Monday, November 11, 2019

अजून वेळ गेलेली नाही


शिवसैनिकच मुख्यमंत्री होऊ शकतो

सोमवारी शिवसेनेला राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी दिलेली मुदत संपलेली असली, तरी शिवसैनिकालाच मुख्यमंत्री बनवण्याची वेळ निघून गेली, असे समजण्याचे कारण नाही. कारण राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लावावी, म्हणून केंद्राला शिफ़ारस केलेली नाही. उलट त्यांनी शिवसेनेचे अत्यंत विश्वासू ‘नैसर्गिक’ व  ‘कौटुंबिक’ मित्र असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉग्रेसला सरकार स्थापनेसाठी तिसरा मोठा पक्ष म्हणून आमंत्रण दिलेले आहे. त्याची मुदत आज मंगळवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत आहे. म्हणजेच त्याही मार्गाने शिवसैनिक मुख्यमंत्री पदावर बसवण्याची संधी कायम आहे. ते कसे साध्य होऊ शकेल, याचा गंभीर विचार झाला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे शिवसैनिक म्हणजे निवडून आलेल्या सेनेच्या ५६ आमदारापैकीच एक, असे मानण्याचे कारण नाही. तो शिवसैनिक असला म्हणजे झाले. मात्र त्याला राष्ट्रवादीने आपला विधानसभेतील नेता म्हणून स्विकारले पाहिजे. त्यामुळे शिवसेनेतील निवडून आलेला कुठलाही आमदार त्यासाठी आपोआप अपात्र ठरतो. मात्र निवडून न आलेला, पण कट्टर शिवसैनिक असलेला कोणीही राष्ट्रवादीची झुल पांघरून मुख्यमंत्रीपदी सहज बसू शकतो. कागदोपत्री तो राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असला, तरी हाडामासाचा पक्का शिवसैनिक असला म्हणजे झाले. मग तो मार्ग खुला नाही काय? सोमवारी राजभवनात पोहोचलेल्या शिवसेना शिष्टमंडळाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित केलेले होते आणि ते आमदार नाहीत. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीमध्ये झटपट दाखल होऊन संध्याकाळपुर्वीच मुख्यमंत्रीपदाचा राष्ट्रवादी उमेदवार म्हणून राज्यपालांसमोर पेश करणे अशक्य अजिबात नाही. शिवाय ते शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीचे असल्याने सोनियांचा आक्षेपही संपुष्टात येऊ शकतो. कॉग्रेसला राष्ट्रवादीचे वावडे नाही. मग हा पर्याय कशाला विचारात घ्यायचा नाही? अशा मार्गाने दोन्ही कॉग्रेस मिळून सत्ता स्थापन करू शकतात आणि शिवसेनेच ५६ आमदार त्यांना बाहेरून पाठींबा देतील. बहूमताचा आकडा पुर्ण होईल ना?

उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणजे अध्यक्ष आहेत. त्यांना आपले पद सोडून वा शिवसेनेचा राजिनामा देऊन राष्ट्रवादीमध्ये सामिल होण्यात कुठलीही कायदेशीर अडचण नाही. जशी निवडून आलेल्या आमदाराला असते. त्याला एका पक्षाच्या तिकीटावर निवडून आल्यानंतर पक्ष सोडता येत नाही. पण उद्धव निवडून आलेले नाहीत. त्यांना अशा कायद्याची फ़िकीर करण्याचे कारण नाही. त्यांनी पक्षाचा राजिनामा देऊन पक्षप्रमुखपद आपला पुत्र आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवावे. मग शरद पवार यांनाही सोनियांकडून उद्धव या नावाला संमती मिळवण्यात कुठली अडचण शिल्लक उरणार नाही आणि तासाभरातच कॉग्रेसने राष्ट्रवादीला पाठींबा दिल्याचे पत्र हातात पडू शकते. दोन्ही कॉग्रेस मिळून आमदारांची संख्या ९८ इतकी आहे. त्यांचा एकत्रित नेता म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते आणि त्यांच्या संयुक्त सरकारला शिवसेनेच्या ५६ आमदारांनी बाहेरून पाठींबा द्यायचा. तेही काम सोपे आहे. तिकडे पक्षप्रमुख म्हणून आदित्य ठाकरेच असल्याने तेही आपल्या पिताजींना पाठीब्याचे पत्र तात्काळ देतील. थोडक्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही कॉग्रेसचे संयुक्त सरकार स्थापन होईल. अर्थात तशी फ़क्त कागदोपत्री नोंद होईल. व्यवहारात शिवसेनेचा पक्षप्रमुखच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल. खुद्द शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा सुपुत्र कुठल्याही पक्षाचा म्हणून मुख्यमंत्रीपदी बसला, तरी अस्सल हाडामासाचा व आत्म्याने शिवसैनिकच असणार ना? लोकांनी त्याला काहीही म्हटले म्हणून त्याच्यातला शिवसैनिक संपत नसतो. फ़ार तर ‘सामना’च्या भाषेत आपण त्याला गनिमी काव्याने शिवसैनिक मुख्यमंत्रीपदी बसवला, असेही म्हणू शकतो. मात्र त्यातून अनेकांच्या अडचणी सुटू शकतात. निकालात निघू शकतात आणि पुर्वाश्रमीचे भाजपा़चे नेने असलेल्या राज्यपालांच्या हातातून खेळाची सुत्रे काढून घेतली जाऊ शकतात.

एक्व म्हणजे थेट शिवसेनेला पाठींबा देताना सोनिया गांधी व कॉग्रेस यांच्या पुरोगामीत्वाला बाधा येण्याची अडचण चुटकीसरशी संपुष्टात आणली जाऊ शकते. त्यांच्याही पक्षांतर्गत अडचणी थोड्याथोडक्या नाहीत. त्यांना एका बाजूला शिवसेनेसारख्या हिंदूत्ववादी पक्षाला खुलेआम पाठीबा देण्याची अडचण आहे. त्यांचे पुरोगामीत्व शाबुत रहाते आणि त्यांच्या आमदारांमध्ये सत्तेत जाण्यासाठी असलेली चलबिचल संपुष्टात येऊ शकणार आहे. त्यामुळे त्या खुल्या दिलाने असा प्रस्ताव मान्य करतील. राष्ट्रवादीच्या शिवसैनिक मुख्यमंत्र्याला पाठींबा देऊन टाकतील. त्यामुळे सोनियांनी आपल्याला पुन्हा सत्ता मिळवून दिली, म्हणून तेच कॉग्रेस आमदार त्यांचा जयजयकार करायला उत्साहीत होतील. राष्ट्रवादी पक्षालाही सत्तेत चांगला मोठा वाटा मिळाल्याने, त्यांचाही पाच वर्षाचा वनवास संपुष्टात आणला जाईल. अजितदादाच गृहमंत्री होतील आणि एसीबीचा असा कान पिळतील, की त्यांच्यावर किंवा अन्य कुणावर सिंचनाचे वा मध्यवर्ति बॅन्केतील घोटाळ्याचे असलेले आरोप व खटलेही उचलून कचराकुंडीत फ़ेकून देता येतील. आरे कॉलनीत तोडलेली झाडे नव्याने वाढवण्यासाठी रस्ता खुला होईल आणि दहा रुपयात पोटभर थाळीची योजना तात्काळ हाती घेऊन, पुरग्रस्त अतिवृष्टीग्रस्त लोकांना भरपाई मागण्यापासून परावृत्त करता येईल. जोपर्यंत शेतकर्‍यांना बुडालेल्या शेती व पिकांची भरपाई दिली जात नाही, तोपर्यंत दहा रुपयाची थाळीही पुर्णपणे मोफ़त देऊनही अतिवृष्टीचा विषय निकालात काढला जाऊ शकेल. ग्रासलेल्या गरीब शेतकर्‍यांना इतक्या वेगाने दिलासा मिळू शकेल, की बुडालेली शेतीच काय फ़ुकटात थाळी मिळणार असल्याने त्यांना शेती करायचीही गरज उरणार नाही. मग राज्यात कुठले महत्वाचे प्रश्न कशाला भेडसावू शकणार आहेत? फ़क्त शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना आपल्या पक्षात घेऊन मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून राज्यपालांना पेश करण्याची खोटी आहे.

