Showing posts with label आम्ही सारे. Show all posts
Showing posts with label आम्ही सारे. Show all posts

Friday, August 28, 2015

शिना, इंद्राणी, पीटर, राहुल, मुखर्जी, मिखाईल..........



पोलिस तपास ही बातमीदारी किंवा टेलिव्हीजनचा शो नसतो. त्यात नुसत्या तर्काने कुणाला दोषी ठरवून फ़ाशी देता येत नाही, की गुन्हेगार सिद्ध करता येत नाही. तर कोर्टात कायद्याच्या निकषावर साक्षीपुरावे सादर करून गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी पोलिसांना पार पाडायची असते. म्हणूनच जे साध्या डोळ्यांना दिसते त्याच्याही पलिकडे जाऊन घटना व तिचे संदर्भ जोडून साक्षीपुराव्यांची संगतवार मांडणी पोलिसांना करावी लागते. त्यासाठी आधी रहस्यमय कोडे सोडवावे, तसे त्याच कोड्यातले विविध तुकडे व सुटे भाग गोळा करावे लागतात. पोरांच्या खेळात जसे सर्व तुकडे समोर असतात, तशी पोलिसांची चैन नसते. त्यांना आपल्या प्रयत्नातून कोड्याचे तुकडे गोळा करावे लागतात आणि त्यातून जे चित्र स्पष्ट होऊ लागते, त्याच्या आधारे उरलेले तुकडे शोधावे लागतात. तेही सहजगत्या बाजारात उपलब्ध नसतात. कसून शोध घेतला तरी मिळायला अवघड असतात. अनेकदा तर एक चित्र स्पष्ट होत असताना त्यातूनच भलतेच चित्र साकारू लागते आणि एका गुन्ह्याच्या जागी दुसर्‍याच अनुत्तरीत कोड्याचा रहस्यभेद होत जातो. इंद्राणी मुखर्जी व शिना बोरा हे त्याचे जळजळित उदाहरण आहे. उठसुट पोलिसांकडे इच्छाशक्ती नाही, सरकारला गुन्ह्यांचा शोध घ्यायचाच नाही, म्हणून जे ‘आम्ही सारे’ रस्त्यावर फ़लक घेऊन उभे असतात, त्यांना गुन्हेतपास म्हणजे काय याचा गंध नसतो, त्याचा हा पुरावा आहे. पण तिथेच ही तुलना संपत नाही शिना व इंद्राणी यांचा हा गुंता म्हणूनच मुळापासून समजून घेतला पाहिजे. ते करताना त्यांच्यातले नातेसंबंध व त्यातला गुंता अनावश्यक आहे. शिना नावाच्या तरूणीचा तीन वर्षापुर्वी निर्घृण खुन झाला आणि त्याचे धागेदोरे लपवणारी तिचीच आप्तस्वकीय निकटवर्तिय मंडळी आहेत. ही बाब सर्वाधिक महत्वाची आहे. म्हणून लक्ष केवळ खुनाच्या संदर्भावर केंद्रित करण्याची गरज आहे.

शिना ही इंद्राणीची मुलगी होती आणि ते सत्य लपवून तिने कागदोपत्री तिला आपली बहिण ठरवण्याचे कारस्थान यशस्वीरित्या राबवले होते. त्यात खुद्द शिना व तिचा भाऊ मिखाईल सहभागी होते. म्हणूनच त्यांनी इतके दिवस त्याविषयी मौन पाळले होते. मारली जाईपर्यंत शिनाने त्याचा कुठे गवगवा केला नाही, की आजपर्यंत मिखाईल त्याबद्दल कुणाला बोलला नाही. याचा अर्थ मुळात जी भामटेगिरी इंद्राणी करीत होती, त्याचे हे दोघेही भागिदारच होते. जेव्हा त्यांच्यात बेबनाव झाला, तेव्हा इंद्राणीने इतर कोणाच्या मदतीने शिनाचा काटा काढला. त्यामुळे आता मिखाईल म्हणतो, की मलाही आईने म्हणजे इंद्राणीने असेच संपवले असते. पण तशी भिती असूनही मिखाईल निदान तीन वर्षे गप्प होता. आज तो इंद्राणीवर खुनाचा आरोप करतो आहे. त्याच्यावर विश्वास ठेवायचा तर आपली बहिण शिना मागली तीन वर्षे बेपत्ता असताना त्याने मौन कशाला धारण केलेले होते? शिनाचा खुन माहित असून लपवाछपवी करणे गुन्हा नाही काय? तिसरा आहे इंद्राणीचा विद्यमान पती पीटर मुखर्जी. त्यालाही शिना बहिण की मुलगी याविषयी शंका होती. पण त्याने त्यात नाक खुपसले नाही. पण मागली तीन वर्षे ही मुलगी बेपत्ता होती आणि कुठल्याही संपर्कात नाही, तर त्याचे कुतूहल कुठे दडी मारून बसले होते? शिना अमेरिकेत आहे आणि तिथे दिवाळी करतानाची छायाचित्रे इंद्राणीने दाखवल्याचे पीटर सांगतो. इतक्या बड्या उद्योग समुहाच्या प्रमुखपदी विराजमान झालेला माणूस इतका भोळा असू शकतो? जो अकस्मात बेपत्ता झालेल्या सावत्र मुलगी वा मेहुणीबद्दल तीन वर्षे थाप ऐकून घेतो? त्याचेही या विषयातले मौन शंकास्पद नाही काय? कारण शिनाला शेवटचे ज्याने कोणी बघितले, त्यानंतर तिचा संपर्क नसल्याने मुंबईत खार पोलिस ठाण्यात ‘बेपत्ता’ व्यक्ती म्हणून तक्रार नोंदली गेली होती.

