Wednesday, September 6, 2017

कोरियन कथा, चीनी व्यथा

n korean dictator के लिए चित्र परिणाम

केले तुका झाले माका असे म्हणायची वेळ आता चीनी राज्यकर्त्यांवर यायला लागली आहे. कम्युनिस्ट राज्यव्यवस्थेतून बाहेर पडून नव्या भांडवलदारी व्यवस्थेत रुजू झालेल्या चीनने सरकारी रोजगार हमी सुरू केली आणि प्रचंड पैसा मिळवला. तो पैसा विविध मार्गाने गुंतवताना चीनला जागतिक महाशक्ती होण्याचे वेध लागले आणि त्यातून आजच्या चीनसाठी नव्या राजकीय समस्या उभ्या राहिल्या आहेत. विसाव्या शतकातून अनेक राजकीय अभ्यासक व नेते बाहेर पडू शकलेले नाहीत. त्यामुळे एकविसाव्या शतकात जुन्या कालबाह्य डावपेच खेळण्याचा मोह त्यांना आवरत नाही. ज्या मार्गाने सोवियत युनियन वा महायुद्धानंतरची अमेरिका गेली, त्याच मार्गाने म्हणूनच चीन वाटचाल करीत राहिला. त्याचेच परिणाम आता त्या देशाला भोगावे लागत आहेत. एका बाजूला भारताला शह देण्यासाठी चीनने पाकिस्तानचा भस्मासूर पोसलेला होता आणि दुसरीकडे आपला पारंपारिक दुष्मन जपानला त्रास देण्यासाठी उत्तर कोरियाचा नवा भस्मासूर निर्माण केलेला होता. आता त्याच भस्मासूराला लगाम लावण्याची वेळ चीनवर आलेली आहे आणि तो आवाक्यात किती येईल, तेही चीनच्या लक्षात येईनासे झाले आहे. अन्यथा ब्रिक्सच्या मुहूर्तावर कोरियाने चीनला गोत्यात घालणारी खेळी केली नसती. इकडे ब्रिक्सची परिषद चालू होती आणि तीच वेळ साधून कोरियाच्या हुकूमशहाने नव्या शक्तीशाली हायड्रोजन बॉम्बचा स्फ़ोट केला आहे. त्यामुळे अकस्मात जागतिक महायुद्धाची भिती अनेकांना वाटू लागली आहे. मग त्याला कोण रोखू शकतो? कोरियन किम जोंग या हुकूमशहाला अमेरिका कितीही धमक्या देत असली, तरी तो त्यांना कधीही भीक घालत नाही. म्हणूनच आता ते प्रकरण हाताबाहेर गेलेले आहे. हा हुकूमशहा चीनी वर्चस्वालाही दाद देईल असे वाटत नाही. कारण तो नुसता हुकूमशहा नाही तर माथेफ़िरू आहे.

कुठलाही माथेफ़िरू जोवर तुमच्या मर्जीतला असतो, तोपर्यंतच तुम्हाला सन्मानाने वागवत असतो. पण एकदा त्याचा आत्मविश्वास वाढला, मग तो कोणालाच दाद देत नाही. जपान वा दक्षिण कोरिया अशा शेजारी देशांना अमेरिकन दोस्त म्हणून सतावण्यासाठी चीनने कोरियन हुकूमशाहीला सतत पाठींबा दिलेला होता. किंबहूना जगातल्या बहुतांश देशांनी कोरियाच्या हुकूमशहावर बहिष्कार घातलेला आहे. अशाही स्थितीत हा देश इतकी मस्ती करतो, कारण आता चीनलाच आपली गरज अधिक असल्याची त्याला जाणिव झालेली आहे. चीनच्या विरोधातले देश म्हणून पुर्वेकडील अनेक देशांना अमेरिकेने आपले मित्र बनवून घेतले. बलाढ्य चीनच्या कम्युनिस्ट आक्रमणापासून आपली सुरक्षा साधण्यासाठी चीनच्या अनेक शेजार्‍यांनीही अमेरिकन गोटात जाणे पसंत केले. पण तो काळ जुना होता. आता एकविसाव्या शतकात राजकारण व राजकीय भूगोल आमुलाग्र बदलून गेला आहे. त्यामुळे जुन्या स्थितीनुसार कृती वा रणनिती उपयोगाची राहिलेली नाही. पण दुसरीकडे अमेरिकेचे जुने दोस्त कायम आहेत आणि त्यात दक्षिण कोरियाचा समवेश आहे. त्या देशाला उत्तर कोरियाचा हुकूमशहा नेहमी धमक्या देत आलेला आहे. त्यामुळेच आपल्या मित्रांसाठी अमेरिकेने त्या त्या देशात अत्याधुनिक शस्त्रास्त्रे तैनात केलेली आहेत. सहाजिकच त्यांचा वापर युद्धजन्य स्थितीत होऊ शकतो. त्याचा रोख अर्थातच कोरियावर असेल. पण त्याचीच पाठराखण करणार्‍या चीनलाही त्याच्या झळा बसू शकतात. सहाजिकच युद्धस्थिती निर्माण होऊ नये, अशी काळजी चीनला घेणे अगत्याचे आहे. अन्यथा कोरिया बाजूला राहून सर्व जग युद्धाच्या खाईत ओढले जाऊ शकते. त्यामुळेच त्यापासून जगाला वाचवायचे असेल, तर चीनलाच पुढाकार घ्यावा लागेल. कारण उत्तर कोरिया नुसताच चीनचा शेजारी नाही, तर चीनने केलेली सर्व प्रगती वा उद्योग विकास कोरिया सीमेलगतच्या भागातच केंद्रीत झालेला आहे.

