Sunday, September 23, 2018

प्रतिगामी परिवर्तनवादी

RSS vigyan bhavan के लिए इमेज परिणाम

तमाम पुरोगामी म्हणवून घेणारे लोक आपल्यासाठी परिवर्तनवादी अशी बिरुदावली लावत असतात. परिवर्तन म्हणजे तरी काय असते? तर जी काही प्रचलित स्थिती परिस्थिती आहे, त्यात बदल घडवून आणण्याला परिवर्तन असा सामान्यत: शब्द वापरला जातो. किंवा एका ठराविक स्थितीत समाज असेल, त्याला बदलून टाकायचा असतो. सहाजिकच जे लोक असलेली परिस्थिती टिकवून ठेवायला झगडत असतात, त्यांच्यावर प्रतिगामी किंवा जैसेथेवादी असा शिक्का मारला जात असतो. हा शिक्का मारणारे प्रामुख्याने स्वत:ला परिवर्तनवादी म्हणवून घेत असतात. ही पुर्वापार चालत आलेली स्थिती आहे. पण आता एक चमत्कारीक विकृती त्यात निर्माण झालेली आहे. ती अशी, की समाजाला बदलण्याचा विचार कधीच मागे पडलेला आहे आणि त्या परिवर्तनवादाची सुत्रे ठराविक लोकांनी आपल्याला हाती घेतली आहेत. स्वत:वर परिवर्तनवादी अशा शिक्का एका गटाने मारून घेतला आहे आणि स्वत:ला तसे ठरवण्यासाठी मग हा वर्ग, आपल्याशी सहमत नसलेल्यांवर प्रतिगामी असल्याचा शिक्का मारून मोकळा होत असतो. त्यातून त्याला जैसेथेवादी किंवा प्रतिगामी वर्गाच्या तसे असण्यावर बोट ठेवायचे नसते. तर आपल्याला पुरोगामी वा परिवर्तनवादी घोषित करायचे असते. तो शिक्का मारून घेतला, मग त्यांना वास्तविक परिवर्तनवादी असण्याची वा तसे वागण्याची गरज उरत नाही. याचा अनुभव अलिकडेच रा. स्व. संघाने योजलेल्या एका विचारमंथनातून आला. ह्या मंथनासाठी संघाने आपल्या विचारांशी सहमत नसलेल्यांनाही आमंत्रित केले होते. पण त्यावर बहिष्कार घालून या लोकांनी आपण जैसेथेवादी असल्याची जगाला साक्षच देऊन टाकली. आपल्याला बदलायचे नाही किंवा अन्य कोणाला बदलायचे असेल, तरी आपण त्याला हातभार लावणार नाही, अशीच ही भूमिका नाही काय?

कुठलाही बदल वा परिवर्तन आपोआप घडून येत नसते. एका बाजूचे दुसर्‍याशी संवाद होणे व त्यातून विचारांची देवाणघेवाण होण्यातून वैचारिक परिवर्तन शक्य असते. एका बाजूने आपली भूमिका दुसर्‍याला समजवायची, किंवा चिकित्सा होण्यासाठी चर्चेला आणायची. मग दुसर्‍या बाजूने त्या पहिल्या भूमिकेची चिरफ़ाड करून त्यातल्या चुका वा त्रुटी समोर आणायच्या आणि त्याचा प्रतिवाद पहिल्या बाजूने करायचा. मागल्या काही दशकापासून संघाच्या विरोधात वाटेल त्या गोष्टी सातत्याने बोलल्या व पसरवल्या गेल्या आहेत. त्याचा संघाने सहसा प्रतिवाद केलेला नाही. या लोकांनी सहसा संघाच्या प्रतिनिधीला आमंत्रित करून त्यांची बाजू आपल्या व्यासपीठावर स्पष्ट करण्याची संधी दिली नाही. म्हणजेच संघात वा त्याच्या अनुयायांमध्ये कुठलाही बदल परिवर्तन शक्य नाही, असा निष्कर्ष त्यांनी आधीच काढलेला आहे. किंवा असल्या पुरोगामी गोतावळ्यात जे कोणी अंधभक्त असतात, त्यांना पढवलेल्या संघविषयक गोष्टींच्या पलिकडले अन्य काही त्यांच्या कानी पडू नये, याची सतत फ़िकीर करावी लागत असते. म्हणूनच कोणी संघवाला त्यांच्या व्यासपीठावर प्रतिवाद करण्यासाठी आमंत्रित केला जात नाही आणि एकतर्फ़ी संघावर दुगण्या झाडण्याचे समारंभ साजरे केले जातात. आपणच आरोप करायचे आणि आपल्यापैकीच कोणीतरी त्याला दुजोरा देत रहायचे; असा पोरखेळ चाललेला असतो. त्यालाच आजकाल परिवर्तनवाद असे नाव मिळालेले आहे. सहाजिकच त्यांना संघासमोर येण्याची भिती वाटली तर नवल नाही. उलट बाजू अशी की आपले विचार संघाच्या मंचावर मांडले आणि तिथे कोणी चिकित्सा करायला आरंभ केला, तर योग्य उत्तरे नसल्याची भिती थोडकी नसते. त्यामुळे़च दृष्टीआड सृष्टी या उक्तीप्रमाणे समोरासमोर यायचेच नाही. आपल्या डबक्यात विहार करायचा, अशी परिवर्तनवादी चळवळ विटाळून गेलेली आहे.

