Friday, March 7, 2014

सेक्युलर पांडवांची कथा


   याच आठवड्यात आयबीएन नेटवर्कने मतचाचणी घेतली होती. वास्तविक मागल्या आठवड्यात एका वाहिनीने चाचण्या घेणारे किती गडबड करतात, त्याचा छुप्या कॅमेराने पर्दाफ़ाश केला होता. त्यामुळेच अशा चाचण्यांविषयी मनात शंका निर्माण केलेल्या आहेत. पण त्या चाचण्याची विश्वासार्हता इथे महत्वाची नाही. या नेटवर्कने आपल्या विविध वाहिन्यांवर त्या चाचणीत विविध पक्षांना मिळू शकणारी मते व जागा यांचे अंदाज व्यक्त करून चर्चा केलेली होती. त्यात राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रवक्त्यांना बाजूला ठेवून जाणकार राजकीय अभ्यासक व विश्लेषकांना समाविष्ट करून घेतले होते. म्हणूनच चाचण्य़ा व एकूण राजकीय विश्लेषण विचार करायला लावणारे आहे. या चर्चेमध्ये भाग घेणारे बहुताश पत्रकार शेवटी आपापल्या राजकीय बांधिलकीचे असतात. त्यांचे कुठल्या पक्षाशी थेट संबंध असले नसले, तरी काही प्रमाणात त्यांच्या वैचारिक निष्ठा त्यांचे मत प्रभावित करीत असतात. मग त्यातला कोणी सेक्युलर डाव्या विचारांचा असतो, तर कोणी उजव्या विचारांचा असतो. क्वचितच त्यातला कोणी तटस्थपणे आपले मतप्रदर्शन करीत असतो. ‘द हिंदू’ या दक्षिणेतील प्रख्यात इंग्रजी दैनिकाचे सहयोगी संपादक पी. साईनाथ हे असेच तटस्थ पत्रकार आहेत. म्हणूनच त्यांच्यावर मग बांधिलकी मानणारे पत्रकार आपापल्या सोयीनुसार पक्षपाताचाही आरोप करीत असतात. पण त्याला महत्व नाही. परवा मतचाचणीच्या चर्चेत त्यांचाही सहभाग होता आणि सेक्युलर बाबतीत त्यांनी व्यक्त केलेले मत किंवा केलेला गौप्यस्फ़ोट मोलाचा ठरावा. आपल्या तमाम राजकीय चर्चेत सेक्युलर व जातीय अशी एक विभागणी दाखवली जाते. ती किती भ्रामक व फ़सवी आहे, त्यावरच साईनाथ यांनी नेमके बोट ठेवले.

   कुठल्याही मतचाचण्य़ा दाखवल्यानंतर वाहिन्यांवरच्या विद्वानांची चर्चा आपोआप सरकार कोण बनवू शकतो तिकडे वळते. त्यांनी काढलेले आकडे किंवा गेल्या सात लोकसभा निवडणूकीचे निकाल, कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहूमत देणारे नव्हते. इतकेच कशाला प्रत्येक निवडणूकीत कुठल्या एकाही निवडणूकपूर्व आघाडीलाही बहूमत मिळालेले नव्हते. त्यामुळेच मग चाचणीमध्ये तशीच स्थिती दिसली, तर कोण सरकार बनवू शकतो, तिकडे चर्चेचा रोख वळतो. त्यात मग पक्षांचे निवडून येणारे सदस्य कुठल्या गोटात जाऊन बसले, मग बहुमताचा पल्ला गाठला जातो, त्याची समिकरणे मांडली जातात. किंबहूना असा गणिते मांडण्याचाच खेळ सुरू होतो. त्यासाठी मग भाजपा जातीय व कॉग्रेस सेक्युलर अशी विभागणी सुरू होते. त्यात सेक्युलर मानले जाणारे पक्ष कॉग्रेस वा तिसर्‍या आघाडीत जातील काय आणि नसतील तर का जाणार नाहीत; त्याची मिमांसा होते. पुढे त्यापैकी उघड सेक्युलर पोपटपंची करणारे पण नंतर ‘जातीय’ भाजपाकडे जाऊ शकणारे पक्ष, अशीही शोधाशोध सुरू होते. मग असे नेहमी सेक्युलर गटात असणारे पक्ष निकालानंतर जातीय गटाकडे कसे जाऊ शकतात, याचीही मिमांसा होते. आजवर असे अनेकदा झालेले आहे. वाजपेयींच्या भाजपा सरकारमध्ये आजकालचे अनेक सेक्युलर पक्ष व नेते सहभागी होतेच. मग त्यापैकी कोण मोदींच्या बाजूला जातील, असा हिशोब सुरू होतो. मग अमुक पक्ष जाईल, तमूक नेता जाणारच नाही, याची हमी देणारे विश्लेषक कमी नाहीत. पण वैचारिक व तात्विक भूमिका इतक्या झटपट कशामुळे बदलतात? जातीयवादी मोदी वा भाजपा रातोरात सेक्युलर कशामुळे होऊ शकतात? साईनाथ यांनी नेमका तोच गौप्यस्फ़ोट केलेला आहे.

