Sunday, November 10, 2019

कोण खोटे बोलतोय?

सरकार बनू शकलेले नाही, कारण ज्या महायुतीला जनतेने कौल दिलाय, त्यातल्या दोन प्रमुख पक्षात टोकाची भांडणे सुरू आहेत. लोकसभेच्या वेळी युती करताना भाजपाने दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप करून सेनेने भाजपाला खोटे पाडलेले आहे. अगदी जाहिरपणे वारंवार सेनेचे नेते खोटेपणाचा आरोप करीत आहेत. उलट असे काही ठरलेलेच नव्हते, असे म्हणून भाजपाने हात झटकले. तर पक्षप्रमुखांनी आपल्याला भाजपा खोटा ठरवित असल्याचा संताप व्यक्त केला आहे. खोटे बोलणारी आपली अवलाद नाही, असेही म्हटलेले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. ते खरेच बोलत आहेत, हे मान्य करूनही एक प्रश्न शिल्लक उरतो आणि त्याचे उत्तर सेनेकडून मिळालेच पाहिजे. भाजपा खोटारडा आहे, हे सेनेला कधी कळले? जेव्हा कळले, तेव्हाच त्यांनी जगासमोर भाजपाचा खोटेपणा उघड कशाला केला नव्हता? भाजपाने मुख्यमंत्रीपद व सत्ता अर्धी अर्धी वाटून घेण्याचे मान्य केलेले असेल, तर भाजपा, देवेंद्र फ़डणवीस, नरेंद्र मोदी वा अमित शहा कधीपासून खोटे बोलत होते? ते २४ आक्टोबरला खोटे बोलू लागले का? निकालानंतर भाजपाचा खोटेपणा सुरू झाला का? नसेल वा आधीच खोटेपणा सुरू झाला असेल, तर त्याला तात्काळ चव्हाट्यावर आणुन भाजपाचे वस्त्रहरण करण्याची जबाबदारी कोणाची होती? ज्यांच्यात तशी बोलणी झाली आणि ज्यांना शब्द दिला गेला होता, त्यांनीच त्याचा गौप्यस्फ़ोट खोटेपणा सुरू होताच करायला नको काय? तसे केले असते तर भाजपाला खुद्द मतदारानेच धडा शिकवला असता. कारण मतदाराचीही यात फ़सवणूक झालेली आहे. महायुतीला बहूमत देणार्‍या मतदाराची त्यात फ़सगत झाली ना? त्याचे कारण काय? कोणामुळे त्या महायुतीच्या मतदाराची फ़सगत होऊन गेली आहे? एक खोटा बोलत होता आणि दुसर्‍याने त्याला वेळीच रोखले नाही वा उघडे पाडले नाही, म्हणून मतदाराची दिशाभूल झालेली नाही काय? त्यासाठी दोषी कोण आहे?

मुख्यमंत्री आमचाच हा भाजपाचा दावा २४ आक्टोबरला निकाल लागल्यानंतरचा नाही. देवेंद्र फ़डणवीस यांची महाजनादेश यात्रा १ ऑगस्टपासून सुरू झाली. तेव्हापासून त्यांच्या प्रचारात प्रत्येक दिवशी त्यांनी व त्यांच्यासमवेत असलेल्या प्रत्येक भाजपा नेत्याने भाजपाचा मुख्यमंत्री, असाच एक सुर आळवलेला होता व प्रचाराचा रोख ठेवलेला होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री व भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनीही सातत्याने त्याचाच उच्चार केलेला होता. भाजपाच्या सर्व प्रचार साहित्यामध्ये मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून फ़डणवीस यांना राजरोस पेश केले जात होते. अगदी महायुतीचा दावेदार म्हणूनच पेश केले जात होते. हा सगळा धडधडीत खोटेपणा नव्हता काय? बंद दरवाज्याआड ह्या गोष्टी चालल्या नव्हत्या. अगदी राजरोस सभांमध्ये, जाहिराती व प्रचार साहित्यामध्ये त्याचे पुरावे सापडू शकतात, उपलब्धही आहेत. सामान्य जनतेच्या साक्षीने सर्वकाही चालले होते. मग शिवसेनेला त्याची गंधवार्ता नव्हती काय? याविषयात विचारणा झालेली होती आणि त्या प्रत्येकवेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘आमचं ठरलंय’ असेच उत्तर दिलेले होते. अगदी जागावाटप घोषित झाल्यावर देखील खोचक प्रश्न विचारले गेले होते. पण केव्हाही पक्षप्रमुख किंवा सेनेच्या कुणा प्रवक्त्याने देवेंद्र यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दाव्याला खोटेपणा म्हणून जाहिर केले नव्हते, की आक्षेप घेतला नव्हता. सहाजिकच ज्यांनी महायुतीला मते दिली, त्यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा जाहिरपणे एकच दावेदार होता आणि एकच नाव होते. कारण त्याला दुसर्‍या पक्षाने म्हणजे शिवसेनेने एकदाही आक्षेप घेतला नव्हता. किंबहूना तो निव्वळ खोटेपणा असल्याचे सत्यही जनतेला कळू दिले नव्हते. युतीला मते देणार्‍या सामान्य मतदाराची ही दिशाभूल नव्हती काय? भाजपाचा खोटेपणा चालला होता आणि तो खोटेपणा झाकून ठेवण्याला शिवसेनेने हातभार लावलेला नाही काय? २४ आक्टोबरला तो खोटेपणा असल्याचे सेनेच्या प्रवक्त्यांना उमगले काय?