शिना बेपत्ता असल्याची तक्रार कोणी दिली होती? त्याचे उत्तर पोलिसांनी दिलेल्या बातमीत कुठे मिळत नाही. जर अशी तक्रार होती तर पोलिसांनी त्याचा तपास कुठवर केला होता? कोणा कोणाकडे शिनाबद्दल विचारपूस केली होती? पीटर म्हणतो की इंद्राणीने शिना अमेरिकेला गेली असल्याचे सांगितले व तसे फ़ोटोही दाखवले. तर त्याला बेपत्ता तक्रार ठाऊकच नव्हती का? तसे असेल तर बेपत्ता व्यक्तीविषयी पोलिसांनी कुठे तपास व चौकशी केली, असा प्रश्न उपस्थित होतो. जी व्यक्ती बेपत्ता आहे तिचे फ़ोटो इंद्राणी दाखवते, तर तिची जबानी तेव्हा पोलिसांनी घेतली होती काय? यातली आणखी एक शंकास्पद व्यक्ती आहे पीटरचा पुत्र राहुल मुखर्जी. त्याचे शिनाशी प्रेमप्रकरण होते आणि ते इंद्राणीला मंजूर नसल्याचे आता सांगितले जात आहे. आपली प्रेयसी तीन वर्षे संपर्कात नसताना व तिच्याविषयी खार पोलिस ठाण्यात बेपत्ता तक्रार असताना राहुल काय करत होता? त्याने प्रेयसी शिनाला शोधण्यासाठी कसला पाठपुरावा केला? नसेल तर कशामुळे त्याने प्रेयसीविषयी इतकी अनास्था दाखवावी? पीटर आपल्या पुत्राच्या प्रेमप्रकरणाकडे अलिप्तपणे बघत होता. तरी त्यातली प्रेयसी बेपत्ता असावी आणि तिच पीटरच्या पत्नीची बहिण (वा कन्या) असावी हे पचणारे आहे काय? यातल्या प्रत्येकाला शिना वा तिच्या बेपत्ता असण्याविषयी इतकी अनास्था कशामुळे असावी? यातला कोणीही शिनाला शोधण्यात उत्सुक नव्हता, की कुठेही प्रयत्न करीत नव्हता. जणू तशी कोणी शिना आपल्या आयुष्यात आलीच नव्हती, असे या प्रत्येकाचे वागणे इंद्राणी इतकेच चमत्कारीक वाटणारे नाही काय? इंद्राणीने तर तिचा खुनच केल्याचा दावा आहे. तिची अनास्था वा लपवछपवी समजू शकते. पण यातले बाकीचे तिघेजण धुतल्या तांदळाइतके निर्दोष आहेत का? की आता प्रकरण उलटल्यावर प्रत्येकजण हात झटकतो आहे?

