Sunday, March 2, 2014

लालूंचा थयथयाट



   जसजसे प्रत्यक्ष निवडणुकीचे दिवस जवळ येत चालले आहेत, तसतसे राजकारण झपाट्याने बदलत चालले आहे. कालपरवाच भाजपाच्या गोटात पासवान येऊन दाखल झाले; तेव्हा त्यांचे जुने सहकारी लालू यादव यांनी संताप व्यक्त केला होता आणि आपणच कॉग्रेसचे बिहारमधील कसे एकमेव निष्ठावान विश्वासू मित्र आहोत, त्याची ग्वाही दिलेली होती. पण दोनच दिवसात लालूंचा भ्रमनिरास झाला आणि त्यांना दिल्ली सोडून पाटण्याला परतावे लागले. चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा झालेले लालू आता निवडणूक लढवू शकणार नाहीत. पण आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना आपल्या अनुयायांना निवडून आणणे भाग आहे. त्यातून राजकीय क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवणे त्यांना अपरिहार्य आहे. पण आजच्या बिघडलेल्या, विस्कटलेल्या राजकीय समिकरणात त्यांना आपले बालेकिल्ले टिकवणेही अवघड होऊन बसले आहे. कारण मागल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत त्यांची सर्वच गणिते फ़सलेली आहेत. तेव्हा त्यांनी कॉग्रेसला त्याची जागा दाखवण्यासाठी बाजूला ठेवून लोकसभा लढवलेली होती. त्यात सफ़ाई झाल्यावर पुन्हा लालू कॉग्रेसच्या वळचणीला जाऊन बसले. पण मग राहुलनी लालूंना बाहेरच ठेवले. सहाजिकच पुन्हा विधानसभा पासवान यांच्याच सोबत लढवावी लागली. त्यात दोघांचा पुर्ण सफ़ाया झाला. आता तर कॉग्रेस भ्रष्टाचाराच्या आरोपांनी बदनाम झालेली आहे आणि लालू भ्रष्टाचाराच्या आरोपांनी बोजाखाली वाकलेले आहेत. म्हणूनच नितीशकुमार व भाजपाच्या जोडीने त्यांचा पुरता सफ़ाया केला होता. त्यातून तिघांना सावरणे शक्य नव्हते. पण पासवानांना ती संधी नितीशनी उपलब्ध करून दिली. पासवान भाजपाकडे आले आणि लालू एकटे पडलेत.

   कॉग्रेस भ्रष्टाचाराच्या आरोपात व घोटाळ्यांच्या गाळात रुतून बसलेली असताना राहुल गांधींना केजरीवाल व्हायची हुक्की आलेली आहे. त्यामुळेच त्यांनी लालू व अन्य भ्रष्ट पक्षांना सोबत घ्यायचे नाकारलेले आहे. मात्र लालूंची त्यातून पुरती कोंडी होऊन गेली आहे. मागल्या वेळी लालू कॉग्रेसला फ़ार तर बिहारच्या चारच जागा देत होते. यावेळी त्यांनी अधिक जागांचा सौदा चालविला होता. तरीही कॉग्रेस बोलायला तयार नाही. तुरूंगातून जामीन मिळताच दिल्लीला येऊन सोनिया व राहुल यांच्या भेटीगाठी करण्यात लालूंचा वेळ गेला. त्यामुळे त्यांनी पासवान यांनाही टांगून ठेवलेले होते. कॉग्रेसकडून जागांचे समिकरण स्पष्ट होत नाही, तोपर्यंत पासवानांना लालू कुठला शब्द देऊ शकत नव्हते. त्यामुळेच भाजपाने देऊ केलेल्या सात जागा स्विकारून पासवान भाजपाच्या गोटात दाखल झाले. पण म्हणून लालू विचलित झालेले नव्हते. त्यांना दुर्बळ कॉग्रेस आपल्याकडे जागावाटपासाठी येणार याची खात्री होती. म्हणुन पासवान गेले तरी लालू खंबीर दिसत होते. मात्र आठवडाभर दार ठोठावूनही कॉग्रेसचा कोणी नेता दाद देत नाही, म्हटल्यावर लालूंचा धीर सुटला. कारण दिल्लीत लालू बसलेले असताना नितीशकुमार त्यांच्या पक्षातच फ़ाटाफ़ूट घडवित होते. ते बंड मोडून काढले, तरी लालूंना दिल्लीत बसणे शक्य नव्हते. म्हणूनच कॉग्रेसने झटपट जागावाटप उरकावे, ही त्यांची अपेक्षा होती. ती दोन दिवसाची प्रतिक्षा केल्यावर फ़ोल ठरली. कॉग्रेसच्या नादाला लागून त्यांनी पासवान हा मित्र आधीच गमावला होता. आता दिल्लीत आशाळभूत बसून बिहारमध्ये पक्षही गमावण्यापेक्षा त्यांनी माघारी जायचा पवित्रा घेतला. पाटण्यातूनच लालूंनी मग कॉग्रेसला फ़ार तर अकरा जागा देऊ, अन्यथा सर्वच जागा स्वबळावर लढवू; अशी गर्जना केलेली आहे.