मुद्दा इतकाच, की बंद दरवाजाआड काय ठरवले गेले वा शिजले, हे सामान्य लोकांना ठाऊक नाही. ते ठाऊक असलेल्या दोनतीन व्यक्ती आहेत. सहाजिकच तिथे हजर असलेल्यापैकी एक कोणी खोटेपणा करीत असेल, तर त्याला तात्काळ खोटा पाडणे,.ही उरलेल्यांची जबाबदारी असते. तसे न करणे म्हणजे त्याच्या खोटेपणाला पाठीशी घालण्याचा गुन्हाच असतो. कुठल्याही गुन्हाची माहिती असताना ती लपवून गुन्ह्याला पाठीशी घालणे देखील सारखाच गुन्हा असतो. कारण भाजपा असो किवा शिवसेना असो, दोघेही लोकशाहीतील पक्ष असून, जनतेला सामोरे जांणारे पक्ष आहेत. जनतेची दिशाभूल होत असेल वा कोणी करीत असेल, तर त्याबाबतीत सामान्य जनतेला जागरूक करणे; ही प्रत्येकाची जबाबदारी सारखीच आहे ना? मग भाजपाचा खोटेपणा १ ऑगस्टला सुरू झाला, तेव्हापासून २४ आक्टोबरपर्यंत शिवसेनेने त्याविषयी मौन कशाला बाळगले? त्यातून जनतेची म्हणजे मतदाराची फ़सवणूक कशाला होऊ दिली? भाजपाला तर खोटेपणा करून मतदार व शिवसेनेला फ़सवायचेच होते. पण आपली व सामान्य जनतेची फ़सवणूक होत असताना शिवसेना निमूट कशाला सोसत होती? कारण त्याच कालखंडात सेनाही प्रचारात उतरली होती आणि रान उठवित होती. मग भाजपाच्या किंवा फ़डणवीसांच्या खोटेपणावर पांघरूण घालण्याचे प्रयोजन काय होते? कारण त्यात सामान्य मतदाराची पण दिशाभूल झाली आहे. भाजपाला किंवा महायुतीला मत देऊन मतदार गंडवला गेला आहे. एकाने फ़सवले आहे आणि दुसर्‍याने हा खोटेपणा चालल्याचे माहिती असूनही मतदाराला अंधारात ठेवलेले आहे. भाजपाने शिवसेनेला फ़सवले हा दावा मान्य केला, तरी सेनेनेही सामान्य जनता व महायुतीच्या मतदाराची फ़सवणूकच केली ना? त्यांच्या गळ्यात एक फ़सवणूक करणारा मित्रपक्ष बांधला ना? त्याला प्रामाणिकपणा म्हणता येईल काय? लोकशाही पक्षांपुरती मर्यादित नसते, जनतेशी संबंधित असते.

