Saturday, April 20, 2019

‘राज’ करेगा ‘खालसा’?

Image result for raj thackeray pawar

'There's no such thing as a free lunch'

अशी एक इंग्रजी उक्ती आहे. त्याचा थोडक्यात आशय असा, की जगात किंवा जगण्यात काहीही फ़ुकटचे मिळत नसते. तुम्हाला एखादी गोष्ट फ़ुकट मिळाली वा दिली गेली, तरी प्रत्यक्षात त्याची किंमत कोणाला तरी मोजावी लागतेच. ती कुठल्या ना कुठल्या स्वरूपात फ़ेडावी लागतेच. मग ते खाणे फ़ुकटचे असो किंवा कुठली भेट वगैरे असो. निवडणूकांमध्ये लोकांची मते मिळवण्यासाठी विविध पक्ष अशा फ़ुकट काही मिळण्याच्या वा देण्याच्या योजना जाहिर करीत असतात. राहुल गांधी यांनीही अलिकडेच गरीबांना दरवर्षी ७२ हजार रुपये खात्यात भरण्य़ाचे आश्वासन दिलेले आहे. पण हे इतके पैसे कुठून आणणार; ते त्यांनी सांगितलेले नाही. सरकारी तिजोरी उघडून ते पैसे गरीबांना दिले जातील, असे राहुल म्हणतात. तरी सरकार कुठले कष्ट करीत नाही की धंदा उद्योग करीत नाही. मग सरकारची कमाई किती आणि कुठून येणार? तर सामान्य जनता आपापल्या कमाईतून कररूपाने जो पैसा सरकारच्या तिजोरीत भरणा करते, त्यातूनच आपण हे ७२ हजार रुपये गरीबांना देऊ केले आहेत, असेच राहुलना म्हणायचे आहे. त्याचाच दुसरा अर्थ असा, की राहुल कोणाला काहीही फ़ुकट देणार नाहीत. किंवा कुठल्याही गरीबाला दमडाही फ़ुकट मिळणार नाही. त्याचा भरणा अन्य करदात्यांना आपल्या खिशातून करावा लागणार आहे. ही जगाची वास्तविकता असून त्याकडे पाठ फ़िरवून कुठलेही विश्लेषण वा राजकीय भाष्यही करता येणार नाही. राहुलनी देऊ केलेले ७२ हजार रुपये गरीबांसाठी फ़ुकटचे नसतील, तर राष्ट्रवादी व कॉग्रेस पक्षाच्या लोकसभा निवडणूकीतला प्रचार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तरी फ़ुकट कशाला करतील? अर्थात असे म्हटले, की राजनी किती कोटी घेतले वा आणखी कसली तोडबाजी केली, असा प्रश्न त्यांचे विरोधक नक्की विचारतील. पण किंमत नेहमीच पैसे वा मालमत्तेच्या रुपात नसते. ती मोजणार्‍यालाही अनेकदा आधी समजलेली नसते. मग राज ठाकरे यांच्या या मोफ़त कॉग्रेस प्रचाराची किंमत कोणती असेल? ती कोणी मोजायची आहे?

