Wednesday, November 20, 2019

जुने नाटक नव्या संचात?

Image result for pawar met modi in parliament

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक संपून आता महिन्याचा कालावधी पुर्ण होत आला आहे. येत्या रविवारी म्हणजे २४ नोव्हेंबरला मतमोजणीला महिना पुर्ण होईल. पण अजून सरकार स्थापना होऊ शकलेली नाही आणि राज्यात राष्ट्रपती राजवटही लागू झालेली आहे. हा धोका सर्वात आधी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला होता. ८ नोव्हेंबरला मावळत्या विधानसभेची मुदत संपते आहे आणि त्या दरम्यान सरकार स्थापन झाले नाही, तर राष्ट्रपती राजवट लागू शकते; असे त्यांनी म्हटले होते. पण एकूणच राजकीय पत्रकारिता व विश्लेषण इतके उथळ झाले आहे, की त्यातला इशारा समजून घेण्यापेक्षा त्याची हेटाळणी करण्यात धन्यता मानली गेली. राष्ट्रपती राजवटीची धमकी देता काय? असे सेनेचा प्रवक्ता म्हणाला आणि मग त्यावरून चर्चा रंगवल्या गेल्या. त्या रंगवणार्‍यांचे डोळे खरीखुरी राष्ट्रपती राजवट लागल्यानंतरच उघडले. त्यातून आता तीच राजवट कशी संपुष्टात आणायची, याचा उहापोह चालू आहे. अर्थात गेल्या विधानसभेतही निकाल त्रिशंकूच लागले होते. किंबहूना निकाल पुर्णपणे लागलेलेही नव्हते, अशावेळी परस्पर शरद पवार यांनी भाजपाला बाहेरून पाठींबाही जाहिर करून टाकला होता. त्यासाठी काय कारण दिले होते? तर त्रिशंकू विधानसभा होऊन सरकार स्थापन झाले नाही, तर मध्यावधी निवडणूका लादल्या जातील. महाराष्ट्राला मध्यावधी निवडणूकांचा खर्च परवडणारा नाही. म्हणून आपण भाजपाला पाठींबा देतोय, असाही युक्तीवाद केला होता. किती तत्परता होती? निकाल पुर्ण लागले नव्हते व भाजपाने पाठींबाही मागितला नव्हता. आज काय स्थिती आहे? निकाल लागून महिना उलटला आहे आणि राष्ट्रपती राजवटीनंतर मध्यावधीची तलवार मराठी राजकारणाच्या डोक्यावर टांगलेली आहे. अशा स्थितीत त्याच पाच वर्षे जुन्या नाटकाचा नव्या संचातला प्रयोग पवार करणारच नाहीत अशी कोणी हमी देऊ शकतो काय?

खरे तर स्थिती गेल्या वेळेपेक्षाही गंभीर आहे. गेल्या खेपेस महाराष्ट्रात ओला वा सुका दुष्काळ भेडसावत नव्हता आणि अस्थीरता निर्माणही झाली नव्हती. तर मध्यावधीच्या चिंतेने पवार भयभीत झालेले होते. आज अवघा महाराष्ट्र मेटाकुटीला आलेला आहे. निकाल लागून महिन्याचा कालावधी उलटल्याने मध्यावधीची भिती नवनिर्वाचित आमदारांना सतावते आहे. म्हणजे जेव्हा तशी परिस्थिती नव्हती, तेव्हा त्याच्या भयाने पवार भाजपाला ‘न मागितलेला’ पाठींबा देऊनही सरकार स्थापनेचा मार्ग प्रशस्त करतात. आज खराखुरा दुर्घर प्रसंग आला असताना मात्र तटस्थ राहून तेच पवार सत्तास्थापनेला वेग येणार नाही, याची पुरेपुर काळजी घेत आहेत. मध्यावधीचे भूत समोर येऊन उभे ठाकले असतानाही पवारांना त्याची भिती अजिबात वाटलेली नाही. उलट जितका विलंब सत्तास्थापनेला लागेल, त्याला हातभार लावण्याचे डावपेच साहेब खेळत आहेत. उलटसुलट विधाने करून अधिकाधिक अस्थीरता निर्माण करीत आहेत. पहिली बाब म्हणजे या खेळात उतावळेपणाने उतरलेल्या शिवसेनेच्या प्रवक्त्त्याला प्रोत्साहन देऊन किंवा विश्वासात घेऊन; पवारांनी शिवसेनेला जाळ्यात असे ओढलेले आहे, की तिनेच आपले मागे फ़िरण्याचे रस्ते बंद करून घ्यावे. आता भाजपाशी सेनेने इतके वैर घेतलेले आहे, की तिला त्या मोठ्या पक्षाशी बोलणी करणेही अवघड होऊन बसले आहे. नंतर कॉग्रेस आणि राष्ट्रवादी, सेनेचा खुळखुळा करून खेळत बसलेले आहेत. त्यात शिवसेनेचे वीरही ‘आमच्याखेरीज कोणी सरकार बनवू शकणार नाही’, म्हणून छातीठोक बोलत आहेत. वरकरणी ते खरेच वाटत असले, तरी सापळ्यात शिवसेनेचा वाघ अडकलेला आहे. किंबहूना भाजपाच नव्हेतर दोन्ही कॉग्रेसनीही सेनेच्या आमदारांना भयभीत करण्याची काही योजना आखून राजकारण केले असावे काय; अशी शंका आता येऊ लागलेली आहे. कारण सत्तेचे कुठलेही समिकरण जुळवल्याशिवायच सेना एनडीएतून बाहेर पडली आहे व त्यांचा केंद्रातला मंत्रीही बाजूला झाला आहे.