मुळात ह्याचा उलगडा पोलिसांनीही बेपत्ता व्यक्तीचा शोध म्हणून केलेला नाही. याच नाट्यातील एक महत्वाचे पात्र श्याम राय हे आहे. त्याला कुठल्या तरी भलत्याच प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतले असताना तो जे काही बरळला, त्यातून शिना बोरा प्रकरण उजेडात आलेले आहे. म्हणजेच तो दुसर्‍या भानगडीत पकडला गेला नसता व बरळला नसता; तर पीटर, इंद्राणी, राहुल वा मिखाईल यांची नावे कुठे पुढे आलीच नसती की शिना बोराची हत्या झाली, त्याचा बोभाटाही झाला नसता. हे सारे उजळमाथ्याने उच्चभ्रू समाजात मिरवत राहिले असते. श्याम राय याच्याकडे संशयास्पद पिस्तुल पोलिसांना मिळाले आणि त्याचा पाठपुरावा करताना श्यामने शिनाची हत्या झाल्याचे ओकून टाकले. तिथून मग बेपत्ता शिना मेली असल्याचे पोलिसांना लक्षात आले आणि शिनाच्या बेपत्ता तक्रारीचा पुन्हा खार पोलिस ठाण्यातून शोध सुरू झाला. पण थोडा वेगळा विचार करा. जर पीटरने आपल्या मुलाच्या प्रेयसीच्या बेपत्ता होण्याचा किंवा राहुलने आपल्या प्रेयसीच्या अकस्मात गायब होण्याचा पाठपुरावा २०१२ मध्येच सुरू केला असता तर? म्हणजे पोलिसांना शिना कधीपासून कुठून व कशा परिस्थितीत गायब झालीय त्याचा तपशील देवून, शोध करण्यास भाग पाडले असते तर? तर श्याम रायने सत्य ओकण्यापर्यंत शिनाच्या हत्येवर पडदा पडून राहिला असता काय? इंद्राणीला तीन वर्षे उजळमाथ्याने मिरवता आले असते काय? या आप्तस्वकीयांची अनास्था किंवा लपवाछपवीच इंद्राणीला खुन पचवायला हातभार लावत नव्हती काय? परस्परातील संबंध, भांडणे, वादविवाद, मतभेद, रागलोभ यांचा सारा तपशील वेळीच पोलिसांना मिळाला असता, तर त्याच बेपत्ता व्यक्तीचा शोध घेताना शिनाच्या खुनाचा उलगडा कधीच होऊ शकला असता. पानसरे वा दाभोळकर प्रकरणात असे काही दुवे नक्कीच असतील, ज्यांचा त्यांच्या हत्याकांडाशी निकटचा संबंध असू शकतो आणि ज्याच्याअभावी पोलिस त्यात नेमक्या दिशेने तपास करू शकले नाहीत. किंवा तिथेच पोलिसांचे गाडे फ़सलेले असू शकते. पण शिनाप्रमाणेच याही दोन्ही प्रकरणात कोणीतरी श्याम राय असू शकतो, तो हाती लागेल, तेव्हा त्यातल्या इंद्राणीचा बुरखा टरटरा फ़ाट्ल्याशिवाय रहाणार नाही. या दोन्ही हत्याकांडातला खरा आरोपी व सुत्रधारही आजही उजळमाथ्याने समाजात प्रतिष्ठीत म्हणून इंद्राणीप्रमाणे वावरतो आहे. पण त्याचाही श्याम राय कुठेतरी असेल आणि तो लौकर पोलिसांच्या जाळ्यात अडकू देत, अशी प्रार्थना आपण करू या.

आम्ही सारे नावाचे पथ‘नाट्य’



