Thursday, November 7, 2019

शेकापची पुरोगामी शोकांतिका

शेकाप मोर्चा के लिए इमेज परिणाम

नुकत्याच संपलेल्या विधानसभा निवडणूकीत एकत्रित युती करून लढलेल्या व बहूमतही संपादन केलेल्या शिवसेना भाजपा यांच्यात सरकार स्थापनेवरून जुंपलेली असताना; एक पुरोगामी राजकारणाची दुर्दैवी शोकांतिकाही उलगडत होती. पण उथळ चुगल्या करण्यात रमलेल्या त्याच पुरोगामी पत्रकारितेच्या बुद्धीजगताचे तिकडे लक्षही जाऊ नये; ही राजकीय विश्लेषणाचीही शोकांतिका आहे. या गडबडीत कुठला अपक्ष वा लहान पक्षाचा सेना वा भाजपाला पाठींबा आहे, त्याची यादी बनवण्यात पत्रकार गर्क आहेत. असाच एक आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्या घरी भेटायला गेल्याची बातमी ओझरती कुठल्या वाहिनीवर बघितली. हवावे की रडावे, तेही समजेना. कारण तो शेतकरी कामगार पक्षाचा एकुलता एक निवडून आलेला आमदार आहे आणि पक्षांतर करून शेकापमध्ये दाखल होत त्याने विधानसभेपर्यंत मजल मारलेली आहे. कधीकाळी विधानसभेमध्ये विरोधी नेतेपदाचा हक्कदार असलेला हा शेकाप आज कुठल्या अवस्थेला पोहोचला आहे? १९५२ ते १९८० पर्यंत राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून ओळख असलेला शेकाप, ताजी विधानसभा निवडणूक कॉग्रेस आघाडीने दिलेल्या सहा सात जागा त्यांच्याच पाठींब्यावर लढला. त्या कॉग्रेसच्या विरोधात त्याने विरोधी राजकारणाचा महाराष्ट्रात पाया घातला होता. आज त्यांचा एकमेव आमदार त्याच कॉग्रेसच्या पाठबळावर निवडून आलेला आहे आणि निकालानंतर भाजपाला पाठींबा द्यायला मुख्यमंत्र्यांच्या दारी पोहोचला आहे. त्याला पुरोगामी पत्रकारिता वा बुद्धीवाद करणार्‍या शहाण्यांच्या लेखी कवडीचेही मोल नाही? यापैकी कोणाला तरी अवघ्या सतरा वर्षापुर्वीचे महाराष्ट्रातील असेच रंगलेले सत्तानाट्यही आठवू नये? राजकीय अभ्यास वा विश्लेषणाची ती शोकांतिकाच नाही काय? कारण उरलासुरला शेकाप आता रायगड जिल्ह्यातूनही अस्तंगत होऊन गेला आहे. एकुलता आमदार आलाय, तोही नांदेड जिल्ह्यातून. काय घडले होते सतरा वर्षापुर्वी?

