Wednesday, November 1, 2017

लंबी रेसका घोडा (पुर्वार्ध)

fadnavis khadse के लिए चित्र परिणाम

या आक्टोबर अखेरीस देवेंद्र फ़डणवीस यांच्या सरकारला तीन वर्षाचा कालावधी पुर्ण झाली. खरे बघितले तर तोच एक मोठा चमत्कार आहे आणि म्हणूनच आजच्या सर्व भाजपा मुख्यमंत्र्यात हा एक तरूण नेता राजकीय कसोटीला उतरला असे म्हणावे लागेल. कारण बाकीच्या प्रत्येक मुख्यमंत्र्याच्या पाठीशी स्पष्ट बहूमत आहे किंवा निदान अल्पमताचे सरकार इतक्या आत्मविश्वासाने चालवण्याची सत्वपरिक्षा अन्य कुठल्या भाजपा मुख्यमंत्र्याला द्यावी लागलेली नाही. मुळात कुठलाही प्रशासकीय अनुभव गाठीशी नसताना फ़डणवीस यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली. खुद्द नरेंद्र मोदी वा अन्य भाजपा मुख्यमंत्र्यांना कधीच अल्पमताचे सरकार चालवावे लागले नाही. जिथे तशी वेळ आली तिथे किरकोळ अन्य पक्षीय आमदारांचा पाठींबा घ्यावा लागलेला होता. दुसरीकडे फ़डणवीस यांची स्थिती अतिशय दुर्घर अशीच बनवण्यात आलेली होती. सरकार स्थापन झाल्यापासून विरोधी पक्ष या मुख्यमंत्र्याला गोत्यात घालायला उत्सुक होतेच. पण त्याच्याही आधी स्वपक्षानेही फ़डणवीसांना राजकारण गढुळ करूनच हे अग्निदिव्य पार पाडण्यास पुढे केलेले होते. जिथे म्हणून आशेने बघावे तिथे अडथळे व समस्याच या तरूण नेत्याला भेडसावत होत्या. दुसरा कोणीही अशा स्थितीत राजिनामा टाकून फ़रारी झाला असता. यापुर्वी इतक्या प्रतिकुल परिस्थितीत सरकार चालवण्यासाठी शरद पवारच ख्यातनाम होते. अन्य कुणाला इतक्या विपरीत स्थितीत सरकार स्थापन करावे लागलेले नव्हते की चालवण्याचे शिवधनुष्य पेलण्याचा प्रसंग आला नव्हता. म्हणूनच सलग तीन वर्षे कुठल्याही प्रसंगाला देवेंद्र फ़डणवीस पुरून उरले, हा चमत्कार मानायला हवा. किंबहूना हा नवा तरूण नेता पुढल्या दोन दशकात भाजपाला दिर्घकालीन नेतृत्व देऊ शकेल, अशी खात्रीच त्याने घडवली असे म्हणता येईल. तीन वर्षापुर्वी राज्यातली राजकीय स्थिती काय होती?

लोकसभा जिंकताना राज्यात शिवसेना व भाजपा यांच्यात युती होती आणि तशीच ती विधानसभेतही चालू राहिल, ही अनेकांची अपेक्षा होती. पण विधानसभेचा मोसम जसजसा जवळ येत गेला. तसतशी दोन पक्षातली रस्सीखेच वाढत गेली. पाव शतकातली युती त्यातूनच संपुष्टात आली. यापुर्वी युतीमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रमुख नेता होते. त्यांच्या निधनानंतर सेनेवर उद्धव ठाकरे यांना तितकी हुकूमत राखता आलेली नाही. बाळासाहेबांच्या हयातीतच नारायण राणे व राज ठाकरे बाहेर पडले आणि शिवसेनेची संघटना विस्कळीत होत गेली. युती असताना त्याचे चटके भाजपालाही सोसावे लागले. पण युती सोडून बाहेर पडण्याइतका भाजपाही समर्थ नव्हता, की त्याच्या राज्य नेतृत्वापाशी तितका आत्मविश्वास नव्हता. मात्र नरेंद्र मोदी यांया उदयानंतर भाजपामध्ये नवा उत्साह संचारला आणि देशभर मोदीलाट असल्याने त्याचाच प्रभाव महाराष्ट्रातही दिसत होता. त्याचाच लाभ युतीला मिळाला. पण दिल्लीची सत्ता काबीज केल्यावर आणि महाराष्ट्रातही कॉग्रेस राष्ट्रवादीला धुळ चारल्यावर, भाजपाच्या इथल्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला होता. अशावेळी शिवसेनेला झुगारून बहूमत मिळवणे भाजपाला तरीही अशक्य होते आणि विधानसभेच्या निकालात त्याचेच प्रतिबिंब पडले. त्यात मोठा पक्ष होऊन दाखवताना भाजपापाशी कोणी खंबीर राज्यनेता मात्र नव्हता. ज्याला राज्यव्यापी चेहरा म्हणता येईल, असे गोपिनाथ मुंडे यांचे लोकसभा निकालानंतर अल्पावधीच निधन झाले होते. त्यांच्या तोडीस तोड म्हणता येतील असे नितीन गडकरी लोकप्रिय चेहरा म्हणावेत असा नेता नव्हता. त्यामुळेच सेनेची फ़ारकत घेऊन खेळलेला जुगार पुर्णपणे यशस्वी झाला नाही आणि राज्यात सत्ता जवळ असली तरी सोपी राहिलेली नव्हती. बहूमतही नव्हते आणि इतरांची सहज जुळवून घेऊ शकेल, असा कोणी मुरब्बी नेताशी भाजपाकडे नव्हता.