अमित शहा किंवा भाजपा नेत्यांनी बंद दरवाजाआड कोणाला काय आश्वासन दिले वा कबुल केले, त्याचा कोणी साक्षिदार नाही. पण १ ऑगस्टला महाजनादेश यात्रा सुरू केल्यापासून देवेंद्र व भाजपा नेते न ठरलेल्या युतीच्या मसूद्यासाठी मतदाराला आवाहन जाहिरपणे करीत होते. त्यांना शिवसेनेने कधीच व कुठेही रोखले नाही, ही जगासमोरची वस्तुस्थिती आहे. उद्धवराव खरे बोलत असतील, तर भाजपावाले मतदाराला खोटेच काही सांगून आपलाच मुख्यमंत्री म्हणजे महायुतीचा सांगत पेश करत होते. पण हे खोटे लपवले कोणी? अमित शहा, देवेंद्र यांनी नव्हेतर सेनेने लपवलेले ते खोटे आहे. करार तसा झाला नसेल वा तसे काही ठरलेले नसेल, तर प्रचाराच्या दरम्यान भाजपाला जगासमोर खोटा पाडण्याची मोठी जबाबदारी शिवसेनेची नव्हती काय? ती टाळणे म्हणजेही खोटेपणाच नाही काय? निकाल लागण्यापर्यंत थांबून वा खोटेपणाला पाठीशी घालून झाल्यावर आता शिवसेनेने आपण त्या गावचेच नाही, म्हणण्यात अर्थ नाही. त्यांनी आधीच हा गौप्यस्फ़ोट केला असता, तर खोटारड्या भाजपाला अधिक जागा देण्यापेक्षा मतदाराने अन्य पक्षांना प्रतिसाद दिला असता. कदाचित राष्ट्रवादी व कॉग्रेसला किंवा मनसे वंचितला मतदाराने प्रतिसाद दिला असता. खोट्यापेक्षा दुबळाही चांगला असाही कौल मिळू शकला असता. पण उद्धवराव किंवा त्यांच्या चाणक्यांचे दावे मानायचे तर भाजपाने खोटेपणा केलेला आहे आणि त्यांचा खोटेपणा जनतेच्या गळी उतरवण्यास शिवसेनेनेच हातभार लावलेला आहे. आज जे सत्य शिवसेना तावातावाने कथन करते आहे, ते आधीच्या दोनअडीच महिनात बोलायला कोणी रोखलेले होते? की दोघांना मतदाराशी खोटेपणा करून आमदार पदरात पाडून घ्यायचे होते? म्हणून संगनमताने दोघांनी सामान्य मतदाराची फ़सवणूक केली का? एकदा आमदार खात्यात जमा झाल्यावर परस्परांना खोटे ठरवण्याची स्पर्धा रंगलेली आहे काय? कोण खोटे बोलतोय? जनतेनेच आपापला निष्कर्ष काढावा.


37 comments:

  1. Very good. This is Nail on the head of SS . Shows their betrayal of MH public at large and more specifically hard core Hindu supporters

    ReplyDelete
  2. शिवसेना आणि भाजप दोघांनीही आपले सीएम उमेदवार घोषित केले होते आणि सर्व सभा मध्येही जाहीर तसा उल्लेख केला जात होता. आमचा ठरलंय हे समसमान वाटपाचा ठरल असेल तर दोघांनाही आपला candidate सांगण्यास काहीच अडचण नाही आणि तसा तो त्यांनी सांगितला ही,

    ReplyDelete
  3. आज महारास्ट्राचे राजकारण हे महाभारता सारखे झाले आहे. धृतराष्ट्र प्रमाणे पुत्रप्रेमापूढे अंध झाल्यामुळे पित्याला असंगता सोबत संगत होत आहे हे दिसत नाही. व यातला संजय हा तो दूरदर्शी संजय नाही.पण शेवटी विजय हा पांडवचा झाला होता हे विसरुन चालणार नाही

    ReplyDelete
  4. शिवसेनेने कधीच फडणवीस हे युतीचे मुख्यमंत्री हे मान्य केले नाही. उलट ते आदित्य ला मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करीत होते. "पदे व जाबदाऱ्या यांची समसमान वाटणी" याचा अर्थ नेमका काय हे भाजपचे चाणक्य नीट समजावून सांगायला चुकले. कदाचित या मुळेच शहा या वेळी महाराष्ट्रात फिरकले नाहीत.