काही महिन्यांपुर्वी माजी राष्ट्रपती प्रणबदा मुखर्जी यांना संघाने त्यांचे विचार मांडण्यासाठी आपल्या मुख्यालयात आमंत्रित केलेले होते. त्यावरूनही असाच गदारोळ झाला होता. प्रणबदांनी तिकडे जावे किंवा नाही, असा वाद उकरून काढण्यात आला होता. या लोकांचा आपल्या विचारावरही विश्वास नाही काय? आयुष्यातली पन्नास वर्षे ज्या व्यक्तीने एका विचारधारेसाठी कार्य केले, ती व्यक्ती वेगळ्या विचारांच्या व्यासपीठावर ती़च भूमिका मांडायला गेली, तर आक्षेप घेण्यासारखे काय होते? की संघाच्या मंचावर वा कार्यालयात गेल्यास कोणाचेही मतपरिवर्तन होते, अशी या लोकांची दृढ श्रद्धा आहे? अशी श्रद्धा असलेल्या व ती जिवापाड जपणार्‍यांना एकेकाळी यांचेच परिवर्तनवादी सनातनीवृत्ती मानत होते. लोकमान्य टिळक गव्हर्नराच्या बंगल्यावर गेले, म्हणून त्यांना प्रायश्चीत्त घ्यायला लावणारा जो ब्रह्मवृंद पुण्यात त्याकाळी होता. त्यापेक्षा प्रणबदांना हटकणार्‍या पुरोगाम्यांची मनोवृत्ती किती वेगळी होती? टिळकांनी तिथे चहा बिस्कुटे खाल्ली म्हणजेच धर्म बुडवला, म्हणून त्यांना पर्वतीवर जाऊन प्रायश्चीत्त करायला लावणार्‍यांनाही मग परिवर्तनवादी म्हणावे लागेल. आणि तसे म्हणायचे नसेल, तर आज प्रणबदांना हटकणार्‍यांना सनातनीवृत्ती़चा ब्रह्मवृंद ठरवण्याला पर्याय उरत नाही. ही आजच्या पुरोगामी परिवर्तनवादी मंडळींची सोवळी शोकांतिका आहे. कुठल्याही सनातनी घरात वा कुटुंबात जितके सोवळे आजकाल पाळले जात नसेल, त्यापेक्षा आजचे पुरोगामी अधिक सोवळे होऊन गेले आहे. संघवाल्याची सावली अंगावर पडली, तरी त्यांचे पुरोगामीत्व विटाळत असते आणि संघाच्या वस्तीत जाऊन आला कोणी, तर त्याला गंगेऐवजी ‘व्होल्गा’ नदीत स्नान करण्याची सक्ती केली जात असते. कारण त्यांचा आपल्याच विचार वा भूमिकेवर विश्वास उरलेला नाही. खात्री उरलेली नाही, तिची कालबाह्यता त्यांना भेडसावत असते.