एक मात्र आहे. शिवसेनेचे जे कोणी आमदार निवडून आलेले आहेत आणि विधान परिषदेत आमदार आहेत, त्यांना आपल्या ‘माजी’ पक्षप्रमुख शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी बसवण्यासाठी एक किरकोळ त्याग करावा लागेल. त्यापैकी कोणाला कुठलेही मंत्रीपद मिळू शकणार नाही. कारण त्यांचा शिवसैनिक वेगळ्या पक्षाच्या नावाने मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असला, तरी त्यासाठी बाहेरून पाठींबा दिलेला असल्याने त्यापैकी कोणाही निर्वाचित शिवसेना आमदाराना मंत्रीपदाला वंचित रहावे लागणार आहे. पण शिवसैनिक मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेला बघण्याच्या आनंदाच्या तुलनेत हा त्याग क्षुल्लक नाही काय? त्याहीपेक्षा मोठा लाभ व फ़ायदा म्हणजे विरोधात बसलेल्या ‘मावळते मुख्यमंत्री’ देवेंद्र फ़डणवीस यांचा केविलवाणा चेहरा विधानसभेत जितके दिवस अधिवेशन असेल तितके दिवस नित्यनेमाने पहायला मिळणार आहे. हा बोनसच ना? शिवाय मुजोर भाजपाला धडा शिकवल्याचा आनंद आपोआप मिळून जाणार आहे. एकीकडे भाजपाला शह आणि दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षालाही मिळालेले मुख्यमंत्रीपद गनिमी कावा करून शिवसैनिकाकडे आणल्याचा इतिहास वेगळाच लिहीला जाईल. किती म्हणून फ़ायदेच फ़ायदे आहेत. सलग पा़च वर्षे फ़डणवीसांना ‘मी पुन्हा येईन’ असे विधानसभेत बोलत बसवण्याची वेळ आणली जाईल. यात शिवसेनेला बाहेरून पाठींबा द्यावा लागणार असला तरी आतून त्यांचाच मुख्यमंत्री सत्तेत बसलेला असणार ना? म्हणून म्हणतो वेळ गेलेली नाही. मात्र वेळ कमी राहिला आहे. शिवसेनेने हा गनिमी कावा करून फ़टाफ़ट पावले उचलावीत आणि राष्ट्रवादी व कॉग्रेसचे संयुक्त सरकार स्थापनेसाठी पवारांकडे लकडा लावावा. उद्धवजींनी तात्काळ पुत्राकडे पक्षाची धुरा सोपवून आपण राष्ट्रवादीत दाखल व्हावे आणि पवारांनी सोनियांना राष्ट्रवादीला बिनशर्त पाठींबा द्यायला तयार करून घ्यावे. मंगळवारी सुर्यास्त होईपर्यंत वेळ गेलेली नाही, शिवसैनिक हो!

35 comments:

  1. चार हाणा पण मुख्यमंत्री म्हणा

    ReplyDelete
  2. आता हसू येवू लागलंय .

    ReplyDelete
  3. छगन भुजबळ हाडाचे शिवसैनिक

    ReplyDelete
  4. भाऊ। उघडे करून मारणे हे या पेक्षा वेगळे असते काय??

    ReplyDelete
  5. एक हीच मारा पर सॉलिड मारा भाऊ !!

    ReplyDelete
  6. 'मार्मिक'विश्लेषण

    ReplyDelete
  7. त्या ऐन वेळी पळून गेलेल्या राउतबद्दल काही म्हणा की... भाऊ

    ReplyDelete
  8. भाऊ फार फार सूंदर .... उपहासात्मक लेख.

    शिवसेनेची हिरव्यासेनेकडे वाटचाल सूरु.

    ReplyDelete
  9. Are deva Kay murpana suru ahe Maharashtra t

    ReplyDelete
  10. भाऊ जबरदस्त निवाडा उद्धव ला फोन करून सांगा लवकर.