सेनेने आपल्याला बदलले पाहिजे, ही दोन्ही कॉग्रेसची मागणी त्यांच्या भूमिकांना धरून असली तरी, त्यांनीही दोन पावले पुढे येताना काही गोष्टींचा त्याग केलेला दिसला पाहिजे ना? गेल्या दोनतीन आठवड्याचा घटनाक्रम बघितला, तर सेना एकामागून एक कॉग्रेस राष्ट्रवादीच्या अटींची पुर्तता करताना दिसली आहे. पण त्या दोन्ही पक्षांनी साधा किमान समान कार्यक्रम वा समन्वय समिती होण्यापर्यंतही कुठल्या हालचाली केलेल्या नाहीत. एनडीए आघाडीने सेनेला बाजूला केले आहे. पण सेनेला युपीए या कॉग्रेस आघाडीत घेण्याविषयी कुठलेही पाऊल उचलले गेलेले नाही. सत्तेची फ़क्त आशा दाखवून सेनेलाच सर्व कसरती कराव्या लागत आहेत आणि मधेच उठून पवार म्हणतात, आम्हाला विरोधी पक्षात बसायचा कौल मिळालेला आहे. सरकार कसे बनणार ते सेना भाजपाला विचारा, जनतेने त्यांना कौल दिलेला आहे. एका बाजूला पवार शेतकर्‍यांचे अश्रू पुसायला जातात. पण तेच पवार दुसर्‍या बाजूला उध्वस्त शेतकर्‍याला मध्यावधी निवडणूक परवडणार नाही, त्याबाबतीत कुठलीही हालचाल करत नाहीत. दुसरीकडे तेच पवार अखेरच्या क्षणी सोनियांना सेनेला पाठींब्याचे पत्र लगेच देऊ नये, असेही खेळ करतात. सेनेला मस्तपैकी राजभवनात नेवून तोंडघशी पाडतात. तीच तर २०१४ सालातलीही पटकथा होती ना? वेगवेगळे लढल्यानंतर एकत्रित बहूमत होत असेल तर सेना भाजपा यांच्यात सहजासहजी पुन्हा मैत्री होऊ नये, म्हणूनच आपण बाहेरून पाठींब्याची हुलकावणी दिली, असे आता पवारही मान्य करतात. मग हा नवा खेळ त्याच नाटकाचा पुढला अंक आहे, की जुन्याच नाटकाचा नव्या कलावंत संचातला प्रयोग आहे? आपले स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी पवारांनी आजवर राज्यघटना, लोकशाही, शेतकरी, अस्मिता वा कशाचाही बेधडक वापर केलेला आहे. त्यामुळे आजच्या परिस्थितीत त्यांनी चालविलेला खेळ कुठला स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी असेल; हे त्यांना जवळून ओळखणार्‍या सेनेच्या प्रवक्त्यांना तरी कसा उमजलेला असू शकतो?