जेव्हापासून राज ठाकरे यांनी मोदी विरोधात आघाडी उघडली, तेव्हापासून त्यांच्यावर भाजपा वा मोदी समर्थकांनी सतत तोफ़ा डागलेल्या आहेत. अलिकडल्या काळामध्ये राज यांच्या मनसे पक्षातले अनेक जुने सहकारी त्यांना सोडून गेले आणि मागल्या पाच वर्षात त्यांच्या पक्षाची पुरती वाताहत होऊन गेलेली आहे. त्यातून नव्याने आपला पक्ष व संघटना उभी करण्याची त्यांची धडपड चालू होती. मात्र इतकी मोदीविरोधी जबरदस्त आघाडी उघडूनही त्यांना अपेक्षित असलेले सहकार्य राष्ट्रवादी व कॉग्रेस पक्षाकडून मिळू शकले नाही. लोकसभा निवडणूकीचे वेळापत्रक जाहिर होण्यापर्यंत कॉग्रेस आघाडीत मनसे दाखल होण्याच्या बातम्या रंगत होत्या. पण कॉग्रेसला ते मंजूर नव्हते आणि राष्ट्रवादीला मनसेची साथ हवी होती. त्यामुळे आधीच मोदीविरोधी भूमिका घेऊन बसलेल्या राजना त्या चक्रव्युहातून बाहेर पडणे शक्य नव्हते. मग त्यांनी अनपेक्षित पवित्रा घेतला. अखेरच्या क्षणी त्यांनी आघाडीतून वा स्वतंत्रपणे लोकसभा लढवण्याचा नाद सोडून दिला. पण राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना ऐन निवडणूकीच्या गदारोळातून अलिप्त रहाता येत नाही आणि तसे झाल्यास त्यांची संघटना अधिकच विस्कळीत होऊन जाते. त्यामुळे निवड्णूका लढवल्या नाहीत, तरी त्यापासून अलिप्त रहाता येत नाही. त्यामुळे लढायचे नाही पण निवडणूकीच्या रणभूमीत टिकायचे; असा पर्याय राजना काढावा लागला. त्यांनी आपले उमेदवार उभे करायचे सोडून दुसर्‍या कुणाचे पाडायचा अजब पवित्रा घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कॉग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार किंवा भाजपा सेनेच्या विरोधातला प्रचार असा त्यांचा कार्यक्रम चालू झाला आहे. सहाजिकच कॉग्रेसला फ़ुकटचा प्रचारक मिळाला; अशीही शेलकी टिका राजवर झाली तर नवल नाही. पण फ़ुकटचे काहीच मिळत नसेल, तर राजचा प्रचार तरी कॉग्रेस राष्ट्रवादीला फ़ुकट कसा मिळू शकतो? कुछ तो किंमत होगी ना? काय आहे ती किंमत?

खुद्द राज ठाकरे ती किंमत सांगणार नाहीत, किंवा कॉग्रेस राष्ट्रवादीही त्याची चर्चा करणार नाहीत. अर्थात ही किंमत आयोगाला सादर करण्याच्या हिशोबातली असत नाही किंवा असणार नाही. तसे बघायला गेल्यास रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्षही महायुतीमध्ये आहे आणि तेही एनडीएचा प्रचार करीत आहेत. पण त्यांना मंत्रीपद देण्यात आलेले आहे आणि विधान परिषद वा विधानसभेच्या उमेदवार्‍याही मिळणार असतील. तशी मनसेची वा राज ठाकरे यांची स्थिती नाही. कॉग्रेसने त्यांना आज आघाडीत घ्यायला नकार दिला असेल, तर विधानसभेतही सोबत घेण्य़ाचा प्रश्नच येत नाही. परप्रांतीयांच्या बाबतीत मनसेचा आक्रमक पवित्रा व आजवरची ख्याती बघता कॉग्रेसला भविष्याही मनसेला सोबत घेणे अशक्यच आहे. मग राज अशा फ़ुकटच्या प्रचारातून लष्करच्या भाकर्‍या भाजत आहेत काय? त्यांना वा त्यांच्या पक्षाला यातून काय मिळणार आहे? अनेकदा अशी मिळणारी वा मिळवायची किंमत सांगितली जात नाही, किंवा दिसणारीही नसते. किंबहूना ज्याला मोजावी लागणार आहे, त्यालाही आज ती किंमत कळलेलीही नसते. क्रेडीट कार्ड घेताना मोठी मजा वाटते. कुठेही घासा आणि रोकड खिशात नसताना खरेदीची मौज करता येत असते ना? पण महिनाअखेर त्याचे बिल पोहोचते व वसुलीचा लकडा मागे लागतो. तेव्हा त्यातली मजा संपून किंमत कळत असते. तशीच ही काही ‘राज’ योजना असावी का? म्हणजे आज कॉग्रेस राष्ट्रवादीला ती सेवा फ़्री मिळते आहे आणि उद्या मोजावी लागणारी किंमत त्या दोन्ही पक्षांना अजून समजलेलीच नसावी काय? असली तर ती किंमत नेमकी काय असू शकेल? कशा स्वरूपातली असेल? राजकारणाचे विश्लेषण करताना त्याचाही अंदाज घ्यावा लागतो. आज जसे कॉग्रेसवाले खुश आहेत, तसेच ५२ वर्षापुर्वी तेव्हाचे कॉग्रेसजन खुश होते आणि आजचे भाजपा शिवसेनावाले प्रक्षुब्ध आहेत, तसे महाराष्ट्र समितीवाले संतापलेले होते.