    ReplyDelete
  11. सिंहाला तरूणीचा मोह व्हावा......तरूणीच्या बापाने याला तयार व्हावे....त्याने यासाठी सिंहाला अट घालावी....मुलगी घाबरते म्हणून "नखे कापून टाका,आयाळ भादरून काढा,सुळे उपटून टाका" ....सिंहानेही त्या अटी पाळून स्वतःचा घात करून घ्यावा......! !

    जातक कथाही फिकी वाटतेय यांच्या मर्कटलीला पाहून....! !

    ReplyDelete
  12. हे म्हणजे " शालजोडीतून हाणणे " नाही. हा तर पार टायर मधे नागड़े करून घालून हाणणे आहे.

    ReplyDelete
  13. म्हणजे...गाढव ही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेले...😂😂

    ReplyDelete
  14. उत्तम विनोदी लिहले आहे :D

    ReplyDelete
  15. भाऊ आज एकदम मुडमध्ये दिसताय. सेनेची अशीही इभ्रत काढाल वाटले नव्हते.
    फडणवीस व भाजप येणा-या काळात मनसेला बळ पुरवून मुंबई-ठाण्यात मैदानात उतरवतील. तिकडे कोकणात राणेंच्या मागे ताकद उभी करून सेनेला कोकणात टक्कर दिली जाईल. या दोन ठिकाणी सेना कमजोर झाली की मग उरतो फक्त मराठवाडा. तिकडेही भविष्यात धनंजय मुंडे आव्हान उभं करेलच.

    थोडक्यात सेनेनी भाजपशी वाजवून आत्मघात केलाय.

    ReplyDelete
  16. भाऊ, हा लेख आपण उपरोधाने लिहिला आहे की गंभीरपणे लिहिला आहे हे समजून येत नाही...जर उपरोधाने लिहिला असेल तर काही हरकत नाही..परंतु गंभीरपणे लिहिला असेल तर खेदाने असे नमूद करावे वाटते की आपल्यातल्या तटस्थ राजकीय विश्लेषकावर शिवसेना प्रेमाने मात केली आहे....आज प्रथमच आपला लेख वाचून खूप वाईट वाटले....आमचा आवडता तटस्थ राजकीय विश्लेषक हरविल्याचे...

    ReplyDelete
  17. खूप छान मार्ग सांगितला आहे, भाऊ तुम्ही....आता एव्हड्या उड्या मारल्याचं आहेत शिवसेना पक्ष प्रमुखाने तर एव्हडी एक उडी मारून टाका एकदा म्हणावं... त्या शिवाय त्या देवतुल्य शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला शांती (आत्मदाह,आत्मक्लेश) भेटणार नाही, असं न राहून वाटतंय.... धन्य तो उद्धव न धन्य त्याची राजकीय बुद्धी..... शिवसेनेला (अखेरचा) जय महाराष्ट्र

    ReplyDelete
  18. भाऊ, तुम्ही शिव सैनिकला वाट दाखवत आहात की वाट लावत आहात,अजूनही आम्ही निर्णय नाही करू शकलो,

    ReplyDelete
  19. भाऊकाका,अगदी बिनपाण्याने धुलाई केलीत

    ReplyDelete
  20. वाहवा! एवढा धुर्तपणा तर जाणत्या राजाकडे सुद्धा नसेल.