    ReplyDelete
    Replies
    1. अमित शाह हे महाराष्ट्रात फिरकले नाहीत ह्याचा फार मोठा ढोल वाजवला जातोय आणि त्याचा अर्थ ते घाबरून किंवा डोक्यावरून पाणी जायला लागल्यामुळे फिरकले नाहीत असा लावला जातोय. खरंतर शाह अजूनही येत राहिले असते तरच आश्चर्य वाटले असते कारण त्यांच्याकडे आता गृहमंत्रीपद आहे, तीही नवीन जबाबदारी, आणि त्या पदावरून करण्यासारखे भरपूर काम आहे. पुन्हा, दिल्लीत महत्त्वाचे पद सांभाळताना सतत एक पाय महाराष्ट्रात आणि राज्य राजकारणात लुडबुड, असे करायला ते काही आपले आधुनिक जाणते राजे नव्हेत.

      जाणत्या राजांनी पत्रकारांची डोकी इतकी फिरवलेली आहेत की आता कुठलाही महाराष्ट्राचा नेता दिल्लीत गेला की तो पुन्हा महाराष्ट्रात कधी येणार आणि का आला नाही याची शहानिशा करण्यात पत्रकारांची भरपूर बुद्धी खर्च होते ही एक पत्रकारितेची शोकांतिका आहे (पहा: नितीन गडकरी यांना सतत असेच प्रश्न विचारण्यात येत होते, आणि आता शहांची पाळी ). खरेतर बोलणी करतानाच शहांनी अंग काढून घेतले असते तरी चालले असते. तसे झाले नाही याचेही कारण त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा नुकताच राजीनामा दिलेला असल्याने आणि पूर्वीच्या सेनेबरोबरच्या वाटाघाटींमध्ये शहांचा वाटा असल्यामुळे त्यांना समाविष्ट करण्यात आले असावे. असो. जरा गुजरातकडेही पाहिले तर एकदा केंद्रात गेल्यानंतर शहांनी आणि मोदींनीही गुजरातकडे पुन्हा वळून पाहिलेले नाही हे लक्षात घ्यावे.

      भाजप पक्षीय नेतृत्त्वाने महाराष्ट्राचा घोळ सांभाळण्याची जबाबदारी पक्षीय नेतृत्त्वाकडे दिली आहे असे दिसते, आणि एकंदर परिस्थितीचा अंदाज घेतल्यास, आणि शिवसेनेचा सध्याचा मूड बघितल्यास आता तशीही यशाची शक्यता कमीच आहे, तेव्हा पक्षीय नेतृत्त्वाने ही परिस्थिती देवेंद्रांकडे सोपवली असावी असा अंदाज करता येतो. ह्या परिस्थितीत शहांनी येऊन जर सेनेबरोबर सरकार स्थापन केले असते तर तशीही देवेंद्र यांच्यासाठी ही पाच वर्षांची डोकेदुखी पुन्हा होऊन बसली असती.

      Delete
    2. वावा। म्हणजे election चालू होते तेव्ह अमित शहा हे पर्यटन मंत्री होते का? याच काळात ते हरियनात ठाण मानडुण बसले होते पण बरोबर आहे दिल्ली पासून ते जवळ आहे ना?
      मुळात BJP ने शिस्तीत वचन निभावले अस्ते तर् आज ही नामुष्की ओढावली नस्ती

      Delete
    3. नाही पटलं. शहा जर हरियाणा सारख्या छोट्या याज्यात जाऊन तिथल्या विरोधी पक्षाबरोबर "सेत्तलेमेंट" करून सत्ता स्थापन करू शकतात तर इथे का नाही?

      Delete
  5. नेहमी प्रमाणे कोणत्याच वाहिनी वर याचा उल्लेख नाही.

    ReplyDelete
  6. पंतप्रधान मोदी यानि यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत फडणवीस मुख्यमंत्री होतील हे जाहिर केले तेव्हा सभेत शक्य नसले तरी सामना मधून तरी लगेच त्याचा प्रतिवाद करणे शक्य होते .आता जे संजय राऊत रोज बोलत आहेत त्यानी तरी बोलायला काय अडचण होती.तीच गोष्ट शिवसेनाप्रमुखांना दिलेल्या वचनाची.मी एक तरी शिवसैनिक मुख्यमंत्री करीन हे दिलेले वचन आता सांगून काय साधले?