१९६६ सालात शिवसेना मुंबईतल्या मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी स्थापन झालेली तरूणांची संघटना होती आणि राजकारण म्हणजे गजकरण, अशी शेलक्या भाषेतली टिका करून बाळासाहेब ठाकरे सार्वजनिक जीवनात उतरले होते. त्यांच्याशी पहिले खटके उडू लागले ते कम्युनिस्टांचे आणि त्याच डाव्यांना मुंबईतून हद्दपार करण्याचा चंग बांधलेली शिवसेना वर्षभराने आलेल्या चौथ्या लोकसभा निवडणूकीत १९६७ सालात थेट कॉग्रेसचा ‘फ़ुकट’ प्रचार करायला मैदानात उतरली होती. त्यामुळे स. गो. बर्वे हे कॉगेस उमेदवार इशान्य मुंबईतून कृष्ण मेनन या डाव्या उमेदवाराला हरवून विजयी होऊ शकले. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणूकीत तारा सप्रे या त्यांच्या भगिनी दुसर्‍यांदा मेनन यांना हरवून जिंकल्या. त्यांच्या प्रचाराचा भारही शिवसेनेनेच उचलला होता. मात्र त्याची किंमत पुढल्या काळात इतरांना व कॉग्रेसलाही मोजावी लागली. काही महिन्यातच ठाणे कल्याण अशा नगरपालिका निवडणूका आल्या आणि त्यात शिवसेना समाजकार्य म्हणून उतरली. त्यातूण हळुहळू राजकारणात स्थिरावत गेली. त्याचा पुढल्या काळात परिणाम असा झाला, की मुंबईतून डावे वा पुरोगामी पक्ष नेस्तनाबूत होऊन गेले आणि आज त्यांचे नामोनिशाण शिल्लक उरलेले नाही. दोन दशकानंतर तीच शिवसेना, जिला कॉग्रेसचे अनौरस पोर म्हणून हेटाळणी झालेली होती, तो कॉग्रेसला आव्हान देणारा मुंबई व नंतर राज्यात एक प्रमुख राजकीय पक्ष बनला. थोडक्यात १९६७ च्या लोकसभा निवडणूकीतला फ़ुकटचा प्रचार प्रत्यक्ष व्यवहारात ‘फ़ुकट’ नव्हता. त्याची किंमत काही दशकांनी त्याच कॉग्रेसला वा सेनेला सोबत घेणार्‍या प्रजा समाजवादी पक्षाला मोजावी लागलेली आहे. मग आज शरद पवार किंवा अशोक चव्हाण मनसे वा राज ठाकरे यांची ‘फ़ुकटची’ सेवा घेत आहेत, ती खरोखर फ़ुकटची असेल काय? त्याची किंमत आजच ठरलेली असेल काय?