   स्वबळावर सर्व जागा लढवणे शक्य नाही, हे लालूंनाही कळते. म्हणूनच त्यांनी मागल्या दहा वर्षात मित्रपक्षांच्या सोबतीने अनेक निवडणूका लढवलेल्या आहेत. कारण सर्व जागी चांगली मते मिळवण्याची लालूंच्या पक्षाची क्षमता असली, तरी तेवढी मते जिंकायला उपयुक्त नसतात. निवडणूका नुसत्या झुंज देण्यासाठी नसतात, लढवल्या त्यापैकी काही जागा जिंकायचीही ताकद असावी लागते. पासवान वा कॉग्रेससारख्या दुबळ्या पक्षाला सोबत घेतले; मग अशा काठावर मते मिळवून पडणार्‍या उमेदवारांना जिंकून आणता येते, हे गणित लालूंना नेमके कळते. त्यासाठीच त्यांनी कॉग्रेसचे दार महिनाभर ठोठावण्यात घालवला. शिवाय आपली मर्यादित मते नसतील, तर लालू स्वबळावर लढतील, पण असलेल्या चार जगाही टिकवू शकत नाहीत; हे कॉग्रेसलाही पक्के ठाऊक आहे. म्हणूनच त्या पक्षानेही लालूंशी लालूंच्या अटीवर आघाडी करण्यात टाळाटाळ चालवली आहे. जितका विलंब होईल तितके लालू अधिक सवलतीला तयार होतील; अशी कॉग्रेसची अटकळ आहे. आपण पुन्हा सत्तेत येणार नाही, हे कॉग्रेसही जाणते. पण पराभूत होताना त्यांना लालूंसारख्या मित्रांना शिरजोर होऊ द्यायचे नाही. कारण असे मित्र संपतील, तितकी त्यांच्या पारड्यात पडणारी मुस्लिम दलित मते पुढे कॉग्रेसच्या वाट्याला येतात; हा जुनाच अनुभव आहे. म्हणूनच कॉग्रेस दुर्बळ असते तिथे लालूंसारखे मित्र सोबत घेते आणि पुढल्या काळात त्यांना फ़स्त करून त्यांची मते बळकावते. कॉग्रेसला पाठींबा देऊनही कधी त्याच्याशी निवडणूकपुर्व युती मायावती व मुलायम तेवढ्यासाठीच करीत नाहीत. लालू व पासवान यांच्यासह डाव्यांनी ती चुक केली. त्याचीच ही विषारी फ़ळे त्यांना चाखावी लागत आहेत. लालूंचा थयथयाट त्याच पश्चात्तापातून आलेला आहे.

No comments:

Post a Comment