ही झाली राज्यातली पक्षीय मांडणी. विविध पक्षांमध्ये भाजपा सर्वात प्रभावी व यशस्वी पक्ष ठरला असला, तरी त्याच्यापाशी स्वत:चे बहूमत नव्हते. तरी शरद पवारांनी बाहेरून बिनशर्त पाठींबा देऊन सरकार स्थापनेची पळवाट दिलेली होती. मात्र राष्ट्रवादीलाच नावे ठेवून इतके यश मिळवल्यानंतर त्याच पक्षाच्या पाठींब्यावर सरकार स्थापन करणे वा चालवणे आत्मघात ठरला असता. त्यामुळे भाजपाला यश मिळाले तरी पेच पडलेला होता. त्यातच राज्याचा नेता कोण ह्याचाही निकाल लागायचा होता. अर्थातच केंद्रीय मंत्रीपद भूषवणारे नितीन गडकरी स्पर्धेत होते, तसेच मुंडेकन्या पंकजा व मुंडेंच्या पिढीतले एकनाथराव खडसेही स्पर्धेत होते. शक्य झाल्यास दुसर्‍या फ़ळीतले देवेंद्र यांच्या पिढीतलेही काही नेते संधी शोधत होते. ही झाली पक्षांतर्गत बाजू. पण महाराष्ट्राची एक वस्तुस्थिती आणखी होती. या राज्यात ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद खुप जुना आहे आणि त्याला राजकीय इतिहास आहे. अशा स्थितीत देवेंद्र फ़डणवीस हे नाव नेत्यांमध्ये येत असले, तरी जातीचा बोजा त्यांच्या माथी होता. म्हणूनच त्यांचे नाव पुढे करायला कोणी राजी नव्हता. किंबहूना याची एक पार्श्वभूमीही सांगता येईल. त्यापुर्वी एका वाहिनीला मुलाखत देताना पवारांनी अपरोक्ष त्या विषयाचा उल्लेख केलेला होता. महाराष्ट्राला विकासाच्या राजकीय मार्गाने घेऊन जाईल असा नेता कोण व कुठल्या पक्षात आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना पवार म्हणाले होते, नितीन गडकरी तसा नेता आहे. पण त्यांचाही पक्ष गडकरींना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार बनवणार नाही. पवारांनी असे सांगण्यामागे महाराष्ट्रातील जुना तोच राजकीय वाद कारण होता. मग इतकी उत्तम प्रतिमा असून गडकरी जातीमुळे मागे पडत असतील, तर फ़डणवीसांचा क्रमांक त्यात आघाडीवर असूच शकत नाही. अशा स्थितीत या तरूणाला मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागलेली होती.