आता थोडे तपशीलात जाऊन या फ़ुकट सेवेचा हिशोब तपासूया. याक्षणी तरी महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्यानंतर गर्दी खेचणारा स्टार प्रचारक राज ठाकरेच आहेत ना? राहुल गांधींच्या सभेला गर्दी जमवावी लागते. पण विविध कॉग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार आपल्या भागात मतदारसंघात राज यांनी प्रचाराला यावे किंवा सभा घ्यावी; अशी मागणी करीत आहेत ना? किंबहूना पवार-राहुलसाठी जितकी मागणी नाही, त्याच्या अनेकपटीने मोदी विरोधासाठी राज यांच्याकडे उमेदवारांची रीघ लागलेली आहे ना? अगदी कालपर्यंत राज व मनसेच्या प्रांतवादी संकुचितपणावर सडकून टिका करणारे मुठभर पुरोगामी सेक्युलरही राजच्या एकाकी झुंजीचे गुणगान करू लागलेले आहेत ना? अगदी नेमक्या भाषेत सांगायचे, तर आज महाराष्ट्रात मोदीविरोधी राजकारणाचा सर्वात मोठा लढवय्या किंवा म्होरक्या नेता, अशीच राजविषयी जनमानसात प्रतिमा झालेली नाही काय? त्यात सर्व कॉग्रेसी वा राष्ट्रवादी नेते मागे पडले आहेत. अगदी प्रकाश आंबेडकरांचेही नाव पुसले जाते आहे. ही या फ़ुकटच्या प्रचाराची खरी किंमत आहे. यात कॉग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे जे निष्ठावान मतदार अनुयायी असतील त्यांना सोडूनही लाखो हजारो मोदी भाजपा विरोधक आहेत. जे मनापासून मोदींचा द्वेष करतात व त्यासाठी कोणाच्याही मागे जायला असा वर्ग तयार आहे. त्यांच्यासाठी आता पवार वा अशोक चव्हाण वा तत्सम कुठल्याही नेता किंवा पक्षापेक्षा राज ठाकरे हाच एकमेव प्रभावी पर्याय म्हणून पुढे आलेला नाही काय? जागेसाठी हुज्जत केली नाही की कुठली सौदेबाजी नाही. आपली सगळी शक्ती मोदी विरोधासाठी निरपेक्षरितीने पणाला लावणारा एकमेव नेता राज ठाकरे आणि एकमेव पक्ष मनसे झालेला नाही काय? मग असा एक नवा मतदार राजनी या प्रयत्नातून गोळा केलेला आहे. त्याच्याच जमण्यातून कॉग्रेस, राष्ट्रवादी वा अगदी मुस्लिम वा दलितांचा एक वर्ग राजकडे ओढला जाणार आहे.

वरकरणी बघितले तर राज ठाकरे कंबर कसून मोदी-शहा वा भाजपा शिवसेनेला पराभूत करायला मैदानात उतरले आहेत आणि कसलीही अपेक्षा न बाळगता त्यांनी जीवाचे रान केलेले आहे. अशीच आज समजूत निर्माण झालेली आहे. अगदी भाजपा वा युतीचे शिवसैनिक समर्थकही राजची त्यासाठी हेटाळणी करीत आहेत. त्याच्यावर टिकेची झोड उठवित आहेत. पण राजनी कितीही प्रचार केला वा रान उठवले, तरी सेना भाजपाच्या एक टक्काही मतांवर राजचा प्रभाव पडणार नाही. फ़ार तर दलितांची व मुस्लिमांची काही मते प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीकडून कॉग्रेसकडे वळतील. पण त्याच वेळी अशा आजवर राजकडे संशयाने बघणार्‍या समाजघटक वर्गाची राजकडे बघण्याची दृष्टी अचानक बदलून गेली आहे. त्यानंतर जेव्हा निकालातून कॉग्रेस राष्ट्रवादी मोठे यश मिळवणार नाही आणि युतीच विजयी होईल, तेव्हा कॉग्रेस राष्ट्रवादी यांच्या बाबतीत असा कडवा भाजपा मोदी विरोधक पुरता निराश होऊन जाईल. त्याचा ओढा मग अन्य कुणा भाजपा विरोधाचे समर्थ नेतृत्व करू शकेल त्या नेत्याकडे पक्षाकडे वळेल. तो पक्ष कुठला असेल? आपसात जागेसाठी भांडून मोदींना विजयी करणारे पवार चव्हाण वा प्रकाश आंबेडकर तसे नेते मानले जातील? की कुठलीही जागा लढवत नसतानाही मोदी विरोधातल्या कोणालाही निरपेक्ष वृत्तीने मदत करणारा राज ठाकरे, असा समर्थ नेता असेल? एकही जागा लढवत नसतानाही राज ठाकरे आपला नवा मतदारसंघ तयार करीत नाहीत काय? बिहार, उत्तरप्रदेश, तेलंगणा, दिल्ली अशा विविध राज्यातून कॉग्रेस नामशेष झाली, त्यातून तिथले प्रादेशिक पक्ष उभे रहात गेले ना? मग इथे फ़ुकटातला प्रचार मिळाला म्हणून सुखावलेले कॉग्रेस राष्ट्रवादी कोणती किंमत भविष्यात मोजतील? त्या दोन्ही पक्षांकडे आज आक्रमक वा प्रभावी नेतृत्व राहिलेले नाही आणि राजपाशी संघटना व मतदार नाहीत. दोघांची सरमिसळ होणार नाही?