बुधवारी उडत एक बातमी आली. राष्ट्रवादीला केंद्रात दोन मंत्रीपदे व राज्यात उपमुख्यमंत्रीपद अशा तडजोडीने सरकार स्थापनेचा तिढा सुटू शकतो. भाजपाने हे देऊ केलेले आहे की राष्ट्रवादीने ते मागितलेले आहे, त्याचा खुलासा त्या बातमीत नाही. ‘सुत्रे’ तर काही सांगत नाहीत. त्यामुळे ही बातमी खरी आहे, की मुद्दाम सोडलेली पुडी आहे, ठाऊक नाही. पण त्यात तथ्य नाही असे कोणी म्हणू शकत नाही. राष्ट्रवादीला सत्तेचा हिस्सा मिळतो आणि त्यांचाच सहभाग असलेल्या सरकारला प्रफ़ुल पटेल व पवारांच्या इडी केसेस सैल कराव्या लागतात. अधिक राज्यातला सत्तेचा तिढा सोडवला जाऊ शकतो. हे सर्व करताना विचारधारेचा तिढा कसा सुटणार? तर राज्यात ओला दुष्काळ आहे आणि शेतकरी मदतीसाठी अगतिक झालेला आहे. त्याच्या हिताला प्राधान्य देण्यासाठी पवारसाहेब काहीही करू शकतात ना? खेरीज अशा उध्वस्त महाराष्ट्राला मध्यावधी निवडणूका परवडणार नाहीत, या पाच वर्षे जुन्या नाटकातला डायलॉग आजही ताजा ठरू शकतो. अर्थात कॉग्रेस आणि शिवसेनेच्या दोन बेड्यांपेक्षा भाजपाची एक बेडी परवडणारी असते आणि भाजपालाही ती सोयीची असू शकते्. काश्मिरात परिस्थितीची गरज म्हणून महबुबा मुफ़्तीच्या पीडीपी सोबत सरकार स्थापना होऊ शकत असेल, तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षाला अस्पृष्य मानायचे काही कारण नाही. ह्या सगळ्या गडबडीत शिवसेना खच्ची व नामोहरम झाली, तर भाजपाला तो बोनसच वाटणार ना? नितीशना सोबत घेऊन लालूंना बिहारमधून असेच संपवले गेले ना? भले त्यात नितीशचे पारडे जड असेल, पण लालूंचा पक्ष मुलाच्या हातून निसटलाच ना? उद्धव ठाकरेंची दमदाटी सहन करण्यापेक्षा वडीलधार्‍या ‘गुरूतुल्य’ पवारांचे चार शब्द ऐकण्यात काय कमीपणा? पवार समजणे सोपे नाही, यात तथ्य नक्कीच आहे. गेले शंभर जन्म खुद्द पवार स्वत:ला समजून घेण्यासाठी नवनवे जन्म घेत राहिले आहेत. ते भाजपा वा शिवसेनेला तरी एका जन्मात कुठून समजावे?

22 comments:

  1. Waa waa khup chaan, aasech whayla pahije.

    ReplyDelete
  2. छान मस्त लेख आहे. मला तर शिवसेना फुटण्याची शक्यता जास्ती वाटते. 25 आमदार सहज फुटू शकतात. काहींना आधीच यायचे होते भाजपात पण जागा वाटपात त्या जागा शिवसेनेला आल्या कारणाने त्यांना फशिवसेनेत जावे लागले.

    ReplyDelete
  3. भाऊ आपले लिखाण खूपच उत्तम असते.
    या सरकार स्थापण्याच्या गदारोळात माध्यमांनी आपली पोळी भाजून घेतली. त्यांनी आपला फायदा बघितला. पण जो माणूस स्वतः एका वर्तमानपत्राचा संपादक आहे त्यांना त्यांच्याच क्षेत्राची माहिती नसावी? बरं आणखी म्हणजे अँजिओप्लास्टी झालेला मनुष्य दोन दिवसात खडखडीत बरा होतो? हा सामान्य माणसाला पडलेला प्रश्न.
    असो इतकी आधुनिक उपचार पद्धती आमच्या आवाक्यात नाही.
    १७५ आमदारांचे समर्थन कुठे गेले हे पेड मीडिया विचारू शकत नाही. मुख्यमंत्री मुंबईत ठरणार तर मग तुम्ही दिल्लीच्या का वाऱ्या करता? आधी हा पोरखेळ पाहून चीड वाटायची आता मजा येत आहे. आणि भाऊ एक विनंती ते 'सूत्र ' नावाचे अदृश्य प्रकरण काय आहे? त्याच्या एवढे मनोरंजन कोणीही करत नाही. त्याच्यावर एकदा प्रकाश टाकावा.