    ReplyDelete
  7. आ. भाऊ, चंद्रकांत दादा किंवा इतर कोणीतरी आमची अडचण समजून घ्या असे शिवसेना पक्षप्रमुख म्हणल्याप्रमाणे ते आशावादी राहिले. पण, अपेक्षित जागा भाजपला मिळल्या नाहीत तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख म्हणाले होते प्रत्येक वेळी अडचण समजून घेणे आमची गरज नाही, आम्हाला पण पक्ष चालवायचा आहे. हे सुचक विधान वाटत मला. महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी टाकलेले फासे मनाप्रमाणे पडले नाहीत, त्यामुळे सेना नेत्यांनी त्यांच्या पायात पाय अडकुन का पडावे ते पण सत्तेत कमी वाटा घेवून.

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर. हे भाजप वाले खोटे बोलत राहणार आणि त्यात सेनेने का भरदत जावे? आणि ज्यां सेना खोटी वाटते त्यांना फडणवीस पेशवे नागपुरकर यांचा त्यांच्या आका बरोबरचा वीडियो दाखवा इथे. आणि जर् मुख्यमंत्रिपद हे पद त्यात नव्हत तर् तs कंसात बोलायचं पेशवे यांनी.
      खोटे कौन बोलतोय ते सगळे जाणतायाईत

      Delete
  8. श्री भाऊ लय भारी विश्लेषण, आता आमच्या हातात काहीही नाही सामान्य मतदार म्हणून पुढील निवडणूक होई पर्यंत वाट पहाणे लोकशाही चा विजय असो

    ReplyDelete
  9. एकदम बरोबर भाऊ...
    शिवाय सेनेने निकालानंतर पहील्याच पत्रकार परिषदेत जाहीर केले, त्यांना सर्व पर्याय खुले आहेत. म्हणजे निकालानंतर सेनेच्या लक्षात आले, आपल्या शिवाय सरकार बनु शकणार नाही आणि म्हणूनच सेनेचा पवित्रा बदलला...

    ReplyDelete
  10. भाऊ ,नेहमी प्रमाणेच अप्रतिम लेख.आता सेना सरकार स्थापण्या करता व युवराजांना मुख्यमंत्री करण्यासाठी एवढे ऊतावीळ झाले आहेत व दोन्ही काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यासाठी संजय राऊत घायकुतिला येऊन पवार व काँग्रेस नेत्यांशी गाठीभेटी घेत आहेत. परवा त्यांनी अगदी तोर्यात सांगीतले की सेनेला १७० आमदारांचा पाठिंबा आहे व मुख्यमंत्री सेनेचाच होईल.राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आमचे सांगितले आमचे आजून ठरले नाही व त्यांची काँग्रेस बरोबर निवडणुक पूर्व आघाडी असल्यामुळे शरद पवार काँग्रेस अध्यक्षां बरोबर चर्चा करुन निर्णय घेणार.सेनेचा मुख्यमंत्री झालाच तर नको त्या तडजोडी करुन व जबर किंमत देऊन आपल्या मुलाचे मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न पूर्ण होइल .सेनेचे कट्टर हिंदुत्व वप्खरर राष्ट्यीयत्व अशी जी प्रतिमा आहे त्याला तिलांजली द्यावी लागेल. भाजपच्या अॕजेंड्यावर समान नागरी कायदा,पाकव्याप्त काश्मिर परत घेणे असे महत्वाचे विषय आहेत व भाजप यावर भारतीयांच्या जे अनेक वर्षे मनात आहे त्याप्रमाणे या विषयांवर यशस्वी तोडगा काढेल याची सर्वसामान्यांना खात्री आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी सारखे बेरकी पक्ष पाठिंबा द्यायच्या आधी सेनेला त्यांची भुमिका बदलायला व भाजपला या बिलांना म्हणजे समान नागरी कायदा व पाकव्याप्त काश्मिर ईत्यादी बिलांना भाजपला विरोध करायला सेनेला सांगाणार. केवळ मुलाला मुख्यमंत्री बनवण्या करता निर्लज्ज तडजोडी करणार त्यामुळे शिवसेना ही हिंदुत्व वादी सैनिकांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या मनातुन उतरणार व सेनेचा ह्रास आटळ आहे.तडाजोड जी आता राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर आता करावी लागणार त्यापेक्षा भाजप बरोबर केली आसती तर सेनेचा मान राहिला आसता.भाऊ आपल्या कडून यावर आपले विचार अपेक्षित आहे.नमस्कार .

