इंदिराजींनी देशात आणिबाणी लागू केली, तेव्हा त्यांच्याच पक्षाचे माजी मंत्री व खासदार मोहन धारिया म्हणाले होते, कन्येने नेहरूंची कॉग्रेस व लोकशाही बुडवली. पण खरेच तेव्हा तरी नेहरूंची लोकशाही अस्तित्वात होती काय? आधीच इंदिराजींनी नेहरूंची कॉग्रेस मोडीत काढली होती आणि त्यांनी पुढल्या काळात जे व्यक्तीकेंद्री राजकारण भारतात प्रस्थापित केले, त्याचे नगारे वाजवून स्वागत करण्यात मोहन धारियांसारखेच ‘तरूण तुर्क’ आघाडीवर होते. तेव्हा म्हणजे १९६९ सालात कॉग्रेसमध्ये दुफ़ळी माजली, त्यावेळी पक्षाच्या संघटनेला झुगारून इंदिराजींनी जो पवित्रा घेतला होता, तेव्हाच कॉग्रेस निकालात निघालेली होती. त्यासाठी बिनीचे शिलेदार म्हणून ज्यांना इंदिराजींनी पुढे केलेले होते, त्यांना तेव्हा तरूण तुर्क असे संबोधन दिले गेले होते. मुद्दा इतकाच, की तेव्हाच म्हणजे १९६९ सालात नेहरू युग संपुष्टात आलेले होते. पण तात्कालीन सेक्युलर पुरोगामी बुद्धीमंत व संपादक वैधव्य आलेल्या पतिव्रतेसारखी नेहरूंच्या आठवणी जागवत कॉग्रेसही जिवंत असल्याचा आक्रोश करीत राहिले होते. मात्र प्रत्यक्षात इंदिराजींचा प्रभाव वाढत गेला, तशी नेहरूंची कॉग्रेस संपलेली होती आणि सोनियांचे आगमन होईपर्यंतची कॉग्रेस इंदिराजींच्या व्यक्तीकेंद्री पक्षाचे अवशेष होते. वठलेल्या झाडासारखा मरत नाही म्हणून जीवंत असा पक्ष चालला होता. त्याला आव्हान देणारा पक्ष वा नेता उदयास आला नाही, म्हणून कॉग्रेसचे राजकारण तीन दशके चालत राहिले. पण इंदिराजींच्या हत्येनंतरच्या प्रत्येक मतदान व निवडणूकीत इंदिरा कॉग्रेस हा व्यक्तीकेंद्री पक्ष क्रमाक्रमाने लयास चालला होता. मात्र त्याची जागा घेणार्या पर्यायी पक्ष व नेत्याचा उदय स्पष्ट होत नव्हता. सर्कशीतल्या झोक्याच्या कसरतीसारखा हा प्रकार असतो. त्या कसरतपटूने एक झोका सोडून झेप घेतली, मग दुसरा झोका पकडण्यापर्यंत तो अधांतरी असतो. तसे १९८४ पासून २०१४ पर्यंतचे भारतीय राजकारण अधांतरी होते. इंदिरा कॉग्रेस संपत चालली होती आणि अन्य कोणी राष्ट्रव्यापी पक्ष म्हणून नजरेस येत नव्हता. त्यात कोण कॉग्रेसची जागा घेऊ शकेल, याची चाचपणी करीत मतदारही विविध पक्षांना किंवा त्यांच्या आघाड्यांना थोडाफ़ार प्रतिसाद देऊन परिक्षा घेत होता. त्या प्रयोगाची समाप्ती २०१४ सालात झाली. म्हणून तर मध्यंतरीच्या तीन दशकात सात लोकसभा निवडणूका कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहूमत मिळाले नाही. पण तसा नेता आणि त्याच्यामागे पाठबळ देऊ शकेल असा संघटित पक्ष दिसल्यावर २०१४ सालात लोकांनी मोदी व भाजपा यांना बहूमताचा कौल दिला. मात्र तोपर्यंत आघाडीचा कालखंड चालू राहिला. त्याने देशातले राजकीय अभ्यासक व विश्लेषकही इतके भरकटून गेले होते, की कोणा एका पक्षाला बहूमत मिळूच शकत नाही, असा एक सार्वत्रिक निष्कर्ष काढून मोकळे झालेले होते. म्हणूनच २०१४ चा निकाल अशा प्रत्येकाला थक्क करून गेला. जमाना आघाडीच्या राजकारणाचा नव्हता. तर पर्याय शोधण्याचा जमाना होता. म्हणूनच आता तीन चार वर्षे उलटुन गेल्यावरही अनेकांना भाजपा व मोदींना मिळालेले बहूमत, हा निव्वळ योगायोग वाटतो आहे. तो योगायोग नव्हता. ती इंदिरा कॉग्रेसच्या अस्ताची नांदी होती. त्याची साक्ष लोकसभेच्या सात निवडणूकातील आकडेवारीच साक्ष देते.