    ReplyDelete
  4. पवार, एक अत्यंत हुषार, धूर्त पण फसवणूक या एका गुणामुळे फुकट गेलेला. भाऊ, चोर सुद्धा हुषार, धूर्त असतोच की. म्हणूनच तो अनेकांना फसवू शकतो.
    पवाराला मध्यावधी निवडणूका हव्या आहेत, म्हणूनच त्यांनी हा डाव टाकलेला आहे आणि त्यात "उठा" फसलेला आहे. (माफ करा भाऊ मी या सर्वांंबद्दल एकेरीत बोलतोय. माझ्या द्रुष्टीने हे आदरणीय नाहीत, तर संधीसाधू कोल्हे आहेत.) सरकार स्थापनेचा हा घोळ घालून जनतेचे हाल करायचे, मध्यावधी निवडणूका घ्यायला लावायच्या व प्रचारात "जनादेश असताना हे सरकार स्थापू शकले नाहीत, त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचे, शेतकऱ्यांचे हाल झाले, वगेरे वगेरे. शिवाय शिवसेना व भाजपा यांच्या भांडणामुळे सरकार स्थापन होऊ शकले नाही म्हणून या नालायकांना निवडून देऊ नका" या प्रचारावर सत्ता मिळवायची. हे एक किंवा तुम्ही वर सांगितले त्याप्रमाणे केंद्रात राज्यात भागीदारी आणि ED पासून सुटका हे दुसरे. पण या सगळ्यात बळी जातोय तो फडणवीस यांचा.
    पवाराला असाच मोठा होताना मी पाहिला आहे.

    ReplyDelete
  5. अतिशय अर्थपूर्ण!!!

    ReplyDelete
  6. "गेले शंभर जन्म खुद्द पवार स्वत:ला समजून घेण्यासाठी नवनवे जन्म घेत राहिले आहेत. ते भाजपा वा शिवसेनेला तरी एका जन्मात कुठून समजावे?"
    हा कळस आहे...🤣🤣🤣

    ReplyDelete
  7. भाऊ अडीच वर्षांपूर्वी मुंबई महानगर पालिकेच्या निकालानंतर भाजप सेनेपेक्षा केवळ दोन जागा कमी असून देखील कोणतेही पद न मागता अख्खी मुंबई महानगर पालिका सेनेच्या ताब्यात देऊन टाकली होती, भाजप द्वेषाने आंधळ्या झालेल्या शिवसेनेने ही गोष्ट लक्षात ठेवली असती तरी आत्ता सत्ता वाटप सोपे झाले असते, चार वर्षांपूर्वी मोदी द्वेषाने आंधळ्या झालेल्या नितीश कुमार यांनी अशीच लालूप्रसाद यांची संगत धरली आणि दीड दोन वर्षात काम करणे अशक्य झाले तेव्हा खाली मान घालून परत आले मात्र नितीश कुमार हे धोरणी राजकारणी असल्याने त्यांनी राऊत यांच्या सारखा कोणी पत्रकार सोबत ठेवला नव्हता त्यामुळे त्यांना परत भाजपकडे येणे शक्य झाले,मात्र शिवसेनेने भाजपकडे जाण्याचे परतीचे दोर कापुन टाकले आहेत,काँग्रेसने कुमारस्वामींचे जेव्हढे वाईट हाल केले त्याहीपेक्षा वाईट अवस्था शिवसेनेची होईल तेंव्हा मात्र वेळ गेलेली असेल

    ReplyDelete
  8. फार छान.पवारांच्या सत्ताकारणाच्या खेळी छान सांगितल्या आहेत. यावर असेच लिहावे ही विनंती. शिवसेना बालीशपणाने यात अडकली आहे.आक्रास्तळेपणा उपयुक्त होत नाही. धन्यवाद.