परिवर्तन संवादातून व संपर्कातून होत असते. जे आपल्या विचारांचे वा भूमिकेचे नाहीत, त्यांना बहिष्कृत करून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणता येत नाही. त्यांच्याशी वाद-संवाद करून आपली भूमिका त्यांना पटवावी लागते. ती पटवायची तर आपलाच त्यावर विश्वास असायला हवा. ज्या विचारधारेला आज देशाच्या कानाकोपर्‍यातून अफ़ाट प्रतिसाद मिळत आहे. प्रतिकुल अपप्रचार अखंड करूनही ती भूमिका टिकलेलीच नाही, तर लोकप्रिय होत चालली असेल, तर आपल्यात कुठे त्रुटी राहून गेली, त्याचा शोध घेतला पाहिजे. संघाच्या प्रमुखांनी आपल्याच संघटनेचे जुने काही पवित्रे वा विचार कल्पना आजच्या काळात उपयोगी नसल्याचे सांगण्याची हिंमत केली. पण ती समजून घेण्य़ाचे धाडस कोणी पुरोगामी दाखवू शकलेला नाही. कारण जगात परिवर्तन होऊ शकते, यावरही त्यांचा विश्वास उरलेला नाही. संघातले लोक बदलू शकत नाहीत, यावर इतका ठाम विश्वास आहे, की आपण बदलण्याच्याही पलिकडे गेलेले अंधश्रद्ध कधी होऊन गेलोय, त्याचे भान उरलेले नाही. राजकीय वैचारिक सांस्कृतिक अस्पृष्यता हा आजच्या सनातनी पुरोगामीत्वाचा निकष झाला आहे. वास्तवाशी अशा लोकांचा संबंध तुटलेला आहे. अगदी नेमके सांगायचे तर असे लोक अजून विसाव्या शतकाच्या उत्तरर्धातच रमलेले आहेत. जग किंवा संघ एकविसाव्या शतकात आल्याचा त्यांना थांगपत्ता लागलेला नाही. हेडगेवार वा गोळवलकर गुरूजींच्या नंतर आणखी काही सरसंघचालक झाले, याचाही त्यांना थांगपत्ता लागलेला नाही. ज्यांना परिवर्तन म्हणजे काय त्याचाही विसर पडलेला आहे, जे ग्रंथप्रामाण्य हेच विज्ञानवाद समजू लागले आहेत, त्यांच्याकडून कुठल्या बदलाची कोण अपेक्षा करू शकतो? जे स्वत:च जैसेथेवादी वा पुराणमतवादी होऊन गेलेले आहेत, त्यांच्या कामातून वा बोलण्यातून कुठले परिवर्तन शक्य असेल? ते प्रतिगामी होऊन गेल्याचे सत्य स्विकारले, तरच असल्या चर्चां थांबवता येऊ शकतील.

10 comments:

  1. Bhau Loksattakar yani paravachya paper madhe Sarsanghachalak bolale nasalele vidhan Bhagwat mhantala asa chapun dile. Loksattakarana yabaddal khulasa pan karava lagala.tya baddal liha

    ReplyDelete
  2. उत्तम भाउ हे परीवर्तनवादी इतके सोवळे पालतात कीfb वरएखादी कदी काॅंमेट पन यांना सहन हेत नाही वेगळा विचार मांडलेली पनते कुठे ही जाउन काॅंमेट करतात अकल पाजळतात तुम्च्या fb पोट तंतोपत बसते कीतुम्हालाा आवडनारी पंचपक्वाने वाढनारे खुप जन तयार असताना तुम्ही उकीरड्यावर येता कशाला

    ReplyDelete
  3. रा.स्व.संघ ही एक गतीमान संघटना आहे.सर्व समावेशक व परिवर्ततनशील आहे.
    हे पुरोगामी बंधूंना जेवढे लवकर कळेल तो सुदिन.ी

    ReplyDelete
  4. जेव्हा सूर्य थंड होईल तेव्हाच संघ बदलेल.

    ReplyDelete
  5. भाऊ ................मस्त विश्लेषण !! पुरोगामी विचारधारा इतक्या भुसभुशीत विचारसरणीवर आधारित आहे की वाद-विवादात आपण उघडे पडू याचीच भीती याना सतावत असते. त्यापेक्षा सतत दुगाण्या झाडणे सोपे. परत तथाकथित पुरोगामी लोकांना त्यांच्या या भूमिकेचा उदोउदो केल्याबद्दल बाहेरील देशातून अर्थपुरवठा होतो ते वेगळेच. ....................शेवटी सर्व काही 'अर्थभ्रांती 'ची भीती.

    ReplyDelete
  6. सदर पोस्ट वाचताना आपली डीसेंबर १९९५ ची "उलट तपासणीतील" संघाच्या नव्वदीप्रीत्यर्थ लिहलेल्या पोस्टची आठवण झाली. सध्या घडत असलेला बदलच आपल्याला अभिप्रेत होता का? उत्तर ऐकायला/वाचायला आवडेल.

    ReplyDelete
  7. आपल्या डिसेंबर १५ मधील "उलट तपासणी" मध्ये सुचविलेला बदल तो हाच का ? आपले मत जाणून घ्यावयाची उत्सुकता आहे.


    ReplyDelete
  8. मोठी गम्मत आहे भाऊ.. संघ स्थितीशील आहे असं ओरडत ज्यांची पुरोगामी हयात त्याच्याही मागे जात आहे.. आता लवकरच ते खोटे पुरोगामी... आम्हीच खरे अशी झोंबी लागणार आहे... त्याची झलक पवार आंबेडकर यांच्या वक्तव्यातून झालेली आहे.. पण पुरोगामी विचारांचे समस्त पाईक एकत्र यायची वाट पाहत आहे....

    ReplyDelete
  9. अतिशय मारमीक विशलेषन.
    धन्यवाद भाऊ

    ReplyDelete