१९९९ सालात आजच्या सारखीच विधानसभेची निवडणूक संपलेली होती आणि सत्तेत असलेल्या सेना भाजपाला बहूमताला वंचित रहावे लागलेले होते. अर्थात निवडणूकीला सामोरे जातानाही त्या दोघांपाशी पुर्ण बहूमत नव्हते. पण शरद पवारांनी सोनियांना परदेशी घोषित करून कॉग्रेसला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादीची वेगळी चुल मांडली. तर कॉग्रेसी मतांच्या विभागणीचा लाभ घेऊन युतीला थेट बहूमत मिळवण्यासाठी धुर्तपणाची चाल प्रमोद महाजन यांना सुचलेली होती. त्यांनी शिवसेनाप्रमुखांना पटवून विधानसभाही लोकसभेसोबत घेण्याचा डाव खेळलेला होता. मात्र त्यांची ती अपेक्षा फ़सली आणि युतीला पुर्ण बहूमत सोडा, असलेली संख्याही राखता आलेली नव्हती. त्यातून विधानसभा त्रिशंकू झाली आणि सत्ता कोणी कशी स्थापन करावी; म्हणून दिर्घकाळ नाट्य रंगलेले होते. सेनेचे मुख्यमंत्री नारायण राणे राज्यपालांना भेटून सत्तेचा दावा करायला सज्ज बसलेले होते. पण महाजन मुडे राष्ट्रवादीलाही सोबत घेऊन भक्कम बहूमताचे सरकार स्थापण्याचा हट्ट धरून बसलेले होते. पण शिवसेना राष्ट्रवादीला सोबत घेण्यास राजी नव्हती, म्हणून तिढा निर्माण झालेला होता. दरम्यान राज्यातल्या बुद्धीजिवी पुरोगामी पत्रकारांनी व पक्षांनी स्वत:च पुढाकार घेऊन सर्व सेक्युलर पक्षांची मोट बांधण्याची धावाधाव केली व पवारांनाही त्यात ओढून घेतले. शेकापही त्यात सहभागी झाला आणि फ़क्त सात आमदार असतानाही त्याला तीन मंत्रीपदे मिळालेली होती. थोडक्यात राष्ट्रवादी व शेकाप हे मित्रपक्ष झालेले होते आणि भाजपा शिवसेनेला सत्तेपासून रोखण्याच्या निकषावर त्यांची मैत्री झाली होती. पण शेकापला लौकरच राष्ट्रवादीशी मैत्री म्हणजे काय, त्याचा अनुभव आला. त्या अनुभवाचीच घटना सतरा वर्षापुर्वीची आहे. कारण तिथूनच राज्य व रायगडमधून शेकापच्या र्‍हासाची ती सुरूवात होती. त्यातून मोठा राजकीय पेचप्रसंग उभा राहिला होता. पण कोणाला आठवतोय?

२००२ च्या मार्च महिन्यात रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक होती आनि त्यातल्या सर्वात मोठ्या शेकापचा उमेदवारही उभा होता. त्याला पाडण्यासाठी विरोधात युतीतर्फ़े सेना भाजपाचाही उमेदवार उभा केलेला होता. हा सेना उमेदवार राष्ट्रवादीच्या मदतीने अध्यक्षपदी निवडून आला आणि शेकापला राष्ट्रवादीचे मंत्रीमित्र सुनील तटकरे यांनी पुरते तोंडघशी पाडलेले होते. सहाजिकच आपल्या एकमेव बालेकिल्ल्यात पराभूत झालेल्या शेकापने संतप्त होऊन सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे धाबे दणाणले. तर विरोधातले नारायण राणे व गोपिनाथ मुंडे यांनी काही अपक्षांना हाताशी धरून वेगळी समिकरणे तयार केलेली होती. २८८ सदस्यांच्या सभागृहात तेव्हा देशमुख सरकार अवघ्या १४८ मतांचे स्वामी होते. त्यातून शेकापचे सात आमदार बाजूला झाले तर सरकार गडगडणार हे निश्चीत होते. त्यामुळे सर्व सत्ताधारी आमदारांना मध्यप्रदेशात व तिथून पुढे कर्नाटकात दडवून ठेवण्यात आले. काही अपक्ष सेनेने जोगेश्वरीला एका रिसॉर्टमध्ये झाकून ठेवलेले होते. तर त्यात आपले पाठीराखे असून त्यांचे अपहरण झाल्याचा दावा कॉग्रेस राष्ट्रवादीने सभापतींकडे केला. कालपरवाच्या कर्नाटकाप्रमाणेच तेव्हा सभापती अरूण गुजराथी यांनी त्या आमदारांना आपल्या समोर हजर होऊन भूमिका मांडायला सांगितले. अखेरीस त्या आमदारांना अपात्र ठरवून विरोधाची बाजू काही लंगडी करून टाकण्यात आली. पण संख्याबळ तपासण्याचा विषय टाळला जाऊ शकत नव्हता. कारण राणे मुंडे यांनी अविश्वास प्रस्ताव आणलेला होता आणि त्या प्रस्तावाचे भवितव्य मग आपोआप शेकापच्या संतप्त आमदारांच्या हाती गेलेले होते. कारण त्यांनी विरोधात मत दिले तर विलासराव सरकार अल्पमतात जाणार होते आणि त्यांनी पाठींबा कायम ठेवल्यास सरकार अबाधितच रहाणार होते. किंवा आणखी एक तिसरा पर्याय होता. शेकाप मतदानात तटस्थ राहिला, तरी सरकार बचावणार होते. शेकापने काय केले?