कुठल्याही विवेकवादी वा बुद्धीजिवी चळवळीला संपवायचे असेल तर तिच्या विरोधात लढण्यापेक्षा त्यात सहभागी होऊन चळवळीचेच एक पाखंड उभे करायचे असते. मागल्या दोन वर्षात अंधश्रद्धा निर्मूलन आंदोलनाचे सोहळे किंवा इव्हेन्ट बघितल्या, मग त्याची खातरजमा करून घेता येते. आम्ही सारे दाभोळकर किंवा शरमिंदा है, तेरे कातील जिंदा है असल्या घोषणा त्याच पाखंडाचे दाखले आहेत. यांना कसली शरम वाटते? ज्यांना खरा खुनी वा हल्लेखोर पकडण्याची इच्छाही नाही, की प्रयत्नही नाहीत, त्यांना शरम कशाला वाटते? म्हणून आधीच्या लेखात आम्ही चेंबुरच्या दुकानात जीव धोक्यात घालणार्‍या नासिरुद्दीन मन्सुरीचा दाखला दिलेला होता. त्याने कधी दाभोळकर वा पानसरे यांचे नावही ऐकलेले नसेल, की त्यांचे कार्य-तत्वज्ञानही मन्सुरीला ठाऊक नसेल. त्याने कधी हातात ‘आम्ही सारे’ असा फ़लकही धरलेला नाही. पण ज्या क्षणी या दोघांवर प्राणघातक हल्ले झाले, तेव्हा तिथे मन्सुरी असता, तर नक्कीच त्याने त्यांना वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला असता. पण आज जे कोणी ‘आम्ही सारे’ असे फ़लक घेऊन मिरवत असतात, त्यापैकी कोणी त्या प्रसंगी हजर असते, तर दाभोळकर पानसरेंच्या हल्लेखोराला रोखणे दुरची गोष्ट झाली, हेच ‘आम्ही सारे’ हल्ला निमूट बघत राहिले असते किंवा शेपूट घालून फ़रारी झाले असते. हा निव्वळ आरोप नाही की शंका नाही, ज्या मध्यमवर्गिय मानसिकतेतून असे लोक आलेले असतात, त्यांच्यात मुरलेला ‘मध्यमवर्गिय व्यवहारी जाणतेपणा’ त्यांना तसे करायला भाग पाडत असतो. तेरा वर्षापुर्वी त्याची साक्ष अंबरीश मिश्र या पत्रकाराने कबुलीजबाब असल्यासारखी एका बातमीतून दिलेली आहे. समोर एका असहाय मुलीवर बलात्कार होताना त्यात हस्तक्षेप करायची हिंमत आपल्याला कशी झाली नाही, त्याची बातमी लिहीताना अंबरीश म्हणतो,

"आम्ही जे बघितले त्याने आम्ही बधीर होऊन गेलो. सलीमने त्या मुलीला खाली खेचले होते आणि तो तिच्यावर बलात्कार करीत होता. आपल्या मध्यमवर्गिय व्यवहारी जाणतेपणाच्या बोजाखाली दबलेले आम्ही शांत राहिलो, काहीही करू शकलो नाही." (टाईम्स ऑफ़ इंडीया)

 हा मध्यमवर्गिय व्यवहारी जाणतेपणा किंवा शहाणपणा काय असतो? तर आपण दुसर्‍याच्या भानगडीत पडायचे कारण नाही. आपले जग आपल्यापुरते, बाकी कुठे कुणाचे काय होते, त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नसते. अगदी कत्तलखान्यातल्या बोकडासारखे आपले मध्यमवर्गिय शहाणपण असते. तिथे एका बोकडाच्या मानेवरून सुरी फ़िरवली जात असते आणि बाजूचा दुसरा बोकड शांतपणे चरत असतो. मरणार्‍याचे पाय झाडणे, रक्ताने माखणे चरणार्‍याला अजिबात विचलीत करत नसते. आजकाल समाज व त्यातले सुखवस्तू व मध्यमवर्गिय इतके आत्मकेंद्रित झाले आहेत, की त्यांना शेजारच्या घरातल्या नवविवाहितेच्या किंकाळ्यासुद्धा ऐकू येत नाहीत. आणि ऐकू आल्या, तरी त्यात पडायची इच्छा व हिंमत ते गमावून बसले आहेत. अंबरीश त्यालाच मध्यमवर्गिय व्यवहारी जाणतेपणाचा बोजा म्हणतो. त्या बोजाखाली दबलेले लोक कुठले आव्हान पेलणार आहेत? ते बघत बसतात. कधी ते रिंकू पाटिल या शाळकरी मुलीला जाळू देतात. कधी ते सांगलीच्या रस्त्यावर अमृता देशपांडेवरचा सुरीहल्ला होताना निमूटपणे बघतात. कधी बॉम्बे सेंट्रलला विद्या पटवर्धनवर रॉकेल ओतून तिला पेटवले जात असताना, स्तब्ध होऊन बघत रहातात. त्याला मध्यमवर्गिय जाणतेपणा किंवा व्यवहारी शहाणपणा म्हणतात. मात्र हेच लोक मोठ्या तावातावाने देशातला भ्रष्टाचार, वाढती असुरक्षितता, गुंडगिरी, काहीतरी करायला हवे; अशी चर्चा छान रंगवत असतात. पण हे सर्व शहाणपण, जाणतेपण प्रत्यक्ष संकटापासून मैलोगणती दुर असतानाचे असते. नेट प्रॅक्टीस म्हणतात तसे हे शहाणपण असते. ते कधीच खर्‍या कसोटी सामन्यात उतरत नाही. लोक टीव्हीसमोर बसून किंवा स्टेडीयमच्या गॅलरीत बसून, सचिन कुठे चुकला त्यावर बोलत असतात. त्यालाच अंबरीश मध्यमवर्गिय व्यवहारी शहाणपणा म्हणतो.