१९७८ नंतर पुलोद बनवून पवारांनी महाराष्ट्रातील पारंपारिक पुरोगामी पक्षांचे नेतृत्व पत्करले आणि ते माघारी कॉग्रेसमध्ये गेल्यावर त्या पक्षांचा बोर्‍या वाजला. त्यांचा अवकाश सेना भाजपाने व्यापला. पवार गेले आणि विरोधी राजकारणात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी प्रभावी वक्ता नेता बाळासाहेब ठाकरेंनी भरून काढली. आज कॉग्रेस राष्टवादी यांच्यामागे ठराविक मतदार आहे. पण त्याला प्रभावित करणारे नेते वा वक्ते, त्या दोन्ही पक्षांकडे नाहीत. नेमकी तीच जागा राज ठाकरे निवडणूका न लढवता भरून काढत आहेत. दुसरीकडे फ़ुकटचा प्रचार म्हणून तेच दोन्ही पक्ष राजसाठी आमंत्रणे देऊन व गर्दी जमवून त्यांना अधिक प्रभावी बनवायला हातभार लावत आहेत. सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणूक आखाड्यात राज आपला पक्ष घेऊन उतरतील, तेव्हा कॉग्रेस राष्ट्रवादी पक्षाला राज विरोधात अवाक्षर तरी बोलण्याची सुविधा असेल काय? तेव्हा राज सेना-भाजपाच्याही विरोधात आग ओकतील. पण त्याच्या झळा आघाडीत घेतले नाही तर कॉग्रेस राष्ट्रवादीलाच सोसाव्या लागतील. ती किंमत सेना भाजपा मोजाणार नाहीत. आज टाळ्या पिटून आमंत्रण देणार्‍यांना मोजायची आहे. कारण व्यवहार घोषित नसला तरी स्पष्ट आहे. सगळेच काही फ़ुकटचे नाही. लोकसभा फ़ुकट असली म्हणून विधानसभा फ़ुकटातली नाही. तिथे आघाडी करून मनसेला सोबत घ्यावे लागेल, किंवा मनसेची दोन हात करावे लागतील. तेव्हा मनसे वा राजविरोधात पवार बोलू शकणार आहेत का? चव्हाण वा कॉग्रेसवाल्यांना बोलता येईल का? पुरोगामी पोपटांची वाचा बसलेली असेल ना? कारण आगामी विधानसभेत सेना भाजपाला युती करावीच लागणार आहे. त्यांच्या विरोधातला एकमेव नेता म्हणून राज ठाकरेंनी आपली प्रतिमा उभारण्याचा प्रकल्प आताच हातात घेतला आहे. तेव्हा कॉग्रेस राष्ट्रवादी पक्षाला महाराष्ट्राच्या राजकारणातून खालसा करण्याची ही मोहिम नंतर किंमत वसुल करण्य़ाची आहे. थोडक्यात काय चालले आहे?

‘राज’ कोणाला राजकारणातून ‘खालसा’ करायला निघालेले आहेत? मोदी की पवार-चव्हाणांना?

32 comments:

 1. वाह भाऊ !!!! अगदी मनातलं बोललात । १५ वर्षा नंतरची राजकीय situation imagine करा ।
  सत्तेत भाजपा आणि शिवसेना । विरोधात मनसे ।
  विचारधारेच्या अंगानं पाहिलं तर, सत्ताधारी ही आम्ही आणि विरोधक ही आम्हीच ।
  ४० वर्षांपूर्वी सुद्धा हीच स्थिती होती ना? तेव्हा काँग्रेस सत्ताधारी होते आणि विरोधक ही काहीशा त्याच विचारसरणीचे होते । तसंच काहीसं ।

  ReplyDelete
 2. गेल्या ४.५ वर्षात शिवसेना आणि भाजपा च्या कलगी तुऱ्या नं हेच तर साध्य केलं । आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष आपल्या विस्मरणात तर गेले आहेत ।
  महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते कोण, हे कोणी पटकन सांगू शकेल का ?
  आणि तिथेच तर गंम्मत आहे।
  माझे विचार 🙏

  ReplyDelete
 3. Kharach apratim vishlashan.......