    ReplyDelete
  9. भाऊ, खरे म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी गेली ५ वर्षे सत्तेपासून दूर आहेत, त्यात नोटबंदीचा धक्का बहुतेक सगळ्या नेत्यांना बसला आहे, फडणवीसांनी "जलयुक्त शिवार" यशस्वी करून अनेक वर्षांपासूनची असलेली "टँकर लॉबी" - जी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेतच जोरात वाढली - धोक्यात आणलेली आहे, मेट्रोचे काम चालू झाले पण त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला कुठेच "फायदा" झालेला नाही, "सरसकट कर्जमाफी" न मिळाल्याने खोट्या किंवा कर्जमाफीची गरज नसलेल्या अनेक "शेतकऱ्यांचा" तोटाच झाला आहे. ह्या सगळ्या पार्शवभूमीवर पवार सत्तेत येण्यास उत्सुक असतील असे वाटत होते. मग ते इतका वेळ का काढत असावेत? का शिखर बँकेच्या घोटाळ्यातल्या ईडी च्या चौकशीमुळे आपल्यावर बारीक लक्ष असेल असे पवारांना वाटत असावे का? का नक्की कोणत्या प्रकारे कायद्याच्या कचाट्यात न अडकता आपले उखळ पांढरे करून घेता येईल ह्यावर विचार चालू असल्यानेच सरकार स्थापनेसाठीची हि चालढकल चालू असावी?

    ReplyDelete
  10. भाऊ भारतीय लोकशाहीत अत्यंत हिन दर्जाचे राजकारण चालते.. हे या सर्व घटना क्रमा वरुन सिद्ध होते..
    भाजपच्या लोकसभा निवडणुकीत निर्विवाद विजय मिळवण्याच्या अपेक्षेला मध्यप्रदेश, छत्तीसगढ व राजस्थान निवडणूकीने धक्का पोहचला. बिगर भ्रष्टाचारी सरकार व कामे करणारे सरकार, पाकिस्तान ला त्यांच्या भाषेतच ऊत्तर देणारे सरकार, स्वछता व सौचालय अभियान यशस्वी रित्या राबवणारे सरकार, जनसामान्यांना गॅस व हेल्थ विमा देणारे सरकार, महागाई रोखणारे सरकार, बँकांची थकलेली कर्जे वसूल करण्यासाठी एनसीएलटी सारखी अस्त्र देणारे सरकार, ग्रामीण भागात चांगले रस्ते देणारे सरकार, शेतीसाठी पाणी खते देणारे सरकार, पासपोर्ट मिळण्यासाठी शेकडो कार्यालयाचे जाळे विणुन 15 दिवसात पासपोर्ट देणारे सरकार... अतिरेकी हल्ले रोखणारे सरकार, मुस्लिमांचे लंगुचालन रोखणारे सरकार, सर्जीकल व एअर स्ट्राईक करुन पाकिस्तानला जबरदस्त चपराक बसवणारे खंबीर नेतृत्व.. चीन ला लाल आंख दाखवणारे सरकार भारतीयांना नको आहे..
    भारतीय लोकशाही जरी कितीही म्हंटलं प्रगल्भ आहे तरी अशाश्वततेच्या जाती पाती धर्म, पंथ, प्रांत व उच्च निच्चच्या हिंदोळ्यावर झुलत राहिले आहे..
    याचमुळे भारतासारखा सुजलाम सुफलाम व भरपूर सुर्यप्रकाश पाणी हवा खनिज संपत्ती असुन पण नेहमीच आर्थिक सामाजिक प्रगती अवसानघातकी/ सापशिडी गेम प्रमाणे झाली आहे.
    यात जरी सरकारने दमदार कामगिरी केली तरी ते परत निवडणूक जिंकून सत्तेवर येईल याची कधीच हमी देता येत नाही. ( आठवा वाजपेयी ची 1999 ते 2004 कामगिरी आणि तरीही संख्याबळ कमी पडल्यामुळे विरोधी पक्षात बसलेले बाजपयी )
    यामुळे भाजपला मध्यप्रदेश राजस्थान व छत्तीसगढ चा पराजय बॅकफुटवर घेऊन गेला..
    व एकाबाजने 2015 ते 2019 शिवसेना सत्तेत असुन सुद्धा भाजपलाच संघाला च नाही तर मोदींना पण शिवीगाळी व खुपच टिका करत राहिली ... असताना पण ना इलाजाने भाजपला शिवसेनेची मनधरणी करत युती करुन 2019 लोकसभा व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत युती करावी लागली...
    यात खुप शी मते शिवसेनेला मोदींच्या नेतृत्वा कडे बघुन दिली गेली.. ठाकरेंचा / शिवसेनेचा काहीच सहभाग राष्ट्रीय व राज्य पातळीवरील कामात नव्हता कारण भाजप व फडणविसांवर तोंड सुख घेणारे कितपत एकदिलाने राज्य चालवताना सपोर्ट देत असतील ही शंकाच आहे..
    भाजपच्या 2014 व 2019 दोन्ही निवडणूकीत जास्त आमदार निवडुन येवून सुद्धा शिवसेना मुख्यमंत्री पदाची अतिरेकी मागणी करत राहिली...
    तर शतप्रतिशत भाजप या फाजील आत्मविश्वास व अहंकाराना (तसेच विधानसभेला भाजपचा सोशल मिडिया पण कमी पडला.. एका भाजपचा अजेंडा चालवणार्या गृपवर मोदी फडणवीस सरकार ची कामगिरी सांगणार्या पोस्ट वर फाॅरवर्ड बंदी घालुन लाखो लोकांना माहिती करणारे मेसेजला खोड घातलेली अनुभवली आहे.. जर मिडियावाले साथ देत नसतील (जशे भाडजपला अहंकार झालाय, मोदी हुकुमशहा आहेत, शहा गुंड आहेत बेरोजगारी वाढली आहे, माॅब लाॅचींग, बँकिंग कोलमडत आहे.. असे वारंवार दाखवून विष पेरणी केली व करत आहे).. आर्थीक मंदी तर अशा कामगिरी च्या पोस्ट चा वारंवार हायलाईट्स करुन युती बाजुने मतदार राजाला झुकवणे आवश्यक होते.. पण काही जन्म-व-जात अहंकरी वृत्ती मुळे हे रोखले गेले..) समोर कोणच पेहेलवान नाही असे भासवले गेले.. युती 2014 मध्ये तुटली वर पासुन खाल पर्यंत 25 वर्षे हिंदूत्वावर चाललेली मने दुभंगली कायमचीच.. शिवसेनेचे अपरिपक्व नेतृत्व व संजय राऊत कडे असलेला ठाकरे घराण्याचा काहीतरी असलेला विक पाँईट यामुळे घात झाला..
    यात महाराष्ट्रच्या जाणत्या राजाने जणु पेरलेले संजय राऊत सेनेला विनाशा कडे घेऊन जाणारे ठरेले पाहिजे पण मिडियावाले जर अशा अभद्र महा शिव आघाडी ला साथ देणारे असतीलच )
    यातच मिडियावाले मोदी भाजपच्या पुर्ण विरोधी आहेत.. व एखाद्या छोट्या वा नकारात्मक गोष्टीचा मोठा बाऊ करत भाजपला बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाहीत. याचा परिणाम होतो आहे..2

