शिना बोरा ही एक हत्या आहे आणि त्याचा तपास घेण्यासाठी इतका आटापिटा कशाला चालू आहे? त्याचे कोडे अनेकांना पडलेले आहे. राज्यात दुष्काळाचे भयानक सावट आहे, तिकडे दिल्लीत समान पेन्शनसाठी माजी सैनिक बेमुदत उपोषण करीत आहेत आणि इथे अनेक प्रश्न करोडो भारतीयांना भेडसावत आहेत. अशावेळी माध्यमात शिना बोरा व इंद्राणी मुखर्जी यांच्याविषयी इतका उहापोह कशाला, असे प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. माध्यमांचे व प्रामुख्याने नव्याने उदयास आलेल्या विविध माध्यमांचे प्राण शिन बोरासाठी इतके कंठाशी कशामुळे आलेत? त्याचे रहस्य कोणीच उघड करीत नसल्याने सामान्य वाचक व प्रेक्षकाच्या मनाचा गोंधळ उडणे चुकीचे नाही. शिनाची हत्या होऊन तीन वर्षे उलटली तेव्हा गप्प वा निष्क्रीय राहिलेले पोलिसही आताच इतके कर्तव्यदक्ष कसे होतात, ह्याचेही नवल वाटू शकते. पण त्याचे कारण स्पष्ट आहे. मुळात शिना बोरा बेपत्ता होती तरी मारली गेली; हेच पोलिसांना ठामपणे ठाऊक नव्हते आणि जेव्हा ते त्यात सहभागी असलेल्या श्यामवर रायने त्याचा बोभाटा केला म्हणुन तपास सुरू झाला. मात्र जेव्हा तपास सुरू झाला, तेव्हा त्यातले धागेदोरे बघून खुद्द पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनाच त्यात हजेरी लावण्याची वेळ आली. कॉ. पानसरे किंवा डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासासाठी कोणी एक ज्येष्ठ अधिकारी नेमून आयुक्त मोकळे होतात आणि शिनाच्या हत्येच्या तपासात अहोरात्र आयुक्त कशाला सहभागी होत असतील? त्याचे उत्तर शोधावे लागेल. कारण त्याच विषयावर आठवडाभर बोलणार्या कुणा पत्रकाराने याबाबतीत प्रकाश टाकायचे कष्ट घेतलेले नाहीत. त्यासाठीच्या बातम्या शोधल्या तर सापडतील, अशा कुठेतरी लपलेल्या आहेत. तशीच एक बातमी ‘दिव्य मराठी’च्या साईटवर वाचनात आली. ज्येष्ठ संपादक शेखर गुप्ता यांचा तो लेख महत्वाचा ठरावा.
दिसायला शिनाची हत्या सर्वसामान्य घटना आहे. पण तपास केवळ त्या हत्येचा चालू नाही, तर त्या निमीत्ताने देशात दोन दशकात बोकाळलेल्या माध्यम समुहांच्या बेताल मस्तवालपणाचा आहे. कशा रितीने या कालखंडात भारतीय बुद्धीजिवीवर्ग व प्रतिष्ठीत समाजाच्या व्यावहारिक जीवनाशी खेळ करण्यात आला, त्याचाच आलेख शेखर गुप्ताने सूचक पद्धतीने व सूचक भाषेत त्या लेखातून मांडला आहे. शेखर म्हणतो. ‘मर्डोक यांचा "स्टार' तेव्हा मोठ्या आनंदाने भारतीय नियमन तंत्राशी खेळी खेळत होता. ही मंडळी मालकाच्या कठपुतळ्या आणि निनावी मध्यस्थ उभी करत होती. इंद्राणीच्या कथेच्या आर्थिक बाजूचा तपास येथपासूनच सुरू व्हायला हवा.’ १९९८ नंतर भारतात चॅनेलचे पेव फ़ुटले. त्याची सुरूवात स्टार या नेटवर्कने केली. त्याचा भारताला मुख्याधिकारी पीटर मुखर्जी होता. लहानसहान मनोरंजनाच्या वाहिन्या सुरू करणारे तेच पहिले नेटवर्क भारतात होते आणि त्याचा सुत्रधार ऑस्ट्रेलियन व्यापारी भांडवलदार रुपर्ट मर्डोक हाच होता. त्याने पैसा ओतून भारतीय कठपुतळ्या उभ्या केल्या आणि त्यांना खेळवून भारतीय माध्यम क्षेत्रात धुमाकुळ घालायला आरंभ केला. त्याचा इथला म्होरक्या पीटर होता. आज जे कोणी विविध वाहिन्या व नेटवर्कचे मुख्याधिकारी आपण बघतो, त्यांचा आद्यपुरूष पीटर आहे. ज्याने मर्डोकची कठपुतळी म्हणून इथे स्टार नेटवर्कचा पसारा उभा केला. कुठलेही बालंट आपल्या थेट अंगावर येऊ नये ,अशी खेळी मर्डोक करत होता. पत्रकारिता व सर्जनशीलता यांतल्या बुद्धीमान मेंदूंना पैशाची आमिषे दाखवून गुलामगिरीत लोटायचे काम त्याने पीटरवर सोपवले होते. राजकारणी, प्रशासकीय मंडळी व प्रतिष्ठीत यांना या मायाजालात ओढून एक आभासी जग उभे करण्याच्या त्या खेळीत आज मिरवणारा बुद्धीजिवीवर्ग सहजगत्या फ़सत गेला. शेखर तेच सांगतो आहे.