  ReplyDelete
 4. एक अतिशय तर्कसंगत लेख. केवळ भाऊ हा विचार करू शकतात, इतर सगळे भोजनभाऊ झाले आहेत!

  ReplyDelete
 5. आदरणीय भाऊ सर एक वेळ मान्य करू की खाजू पेंटर मोदी शहा विरोधात एकाकी लढतोय पण आदरणीय बाळासाहेबांनी आपल्या सोबत अनेक धुरंधर लढवय्ये नेते तयार केले होते आणि त्यांच्याच सोबतीने महाराष्ट्रात आपला दबदबा तयार केला. पेंटर उत्कृष्ट वक्ता जरूर आहे पण उत्कृष्ट नेता आणि नेतृत्व करणारे लढवय्ये तयार करू शकत नाही ही खरी शोकांतिका आहे.

  ReplyDelete
 6. सुंदर विश्लेषण भाऊ काका, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पेक्षा मनसे बरी.

  ReplyDelete
 7. भाऊ, तुम्ही सांगताय ते अगदी चपखल आणि सुर्यप्रकाशासारखे सत्य आहे! विज्ञानाच्या भाषेत कोणतीही गोष्ट आपोआप घडत नसते!कुठेतरी ऊर्जा खर्च होते आणि ती दुसऱ्या कुठल्या स्वरूपात प्रकट होतेच.राज हे अशी perpetual मशीन बनू पाहत आहेत!

  ReplyDelete
 8. खुप छान विश्लेषण, न समजलेला विषय अलगद उलगडून दाखवला आहे तुम्ही.

  ReplyDelete
 9. भाउ तुमच विश्लेशन पटतय पण राजचा पैसा नोटबंदीत गेलाय म्हनुन ते मोदींवर चिडलेत अस पण एक प्रचार ााहे

  ReplyDelete
 10. पुढील विधानसभा निवडणुका जर कॉंग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढले तर राष्ट्रवादी चा मुख्यमंत्री होणार नाही आणि स्वबळावर पण होणार नाही त्यामुळे विधानसभेसाठी राष्ट्रवादी आणी मनसे यांची युती करून कॉंग्रेस ला खिंडीत पकडण्याचा डाव आहे हा

  ReplyDelete
 11. मोदीशहा यांच्या झंझावाती व प्रभावी प्रचारापुढे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासासारख्या देशव्यापी प्रचारकांचे जाळे आणि त्यांच्या समाजसेवेची पुण्याई पाठीशी असल्याने भाजपचं पुन्हा सत्तेवर येणार ही गोष्ट उघड आहे . त्याच्या तुलनेने एका वाताहात झालेल्या ,संघटना नसलेल्या आणि पूर्ण राज्यभर प्रभाव आहे असेही म्हणता येणार नाही अशा मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या केवळ गर्दी खेचणाऱ्या वक्तृत्वाच्या भांडवलावर चाललेल्या मोहिमेची वास्तविक दखलही मोदीसमर्थकांनी घ्यायची गरज नाही . तरीपण राज यांच्यावर टीका का होतं आहे आणि त्यांना पुढे कोणता लाभ होणार याविषयी तर्क केले जात आहेत असे प्रश्न सामान्य माणसाला पडू शकतात .. तसेच आवश्यकता नसताना सत्ताधाऱ्यांची बाजू मांडणार्यांना त्या बदल्यात काय मिळत असेल असा तर्क शिरोभागी उद्धृत केलेल्या इंग्लिश युक्तीच्या आधाराने करता येणार नाही काय ? केवळ राजकारणीच लाभ असल्याशिवाय काही करत नाहीत असे समजावे काय ?