    ReplyDelete
  11. आता भाजप या परिस्थितीत शांत असुन पण मिडियावाले पुरेपुर बदनामी करत आहेत.. व शेतकरीवर्गाची मते फिरवतो आहे... यात सोशल मिडिया मुळे काही प्रमाणात देशाच्या काही जगरुक नागरिकांना वस्तूस्थीती व भाजपचे देशहिताचे धोरण व मुलगामी बदलाव करुन सुशासन निर्माण करण्याचे कार्य काही लोकांना समजत आहे.. म्हणुन व मोदी शहांचा झांझावती प्रचार मोदींचे मनकी बात रेडिओ कार्यक्रम यामुळे भाजपला मते मिळाली आहेत..
    परंतु मिडियाचा साथ नाही यामुळे खुपच उपेक्षित स्थिती भाजपची झाली आहे.. यावर काँग्रेसने जशा डिप अॅसेट पेरुन काही वेळा जणु मिडियावाले भागिदारच आहेत असे वाटते व याचा फायदा घेतला आहे व निष्क्रिय किंवा फारच सुमार कामगिरी किंवा काही वेळा चुपचाप देशद्रोही शक्तीना धोरणे लपवून ठेवून दशकानु दशके घराणेशाहीच राज्य केले..
    याच घराणेशाही ला व सुमार कामगिरीला आवाज देत मोदी सत्तेत आले ...
    परंतु याला एकटे मोदी कीती पुरुन उरणार.. या खंडप्राय देशामुळे काही मर्यादा आहेत... यामुळे या देशातील लोक वर्तमान पत्र मिडियावाले व गल्ली गल्ली त पेरलेले घराणेशाही चे दलाल... ब्रेन डायलुट करत... मोदी नी केलेला ब्रेन वाॅश परत कलुषित करतात.. यामुळे मिडियावाले ची साथ मिळाण्यासाठी काही गेम प्लान करणे भाजपला आवश्यक आहे..
    नाहीतर या मिडियावाले मुळे जनता मोदी व भाजप विरोधी प्रचाराला
    सहज बळी जाणार.. व परत भारतीय राजकारणाला घराणेशाही व भ्रष्टाचारा कडे घेऊन जाणार..का? की मोदी शहा परत 2019 प्रमाणे (तसेच संघ व भाजपचे शेंड्या पासुन तळा पर्यंत चे कार्यकर्ते या सर्व घटना क्रमातुन व लिमिटेड रिसोर्सेस व मतदार कारण कोणताही राष्ट्रीय पक्ष केंद्रात सत्तेवर येण्यासाठी नाॅर्थ व वेस्टर्न प्रांतावर अवलंबून आहे दक्षिणेची साथ पुढील दहा वर्षे तरी स्वार्थी व्रृत्ती मुळे मिळण्याची शक्यता नाही) जाणुन काही शिकवणुक घेऊन कार्यक्रम राबवतील ) बाजी ऊलटवत.. परत 2024 ला लोकसभेत निर्णायक विजय मिळवून देणार हे पहायला लागेल.. यावरच देशाचे भवितव्य अंवलबुन आहे..