सुनील तटकरे हे रायगडमधील राष्ट्रवादीचे अंतुले यांच्यानंतरच दांडगे नेता आहेत. आपले बस्तान बसवायचे तर प्रसंगी शिवसेनेलाही हात द्यावा. पण शेकाप उलथून टाकला पाहिजे, असा त्यांचा डाव होता आणि त्या जिल्ह्यात दुय्यम असलेली शिवसेना वैचारिक विरोधक असली तरी शेकापसाठी प्रतिस्पर्धीच नव्हता. त्यामुळे शेकापने व्यवहारी पातळीवर सेनेशी जुळवून घेत खरे आव्हान असलेल्या राष्ट्रवादीशी कायम फ़ारकत घेण्याला पर्याय नव्हता. पण वैचारिक बांधिलकीच्या बेड्यांमध्ये जखडलेल्या शेकापला ते जमले नाही आणि व्यवहारी राजकारणात कधीही कुठेही विचारांना तिलांजली देणार्‍या तटकरे यांनी शेकापच्या बालेकिल्ल्यातच सेनेला हाताशी धरून मित्र पक्षाला तोंडघशी पाडलेले होते. मग सगळा वाद तटकरे यांच्या अंगावर आला आणि त्यांनी आपली ‘चुक’ मान्य करून मंत्रिमंडळाचा राजिनामा दिला. सहाजिकच त्यांचा राजिनामा घेतल्याचे लॉलीपॉप देऊन शेकापची समजूत काढण्यात आली आणि त्यांनी त्या वैधानिक पेचप्रसंगातून कॉग्रेस राष्ट्रवादीला बाहेर काढले. त्या अविश्वास प्रस्तावाच्या वेळी शेकापने सरकारला भरपूर झोडपून घेतले आणि मतदानाची वेळ आल्यावर शेकापने सभात्याग केला. पर्यायाने विलासरावांचे ते कॉग्रेस आघाडी सरकार बचावले आणि आता सतरा वर्षांनी रायगड जिल्ह्यात तेच तटकरे शेकापच्या मदतीने लोकसभेत निवडून आलेले आहेत. दरम्यान त्या जिल्ह्यातूनही शेकाप नामशेष होऊन गेला आहे आणि त्यांचा एकही आमदार तिथून निवडून येऊ शकलेला नाही. जो कोणी एक आमदार नांदेडमधून निवडून आलाय, तोही भाजपाला पाठींबा द्यायला फ़डणवीसांच्या दारी जाऊन उभा राहिला आहे. ह्याला पुरोगामीत्वाचा विजय म्हणावा की शेकापची वैचारिक शोकांतिका म्हणावी? पण इतका पुरोगामीत्वासाठी त्याग करून वा सर्वस्व गमावून बसलेल्या शेकापच्या समाधीवर नाही दिवा नाही पणती.