  ReplyDelete
 12. भाऊ काका, आता महाराष्ट्रातली चौथी फेरी झाली की हा राज ठाकरे असा गायब होईल की नंतर मग विधानसभा निवडणुकीच्या आधी एक महिना पुन्हा तोंड दाखवेल...

  ReplyDelete
 13. या सर्वांत एक गोष्ट नक्की की राज ना उमेदवार मिळवणे अतिशय गरजेचे आहे. कारण आज त्यांच्या पक्षात त्याची सगळ्यात जास्त वानवा आहे. आणि राज इतरांना किती वाव देतील यावर ते अवलंबून आहे. मोदी हे कितीही एकखांबी वाटले तरी त्यांच्याकडे अनेक चांगले लोक आहेत व त्यांना वाव आहे. राजाच्या पक्षात तो किती मिळेल हे सांगता येत नाही.

  ReplyDelete
 14. श्री भाऊ एक नक्की राज ठाकरे राज्य चालवू शकणार नाहीत ,

  ReplyDelete
 15. ग्रामिण भागात एक म्हण आहे... "माझा नवरा मेला तरी चालेल पण समोरची रंडकी झालीच पाहिजे " ही म्हण अर्धवट आहे , असं राज ठाकरे सिध्द करू पहात आहेत. समोरची रंडकी झाली की , मी पुन्हा दुसरं लग्न करीन आणि समोरचीनं ही केलं तर....पुन्हा तसच म्हणीन ! थोडक्यात काय तर समोरचीचा नवरा माझ्या शापाने मेलाच पाहिजे. या भानगडीत माझा नवरा कशाने का मरेना मला चालेल ! मी पुन्हा दुसरं लग्न करेनच !अशी ही कथा आहे....
  तुम्ही दिलेले बाळासाहेबांचे संदर्भ अगदी फिट्ट आहेत. तुम्ही नेहमी म्हणता त्या प्रमाणे विधान सभेच्या निवडणूकांच्या वेळी शिवसेना भाजप युतिला जबरदस्त पर्याय मात्र नक्कीच उभा राहिलेला दिसेल . लोकांना पर्याय पाहिजे असतो , तो काॅंग्रेस व राष्ट्रवादीच्या युतित सध्यातरी दिसत नाहीय....

  ReplyDelete
 16. अफलातून फक्त राज नि उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नये

  ReplyDelete
 17. आपले राजकीय विश्लेषण जरा बाजूला ठेऊन, भाऊ तुम्हाला पटतंय का राज चे हे बाळकोट वरून संशयाचं वातावरण तयार करणे? आपल्या स्वार्थासाठी, पक्ष वाढवण्यासाठी देशद्रोही वागणे रास्त आहे का? बाळाकोट न वापरता राजने त्याचे हेतू साध्य करणे योग्य ठरले नसते का?

  ReplyDelete
 18. खूप भारी विश्लेषण भाऊ, मस्त !!!!👌👌

  ReplyDelete
 19. राज व मनसे २०१४ मध्येच कायमचे संपले. राजने आता मोदी-शहांविरोधात कितीही आदळआपट केली तरी मनसे हा मृत पक्ष परत जिवंत होणे अशक्य आहे.

  ReplyDelete
 20. Today, credibility of Raj is almost zero. As well as, in future people will not trust him because of so many U Turns & no work at ground level. Reason of oppose to Modi Shah has now become a personal hate.
  I do not agree with Bhau that Raj has any future in Maharashtra politics.

  ReplyDelete
 21. खरच भाऊ मनाला पटणारे विसलेशण

  ReplyDelete
 22. शरद पवारांची विश्वासार्हता जसी लयास गेली आहे तसी अवस्था राज ठाकरे यांची झाली आहे. शिवसेना हळूहळू वाढत गेली. याउलट मनसे दिवसेंदिवस अस्तित्व हीन होत आहे. बाळासाहेबां कडे दुसर्या फळीतील ताकदवार नेते व संघटक होते. ती गोष्ट राज ठाकरे कडे नाही. तसेच महाराष्ट्रातील तरूण नेत्या ची जागा फडणवीस यानी व्यापलेली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचे महत्व दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे.