चीनच्या विकास उद्योग नकाशावर नजर टाकली तर एक गोष्ट स्पष्ट होते, की भारतालगतच्या चीनची फ़ारशी प्रगती झालेली नाही. जगातला सर्वात मोठा औद्योगिक कारखाना म्हणून ज्या चीनकडे बघितले जाते, ती प्रगती पुर्वेच्या बाजूला केंद्रीत झालेली आहे. कोरियाच्या वरच्या बाजूला असलेल्या चीनमध्ये जितका विकास झाला आहे, त्याच्या तुलनेत पश्चिमेकडला चीन ओसाड व उजाड आहे. सहाजिकच कोरियाने युद्धस्थिती निर्माण केली व त्याची नुसती झळ लागली, तरी चीनच्या विकसित भागाला मोठा फ़टका बसू शकतो. म्हणूनच उद्या अमेरिकेने कोरियाला धडा शिकवण्याचा पवित्रा घेतलाच किंवा कोरियन हुकूमशहाने आत्मघाती निर्णय घेतल्यास, चीन गोत्यात येण्याची शक्यता आहे. सहाजिकच कोरियाला आवरणे ही चीनची जबाबदारी झालेली आहे. पण त्याला आवरणार कसा? आज तरी चीन वगळता कोरियाचा कोणी अन्य देश मित्र राहिलेला नाही. आपल्या जागतिक संपर्क व व्यापार व्यवहारासाठी त्या देशाला चीनी मदतीवर विसंबून रहावे लागत असते. सहाजिकच त्याला मिळणारी रसद तोडून चीनच त्या हुकूमशहाची कोंडी करू शकतो, हे सत्य आहे. पण म्हणूत ते बरोबर आहे असे होत नाही. हुकूमशहा हे अत्यंत अहंकारी व अहंमन्य असतात. त्यांना आपल्या देशातील वा अन्य कुठल्याही जनतेच्या सुरक्षेची वा भवितव्याची फ़िकीर नसते. आपल्या अहंकारासाठी असे हुकूमशहा कुठल्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे उद्या चीनने कोंडी केल्यास पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे हा हुकूमशहा चीनवरही उलटू शकतो. अमेरिका बाजूला राहिल आणि चीनलाच कोरियन बॉम्बची शिकार व्हायला लागली, तर नवल वाटण्याचे कारण नाही. इराकचा सद्दाम किंवा लिबियाचा गडाफ़ी ही त्याची अलिकडली उदाहरणे आहेत. त्यामुळेच कोरिया ही चीनसाठी मोठी डोकेदुखी झाली आहे असे मानणे भाग आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप कितीही अतिरेकी व आक्रस्ताळे गृहस्थ असले, तरी तिथली राज्यव्यवस्था त्यांना माथेफ़िरू कृती करायची मोकळीक देत नाही. म्हणूनच त्यांनी काही युद्धखोर भूमिका घेण्याची शक्यता कमी आहे. पण तशी हमी कोरियाच्या किम जोंग बाबतीत देता येत नाही. चीनने आपली कोंडी केल्यास हा हुकूमशहा चीनलाही धडा शिकवण्याचा पवित्रा घेऊ शकतो. कारण चीनी सहकार्य हा त्याचा प्राणवायू आहे. तो तोडला जाणार म्हटला, मग हा माथेफ़िरू चवताळून काहीही करण्याचा धोका आहे. पण तसे झाले तर अमेरिका बाजूला राहिल व दक्षिण आशिया युद्धात ओढला जाईल. त्याचे सर्वाधिक दुष्परिणाम चीनलाच भोगावे लागतील. कारण चिनी व्यापार उदीम तिथल्याच सागरी किनार्‍यावर अवलंबून आहे. म्हणूनच कोरियन माथेफ़िरू हुकूमशहा, ही कोरियन कथा असली तरी ती चीनसाठी व्यथा बनलेली आहे. तसे नसते तर ब्रिक्सच्या पार्श्वभूमीवर रशियन अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन व चीनी अध्यक्ष जिनपिंग यांना कोरियन स्फ़ोटावर चर्चा करण्याची वेळ आली नसती. आता आजवरचे राजकारण व महाशक्ती होण्यासाठी खेळलेले डावपेच चीनच्याच अंगाशी येऊ लागल्याचे हे लक्षण आहे. मात्र त्यातून सुटण्याचा मार्ग सोपा नाही. त्यात उत्तर कोरियात सत्तापालट करूनही भागणार नाही. त्यामुळे तिथे राजकीय अस्थीरता येईल आणि चीनचे पारंपारिक शत्रू जपान व दक्षिण कोरिया शिरजोर होतील. किम जोंगला म्हणूनच पदभ्रष्ट करून भागणार नाही. तर त्याला वेसण घालता आली पाहिजे. जगाची चीनकडून तीच अपेक्षा आहे. पण कितीही सोपे वाटले तरी चीनसाठी ते काम सोपे राहिलेले नाही. कारण आजवर कठपुतळी असलेला कोरियन सत्ताधीश, आता खुप शिरजोर झाला आहे आणि तो चीनी आदेशानुसार निवांत बसायचे मान्य करील अशी शक्यता कमीच आहे. त्याने माथेफ़िरू निर्णय घेतले तर? कथा कुणाची व्यथा कुणा!

