Monday, April 22, 2019

उडाले तर विमान, कोसळले की भंगार

Related image

मी मुंबईचा मतदार आहे. उत्तररदेशची अमेठी वा केरळात वायनाडमध्ये मतदार नाही, याचे मला कमालीचे दु:ख झाले आहे. कारण तिथे मतदार असतो, तर मला राहुल गांधींना व्यक्तीगत मतदान करता आले असते. अर्थात मी वास्तव्य करतो, तिथेही राहुलच्या कॉग्रेस पक्षाचा उमेदवार आहे. पण मला कॉग्रेसला मत द्यायचे नाही. कारण ज्या हेतूने मी आज राहुलवर फ़िदा आहे, ते कॉग्रेस पक्षाचे कर्तॄत्व नाही, किंवा त्या पक्षामुळे मला काही मिळालेले नाही. जे काही मला अपेक्षित होते-नव्हते, ते राहुलनी व्यक्तीगत कर्तबगारीतून मला दिलेले आहे. तर त्यांनाच माझे मत देण्यात अर्थ आहे. म्हणूनच अमेठी वा वायनाडचा मतदार नाही, याचा खेद होतो आहे. असे राहुलनी माझ्यासाठी वा देशासाठी काय केले? हा प्रश्न एव्हाना तुमच्या डोक्यात आलेला असेलच. तर त्याचे उत्तर राहुलनी सुप्रिम कोर्टात मागितलेली माफ़ी असेच आहे. पण ती माफ़ी किंवा राफ़ायलच्या प्रकरणाचा बोजवारा उडवला म्हणून मी राहुलवर खुश झालेला नाही. त्यांनी या उद्योगात एक मोठे राष्ट्रहिताचे कार्य अनवधानाने पार पाडलेले आहे आणि त्याचे योग्य श्रेय त्यांना मिळायलाच हवे. ते कॉग्रेस पक्ष देणार नाही की विरोधकही देणार नाहीत. ते महत्कार्य आहे मुखवटे फ़ाडण्याचे. मागल्या सत्तर वर्षात उजळमाथ्याने आपल्या समाजात प्रतिष्ठीत व मान्यवर म्हणून मिरवणार्‍या शेकडो हजारो, त्तथाकथित पुरोगामी, सेक्युलर वा कलावंत विचारवंत भुरट्यांना राहुलनी एका माफ़ीपत्राने संपवलेले आहे. तोंडघशी पाडलेले आहे. पुर्ण बहूमत मिळवून व देशाची सत्ता हातात असताना नरेंद्र मोदींना जे शक्य झाले नाही, तो मोठा पराक्रम राहुलनी केला आहे. जे भल्या भल्या भाजपा संघ प्रवक्त्यांना साधले नाही, ते काम राहुलनी सहजगत्या करून दाखवले आहे. नेहमी जे बुद्धीमंत म्हणून मिरवतात, ते किती बुद्दू वा पप्पू आहेत, हेच ताज्या माफ़ीनाम्याने सिद्ध केले नाही काय?