    ReplyDelete
  12. भाऊ एकदम सही विश्लेषण यात महाराष्ट्रात प्रचारात राज्य सरकार ने केलेल्या ऊतम कामगिरी चा ऊल्लेख करण्यात केंद्रीय व राज्य पातळीवरील नेतृत्व कमी पडले.. अनेक आयात उमेदवार पण जनतेला पटले नाहीत..

    ReplyDelete
  13. भाऊ चालू घडामोडी पाहता राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिघांचे सरकार स्थापन होईल असे दिसते आहे, मात्र खरी परीक्षा पुढेच आहे, अवकाळीने झालेले शेतकऱ्यांचे नुकसान आणि त्यांना पूर्ण कर्जमाफी यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सेनेवर प्रचंड दबाव आणतील आणि सेनेच्या मुख्यमंत्र्याला सारखे दिल्लीला मोदी शहा यांच्या दारात जावे लागेल,या शिवाय मेट्रो, समृद्धी महामार्ग बुलेट ट्रेन या विषयांवर कॉंग्रेस राष्ट्रवादी सेनेच्या मुख्यमंत्र्याला धडपणे काम करू देणार नाहीत, देवेंद्र फडणवीस यांनी 5 वर्षे स्थिर सरकार दिले म्हणून त्यांचे जरी कौतुक होत असले तरी केंद्र सरकारचा भक्कम पाठिंबा नसता तर त्यांना धडपणे सहा महिनेदेखील सरकार चालविणे शक्य झाले नसते, म्हणजेच एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादी आणि दुसरीकडे विरोधात असलेले केंद्र सरकार या कात्रीत सेना मुख्यमंत्र्यांची अवस्था कुमारस्वामी यांच्या पेक्षा केविलवाणी होईल आणि हे सरकार धडपणे वर्षभर चालणे देखील अवघड होईल आणि कदाचित कर्नाटकात जसे येडीयुरिअप्पा वर्षभरात परत सत्तेत आले तसे महाराष्ट्रात घडेल

    ReplyDelete
  14. गेले शंभर जन्म खुद्द पवार स्वत:ला समजून घेण्यासाठी नवनवे जन्म घेत राहिले आहेत.
    hey lay bhari Bhau :)