    ReplyDelete
  11. भाऊराव,

    प्राप्त परिस्थितीत शिवसेनेने बाहेरून पाठिंबा देण्याशिवाय इतर पर्यायांचा विचार करू नये असं माझं मत. योग्य वेळ येताच पाठिंबा काढून घेऊन स्वबळावर निवडणुका लढवाव्यात.

    शिवसेनेचा मुख्यमंत्री बन(व)ण्याच्या नादात भलत्यासलत्या तडजोडी करू नयेत. भले बाळासाहेबांचे स्वप्न असेल तसं, पण त्यासोबत जनतेचं हितही लक्षात घ्यायलाच हवं. थोडक्यात पवार व काँग्रेसच्या नादी लागू नये. नुकसानच होईल. त्यापेक्षा येत्या दोनेक वर्षांत पक्ष मजबूत करून मध्यावधीची हाळी द्यावी. मध्यावधी निवडणुका लढवायला पैसे कमी पडतील, पण हा खड्डा पक्षकार्य/समाजसेवा करून भरून काढावा.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  12. १) योग्य लेख २)प्रचारात भाजप केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, प्रचार साहित्यात, म्हणत होते ३) प्रचारात शिवसेनेने विरोध केला नाही.४) निवडणूक आधी युती केली. मग आता विचार फिरले.५) तेव्हा शिवसेना युती धर्म पाळत नाही. पोरखेळ करते

    ReplyDelete
  13. भाऊ,

    पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, अमित शहांबरोबरील बैठकीत असे ठरले आहे, असे उद्धव ठाकरे व काही सेना नेते जूननंतर वारंवार सांगत होते. तेव्हा भाजपने का आक्षेप घेतला नव्हता?

    ReplyDelete
  14. शिवसेनाच चक्क खोटे बोलत आहे. ५०-५० चा टक्क्याचा नियम हीही शुद्ध बनवेगिरी आहे, नाहीतर जागा वाटपात गाडी १४४ ऐवजी १२४ वर का थांबली ह्याचे कुठलेही संयुक्तिक कारण आज तागायत शिवसेना देवू शकलेली नाही. वास्तविक ह्याचा उहापोह तेव्हाच व्हायला हवा होता नव्हे काही प्रमाणात झालेला असेलही पण तेव्हा ’ आमचं ठरलंय’ सांगत का गुलदस्तात ठेवलं? परंतू भाजपा च्या सीटस इतक्या खाली येतील ह्याची शक्यता शिवसेनालाही नव्हती. आता ही पश्चात बुध्दी २४ तारखेनंतरच का आली ह्याचे कारणहि अत्यंत उघड आहे कारण भाजपाच्या जागा पण कमी झाल्यानॆ आपल्याशिवाय भाजपा कारभार हाकूच शकत नाही हे तेव्हाच उघड झाले व ह्या स्थितीचा फायदा घेण्याचे ठरवले गेले आणि मग दुसरीकडून खा. संजय राऊतांची तोफ धडधडू लागली. बाळासाहेबांना दिलेले वचन ही पण एक शुध्द लोणकडी थापच वाटते अन्यथा २०१४ ला जेव्हा समर्थन द्यायचा प्रश्न ऐरणीवर आला तेव्हाच त्याची वाच्यता झाली असती व भाजपला तेव्हाच नमते घ्यायला भाग पाडता आले असते ! ह्या सर्व परिस्थितीचा शिवसेना फायदा उपटू पहात्येय इतकेच ! जनता हे जाणून आहे व त्याचा परिणाम पुढील निवडणूकांमधून नक्कीच दिसेल !

    ReplyDelete
  15. आपल्या लेखावरून उद्धव ठाकरे खोटे बोलतायत असाच निष्कर्ष काढता येईल

    ReplyDelete
  16. शिवसेना खोटे बोलत आहे.