इथे मन्सुरी व अंबरीश यातला फ़रक लक्षात घेण्याची गरज आहे. कारण अंबरीश हा तुमच्याआमच्या सारखा एक मध्यमवर्गिय बुद्धीजिवी आहे. पोलिसाचे काम असल्याचे सांगत तोही ‘आम्ही सारे’ यांच्याप्रमाणे बलात्कार होऊ देतो आणि मग पोलिसात तक्रार नोंदवतो. मागल्या दोन वर्षात ‘आम्ही सारे’ काय करू शकलो? काहीच कशाला नाही करू शकलो? त्याचेही उत्तर अंबरीशने प्रामाणिकपणे दिलेले आहे. आपण वाचाळ बुद्धीवादी असतो आणि व्यवहारी जाणतेपणाचे गुलाम असतो. संकटाची घडी येते आणि परिक्षा घेऊ पहाते, तेव्हा आपले पोपटपंची करणारे तत्वज्ञान लुळेपांगळे होऊन जाते. ढुंगणाला पाय लावून ‘आम्ही सारे’ पळ काढतो, धोका संपला मग बिळातून बाहेर पडून पोलिस व सरकारला त्याच्या कर्तव्याविषयी शहाणपणाचे व्याख्यान देऊ लागतो. पण प्रत्यक्ष घटना घडत असताना मात्र त्यात हस्तक्षेप करायची हिंमत आम्ही गमावून बसलेलो असतो. ती अगतिकता व नाकर्तेपणा झाकण्यासाठी मग सोहळे व इव्हेन्ट साजर्‍या करतो. कसाबची टोळी मारली गेली, मग आम्ही गेटवे ऑफ़ इंडीयापाशी जमून मेणबत्त्या पेटवतो आणि त्यातच मोठा पुरूषार्थ असल्याचे पाखंड मिरवू लागतो. पण कसाब समोर असताना किंवा हल्लेखोर बलात्कारी समोर खडा उभा असताना आम्ही गर्भगळित होऊन जातो. कारण आम्ही सामान्य बुद्धीचे नासिरुद्दीन मन्सुरी नसतो की कसाबच्या अंगावर मरायला धावून जाणारे तुकाराम ओंबळेही नसतो. ‘आम्ही सारे’ बुद्धीजिवी असतो. आपल्या नाकर्त्या नपुंसकत्वाला पुरूषार्थ ठरवण्याचे पाखंड रंगवणारे पथनाट्य कलावंत असतो. आपल्यात मन्सुरी वा ओंबळेप्रमाणे पुढे सरसावण्याचे नसलेले बळ झाकण्याची केलेली केविलवाणी धडपड, मग एक सोहळा बनून जातो आणि बाहेर असे शेकडो खुनी, बलात्कारी, हल्लेखोर, मारेकरी आपल्या त्या तमाशाला फ़िदीफ़िदी हसत मोकाट फ़िरत असतात. कारण आपल्या पोकळ घोषणांच्या शब्दापेक्षा त्याच्या नुसत्या धमकीच्या शब्दातली ताकद त्याला पक्की ठाऊक असते.