मग एका बाजूला पारंपारीक विरोधक कॉग्रेस आणि राष्ट्रवादी होते, तर नव्याने शत्रूत्व घेतलेली शिवसेना विरोधात दंड थोपटून उभी होती. पण मोदी-शहांच्या नेतृत्वाने गडकरींना नकार देऊन फ़डणवीस यांनाच आपला कौल दिला. कुठलाही पुर्वानुभव गाठीशी नसताना त्यांनी जबाबदारी स्विकारली. त्यांनी बहूमताची तजवीजही न करता थेट शपथविधी उरकला आणि राजकारण अधिकच गुंतागुंतीचे होत गेले. कारण दोन्ही कॉग्रेस आणि शिवसेना यांची बेरीज बहूमतात जाणारी होती आणि त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाच तर फ़डणवीस सरकार एकही दिवस टिकण्याची शक्यता नव्हती. तरीही शपथविधी उरकणे व तसेच बहूमत सिद्ध करायला विधानसभेचे अधिवेशन बोलावणे, हा मोठा जुगार होता. तोही खेळला गेला आणि आवाजी मतदानाने सरकारने तग धरला. पण त्यात केलेली चलाखी लपून राहिली नाही. राष्ट्रवादीचा त्यातला पाठींबा लोकमताला रुचलेला नव्हता आणि त्याची कबुली खुद्द फ़डणवीसांनीच आपल्या वक्तव्यातून दिली. राजकीय हयातीत लोकांचे शिव्याशाप जितके मिळाले नाहीत, तितके विश्वास संपादनानंतर चार दिवसात वाट्याला आले, अशी कबुली देणारा बहुधा देशातला हा पहिलाच मुख्यमंत्री असावा. त्यातून फ़डणवीसांचा प्रामाणिकपणा दिसतो, तसाच वास्तवाला सामोरे जाण्याची इच्छाशक्तीही जाणवते. पण पुढल्या काळात त्यांनी कट्टर शत्रू झालेल्या शिवसेनेला अधिक सत्तेचा वाटा दिल्याशिवाय सत्तेत सहभागी करून घेण्याची चतुराई दाखवली. शिवसेनेतील नेत्यांच्या सत्तालोलूपतेचा धुर्तपणे वापर करून घेत त्यांनी सत्तेवर मांड ठोकण्याची जी हिंमत दाखवली, ती कौतुकास्पद आहे. कारण त्यांनी आपली अगतिकता संपवून शिवसेनेलाच सत्तेसाठी गरजू बनवले आणि बहूमताचा खुंटा पक्का करून घेतला. नंतर त्यांनी मागे वळून बघितलेले नाही.

तीन वर्षापुर्वी मोदीलाटेने राजकारण बदलले. त्याच्या आधी महाराष्ट्रात तरी संभाजी ब्रिगेड वा मराठा अस्मितेने इतके आक्रमक रूप धारण केलेले होते, की फ़डणवीस यांच्यासारख्या ब्राह्मणाने मुख्यमंत्रीपदाचे स्वप्नही बघणे हा गुन्हा ठरला असता. पुण्यातल्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा खणून काढला गेला आणि त्यासाठी मराठा तरूणांचे जमाव हिंसक बनवून पुढे करण्यात आलेले होते. अवघ्या महाराष्ट्राची समस्या म्हणजे इथला ब्राह्मण वर्ग, असा एक देखावाच उभारलेला होता. संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड वा मराठा सेवा संघ अशा विविध नावाने धुडगुस घातला जात होता. त्यामुळे कुठल्याही स्थितीत भाजपा वा ब्राह्मणी शिक्का बसलेल्या पक्षाला महाराष्ट्रात काही राजकीय स्थान असू शकते, यावर राजकीय विश्लेषकांचा विश्वासही बसला नसता. अशा ब्राह्मण विरोधाला कॉग्रेस व राष्ट्रवादी यांची छुपी साथ व कुमक होती, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळेच शिवसेना भाजपा युती वा भाजपा कोणत्या मराठा नेत्याला पुढे करणार; याची प्रतिक्षा चालू होती. मग तोच भाजपा फ़डणवीस नामक कुणा ब्राह्मणाला पुढे करील, ही शक्यताच दुरापास्त होती. किंबहूना म्हणूनच नितीन गडकरी पात्र असूनही भाजपा त्यांचे नाव पदासाठी पुढे करू शकत नाही, असे पवारांनीच सांगुन टाकलेले होते. हे गडकरींसारख्या अनुभवी नेत्याच्या बाबतीत असेल, तर फ़डणवीस यांच्यासारख्या अननुभवी तरूणाची कथाच वेगळी होते ना? त्याने कोणाकोणाला अंगावर घ्यावे आणि कुणाशी कसे लढावे? पक्षांतर्गत, पक्षबाह्य व राजकीय परिस्थिती अशा सर्वच बाजू फ़डणवीसंना अगदी प्रतिकुल होत्या. म्हणूनच दिल्लीत नरेंद्र व मुंबईत देवेंद्र ही घोषणा सोपी असली, तर व्यवहारी जगात ती अशक्य वाटणारी बाब होती. किंबहूना तसे काही झाले तर ती फ़डणवीस यांच्यासाठी अग्निदिव्यच असेल अशी स्थिती होती.