   साईनाथ म्हणाले, भाजपा व मोदींच्या सोबत जाण्याविषयी त्यांची आंध्रातील दोन पक्षांच्या नेत्यांशी चर्चा झाली. तेलंगणा राज्य समिती आणि जगन रेड्डी यांच्या पक्षांचे नेते जातीयवादी मोदींसोबत जाणारच नाही, याची छातीठोक हमी देत होते. कुठल्याही परिस्थितीत भाजपा वा मोदीच्या गोटात जाण्याचा विषय येत नाही, असे त्या दोन्ही सेक्युलर पक्षांचे ठाम मत होते. त्यानंतर साईनाथ यांनी त्यांना निकालानंतर काय होऊ शकते, असेही विचारले. प्रश्न असा होता की मोदी व भाजपा यांनी दोनशे सव्वा दोनशेहून अधिक जागा मिळवल्या तर काय होईल? त्यावर त्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी दिलेले उत्तर अतिशय बोलके व आजच्या राजकारणाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. ह्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे असे पडले, की लोक्सभेच्या दोनशेहून अधिक जागा मिळवणारा आपोआप सेक्युलर होऊन जातो. याचा स्पष्ट आणि व्यवहारी अर्थ असा आहे, की सेक्युलर नावाची कुठली विचारधारा किंवा भुमिका नसून निवडणूक निकाल व त्यातल्या आकड्यांवर सेक्युलर असण्या नसण्याची व्याख्या ठरत असते. म्हणूनच वाजपेयींच्या काळात १८० जागा भाजपाने मिळवताच आधीच्या सेक्युलर आघाडीतले चंद्राबाबू नायडू भाजपाच्या आघाडीत सहभागी झाले. वर्षभरात झालेल्या पुढल्या मध्यावधी निवडणूकीपुर्वीच देवेगौडांच्या जनता दलाला रामराम ठोकून शरद यादव आणि पासवानही जॉर्ज-नितीश यांच्या गोटातून भाजपाजवळ आले. सेक्युलर भूमिका व व्याख्या अशी निवडणूक कोण जिंकणार अथवा कोण सत्ता मिळवणार, त्यानुसार बदलत असते. आजच्या महाभारतीय राजकारणात जिंकण्यासाठी पांडव असावे लागत नाही, तर जिंकण्याच्या आधी सगळेच कौरव असतात, लढाई जिंकणारा पांडव असतो. सेक्युलर पांडव कोण, ते निश्चित करण्यासाठीच तर निवडणूकीचे महाभारत होत असते ना?

1 comment:

  1. हेच तर अडवानी ना समजले नाही . आणि आत्ता राजनाथ सिंह ला समजत नाहीये .

    ReplyDelete