Tuesday, March 4, 2014

व्हॉट नॉनसेन्स?



   गेल्या तीन वर्षात कॉग्रेसचे अब्जावधी रुपयांचे भ्रष्टाचार चव्हाट्यावर येत असताना राहुल गांधी गप्प होते. राष्ट्रकुल घोटाळ्यापासून स्पेक्ट्रम वा कोळसा घोटाळ्यापर्यंत त्यांची वाचा कायम बसलेलीच होती. अगदी त्यांचे भावोजी रॉबर्ट वाड्रा यांचे जमीन बळकाव किंवा कालपरवाच्या ऑगस्टा हेलिकॉप्टर घोटाळ्याबद्दलही राहुल चकार शब्द आजही बोलत नाहीत. पण नित्यनेमाने लोकांचे घोळके जमवून त्यांना भ्रष्टाचार विरोधाचे ज्ञानामृत अगत्याने पाजत असतात. आपणच पुढाकार घेतल्याने लोकपाल वा माहिती अधिकाराचा कायदा होऊ शकला; असे घसा कोरडा करून सांगताना हा माणूस कुठल्या धुंदीत जगतो, अशी शंका येते. कारण अण्णा हजारे व त्यांच्या सहकार्‍यांनी त्याच कायद्यांच्या मागण्यांसाठी दिर्घकाळ केलेले आंदोलन अवघ्या जगाला माहिती आहे. त्यात टांग अडवायचे काम कॉग्रेस पक्षच करीत होता आणि त्याच पक्षाचे राहुल नेता आहेत. याचा अर्थ इतकाच, की राहुलना वास्तव जगात काय चालले आहे, त्याचे अजिबात भान नसावे किंवा हा माणूस अस्सल थापाड्या असावा. असो, मध्यंतरी त्यांनी आपल्या शुद्ध चारित्र्याचे प्रदर्शन मांडायची एक मोहिम हाती घेतली होती आणि त्यासाठी स्वपक्षीय पंतप्रधानाला तोंडघशी पाडण्याचा अभिनव प्रयोगही यशस्वी केला होता. मनमोहन सिंग अमेरिकेत राष्ट्रसंघाच्या वार्षिक सभेला गेलेले असताना; इथे राहुलनी पंतप्रधानासह त्यांचे एकूण मंत्रिमंडळच कसे बेअक्कल आहे, त्याची पत्रकार परिषदेत कबुली देऊन टाकली होती. अमेरिकेतून माघारी येताच मनमोहन सिंग यांनी लगेच त्याला दुजोरा देऊन त्यानुसार कारवाई सुद्धा केली होती. दोन वर्षापेक्षा अधिक काळासाठी शिक्षा झालेल्या नेत्यांना कायदेमंडळातून बडतर्फ़ करण्याचा तो मामला होता.