आजचा भाजपा ही स्वातंत्र्योत्तर काळातील कॉग्रेस झाली आहे. नेहरूंना ती वारश्यात मिळाली आणि वारश्यात मिळाल्यावर इंदिराजींना तीच अडचण व्हायला लागली म्हणून त्यांनी मोडून टाकली. नेहरूंच्या काळतली कॉग्रेस म्हणजे पक्षाला निवडणूकीत हमखास यश मिळवून देणारी एक भक्कम यंत्रणा होती. त्यातले मक्तेदार इंदिराजींना डोईजड वाटू लागले. म्हणून त्यांनी ती यंत्रणाच मोडीत काढली आणि आपल्या लोकप्रियतेवर मते मिळवीत आपले सुभेदार राज्यात उभे केले. त्यांच्यापाशी नेतृत्वगुण नव्हते की कर्तृत्व नव्हते. त्यामुळेच त्यांना इंदिराजींच्या लोकप्रियतेवर जगावे लागत होते. त्यातही कोणा गुणी नेत्याचे आव्हान भासल्यास इंदिराजी त्यालाही संपवून टाकत गेल्या. त्यामुळे नवी कॉग्रेस संघटना उभी राहिली नाही. ती पोकळी इतर कुणा नेत्याला वा पक्षालाही भरून काढता आली नाही. जनता पक्ष व जनता दलाचा प्रयोग फ़सला. त्यानंतर मात्र भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांनी पद्धतशीरपणे पुढल्या फ़ळीचे नेतृत्व आणि संघटनात्मक बांधणीचे काम हाती घेतले. त्यांचे नेतृत्व करायची कुवत वाजपेयी वा अडवाणी यांच्यापाशी नव्हती. त्यांच्यापाशी लोकांना भारावून टाकण्याची वा जनमानसावर स्वार होण्याची क्षमताही नव्हती. म्हणूनच त्याही पक्षाला नरेंद्र मोदींचा उदय होईपर्यंत प्रतिक्षा करावी लागली. अर्थात सत्तेच्या राजकारणात शिरण्यापर्यंत खुद्द मोदींनाही आपण इतकी मजल मारू शकतो, असे कधीही वाटलेले नसावे. त्यांनी संघटनात्मक काम करताना निवडंणूकीच्या स्पर्धेपासून स्वत:ला अलिप्त ठेवलेले होते. योगायोगाने मोदींवर थेट गुजरातमध्ये मुख्यमंत्री होण्याची जणू सक्ती झाली आणि नंतर घटनाच अशा घडत गेल्या, की त्यांना परिस्थितीनेच राष्ट्रीय राजकारणात ओढले. गुजरातच्या दंगलीचे इतके काहूर माजवले गेले नसते, तर कदाचित मोदी राष्ट्रीय क्षितीजावर उगवलेही नसते. २००२ नंतर मोदींची अशी राजकीय कोंडी सुरू झाली, की त्यातून देशाला इंदिराजीनंतरचा तितकाच प्रभावी नेता मिळवून दिला. सार्वत्रिक हल्ल्यापासून मोदी आपला बचाव करताना जितके अनुभव घेत गेले, त्याच अनुभवाने त्यांना राष्ट्रीय नेता बनवून टाकले. पक्षातील अनुयायी व विरोधी गटातील टिका, यांचा चतुराईने वापर करत मोदी मग पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी अवघ्या भारतीय राजकारणाला आपल्या भोवती फ़िरवले आहे. पण प्रत्यक्षात २००२ नंतरच्या काळात त्यांच्या भोवती राजकारण फ़िरवण्याची घाई ज्यांनी केली, त्यांनीच मोदींना इथपर्यंत पोहोचवलेले नाही काय? १९६९ सालात इंदिरा विरुद्ध बाकी सगळे, अशी जी स्थिती निर्माण झाली. त्याचा जसा चतुराईने इंदिराजींनी वापर केला, तशीच वाटचाल मोदी मागल्या तीनचार वर्षात करत आलेले आहेत. लोकप्रियतेवर स्वार होऊन त्यांनी नुसत्या निवडणूका जिंकलेल्या नाहीत. तर इंदिराजींनी मोडून टाकलेल्या नेहरूकालीन कॉग्रेसप्रमाणे भाजपाला एकविसाव्या शतकातील निवडणूका जिंकणारी यंत्रणा करून टाकलेले आहे. हे आजच्या पिढीला व त्यातल्या पत्रकार विश्लेषकांनाही लक्षात आलेले नाही. त्यासाठी १९६४ ते २०१४ ह्या कालखंडातील निवडणूका व त्यातली उलथापालथ समजून घेणे व अभ्यासणे अगत्याचे ठरावे. (समाप्त)
(‘इंदिराजी ते मोदी अर्थात १९६४ ते २०१४’ या आगामी पुस्तकातून)
मोदींनाही माहिती नव्हते .....
ReplyDeleteअगदी यथायोग्य निरीक्षण.
Pustak kadhi prakashit honar aahe?
ReplyDeleteघटना व त्यांची तुलना व काढलेला निष्कर्ष अगदी योग्य आहेत..,परंतु काळाच्या ओघात बदललेले जग बघता हि तुलना पुढे खरेच आपण सांगताय त्या वाटेने जाईल का हे बघणे औत्सुक्याचे ठरेल
ReplyDeletemala pustakachi nondani karaychi ahe
ReplyDelete