तेरा वर्षापुर्वी चर्चगेट बोरीवली लोकलमध्ये दरवाजाच्या बाजूला असलेल्या सीटवर एक गुंड एका मतिमंद एकाकी मुलीवर बलात्कार करताना अलिकडल्या भागात बसलेल्या प्रवाश्यांना दिसला. तिचा टाहो ऐकून हे पाचजण तिथे धावले आणि तरीही तो गुंड क्षणभर विचलीत झाला नाही. त्याने या प्रवाश्यांना धावत्या गाडीतून बाहेर फ़ेकून देण्याची धमकी दिली आणि ते निमूट बाजूला झाले. त्याला बलात्कार करू दिला. मग तो पळून गेल्यावर याच प्रवाश्यांनी रेल्वे पोलिसांना खबर दिली आणि त्याला अटकही झाली. पण सवाल बलात्कार रोखण्याचा होता. पाचजण मिळून त्या नि:शस्त्र गुंडाला कशामुळे रोखू शकले नाहीत? ‘मध्यमवर्गिय व्यवहारी जाणतेपणा!’ जो ‘आम्ही सारे’ असतात त्यांच्यात ठासून भरलेला असतो. म्हणूनच मग त्याच दुखण्यावर किंवा अगतिकतेवर बोट ठेवले तर त्यांच्यातला तोच बुद्दीजिवी न्युनगंड जणू नागाने फ़ुत्कार टाकावा तसा उफ़ाळून बाहेर येतो. पोलिस नाकर्ते असतील. पण पानसरे दाभोळकरांच्या खुन्यांना पकडण्यासाठी समर्थकांनी काय केले, असे विचारताच तो न्युनगंडाचा नाग फ़णा काढून पुढे आला आणि म्हणतो काय? ते पोलिसांचे काम आहे. पोलिस कशाला असतात? नासिरुद्दीन असे म्हणत नाही. कुठलाही जीव धोक्यात घालून मदतीला धावणारा असे ‘बुद्धीवादी विवेकी’ प्रतिसवाल करत नाही. कारण संकटात असलेल्याला मदत करायला धावणे किंवा सत्य प्रस्थापित करायला पुढाकार घेणे विवेकी नसेल कदाचित. पण माणूसकीचे कर्तव्य नक्कीच असते. उलट ‘मध्यमवर्गिय व्यवहारी जाणतेपणा’ दाखवून त्यापासून पळ काढणे मात्र विवेकवाद असत्तो. जो नासिरुद्दीन वा ओंबळे यांना ठाऊकच नसतो. पानसरे असोत किंवा दाभोळकर असोत, त्यांच्या चळवळी कार्यालाच पाखंड करून टाकण्याची यापेक्षा भीषण खेळी दुसरी कुठली असेल. अंबरीश मिश्र निदान प्रामाणिकपणे आपल्या अगतिकतेची कबुली देतो. पण ‘आम्ही सारे’ इतके बनेल असतो, की त्याच अगतिकतेला पुरूषार्थ ठरवण्याचे पथनाट्य मांडत असतो.

Monday, August 24, 2015

‘आम्ही सारे’ हातपाय का हलवित नाहीत?



देशात दोन दशकापुर्वी खाजगी वाहिन्यांचे पेव फ़ुटले आणि आता तर इंग्रजी व हिंदी वगळून अनेक प्रादेशिक भाषांच्याही कित्येक वाहिन्या सुरू झाल्या आहेत. त्यातून काय बघायचे व काय बघू नये, असाच प्रश्न प्रेक्षकाला सतावत असतो. शिवाय त्यातल्या प्रत्येक वाहिन्यांचा आपणच सर्वाधिक प्रेक्षकांची पसंती असल्याचाही दावा असतो. जसजसे वाहिन्यांचे पसारे वाढत गेले तसतसे त्यात विविधताही येत गेली. कौटुंबिक मालिका व वृत्तवाहिन्यांच्या पलिकडे विशिष्ट विषयाला वाहिलेल्या वाहिन्याही आल्या आहेत. त्यात इन्व्हेस्टिगशन डिस्कव्हरी ही पहिलीच गुन्हेतपास दाखवणारी एकमेव वाहिनी असल्याचा दावा केला जातो. त्यात बहुतांश अमेरिकेतील गुन्ह्यांचा तपास व पाठपुरावा असलेल्या सत्यकथा दाखवल्या जातात. काही प्रत्यक्ष चित्रण तर काही नाट्यरुपांतर असे त्याचे स्वरूप असते. पण त्यातून गुन्हेतपास, त्यामागची प्रक्रिया समजायला खुप मदत होते. त्यातही अमेरिकन गुन्हे तपासात कायद्याची काटेकोर बंधने असल्याने भक्कम पुरावे-साक्षी हाताशी नसताना कुणाला हात लावता येत नसल्याने किती सुक्ष्म तपास चालतो, त्याचीही जाण येऊ शकते. आपल्या देशात जशा वाहिन्या व वृत्तपत्रे बोंबा ठोकतात, तसाच तिथेही गदारोळ चालतो. पण म्हणून कुणालाही उगाच उचलून आत टाकले असे होत नाही. कित्येक प्रकरणे तर दोनतीन दशके अनुत्तरीत राहिलेली असतात आणि त्याचाही शोध अधूनमधून नवी माहिती आल्यावर नव्याने सुरू केला जात असतो. त्याच्याही गोष्टी या वाहिनीवर बघता येतात. ते बघितले, मग आपल्याकडे अशा अनेक प्रकरणात पोलिसांना आरोपी असल्यासारखे पेश करणार्‍या माध्यमे व पत्रकारांची खरेच कींव येते. कारण अशा चर्चा करणारे पत्रकार व शहाणे शुद्ध मुर्खपणा करत असतात. त्यांना गुन्हेतपास म्हणजे काय, त्याचा थांग लागलेला नाही याची स्पष्ट जाणिव होते.