मागल्या सहाआठ महिन्यात राफ़ायल म्हणून जो तमाशा राहुलनी अविश्वास प्रस्तावाच्या निमीत्ताने सुरू केला; त्यात हळुहळू एक एक बुद्धीमंत, कलावंत, साहित्यिक व इतर महत्वाच्या क्षेत्रातले मुखवटे पांघरलेले छुपे बदमाश लोक उतरत गेले. कोणी त्यावरून खोटीनाटी कागदपत्रे तयार केली. कोणी युक्तीवादातून राफ़ायल खरेदीत घोटाळ्याचे लेख लिहीले वा आभास उभे केले. कोणी थेट सुप्रिम कोर्टात धाव घेऊन याचिका सादर केल्या. ज्यांनी चौकीदार चोर अशा डरकाळ्या फ़ोडल्या, त्यांनी सतत समाजतले धुरीण मान्यवर प्रतिष्ठीत म्हणून आपल्या प्रतिष्ठेचा तमाशा मांडलेला होता. यशवंत सिन्हा, अरूण शौरी यांच्यापासून विविध क्षेत्रातले लोकही राहुलच्या मागे धावत सुटलेले होते. यापैकी एकालाही यापुर्वी असा गंभीर आरोप मोदींच्या विरोधात करायची हिंमत झालेली नव्हती. गुजरात दंगलीचे निमीत्त करून त्यांनी मोदीविरोधी जी चिखलफ़ेक केलेली होती, त्याने तोंड भाजले असताना कोणाला असे बेछूट आरोप करण्याची हिंमत उरलेली नव्हती. म्हणूनच सगळे मोदीं कारकिर्दीच्या पहिल्या तीन वर्षात चिडीचुप होते. हातात काही पुरावा नसताना आणखी खोटे आरोप केल्यास उरलीसुरली अब्रुही चव्हाट्यावर येईल; म्हणून त्यांची वाचा बसलेली होती. पण राहुलनी गेल्या जुन महिन्यात अविश्वास प्रस्तावाचे निमीत्त करून राफ़ायलचा घोटाळा बाहेर काढला आणि हळुहळू अशा दबलेल्या बदमाशांना धीर येत गेला. कॉग्रेसने मुठभर माध्यमे वा काही ठराविक पत्रकारांना हाताशी धरून खोटे पुरावे साक्षिदार उभे केले. जनतेमध्ये गैरसमज पसरवण्याची मोहिम हाती घेतली. त्यामुळे बिळात दडी मारून बसलेल्या या भुरट्यांना धीर येत गेला आणि एक एक करीत ते बाहेर आले. चारपाच महिन्यात तर ‘चौकीदार चोर’ अशी डरकाळीच तयार झाली. हुरळल्यासारखे हे सगळे राहुलच्या मागे धावत गेले आणि सोमवारी त्यांची राहुलनी सुप्रिम कोर्टातच नाचक्की करून टाकली.

वरकरणी त्यामुळे राहुल खोटा पडल्याची भावना आहे. पण राहुलने फ़क्त माफ़ी लिहून दिलेली आहे. त्याला माफ़ीपत्र वा प्रमाणपत्र यातलाही फ़रक कळत नसल्यावर एका माफ़ीने काय मोठे बिघडते? शेफ़ारलेल्या पोराने महागडे खेळणे मोडले, म्हणून त्याला कुठलाही खेद खंत नसते. सहाजिकच असल्या माफ़ीने राहुलवर काडीमात्र फ़रक पडत नाही. पण त्याच्या आरोपांचा व डरकाळ्यांचा आधार घेऊन ज्यांनी मागल्या चार महिन्यात मोदी विरोधात चिखलफ़ेकीची मोहिम उघडली, ते साहित्यिक, संपादक, पत्रकार, कलावंत, मान्यवर वकील, राजकीय सामाजिक नेते इत्यादींचे काय? राफ़ायलचा आडोसा घेऊन त्यांनी राहुलची पालखी उचलली त्यांचे काय? पुरते तोंडघशी पडले ना? कारण त्यांनी राहुलची पालखी उचलल्याचे कधीच मान्य केलेले नव्हते. आपापल्या क्षेत्रातले मान्यवर प्रतिष्ठीत म्हणून ते मोदी विरोधात समोर आले होते. मोदी वा त्यांच्या हाती सत्ता म्हणजे देशाला धोका आहे. कारण मोदी खोटारडा माणूस आहे असे यापैकी प्रत्येकाने अगत्याने व आग्रहपुर्वक सांगितलेले होते. आता प्रश्न असा आहे, की ज्याच्या साक्षीने हे मान्यवर समोर आले, त्यानेच आपण खोटारडे असल्याची कबुली देशाच्या सर्वोच्च न्यायालयात दिलेली आहे. कोर्टामध्ये जे घडले, ते आपण आपल्या लबाडीसाठी मोडतोड करून खोटेपणा केला व निवडणूक प्रचारासाठी आपण हा खोटेपणा केल्याची कबुली राहुलनी दिलेली आहे. सहाजिकच या निवडणूक प्रचारासाठी अशा कंड्या पिकवून ज्यांनी कोणी मोदी विरोधात चिखलफ़ेक चालवली आहे, त्यांनाही राहुलने एका माफ़ीपत्राने जगासमोर खोटे पाडलेले आहे. पण त्यालाही महत्व कमीच आहे. हे लोक पहिल्यापासूनच खोटे व भामटे आहेत. कलावंत विचारवंत वा साहित्यिक वगैरे त्यांनी आपला हिडीस चेहरा लपवण्यासाठीच लावलेले मुखवटे होते आणि तेच राहुलनी एका माफ़ीपत्रातून टरटरा फ़ाडून टाकलेले आहेत.

