांनी सहमतीच्या उमेदवाराची भाषा वापरली, तेव्हा त्यांच्याशी संवाद साधण्याचे नाटकही मोदी-शहांनी रंगवले होते. पण आपल्या पोटातले पाणीही हलू दिले नव्हते. पंतप्रधानांच्या निकटवर्तियांनाही दोन दिवस आधी रामनाथ कोविंद यांच्या नावाची पुसटशी कल्पना येऊ शकलेली नव्हती. स्वामिनाथन किंवा तत्सम नावाच्या चर्चाचा इन्कारही मोदींच्या गोटातून झालेला नव्हता. ज्या क्षणी कोविंद यांचे नाव पुढे आले, त्यानंतर विरोधी गोटाची तारांबळ उडून गेलेली होती. याला रणनिती म्हणतात. ती मोदींची असल्याने कोणी नाके मुरडली म्हणून निवडणूकीचे निकाल तर बदलत नाहीत ना? निवडणूक वा युद्ध जिंकण्याशी मतलब असतो. कॉग्रेस वा मोदी विरोधकांची तीच गोची आहे. त्यांना विजयात वा यशात रस नाही. त्यांना नुसत्या मोदींना शिव्याशाप देण्यात स्वारस्य आहे. कुठल्या तरी कुरघोड्या करून वा कुजकट बोलून मोदींच्या विरोधात काहूर माजवण्यावर हे लोक खुश असतात. त्यामुळे भाजपा व मोदींचे कुठलेही नुकसान झालेले नाही, होणारही नाही. कारण त्यांना माध्यमातील कुरापतींपेक्षाही यश व विजयात रस आहे.

गुजरातमध्ये राहुलनी उघडलेली आघाडी जोरदार होती. पण त्यात आपल्या हाती कुठले पत्ते आहेत आणि आपण कुठल्या वेळी कोणता पत्ता टाकणार; याचा गहजब करण्याची काय गरज होती? ज्यांच्याही हातमिळवणी करणार, त्यांचा गवगवा करण्याचे तरी काय कारण होते? माध्यमात या बातम्या झळकण्याने काय साधले जाणार होते? बिहारमध्ये नितीश लालू यांची लागल्यावर कोविंद यांच्या निवडणूकीत जवळ आलेल्या नितीशविषयी मोदी-शहांनी काही गवगवा केला होता काय? नितीश यांनी तेजस्वीला खुलासा देण्यास मुदत दिली आणि ती संपताच स्वत:च राजिनामा देऊन लालू व कॉग्रेस यांच्या सर्व मंत्र्यांना बाजूला करून टाकले. पुढल्या चोविस तासात भाजपाशी हातमिळवणी करून नवे सरकारही स्थापन करून टाकले. दोनचार दिवस आधी भाजपाशी नितीश संयुक्त सरकार बनवणार, याची कोणाला सुतराम कल्पनाही येऊ शकली नव्हती. मग त्याचेच अनुकरण गुजरातमध्ये राहुल व कॉग्रेसला करता आले नसते काय? हार्दिक, अल्पेश वा जिग्नेश यांच्याही खो खो खेळत बसण्याची काय गरज होती? त्यांनी कॉग्रेसला चार हात दूर ठेवून भाजपाच्या विरोधात तोफ़ा डागल्या असत्या, म्हणून काही विघडले नसते. जोवर मतदानाचा कार्यक्रम जाहिर होत नाही, तोपर्यंत या तीन शिलेदारांनी भाजपावर भडीमार करत रहायचे. पण कॉग्रेसविषयी आपुलकी वा दुरावाही बोलून दाखवण्याची गरज नव्हती. त्यांच्याशी देवाणघेवाण आधीच ठरवून घेतली असती आणि आता जाहिर केली असती, तर हा पोरखेळासारखा तमाशा कशाला झाला असता? उलट हे तीन तरूण कोणती भूमिका घेतील, त्याची भाजपाला कल्पना आली नसती की कॉग्रेसलाही त्यांच्यासमोर जाहिर नाकदुर्‍या काढण्याची लज्जास्पद वेळ आली नसती. त्यांना ठराविक जागा दिल्याचे यादी घोषित झाल्यावरच उघड झाले असते आणि नंतर खुलेआम त्यांना संयुक्त प्रचारात आणता आले असते.

पण राहुल गांधी वा त्यांच्या निकटवर्तियांना कुठल्याही रणनितीने यश मिळवण्यापेक्षा तिचा माध्यमातून गाजावाजा करण्याचे भयंकर आकर्षण आहे. त्यात मग त्याच रणनितीचा बट्ट्याबोळ झाला तरी बेहत्तर! हेच उत्तरप्रदेशात अखेरच्या काळात झाले होते. समाजवादी पक्षाशी हातमिळवणी करण्याचे नाटक अकारण चार दिवस रंगवले गेले आणि त्यातून त्यांच्याच कार्यकर्त्यात गोंधळ माजून गेला. अनेक जागी अखिलेशने कॉग्रेसला जागा सोडली. पण आधीच आपल्या उमेदवाराला अधिकारपत्र दिलेले असल्याने तो उमेदवार माघार घेऊ शकला नाही. परिणामी मतांची विभागणी होऊन गेली. अगदी अमेठीतल्या एका कॉग्रेस उमेदवारालाही तसेच पराभूत व्हावे लागले. हीच गोची आहे. शक्य होईल तितका खुळचटपणा करायचा आणि मग तो उपाध्यक्षाने केला म्हणून बाकीच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यातली रणनिती सिद्ध करण्यासाठी कसरती करायच्या; हा नित्याचा खेळ झालेला आहे. गुजरातमध्ये त्याचीच पुनरावृती होताना दिसते आहे. जे काही पडद्याआड करायचे, त्याची जाहिर वाच्यता करण्याची अनाठायी अतिरेकी हौस थक्क करून सोडणारी आहे. आपण शत्रूला जोरदार तुंबळ युद्धाचे आव्हान दिले आणि प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी तिकडे फ़िरकलोच नाही. कशी जिरवली ना शत्रूची? अशा स्वरुपाचा हास्यास्पद प्रकार नित्याचा होऊन बसलेला आहे. त्यामुळे कुठल्याही प्रयत्न व कष्टाशिवायही जे यश स्थानिक कॉग्रेस नेते आपल्या कुवतीवर मिळवू शकतील, त्याचाही चुथडा करून टाकला जातो. मोदी-शहांनाही आता बहुधा त्याची सवय झालेली असावी. म्हणून ही जोडगोळी अखेरचा निर्णायक क्षण जवळ येईपर्यंत कितीही गदारोळ झाला म्हणून विचलीत होऊन जात नाहीत. शेवटच्या क्षणी राहुलनितीचा अवसानघातकी हुकमी पत्ता आपल्या हाती असल्याचा त्यांचा आत्मविश्वासच त्यांना यश मिळावून देतो आहे. गुजरात त्याच दिशेने वाटचाल करताना दिसू लागला आहे.

No automatic alt text available.

1 comment:

  1. ACCORDING TO CHANAKYA,
    "SUCCESS OF ANY PROJECT DEPENDS ON ITS SECRECY".
    AND MODI-SHAH DUO ARE THE DIE HARD FOLLOWER OF CHANAKYA.

    ReplyDelete