    ReplyDelete
  17. हा लेख उपरोधिक आहे असे मी समजतो. सेना भाजप वर खोटेपणाचा आरोप करते व बाळासाहेबांचे वंशज खोटे बोलू शकत नाहीत असेही म्हणते, म्हणजे फडणवीस खोटे बोलतायत असे लोकांनी समजायचे, आणि कारण काय, तर म्हणे बाळासाहेबांचे पुत्र खोटे बोलत नाहीत, किती हास्यास्पद युक्तिवाद आहे नाही?

    ReplyDelete
  18. पटलं.मतदारांना मूर्खात काढण्याचा जो उद्योग शिवसेनेने चालवलाय,तो बघून कीव येतेय. किती खोटेपणा, किती माज... कुठे फडणवीस नि कुठे आदित्य ठाकरे! राष्ट्रपती राजवट यावी अशी परिस्थिती आणावी ह्यांनी?

    ReplyDelete
  19. भाऊ आता जी शिवसेनेची अवस्था झाली आहे व सेनेचे मुख्यमंत्री बनण्याचे व सरकार बनवण्याचे स्वप्न जवळ जवळ भंग पावले आहे व राष्ट्रपति शासन यायची शक्यता बळावली आहे.शिवसेनेच्या भवितव्या बद्दल कृपया आपले विचार मांडावेत ही विनंती.

    ReplyDelete
  20. एक व्हिडिओ बघितला.. त्यामध्ये, पदे आणि जबाबदारी यांचे समसमान वाटप करायचे असे फडणवीस म्हणाले होते, त्यावरून उद्धव ठाकरे म्हणतायत की मुख्यमंत्रीसुद्धा सुद्धा एक पद आहे

    ReplyDelete
  21. कोणी का खोटे बोलेना! पण भाजप+काकांनी छुपी युती करून एकाची जिरवली.

    ReplyDelete
  22. भाऊ, आपल्या विश्लेषणाशी अगदी १००% सहमत. "मुख्यमंत्री आमचाच" हा देवेंद्र फडणवीस यांचा दावा यू ट्यूब आणि तत्सम माध्यमांवर व्हिडिओ रूपाने अजूनही आहे. यात्रा आणि सभांना हजर राहणे व्यक्तिशः मला शक्य नव्हते (कारण महाराष्ट्राच्या बाहेर वास्तव्य) पण वृत्तपत्रे/समाज माध्यमे यांतून तर हे स्पष्ट होते. म्हणूनच जेव्हा सेनेने आरोपांची सरबत्ती सुरु केली तेव्हा व्यक्तिशः माझी प्रतिक्रिया ही सेनेचा खोटारडेपणा अशीच झाली.


    मुळात, आता हे सत्य धगधगीतपणे उघडकीला आले आहे की सेना-भाजप युतीचे दुःखद निधन झाले आहे, नव्हे सेनेच्या महामूर्ख आणि वाचाळ प्रवक्त्यांनी आणि कदाचित नेतृत्वानेसुद्धा, ह्या युतीचा गळा दाबून खून केला आहे. उद्धव ठाकरे संजय राऊत ह्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळीबार करतायत पण ते न ओळखण्याइतकी जनता दुधखुळी नाही. आता भाजपने स्वतःची लढाई स्वतः लढावी. एकच मुद्दा आहे, यातून सेनेचे अस्तित्वच संपुष्टात येते, हे उद्धवजींना कळत नसावे का? ह्या विचारानेपण दुःख होते. थोडक्यात, बाप कष्टांनी आणि कर्तृत्वाने उभारतो आणि वारस मूर्खपणातून घालवतात, हे फक्त उद्योगांमध्ये दिसते असे नाही तर राजकारणातसुद्धा नजरेला पडते हे स्पष्ट होते. दुसरा धडा म्हणजे जी पार्टी निव्वळ घराणेशाहीवर चालते, तिचा शेवट हा असाच होणार. (आजची काँग्रेसची दशा सुद्धा पाहावी).