पाच वर्षे देशाची सर्वोच्च सत्ता हाती असतानाही मोदी या खोटारड्यांना कधी उघडे पाडू शकले नाहीत. खटले भरून वा अशा मान्यवरांना कोर्टात खेचूनही नरेंद्र मोदींना त्यांचे मुखव्टे फ़ाडता आले असते. त्यांचे हिडीस बिभत्स व समाजविघातक चेहरे समोर आणता आले असते. पण मोदींना तितकी हिंमत झाली नाही, किंवा अतिरेकी सभ्यतेच्या आहारी जाऊन मोदींनी आपल्याच समाजात प्रतिष्ठीत म्हणून मान्यता पावलेल्यांना नामोहरम करायचा मोह टाळलेला असावा. मागल्या सत्तर वर्षात असे जे पोसलेले भामटे मान्यवर आहेत. तीच समाजाला लागलेली किड होती आणि तिचा बंदोबस्त व्हायला हवा आहे. गुजरात दंगलीनंतर एक एक असा मुखवटा उघडा पडत गेला आणि मागल्या लोकसभेनंतर यापैकी अनेकांचे अवसान गळून पडलेले होते. तरीही आणखी काही मुखवटे पांघरून प्रतिष्ठा मिरवणार्‍यांचे बुरखे शिल्लक होते. आज राहुलने तेही फ़ाडून टाकले. त्या लाडावलेल्या पोराला कुठे माहित आहे, की आपणच आपल्या निष्ठावंतांना पुरते नागडेउघडे करून टाकत आहोत? अनवधानाने का असेना, पण त्याचे श्रेय राहुलना जाते. मागल्या चारसहा महिन्यात उभा केलेला राफ़ायलचा व खोटेपणाचा बागुलबुवा राहुलने एका माफ़ीपत्राने उध्वस्त करून टाकला. निवडणूक प्रचाराच्या आवेशात आपण खोटे बोलून गेलो आणि चौकीदार चोर असल्या घोषणा वदवून घेतल्या; ही कबुली भारतीय अभिजन प्रतिष्ठीत व्यक्तींचे विमानच होते, ते उडवले आणि राहुलनेच पाडले. एक गोष्ट कधीच विसरू नये. उंचावरून उडते तोपर्यंतच ते विमान असते आणि कोसळून पडले, मग ते फ़क्त भंगार असते. आज राहुलसह त्या सर्व प्रतिष्ठीतांचे तसेच भंगार होऊन गेले आहे. मात्र त्याचे श्रेय मोदी वा सुप्रिम कोर्टात अवमान याचिका भरणार्‍या मीनाक्षी लेखींना नाही, तर फ़क्त राहुलना त्याचे श्रेय जाते. आपण त्याच धाडसी राहुलना मत देऊ शकत नाही, त्याचे म्हणून दु:ख आहे.


17 comments:

  1. लई भारी भाऊ ������

    ReplyDelete
  2. मस्त चपराक लगावली भाऊ

    ReplyDelete
  3. गोबेल्स निती आहे. १०० वेळा ठासून असत्य बोलले तरी लोकांना सत्य भासणार. या सर्व भोंदू लोकांना असत्य माहित असुन राहूलच्या आडून डंका पिटायला संधी मिळाली व ति त्यांनी वापरली. माफिनामा लोकांपर्यंत कोठे पोहचणार आहे. अजुनही मंदभक्त समर्थनच करताना दिसतात.