   फ़ौजदारी कायद्यानुसार ज्यांना दोन वर्षापेक्षा अधिक शिक्षा झालेली असेल, त्यांना प्रकरण अपीलात असले तरी निवडणूक लढवण्यास प्रतिबंध घालणारा एक निकाल सुप्रिम कोर्टाने दिलेला होता. त्यानुसारच असे सदस्य कुठल्या कायदेमंडळात असतील, तर त्यांचे सदस्यत्व तात्काळ रद्दबातल करण्याचेही आदेश देण्यात आलेले होते. त्यात लालू व रशीद मसूद असे दोन नेते फ़सत होते. त्यांना वाचवण्यासाठी मग राहुलच्या भ्रष्टाचारमुक्त मनमोहन सरकारने अध्यादेश लागू करून पळवाट शोधण्याचा आटापिटा चालविला होता. त्यावर खुप गहजब झाला. त्यातून पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी राहुल गांधी भ्रष्टाचार मुक्तीच्या मोहिमेवर रवाना झाले. पण त्यांना त्या अध्यादेशाविषयी प्रश्न विचारले जाऊ लागले. तोपर्यंत अध्यादेश लागू झाला नव्हता. कारण मंत्रिमंडळाने त्याचा मसूदा मान्य करून सहीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवून दिला होता. सही होणारच या विश्वासाने मनमोहन सिंग अमेरिकेला निघून गेले होते. पण सही होण्याऐवजी आपण अध्यादेश काढून मुर्खपणा केल्याचा शोध पंतप्रधानांना लागला. तो अध्यादेश कसा कायद्याच्या राज्याचेच समर्थन असून न्याय्य आहे, ते कॉग्रेस प्रवक्ते अजय माकन पत्रकारांना समजावत होते. इतक्यात तिथे राहुल गांधी येऊन टपकले आणि त्यांनी माकनसह पत्रकारांच्या ज्ञानात मोठीच भर घातली. हा अध्यादेश काढून आपला पक्ष व त्याचे सरकार मुर्खपणा करीत असल्याने, तो अध्यादेश फ़ाडून कचर्‍याच्या टोपलीत फ़ेकून देण्याच्या लायकीचा आहे, असे त्यांचे बोधाम्रुत होते. इतका अनुभव घेतल्यावर राष्ट्रपती सही करायचे थांबले आणि त्यांनी मनमोहन सिंग येऊन पुढला काय मुर्खपणा होतो त्याची प्रतिक्षा केली. त्यातून मग राष्ट्रपतींनी अध्यादेशाविषयी एक धडा घेतला.

   तो धडा असा, की राहुलच्या तालावर नाचणारे युपीएचे विद्यमान मनमोहन सरकार अध्यादेश काढते, हाच मुर्खपणा असतो. त्यामुळे त्या सरकारच्या कुठल्याही अध्यादेशाला मान्यता द्यायची नाही किंवा त्यावर सही करायची नाही, हाच तो धडा. त्या गोष्टीला आता काही महिने उलटून गेले आहेत. कदाचित मनमोहनच कशाला राहुल सुद्धा तो घटनाक्रम विसरून गेलेले असतील. पण आपल्या राष्ट्रपती प्रणबदा मुखर्जींची स्मरणशक्ती मोठी दांडगी आहे. ते धडा विसरलेले नाहीत. आता लोकसभेची मुदत संपून गेलीय आणि राहुलना झटपट काही भ्रष्टाचारमुक्तीचे कायदे मंजूर करून हवे होते. ते शक्य झाले नाही. तेव्हा त्यांनी मनमोहन यांना नवा मुर्खपणा करायला फ़र्मावले. त्यांनीही आपल्या मंत्रीगणांना गोळा करून अडकून पडलेल्या सहा विधेयकांचे अध्यादेश जारी करण्याचा मार्ग शोधून काढला. पण कोणाच्या तरी डोक्यात आले, की राष्ट्रपती सही करतील काय? तेव्हा आधीच तशी विचारणा करण्यात आली. त्याला प्रणबदांकडून नकार मिळाला. वास्तविक लोकसभेची मुदत संपली असताना असे कुठलेही आध्यदेश काढणेच घटनाबाह्य आहे. कारण ते संमत करून घ्यायला आगामी लोकसभेत याच सरकारला बहूमत असण्याची हमी कोणी देऊ शकत नाही. पण कोणाला फ़िकीर आहे? राहुल म्हणतात, म्हणजे प्रत्येक मुर्खपणाही घटनात्मक असू शकतो, अशीच एकूण कॉग्रेसची आज मानसिकता आहे. सुदैवाने त्यातून प्रणबदा बाहेर पडलेत आणि राष्ट्रपती पदावर आसनस्थ झालेत. त्यांनी हा मुर्खपणा अडवला. जे पंतप्रधान असून मनमोहन सिंग यांना आजवर साधलेले नाही, ते प्रणबदांनी एका नकारातून करून दाखवले. म्हणूनच सहा अध्यादेश बारगळले आहेत. अध्यादेशाला ‘कंप्लीट नॉनसेन्स’ बोलणार्‍या राहुलना त्या शब्दांचा अर्थ आता कळला असेल.

No comments:

Post a Comment