    अगदी व्यवस्थापनाच्या भाषेत सांगायचे तर शिवसेनेचा ब्रँड हा बाळासाहेबांनी स्वतःच्या व्यक्तिगत करिष्म्यावर बनवला, पण तो शेवटपर्यंत त्यांच्या करिष्म्यावरच अवलंबून राहिला. भाजप हा विचारधारेचा "प्लॅटफॉर्म" होता आणि राहिला, आणि संघटनेने तो बनू दिला, म्हणून येथे विचारधारेचा आणि मतांचा, व्यक्तीचा नव्हे, प्रभाव जास्त आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची आणि पुढाऱ्यांची फळी तयार आहे. भाजपने स्वतःची वाटचाल चालू द्यावी. कदाचित नजीकच्या काळात याचा भाजपाला तोटा होईल पण लांबच्या भविष्यकाळात फायदाच होईल.


    आणखी एक: ही जर-तरची भाषा झाली पण जर शिवसेनेने आदित्य ठाकरे किंवा उद्धव, यांचे मुख्यमंत्रीपद निवडणुकीपूर्वीच जाहीर केले असते तर शिवसेनेचा कधीच धुव्वा उडाला असता. आदित्य ठाकरे भले निवडून येवोत पण मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्यावर विश्वास ठेवायला महाराष्ट्राची जनता सुखासुखी तयार झाली असती असे वाटत नाही. आणि हे उद्धवजींनासुद्धा माहित असावे असे वाटते. दुसरे, मला तर स्पष्ट दिसतंय की उद्धवजींना कळून चुकले आहे की मुख्यमंत्री बनण्याची ही अखेरची संधी. यानंतर घसरण ठरलेली आहे. त्यांचा हा अखेरचा निकराचा प्रयत्न वाटतो.

    ReplyDelete
  23. काँग्रेसने गटनेता निवडलेला नाही म्हणजेच उद्या भाजप काय करणार? तर शिवसैनिकांनी आणि संजयजी राऊतांनी गेले दोन दिवस भडभडून तारीफ केलेल्या राष्ट्रवादीला पाठिंबा देतील आणि फडणवीस शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. अजितदादा उपमुख्यमंत्री! अस्तनीत बसून डसणारा इंचू बाहेर काढून चपलेने ठेचलाय त्यामुळे फाटक्यात पाय घालणारा कोणीही नसेल! कामे जोमाने होतील यात संशय नाही.

    ReplyDelete
  24. https://m.facebook.com/story.php?story_fbid=2463654003671771&id=100000815850619&notif_t=feedback_reaction_generic&notif_id=1573528872499428&ref=m_notif

    ReplyDelete
  25. भाऊ जर प्रथमपासूनच मुख्यमंत्रीपद अडीच वर्षे वाटून घ्यायचे ठरले असेल तर देवेंद्र फडणवीस मीच पुढचा मुख्यमंत्री आहे हे सांगत होते तेंव्हाच शिवसेनेने आक्षेप घ्यायला हवा होता. पण ते त्यांनी केले नाही त्यामुळे असे ठरले असेल यावर शंका आहे. बाकी मंत्रीपदांसाठी ५०/५० ठरले असावे आणी त्यासाठी भाजपचाही आक्षेप नाही.

    ReplyDelete
  26. Shivsena not objecting whole BJP campaign of Fadanvis as a CM proves that there was no promise esp for CM post and 50-50 applies to other posts. Why do you blame BJP then as if Sena is always truthful and innocent.

    ReplyDelete
  27. भाऊ अमित शहा गप्प काॽ
    अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री
    शिवसेनेला मान्य होते मग त्यांनी
    फडणवीसांना ऐन प्रचारात विरोध
    करायला हवा होता असे आपल्याला वाटते काॽ
    जागा वाटपात भाजपची अडचण समजून घेऊन युतीधर्म
    पाळला हि उद्धव ठाकरेंची चुक काॽ
    विरोध का करावा

    ReplyDelete
  28. असेही असु शकते की, हा शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांनी मिळून निवडणुकीपुर्वी ठरवलेला खेळ आहे. शिवसेनेने सहजपणे १२४ सीट घेतल्या कारण त्यांना भाजपच्या सीट्स वाढू द्यायच्या नव्हत्या. १६४ मधल्या १४५ आणणे अवघड असते. आता काहीतरी कारण काढून बाहेर पडायचे आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे, यात कॉंग्रेसला बाहेर ठेवण्याचाही डाव होता पण सीट्स कमी मिळाल्याने त्यांना घ्यावे लागले असेल. उगाच नाही शिवसेना गेले ५ वर्षे शिव्या देत होती

    ReplyDelete