अशाच एका सत्यकथेत कुठल्याशा अमेरिकन शहरामध्ये लागोपाठ महिलांच्या हत्या होत असल्याचे एक प्रकरण महिन्याभरापुर्वी दाखवले गेले. त्यातला प्रमुख डिटेक्टिव्ह जंग जंग पछाडतो, पण त्या सिरीयल किलरचे प्रकरण त्याच्या कारकिर्दीत अनुत्तरीतच रहाते. मात्र पोलिस सेवेतून निवृत्त झाल्यावरही त्या महिलांचे चेहरे त्याला सतावत असतात आणि त्या गुन्हेगाराला शोधून काढायची त्याच्या मनातली इच्छा मरत नाही. अकस्मात एके दिवशी आपल्या दिवंगत पित्याच्या जुन्या वस्तू व कागदपत्रांचा पसारा आवरत असताना त्या माजी डिटेक्टीव्हच्या हाती काही अशा गोष्टी लागतात, की त्याचे कुतूहल जागे होते. तो पुन्हा पोलिस ठाण्यात जाऊन नव्या तपास अधिकार्‍याला त्या दोन दशके जुन्या प्रकरणाचा तपास नव्याने सुरू करायचा आग्रह धरतो. हळुहळु ते प्रकरण प्रगती करू जाते आणि त्या जुन्या हत्याकांडाचे रहस्य उलगडू लागते. मात्र त्याचा उलगडा सर्वांनाच धक्कादायक असतो. कारण ह्या निवृत्त डिटेक्टीव्हचा मृत पिताच त्यातला हल्लेखोर असतो. आता त्याच्यावर खटला भरणे अशक्य असते. पण निदान सत्याचा शोध लागला याचे समाधान असते. आपलाच पिता इतका भयंकर मारेकरी असल्याची वेदना बोचरी असली तरी गुन्ह्याचा तपास पुर्ण केल्याचे समाधान मोठे असते. इथे हे सांगायचा मुद्दा इतकाच, की घटनाक्रम घडताना ज्या घरात डिटेक्टीव्ह रहात असतो, तिथेच मारेकरीही वास्तव्य करीत असतो. पण तरीही तपास करणार्‍याला त्याचा सुगावाही लागू शकलेला नसतो. गुन्ह्याचा तपास हा इतका गुंतागुंतीचा मामला असतो. पुस्तकातले किंवा परिक्षेतले गणित सोडवावे तसे गुन्ह्याचे रहस्य उलगडत नसते. त्यात अनेक रहस्ये व कोडी सोडवत जुळवाजुळव करावी लागत असते. त्याचे भान ज्यांना असेल, त्यांना दाभोळकर वा पानसरे यांच्या मारेकर्‍यांना पकडण्यात कोणती अडचण आहे, त्याचा अंदाज येऊ शकेल.

अर्थात अमेरिकन व भारतीय गुन्हे तपासाची पद्धत भिन्न आहे. तसेच कायदेही भिन्न आहेत. आपल्याकडे पोलिस इतके उत्साहाने कुठल्या गुन्ह्याचा तपास करीत नाहीत आणि कुठल्याही पुराव्याशिवाय कोणालाही नुसत्या आरोपाखाली अटक करायची कायदेशीर तरतुद असल्याने शेकडो गुन्ह्याचा कधीच उलगडा होत नाही. ठराविक मुदतीपर्यंत संशयिताला गजाआड ठेवण्याची मुभा पोलिसांना असल्याने गदारोळ झाला, मग माध्यमांना शांत करण्यासाठी पोलिस तडकाफ़डकी कोणालाही अटक करून त्याच्यावर आरोप ठेवतात. पुढे तपासात त्याच्याविरोधात कुठलाही पुरावा नसल्याने व मुदत संपल्याने त्याला जामिनावर मुक्त करावे लागते. सहाजिकच पोलिसांना तपासापेक्षा माध्यमातील पोपटपंची व राजकीय गदारोळ थांबवण्याला प्राधान्य द्यावे लागते. परिणामी कोणालाही गजाआड टाकून विषय गुंडाळण्याची प्रवृत्ती वाढली आहे. दाभोळकर पानसरे अशा दोन्ही गंभीर प्रकरणात नेमके तेच झालेले आहे. पोलिसांनी कोणतेही दावे करोत. ह्या गुन्ह्यांच्या तपासाचा आता पुरता बोर्‍या वाजला आहे. मात्र त्याचे खापर एकट्या पोलिसांवर किंवा सरकारवर फ़ोडता येणार नाही. ज्यांनी या दोन्ही हत्यांचे राजकारण करण्यात धन्यता मानली, तेच या अपयशाचे खरेखुरे धनी आहेत. कारण त्यांनी पोलिसी पद्धतीने व प्रक्रियेने गुन्ह्याचा तपास होऊ नये, याची पुरेपुर काळजी घेतली आहे. काही तासातच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नथूराम प्रवृत्ती यामागे असल्याचे विधान केले आणि मग तथाकथित पुरोगाम्यांनी हिंदूत्ववाद्यांच्या विरोधात राजकीय काहुर उठवले. मग पोलिसांवर यासाठीच दबाव आणला गेला, की दोन्ही प्रकरणातूल खरे मारेकरी वा खुनी शोधायचे नसून, त्यात हिंदूत्ववाद्यांना आरोपी बनवायचे आहे असे संकेतच पोलिसांना दिले गेले. तिथून हा विचका सुरू झाला. आणि त्याचा सगळा दोष त्याचे राजकारण करणार्‍यांना द्यावा लागेल.