आता थोडे मगे जाऊन भारतातल्या पहिल्या वृत्तवाहिनीची कथा तपासा. १९९८ सालात अकस्मात सोनिया गांधींनी संसार बाजूला ठेवून भारतीय राजकारणात संपत चाललेल्या कॉग्रेसला जीवदान देण्यासाठी लोकसभा प्रचारात उडी घेतली. प्रथमच सोनिया मोडक्यातोडक्या भाषेत भाषणे देवू लागल्या होत्या आणि लौकरच पक्षाध्यक्षाही झाल्या. स्टारन्युज ही वृत्तवाहिनी त्याच काळात अकस्मात सुरू झाली. अगदी स्पष्ट सांगायचे तर सोनियांच्या प्रचारार्थ ही वाहिनी सुरू झाली, असेही म्हणता येईल. त्या वाहिनीकडे आपले स्वत:चे पत्रकार वा अन्य कर्मचारीही नव्हते. ते काम प्रणय रॉय यांच्या एनडीटीव्ही या कंपनीने करावे, असा पाच वर्षाचा करार झाला होता. प्रक्षेपण मात्र स्टारन्युज म्हणून व्हायचे. पुढे तो करार संपत असताना प्रणय रॉय यानेच आपले दोन स्वतंत्र चॅनेल सुरू केले. हिंदी व इंग्रजी बातम्यांचे. तर स्टारने आपली मुळ वाहिनी हिंदी बातम्यांनी चालू ठेवली. त्यासाठी स्वतंत्रपणे संपादक पत्रकारांची भरती केली. पुढल्या काळात या दोन वाहिन्यांमध्ये काही ना काही काम केलेल्या प्रत्येकाने आपापल्या वाहिन्या काढण्यापर्यंत मजल मारली. आज ज्याला एबीपी न्युज वा एबीपी माझा म्हणून ओळखले जाते, त्या वाहिन्या त्याच मर्डोकच्या स्टारचे आजचे वारस होत. हा सगळा खेळ परदेशी गुंतवणूक व पैसे आणून खेळला जात होता. त्यासाठी मोठमोठे पगार देवून नामवंत संपादक व गुडघे टेकून मालकाच्या सेवेत लाळ घोटणार्यांची वर्णी लावली गेली, हे उघड गुपित होते. आपल्या लेखत शेखर गुप्ता ते सुचित करतो, पण थेट नावे घेत नाही. थोडक्यात एकूण पत्रकारिता व माध्यमांना भ्रष्ट करण्याचा खेळ या कालखंडात केला गेला आणि त्यासाठी हवाला वा काळापैसा मुक्तहस्ते वापरला, फ़ितवला व खेळवला गेला. त्यात पैसे गुंतवणारे कोण याचा तिथे काम करणार्यांनाही थांगपत्ता नव्हता.
पीटर मुखर्जी व इंद्राणी यांनी काढली व बुडवली त्या आय एन एक्स कंपनीचा एक गुंतवणूकदार अमेरिकेतल्या मोठ्या गाजलेल्या अफ़रातफ़रीचा आरोपी म्हणून आज तिथल्या गजाआड आहे. रजत गुप्ता असे त्याचे नाव. इतके सांगितले मग शिना बोरा प्रकरणाचा खोलवर जाऊन तपास कशासाठी चाललाय त्याचा थोडाफ़ार अंदाज येऊ शकेल. कारण तो एका तरूण मुलीच्या आईने केलेल्या खुनाचा तपास नसून मागल्या दोन दशकात माध्यम क्षेत्रात धुमाकुळ घालून काळ्यापैशाच्या बळावर भारताच्या राजकीय व आर्थिक धोरणांशी जो खेळखंडोबा करण्यात आला, त्याच्याशी निगडीत असलेले धागेदोरे शोधण्याचा तपास आहे. विस्तारलेल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांची सर्व शक्ती पणाला लावून तब्बल बारा वर्षे गुजरातच्य दंगलीचे जे आख्यान लावले गेले, त्यातून मोदी वा त्यांच्या राजकारणाला सुरुंग लावण्य़ाचा जो डाव खेळला गेला होता, त्याचे अनेक दुवे शिना बोरा हत्याकांडाच्या तपासातून उघड होत जाणार आहेत. त्यात कित्येक नामवंत संपादक, प्रतिष्ठीत गुंतवणूकदार, माध्यमसमुहाचे मालक, राजकीय नेते व उद्योगपती यांचे मुखवटे फ़ाटत जाणार आहेत. मात्र त्यात कुणाकुणाचे नाव किंवा हातपाय अडकलेत त्याचा कुणालाच अंदाज येईनासा झाला आहे. म्हणून तर अन्य कुठल्या किरकोळ विषयात पांडित्य सांगणारे शोभा डे, महेश भट, आमिर खान, आदि इत्यादी प्रतिष्ठीत मूग गिळून गप्प आहेत. काळा व बेहिशोबी पैसा गुंतवून सरकारच्या धोरणे व निर्णयांना प्रभावित करण्याचे हत्यार म्हणून माध्यमांचा कसा वापर झाला व गुंतलेल्यांचा पर्दाफ़ाश होण्याचे भय सतावत असल्याने अनेकजण निमूट बसले आहेत. म्हणून मुंबईचा पोलिस आयुक्त एका सामान्य वाटणार्या खुनाचा जातिनिशी तपास करतो आहे आठदहा तास बसून जबान्या घेतो आहे. शिनाचा मृतदेह सापडलेला नाही. पण तिच्या खुनाचा तपास करताना किती वाहिन्या व वृत्तपत्रांखाली दडपलेले कसल्या भानगडीचे मुडदे सापडतात, त्याच्या भयाने अवघे माध्यमजग भयभीत झाले आहे. शेखर गुप्ताचा लेख त्याची नुसती तोंडओळख आहे. म्हणून शेखर गुप्ता म्हणतो, ‘इंद्राणीच्या कथेच्या आर्थिक बाजूचा तपास येथपासूनच सुरू व्हायला हवा.’