    ReplyDelete
  15. भाऊ मे महिन्यात लोकसभेचे निकाल लागले भाजप 303 जागा आणि मित्रपक्ष 47 जागा अशा NDA आघाडीला 350 जागा मिळाल्या, अनेक राज्यांनी पूर्णपणे भाजपला कौल दिला,मात्र उत्तर प्रदेश खालोखाल ज्या दोन राज्यांमधून लोकसभेत जास्त खासदार पाठविले जातात त्या महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यांत भाजपने मित्रपक्षांना बरोबर घेऊन निवडणूक लढवली, कदाचित या दोन्ही राज्यात भाजप एकटा लढला असता तर मोदी लाटेत भाजपच्या वीस ते बावीस जागा वाढल्या असत्या मात्र त्या NDA च्या बेरजेतून कमी झाल्या असत्या, मात्र स्थानिक राजकारण लक्षात घेऊन भाजपने त्यावेळी पडते घेऊन दोन्ही ठिकाणी जुन्या मित्रपक्षांशी युती केली, आता मात्र उत्तर प्रदेशा पाठोपाठ 48 जागा लोकसभेत पाठविणार्या महाराष्ट्रात हिंदुत्ववादी युती तुटली आहे, म्हणजेच या 48 ठिकाणी 2024 मधे भाजप लढणार आहे, विधानसभा निकालानंतर युती किंवा आघाडी या प्रयोगाची विश्वासार्हता महाराष्ट्रापुरती तरी संपली आहे,जर 2024 पर्यंत नरेंद्र मोदींना सक्षम पर्याय विरोधी पक्षांनी दिला नाही तर त्या निवडणुकीतून भाजपला महाराष्ट्रातून मोठा लाभ मिळणार आहे, शिवसेनेच्या गेल्या महिन्यातील वर्तनाचा फटका भविष्यात सगळ्याच प्रादेशिक पक्षांना बसणार आहे आणि ज्या एकपक्षीय बहुमत या विषयाला गेल्या दोन लोकसभा निवडणुकात मतदाराने उचलून धरले आहे त्यासाठी 2024 मध्ये भाजपला महाराष्ट्रातून खुप मोठा लाभ होणार आहे.दुसरी गोष्ट अशी आहे की केंद्रात जेंव्हा भक्कम बहुमत असलेले सरकार असते तेंव्हा प्रादेशिक पक्षांची बर्गेनिंग पॉवर आपोआप कमी होत असते अशा वेळी प्रादेशिक पक्षांना भक्कम केन्द्र सरकारची मैत्री फायदेशीर असते याचा प्रत्यय ट्रिपल तलाक आणि 370 च्या वेळी भाजपचे मित्र नसलेल्या प्रादेशिक पक्षांनी राज्यसभेत भाजपला मदत केली त्यावेळी आला आहे आता शिवसेनेचे 18 खासदार एका फटक्यात विरोधी बाकावर फेकले गेले आहेत आणि म्हणूनच एकीकडे काँग्रेसबरोबर सरकार स्थापन करत असताना राज्यसभेत आम्हाला विरोधात का जागा दिली असे निर्लज्जपणे व्यकांय्या नायडू यांना संजय राऊत विचारत आहेत, एकंदरीत एका मुख्यमंत्री पदा पायी सेनेने भविष्यात बरेच काही गमावले आहे.

    ReplyDelete
  16. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी २०१७ मध्ये वर्तवलेलं भाकीत खरं ठरण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी नाशिकमधील एका सभेत राज ठाकरेंनी शिवसेनेच्या राजकीय भविष्यावर काही 'विश्वसनीय सूत्रांच्या' आधारे भाष्य केलं होतं की
    'भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणुका एकत्र लढवणार आणि निवडणुका झाल्या की शिवसेना राष्ट्रवादी पक्षासोबत जाणार आणि भाजप विरोधी पक्षात बसणार..... हा काय पत्त्यांचा क्लब आहे का? माझे पिसून झाले, आता तुझे पिस म्हणायला’, असं राज ठाकरे म्हणाले होते. ज्यावेळी शिवसेनेचे मंत्री आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरत आहोत, असं जाहीरपणे सांगत होते, त्यावेळी राज यांनी हे विधान केलं होतं.

    म्हणजे उद्धव ठाकरे जे बोलत होते की 'आमचं ठरलंय' ते हे होतं का? जर हे सर्व २ वर्षांपूर्वीच ठरलेले असेल तर निवडणुका कशाला घेण्यात आल्या?

    ReplyDelete
  17. हा लेख वाचून शिवसेनाप्रमुख योग्य तो निर्णय घेतील असे वाटते.अजून वेळ गेलेली नाही.

    ReplyDelete
  18. सरकार बनवन्याची जबाबदारी भाजप सेनेची कारण राज्यातील जनतेने त्यांना बहुमताने निवडुन दीले तरी ते बनत नाही आणि बहुमत मिळुन सुध्दा ते बनऊ शकत नाही तर त्याला पवार जबाबदार वारेवा राजकिय विश्लेषण

    ReplyDelete