आपल्या मराठी भाषेत म्हण आहे. कसायाला गाय धार्जिणी. शेकापचे वर्तन त्यापेक्षा तसूभरही वेगळे नाही. शेकापच कशाला? जनता दल, विविध डावे पक्ष किंवा कम्युनिस्ट पक्ष, रिपब्लिकनांचे विविध गट; यांना पुरोगामीत्वाच्या मंदिरात आणुन शपथ घातली, की ते आत्मसमर्पण करून कॉग्रेस पक्षाला नव्याने जीवदान देण्यासाठी आपल्या जीवनाची आहुती देता्त. हा अलिकडल्या तीन दशकातला अनुभव आहे. आपले पुर्वज कॉग्रेसला राजकीय पर्याय उभा करण्यासाठी झटले व त्यांनी त्यासाठीच हे विविध पक्ष स्थापन केल्याचेही स्मरण अशा कुठल्याही पुरोगामी पक्षांच्या आजच्या नेत्यांना वा वारसांना उरलेले नाही. जेव्हा हे पक्ष कॉग्रेसला पर्याय उभा करण्यासाठी झटत होते, तेव्हा कॉग्रेसला पुरोगामीत्वाशी कर्तव्य नव्हते वा याच पक्षांना कॉग्रेस हा देशातला प्रतिगामी पक्ष वाटत होता. किंबहूना त्याच कॉग्रेसला संपवून नवे राजकारण देशात प्रस्थापित करण्यासाठी असे पक्ष उदयास आलेले होते. वैचारिक राजकारण प्रस्थापित करून कॉग्रेसच्या बुवाबाजी राजकारणाला संपवण्याचा निर्धार त्यांनी केलेला होता. पण गेल्या दोनतीन दशकात त्यांना त्यांच्याच पुरोगामी अंधश्रध्देत गुरफ़टून टाकत कॉग्रेसने आपले बुडते जहाज वाचवलेले आहे. भाजपाचा किंवा हिंदूत्वाचा बागुलबुवा माजवून त्या पक्षांनाच संपवून टाकलेले आहे. जनता दल, समाजवादी, कम्युनिस्ट यांच्याच रांगेत आता शेकाप जाऊन बसला आहे.  त्यांचेही असे कुठल्या तालुका जिल्ह्यात किरकोळ कोणी निवडून येतात. पण राज्याच्या राजकारणात व घडामोडीत माध्यमांखेरीज कोणी त्यांची दखलही घेत नाही. आताही शेकापचा एकुलता एक आमदार भाजपाला पाठींबा द्यायला गेला, तरी पुरोगामी विचारवंत पत्रकार अशा कोणालाही भुवई उंचावून प्रश्न विचारण्याचीही गरज वाटलेली नाही. याला शोकांतिका नाहीतर काय म्हणायचे? १९८० च्या दशकात विधानसभेत दत्ता पाटिल नावाचे रायगडातील शेकाप नेते विरोधी नेता म्हणून बसायचे, यावर आजच्या कुणा पत्रकाराचा विश्वास तरी बसेल काय?

6 comments:

  1. शेकाप या पक्षावर अलीकडच्या काळामध्ये इतकी वाईट परिस्थिती आली होती कि संभाजी ब्रिगेड सारख्या पाकिस्तानातून पैसा घेऊन भारत विरोधी कारवाया करणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांना निवडणुका लढवाव्या लागत होत्या .केवळ आम्ही पुरोगामी आहोत असा भ्रम स्वतःच्या मनाशी बाळगल्या वर याच्यापेक्षा मोठ्या चुका होणे क्रमप्राप्त आहेत .
    असली तत्त्वशून्य पक्ष नष्ट झालेले कधीही उत्तम

    ReplyDelete
  2. कांग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सहकारी संस्था जशा की बँका दुध उत्पादक संस्था पतपेढ्या यांचे जाळे विणुन...शेकापचे मुळ मतदार पळवला....
    शेकाप नेत्यांनी फक्त विरोधी पक्ष म्हणून लढा दिला...सहकारी संस्था कमीच निर्माण केल्या...
    मग हे बँकेचे पतपेढ्या सहकारी संस्थाचे संस्थापक काँग्रेसचे वतनदार झाले...
    महाराष्ट्र मधील विरोधी पक्षांनी मुळात अश्या संस्था निर्माण केल्याच नाहीत...त्यामुळे त्यांंचे हक्काचे मतदार संघ बनलेच नाहीत...म्हणून असे सारे पक्ष लुप्त झाले...आणि काँग्रेस टिकून राहिली

    ReplyDelete
  3. नांदेड जिल्ह्यातील कंधार मतदारसंघात निवडून आलेले आ. श्यामसुंदर शिंदे हे काँग्रेस च्या पाठिंब्यावर निवडुन आलेले नाहीत.इथे आघाडीकडून राष्ट्रवादी चे धोंडगे हे उभे होते . ते चौथ्या नंबर वर गेले .

    ReplyDelete
  4. Nivdoon aalele SheKaP aamdar hyanni BhaJaPa kadun Vidhan Parishadechi nivadnook ladhavleli aahe. Te SheKaP peksha tyanchya swatahachya jan-samparkavar nivadoon aalele aahet

    ReplyDelete
  5. Kharay bhau.ha itihas tumchyamule kalala.

    ReplyDelete
  6. कलियुग दुसर काय,,😶

    ReplyDelete