    ReplyDelete
  4. भाऊ,

    हे तथाकथित मान्यवर कधी ना कधी आपल्या कर्माने उघडे पडणार होतेच, मोदींनी जर त्यांच्या विरुद्ध खटले भरले असते त्यांना फुकटची प्रसिद्धी मिळत राहिली असती

    आता ह्या पुढे जेंव्हा केंव्हा एखाद्या खऱ्या घटनेच्या वेळीस सुद्धा असे लोक काही बोलतील तेंव्हा लोक विश्वास ठेवणार नाहीत

    ReplyDelete
  5. भाऊ, सावरकरांच्या अंदमानातून सुटका व्हावी म्हणून केलेल्या अर्जाला माफीनामा म्हणून हिणवणारे हे भामटे बेशरम लोक आज राहुलच्या माफीला मात्र माफीपत्र म्हणून संबोधणार नाहीत. त्याची यांना लाज वाटते. आपापल्या वृत्तपत्र, वाहिन्यांवर वरून राहुलमाफीची किरकोळ बातमी देऊन विषय संपवतील हे निर्लज्ज लोक. किंवा ती माफी कशी नाही हे सिद्ध करण्यासाठीही आपली बुद्धी पणाला लावतील. बघा सत्तेनी कशी इवलीशी बातमी देऊन पडदा टाकलाय.

    'चौकीदार चोर है'साठी राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टात व्यक्त केली दिलगिरी
    http://dhunt.in/5YKyI?s=a&ss=wsp
    Source : "लोकसत्ता" via Dailyhunt

    ReplyDelete
  6. It seems the Supreme Court has issued contempt notice to RaGa. I think that would mean that the regret letter has not been accepted by the Court.

    Is it a very early signal that the judiciary is beginning to turn against the old ecosystem? #justathought

    ReplyDelete
  7. जबरदस्त उपरोध.....मानलं !

    ReplyDelete
  8. वक्रोक्ति हा अलंकार अलिकडे दुर्मीळ होत चाललाय भाऊ !

    ReplyDelete
  9. भभाऊंची लेखणी नेहमी प्रमाणेच परखड.

    ReplyDelete
  10. Correct me if I am wrong, but I thought the case is about Rahul Gandhi's statement that "Even Supreme Court has said that Chowkidar chor hai" (which Supreme court never did). The apology or the case is regarding wrong quotation. Then how can we generalize it to the extent that Rahul apologized for the entire narration of "Chowkidar Chor hai"? Of course, if Supreme court gives clean chit to government in Rafale matter (note that the case is re-opened in view of the new documents/evidence), then Rahul Gandhi should apologize to the entire nation (which I doubt if any politician would do). But, let's not blow the current case out of proportion.

    ReplyDelete
  11. भाऊ, ही एकंदर घटना माध्यमांतून अशी सांगितली जात आहे की, राहुल गांधी यांनी "सुप्रीम कोर्टानेपण मान्य केले आहे की चौकीदार चोर आहे" असे भाष्य केले होते, आणि यावर भाजपाच्या कुणी मंडळींनी कोर्टात तक्रार केली होती, ज्याची कोर्टाने दाखल घेतली आणि राहुल गांधींना पुरावा मागितला आणि त्याबद्दल त्यांना कोर्टाचा अपमान केल्याची नोटीस बजावली. सुप्रीम कोर्टाने असे बोलल्याचा पुरावा नाही हे राहुल गांधींनी कबूल केले आणि माफी मागितली. ही माफी कोर्टाचे नाव घुसडल्याबद्दल होती, राफाएलच्या आरोपांबद्दल नाही. निवडणुकीचे दिवस असल्याने ह्या अश्या चाळ्यांना ऊत येणारच पण आपल्या लेखातून वाटते की सगळी माफी ही राहुल गांधींनी आरोप केल्याबद्दल मागितली आहे -- ते जरा विपर्यास केलेले वाटते. कृपया खुलासा करावा.

    ReplyDelete
  12. भाऊ कळत नकळत राहुल हा भाजपाचा स्टार प्रचारक झालाय हेच खरे.

    ReplyDelete
  13. तुम्ही तर सगळ्या भामट्या पुरोगामी म्हणवणाऱ्या लोकांची विजारच उतरवलीत भाऊ!

    ReplyDelete
  14. तुम्ही जेव्हा वाचता Manmohan *Under* Raul मला तर फार
    वेगळाच अर्थ वाटतो, Raul above and Moni UNDER

    ReplyDelete