19 comments:

  1. मस्त , मार्मिक व वस्तुनिष्ठ विश्लेषण •

    ReplyDelete
  2. Putin Rejects Cutting Off Oil to North Korea.......

    *Putin*: Military hysteria over *N*. *Korea* may lead to planetary catastrophe, heavy loss of life.................

    Do not drive N. Korea into corner, sanctions alone will not solve problem – Putin............

    चीन व रशियाचा नक्कीच पाठिंबा आहे.

    ReplyDelete
  3. The best information. Salute to Bhau Toraskar. I am ur fan.

    ReplyDelete
  4. भाऊ पुढच्या लेखाची आतुरतेने वाट पहात आहोत

    ReplyDelete
  5. भाऊ
    कुठे आहात तुम्ही???
    लवकर द्या नवीन खाद्य,
    एक एक दिवस कसा काढतोय आम्हांलाच माहिती

    ReplyDelete
  6. नमस्कार बदलत्या कायद्या मुळे आता महिलांना वडीलार्जीत मिळकतीत समान हिसा मिळतो परंतु त्यामुळे सर्वच मूली तसा हकक सांगत असून त्यामुळे एकत्र कुटुंब पथती धोक्यात आली आहे त्या बाबत लिहावे ही वींनंती

    ReplyDelete
  7. Bhau, barech divas zalet , navin lekhachi vat pahatoy

    ReplyDelete
  8. bhau aapan Gouri Lankesh aani Rohingya muslimancha prashn yavar lekh lihave aani vastusthiti samor anave

    ReplyDelete
  9. शिरीष वरूडकरSeptember 15, 2017 at 5:53 AM

    भाऊ, तुम्ही खूप अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्वक लिहीत असता. पण, आजकाल, तुमच्या ब्लॉग पोस्ट करण्यात बरेच दिवस जातात. आम्हाला आता तुमचे ब्लॉग वाचण्याची सवय झाली हो.

    ReplyDelete
    Replies
    1. सवय नव्हे, तर चटक लागली आहे.

      Delete
  10. 6सप्टेंबरनंतरचे लेख अजून का आले नाहीत ��आम्ही वाट पहातोय

    ReplyDelete
  11. ६ सप्टेंबर नंतर एकही ब्लॉग नाही त्यामुळे चुकल्या सारखे वाटते. का माझ्या कडे काही प्रोब्लेम आहे ? आपली तब्येत चांगली असावी अशी अपेक्षा आणि इच्छा

    ReplyDelete
  12. Dear Bahu,
    We are waiting for your next article.
    Regards.
    Bapu.

    ReplyDelete
  13. Khar ch...roj 10 vela open karun baghtoy blog me tar..bhau kuthe ahat ..savay lavalit ho tumhi amhala

    ReplyDelete
  14. What happened Bhau

    No post since long time

    Hope everything is well

    We are missing intellectual from you

    ReplyDelete
  15. Waiting for next article... Where are you sir?? We all are Hungry of your articles...

    ReplyDelete