    ReplyDelete
  21. भाऊ अडीच वर्षांपूर्वी गोव्यात निवडणुका झाल्यावर काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष झाला भाजप दुसऱ्या क्रमांकावर गेला बहुमत कोणालाही मिळाले नाही त्यावेळी भाजपने अत्यंत चपळाईने अपक्ष आणि किरकोळ पक्षांच्या मदतीने बहुमत गोळा केले आणि पर्रीकर यांचे सरकार स्थापन झाले, आता महाराष्ट्रात बघा सेनेला मुख्यमंत्री पद हवे होते आणि भाजपने ते नाकारले म्हटल्यावर सेनेने 15 दिवसात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांशी संपर्क करून त्यांना प्रस्ताव देणे आवश्यक होते तसे केले असते तर त्यांना अंदाज आला असता त्यावेळेस सेनेचे प्रवक्ते माध्यमातून जनतेचे मनोरंजन करत बसले आणि जेंव्हा भाजपने नकार दिल्यावर जेव्हा सेनेला राज्यपालांनी विचारणा केली तेव्हा सेनेचे नेते धावपळ करत सुटले याचाच अर्थ भाजपशी तोडायचे असेल तर पर्यायी कोणतीही रचना शिवसेनेने लावली नव्हती आणि कोणत्याही गंभीर्याशिवाय सेना 170 चा आकडा जनतेला सांगत होती,आता एवढया मोठ्या राज्याची सत्ता ज्यांना हवी आहे त्यांची समज काय लायकीची आहे याचा प्रत्यय जनतेला आला आहे, भविष्यात याची खुप मोठी किंमत सेनेला मोजायला लागणार हे नक्की

    ReplyDelete
  22. वा भाऊ! तुमच्या उपहासाला तर तोड नाही. 🤣🤣🤣

    ReplyDelete
  23. Outstanding satire sir! तुम्हाला salute!

    ReplyDelete
  24. Very sarcastic 😀😀😀

    It's like SHIVSENECHI sunta 😀😀😀

    ReplyDelete
  25. Bhau namaskar, tumchi bhasha shaili la tod nahi shivsenela agadi nagde karun gadhavavar varat kadhali udhav thakare ni islam dharma swikarla ka? Asa sanshay yeto Satte sathi itki lachari shiv sainikachi? Dropadila davavar lavle yevdech mahanane purese aahe

    ReplyDelete
  26. पुंड नारायणराव राणे शिवसैनिकच आहेत.... पहिली अडीच वर्षे चालतील का?

    ReplyDelete
  27. भाऊ शाल जोडीतले मारले पण अक्कल व स्वाभिमान गाहाण टाकलेल्या सेना प्रमुखांना त्याचे काही वैषम्य नाही.सत्तातुराणाम् ना भयं न लज्जा अशी अवस्था आहे गुढघ्याला बाशींग बाधुन तयार बसले आहेत.काल 'ताज एन्डस 'हाॕटेल मध्ये सोनिया मॕडमला पाठिंबा मागायला फोन करण्यासाठी पिता पुत्र गेले व मॕडमच्या उत्तराची वाट बघत बसले ते दृष्य अत्यंत केविलवाणे होते.ज्यापरदेशी बाईला बाळासाहेबांनी विरोध कायम केला तैचेच पाय चाटायला बाप बेटे गेले हे बघुन स्वर्गात मा.बाळासाहेबांना काय वाटले असेल? अरविंद सावंत यांची किव येते हातच सोडून पळत्या पाठी गेले बिचारे.जाणत्या राजाने शिवसेनृचा आक्षरशः पोपट केला.सेनेसाठी भाजपचे दोर कापले व आता काँग्रेस व राष्ट्रवादी कडे सुत्र राहतिल याची काळजी घेतली.जनता सेनेला माफ करणार नाही.बिचार्या प्रामाणिक सैनिकांची विचित्र अवस्था करुन ठेवली.

    ReplyDelete
  28. By this idea...xxxxx will hang himself.....hhahahahha..what a solution Bhau....

    One more possibility will be there....
    Key person of Thane sena will go out of Party with 20-25 MLA and support BJP.

    ReplyDelete
  29. शिवसेने ने अविचाराने, घिसाडघाई करत NDA सोडण्याचा जो निर्णय घेतला त्याची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे शरद पवारसाहेब चे राजकीय चरित्र सेना नेत्यांना त्यांच्या स्वार्था मुळे समजलेच नाही.उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या अस्तित्वावर घाला घेतला आहे. पवारांनी जाणीव पूर्वक सेनेला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सेनेला भविष्य उरलेले दिसत नाही. जशी करणी तशी भरणी याचा प्रत्यय सेनेला आला आहे.

    ReplyDelete