  ReplyDelete
 23. भाऊ या विषयावर तुमचे विचार ऐकण्याची इच्छा होती ती आज पूर्ण झाली, बर लोकसभेला काय होईल यापेक्षा येणाऱ्या विधानसभेला काय चित्र असेल याची मला पुसटशी कल्पना यायला लागली आहे,
  म्हणजे विधांसभेमध्ये जर काँग्रेसने राज यांना सोबत घेण्यास नकार दिला तर शरद पवार राज आणि शिवसेना यांचं मनोमिलन करून काँग्रेसला बाजूला सारून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मनसे अशी नवीन आघाडी किंवा युती जन्माला येऊ शकते का? कारण पाहिलं तर काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याचा वारसदार महाराष्ट्रात नाही, शिवाय त्यांचं जहाज बुडल्यात जमा आहे, राहिले राष्ट्रवादी सेना आणि मनसे,शिवसेनेचं पण भाजपशी तसा प्रेमाचा संसार राहिला नाही, सध्या सोबत आहेत म्हणजे पर्याय नाही म्हणून,मग येत्या काळात शरद पवार सेना आणि मनसेला सोबत घेउन नवीन पर्याय निर्माण करू शकतात का? कारण हे तिन्ही पक्ष आज मातब्बर असून सुद्धा राष्ट्रय पक्षामुळे झाकोळले जातात।
  शरद पवारांची कारकीर्द पहिली तर ते आशा गोष्टी घडवून आणू शकतात यात शंका येण्यासारखं मला तरी वाटत नाही, महत्वाचं म्हणजे मनसे राष्ट्रवादीला अनुकूल झाला आहेच शिवाय सेना पण आतून अनुकूल आहेच। त्यामुळे या प्रकारचा नवीन पर्याय भविष्यात जनेते समोर यायला हरकत नाही।
  तुमच्या मताची मी वाट पाहतो अथवा या शक्यतेवर तुम्ही नवीन ब्लॉग लिहून प्रसिद्ध करावे।

  ReplyDelete
 24. अप्रतिम विश्लेषण
  भाऊ मोदींविरोध करता करता प्रादेशिक पक्ष या निवडणुकीत संपून जातील असे वाटते
  बाकी मतदार सुशिक्षित आहेतच

  ReplyDelete
 25. Bhau, welcome to Goregao tomorrow

  ReplyDelete
 26. जी व्यक्ती आदरणीय बाळासाहेबांना दिलेलं सुप काढतो मग ती व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकते,
  2008 /09 ह्याच्यात ज्या कोणी पंपाने हवा भरली हे नंतर सुर्य प्रकाशा प्रमाणे स्वच्छ, जनतेला 2014 ला समजल्याने सध्या विश्वासार्हता संपलेल्या अवस्थेत आहेत

  ReplyDelete
 27. If any one knows Raj Thakre, he should told him that the level Raj is using for his political gain is demolishing PM's respect in the eyes of people and demolishing faith in Democratic Government, even though the new government will be of Modi people will disrespect PM which is not good for Democracy. Bhau if you know him please tell him personally.

  ReplyDelete
 28. फक्त भाषणं करून निवडणुका जिंकता येत असत्या तर--- आदरणीय अटलबिहारी वाजपेयी आजन्म पंतप्रधान असते,,

  ReplyDelete
  Replies
  1. बरोबर आहे फक्त भाषणं करून निवडणुका जिंकता येत नाहीत हे राज ठाकरे यांनी सिद्ध केलं आणि खोटं बोलून जिंकता येतात हे मोदींनी सिद्ध करून दाखवलं

   Delete
  2. H j mirje तुम्ही पोपटभक्त असाल पण नाशिकची काय वाट लावली ते नाशिककरांना विचारा लोक परत विश्वास ठेवणार नाहीत. कुठे आहे विकासाची ब्लू प्रिंट हे खोट नाही का? काँग्रेस ncp ला शिव्या दिल्या आता त्यांचा साठी सभा हा शुद्ध खोटारडेपणा आहे फसवणूक गद्दारी मराठी माणसाशी ते तुम्हाला नाही दिसणार

   Delete
 29. What Raj is telling people from Nashik had given him majority and tested long back and the outcome is infront people

  ReplyDelete