दाभोळकर वा पानसरे यांची हत्या बघितली तरी एक गोष्ट स्पष्ट जाणवते, की त्यांना गोळ्या घालणारे कोणी हौशी लोक नाहीत. ते अत्यंत कुशल नेमबाज व व्यवसायी हल्लेखोर आहेत. ज्यांना गुन्हेगारी भाषेत शार्पशूटर म्हटले जाते. नेमक्या व मोजक्या गोळ्या झाडून झटपट निसटण्याची कला अवगत केलेले खुनी यात गुंतलेले होते व त्यांना पकडले असते तर त्यांना हे काम सोपवणार्‍या सुत्रधारापर्यंत पोहोचणे शक्य होते. त्यासाठी पोलिस नेहमी नाकाबंदी व अन्य ठराविक प्रारंभिक उपाय योजत असतात. इथे पहिल्या क्षणापासून सनातन वा अन्य कुणाला कधी पकडणार; असा ससेमिरा पोलिसांच्या मागे लावला गेला. त्यामुळेच नेहमीच्या पद्धतीने खुनाचा तपास होऊच शकला नाही. खुनी पकडण्यापेक्षा राजकीय आरोपबाजीला लगाम लावण्यात पोलिसांचा वेळ वाया घालवण्यात आला आणि ते काम स्वत:ला दाभोळकर वा पानसरे यांचे पाठीराखे म्हणवणार्‍यांनीच केले. पण त्यांच्या उत्साहाने वा मुर्खपणाने खर्‍या मारेकर्‍यांना निसटून जाण्यात यश मिळू शकले. की जाणिवपुर्वक तशी परिस्थिती निर्माण करण्यात आली? गुन्हे वा हत्या प्रकरणात दोन मुद्दे कळीचे असतात. हत्येचा हेतू व लाभार्थी. त्याचा मागोवाच पोलिसांना घेऊ दिला गेला नाही. मोक्याची वेळ निघून गेल्यावर असे तपशील हाती लागत नसतात. म्हणून शंका येते, की दाभोळकर-पानसरे यांच्याविषयी आस्था दाखवणार्‍यांना खरेच खुनी हवे होते, की खुन्यांना निसटून जाण्यात या लोकांना रस होता? असेल तर पोलिस बाजूला ठेवून त्या दोघांच्या पुरस्कर्त्यांनी हल्लेखोर शोधण्याचा किती व कोणता प्रयत्न केला? इच्छा असेल तर सामान्य माणूसही खतरनाक गुन्हेगार शोधू शकतो व पकडून देऊ शकतो. ‘आम्ही सारे दाभोळकर’ असे मिरवणार्‍यांनी त्या दिशेने एकही पाऊल का टाकले नाही? फ़क्त इव्हेन्ट व सोहळा करण्यापलिकडे यातल्या कोंणीच काहीही हालचाल कशाला केलेली नाही? दाभोळकर पानसरे यांच्याविषयी खरी आस्था असलेले लोक काय करू शकले असते आणि पोलिसांपेक्षा हेच लोक खरा मारेकरी कसा शोधू शकले असते? पुढल्या भागात त्याचा आढावा घेऊ. (अपुर्ण)