मागल्या दोन दशकात महाजन-मुंडे यांनी महाराष्ट्रातला भाजपा आपल्या खिशात टाकला होता. त्यांच्या कृपेशिवाय अन्य कोणाला पक्षात डोके वर काढता येत नव्हते. त्यापैकी प्रमोद महाजन यांचे आकस्मिक अपघाती निधन झाले आणि मुंडे यांना एकहाती पक्षाचा डोलारा संभाळावा लागत होता. त्यातही नितीन गडकरी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर दुफ़ळी माजलेली होती. एका क्षणी मुंडे पक्ष सोडायला निघाल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण तो विषय लौकरच निकालात निघाला. तरी गटबाजी कायम राहिली होती. पण लोकसभेनंतर अकस्मात मुंडे यांचेही अपघाती निधन झाले आणि महाराष्ट्रात भाजपाला नाथाभाऊ खडसे वगळता कोणी ज्येष्ठ नेता उरलेला नव्हता. म्हणून तर जेव्हा विधानसभेच्या वेळी युतीमध्ये बेबनाव निर्माण झाला, तेव्हा प्रदेशाध्यक्ष फ़डणवीस असूनही निर्णयाची घोषणा खडसे यांनीच केली होती. अनेक पक्षातून इच्छुकांना गोळा करण्याचे डावपेचही नाथाभाऊच खेळत होते. सहाजिकच त्यांची महत्वकांक्षा लपून राहिलेली नव्हती. पुढे मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चीत करण्याची वेळ आली, तेव्हाही खानदेशात आपल्या अनुयायांच्या जमावाचे मोर्चे दिंड्या काढून त्यांनी त्या शंकेला पुष्टी दिली होती. ही पार्श्वभूमी विचारात घेतली पाहिजे. तर फ़डणवीस यांच्या कारकिर्दीकडे बघता येईल. त्यांच्या शपथविधीवर शिवसेनेने बहिष्कार घालण्यापर्यंत वेळ आली आणि विधानसभेच्या अधिवेशनात शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांची विरोधी नेतापदी नेमणूक करण्यापर्यंत परिस्थिती गेलेली होती. अशा वातावरणात पंकजा मुंडे तर आपली जाहिरात जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून डंका पिटत होत्या आणि नाथाभाऊ डझनभर खाती आपल्याकडे घेऊनही नाराज होते. म्हणजेच सर्वोच्चपदी फ़डणवीस, पण त्यांच्या हाती सत्तेची सुत्रे नाहीत, अशीच एक समजूत राजकीय क्षेत्रात निर्माण झालेली होती.

पण नरेंद्र मोदी हा अपवाद आहे आणि त्याच्यामध्ये अपवादात्मक निर्णय घेण्य़ाची धमक आहे. तसे नसते तर अल्पमतातले सरकार चालवण्यासाठी या नव्या तरूणाला मुख्यमंत्रीपदी बसवण्य़ाचा जुगार खेळला गेलाच नसता. अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर माझ्यासारख्या अनुभवी पत्रकाराला व राजकारणाच्या अभ्यासकालाही ही निवड राजकीय आत्महत्या वाटलेली होती आणि तसे मी तेव्हा अनेक लेखातून स्पष्टपणे मांडलेले आहे. त्यामुळेच त्या अर्थाने फ़डणवीस यांनी माझा व अनेकांचा साफ़ भ्रमनिरास केला, हे आता मान्य करायला हवे. कारण हा अननुभवी तरूण नेता अशा प्रतिकुल राजकीय वातावरणात सरकार चालवू शकणार नाही आणि कोवळ्या वयात अशी गुंतागुंतीची जबाबदारी आल्यामुळे त्याखाली पुरता दबून जाईल, असेच वाटत होते. किंबहूना त्यामुळे चांगली पात्रता असल्याने दिर्घकाळ मराठी राजकारणावर छाप पाडण्याच्या कुवतीच्या एका तरूण नेत्याचा हकनाक बळी दिला गेला, अशीही माझी तात्कालीन प्रतिक्रीया होती. पण आज तीन वर्षे फ़डणवीस यांनी राज्यातील सरकार व राजकारण यांचा समतोल राखण्यातून आपले कौशल्य सिद्ध केलेले आहे. अगदी विरोधकांचा चोख उत्तर देत आणि शत्रूवत वागणार्‍या मित्रांनाही काटेकोर हाताळून, आपण दिर्घकालीन मॅराथॉन शर्यतीचे खेळाडू असल्याची साक्षच दिलेली आहे. आपले दुबळेपण लक्षात ठेवून आणि विरोधकांचे दुबळेपण जोखून, या नेत्याने मुख्यमंत्रीपद नुसते संभाळलेले नाही, तर विविध समस्यांची हाताळणी करताना लवचिकता दाखवून मुरब्बीपणाचे पुरावे दिलेले आहेत. विरोध किती कडाडून करावा आणि कुठे त्याच विरोधाची धार थोडी कमी करून बाजी मारावी, याचे तारतम्य असल्याशिवाय हे अग्निदिव्य पार पाडणे अशक्य आहे. विरोधकांना रोखायचे आणि पक्षांतर्गत स्पर्धकांना लगाम लावायचा, याचे धडे या तरूणाने या अनुभवातूनच गिरवलेले दिसतात.   (अपुर्ण)

किस्त्रीम विशेषांकातील लेख
ऑगस्ट २०१७

4 comments: