Sunday, April 8, 2018

व्यापारी बॅन्का बुडवल्या आता व्होटबॅन्काही बुडवणार


 prakash ambedkar sonia के लिए इमेज परिणाम

दिवसेदिवस भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा अण्णा होताना दिसू लागला आहे. या वर्षाच्या आरंभी भीमा कोरेगाव प्रकरण घडले आणि त्यानंतर जो घटनाक्रम सुरू झाला, त्यातून प्रकाश आंबेडकरांना वारेमाप प्रसिद्धी मिळाली आहे. पण त्यामुळे त्यांची स्थिती क्रमाक्रमाने अण्णा हजारे यांच्यासारखी होत चालली आहे. अन्यथा अलिकडल्या काळात त्यांनी अत्यंत बेजबाबदार विधाने करण्याचा सपाटा लावला, तसे घडले नसते. मागल्या निवडणूकांपासून त्यांची मराठी राजकारणातली पकड सुटली आहे. एकूण दलित चळवळीच्या बाबतीतही ते बाजूला पडल्यासारखे झालेले होते. याच निमीत्ताने मग ज्या काही अन्य घटकांनी दलित चळवळीत शिरकाव करून घेण्याचे प्रयत्न चालविले, त्यांच्या आहारी जाण्याखेरीज आंबेडकरांनाही पर्याय उरलेला नाही. ज्यांनी असा शिरकाव करून घेतला वा तसा प्रयत्न चालविला आहे, त्यांनाही आपला चेहरा लपवूनच आपला हेतू साध्य करायचा आहे. सहाजिकच त्यांच्यासाठीही घटनाक्रमाचे श्रेय प्रकाश आंबेडकर यांना जाण्याने काही बिघडत नाही. मात्र त्यात आंबेडकरी चळवळ म्हणतात, ती हळुहळू भलत्याच दिशेने भरकटत चालली आहे. म्हणून भीमा कोरेगावच्या घटनेनंतर जो बंद पाळण्यात आला, तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी आवाहन केले होते आणि तिथेही असेच चेहरे झाकून अनेकांनी धुमाकुळ घालून घेतला. त्याचाच आधार घेऊन आंबेडकर पुढे सरकू बघत आहेत. मात्र अशा वागण्यातून जी काही चळवळ त्यांच्या हाती उरली आहे, तिची सुत्रेही भलत्यांच्या हाती चालली आहेत. सोमवारच्या भारत बंद आंदोलनातही त्याचेच प्रतिबिंब पडलेले आहे. एट्रोसिटी कायद्याविषयी सुप्रिम कोर्टाचा जो निकाल आला त्याच्या विरोधातला हा पवित्रा देशाच्या विविध राज्यात भलत्यांनीच हायजॅक केला आहे. आंबेडकर मात्र श्रेयावर खुश आहेत. पण याचे दुरगामी परिणाम त्यांनाही उमजलेले नाहीत.

आता लोकसभेच्या निवडणूकांना वर्षाचा कालावधी शिल्लक उरला आहे आणि नेमकी पाच वर्षापुर्वीच्या घटनाक्रमाची आठवण यावी, तशी स्थिती हळुहळू आकारास येत चालली आहे. तेव्हाही देशात एक अशी भूमिका नित्यनेमाने मांडली जात होती, की मुस्लिमांच्या मताशिवाय भारतात कोणी राज्य करू शकत नाही. मुस्लिम व्होटबॅन्क तर मोदींच्या कडव्या विरोधात आहे. त्यामुळे मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार केल्यास भाजपाची ती आत्महत्या ठरेल. सुरुवातीच्या काळात म्हणून तर भाजपाही मोदींचे नाव जाहिर करायला बिचकत होता आणि तमाम तथाकथित पत्रकार पुरोगामी विचारवंत तसे आव्हानच भाजपाला देत होते. पण मोदींचे नाव जाहिर झाले आणि हळुहळू प्रचार मोहिम साकार होऊ लागली. तेव्हा तथाकथित मुस्लिम व्होटबॅन्केची दिवाळखोरी उघडी पडत गेली. जे कोणी या व्होटबॅन्केवर विसंबून राजकारण खेळत होते, त्यांचा पुरता बोर्‍या वाजला आणि आठ लोकसभा निवडणूकीनंतर प्रथमच कुठल्या तरी एका पक्षाला स्पष्ट बहूमतापर्यंत मजल मारता आली. मग त्या मुस्लिम व्होटबॅन्केशिवाय सत्ता मिळूच शकत नसल्याच्या महान राजनैतिक सिद्धांताचे काय झाले? अजूनही त्याचे उत्तर कोणी शोधलेले नाही. मात्र तेव्हाचे दिवाळखोर हल्ली दलित व्होटबॅन्केला आपला तारणहार बनवण्याच्या कामात गढलेले आहेत. भीमा कोरेगावच्या घटनेपासून व गुजरातच्या निकालापासून त्या प्रक्रीयेला मोठा वेग आलेला आहे. भारत बंद वा अन्य तत्सम कारवाया, त्याची पुर्वनियोजित योजना आहे. त्यातून देशातील तमाम दलित मते मोदी व भाजपा विरोधात उभी व एकजुट करण्याचा डाव त्यातून खेळला जात आहे. जसा तेव्हा मुस्लिम मोदी विरोधात उभा केला होता, तसा आता दलित मतदार मोदी विरोधात उभा करण्याची योजना आहे. पण ती कुठे कशी फ़सू शकते, त्याची चाचपणी करण्याची बुद्धी यापैकी एकालाही झालेली नाही. प्रकाश आंबेडकरांना त्यात एक मोहरा म्हणून वापरले जात आहे.

व्होटबॅन्क ही कल्पना तशी नवी नाही. पण खरोखरच अशी काही बॅन्क असते आणि एकगठ्ठा अशी एका समाजाची मते कुठल्याही पक्षाला मिळतात, हा निव्वळ भ्रम आहे. तो राजकीय अभ्यासकांनी पसरवलेला आहे आणि राजकीय जुगार खेळणार्‍यांनी तो भ्रम जोपसलेला आहे. मध्यंतरीच्या लोकसभा व विधानसभांच्या मतदान व निकालांनी तो भ्रम खोटा पाडलेला आहे. त्याचे दुष्परिणाम यापैकी बहुतेक पुरोगामी पक्षांनी भोगलेले आहेत. पण अंधश्रद्धा विचारवंतांची असेल, तर त्यातून बाहेर पडणे खुप अवघड असते. मतांचे धृवीकरण हा असाच एक भ्रम होता. तो एक निकष जरूर आहे. पण त्यावर निवडणुका जिंकता येत नाहीत की कोणाला हरविता येत नाही. म्हणून तर मुस्लिम मतांची फ़िकीर न करता भाजपा व मोदींना लोकसभेत व उत्तरप्रदेश विधानसभेत इतके दैदिप्यमान यश मिळवता आले. मुळात त्याचे मोठे श्रेय पुरोगाम्यांचे होते. कारण त्यांनी मुस्लिम व्होटबॅन्केचे धृवीकरण करण्यातून पलिकडे जी हिंदू व्होटबॅन्क उभी रहात गेली, त्याचा भाजपा मोदींना लाभ मिळत गेला आहे. आताही दलितांच्या नावाने आक्रोश करून जो धृवीकरणाचा घाट घातला गेला आहे, त्यातून कितपत दलित मतांची व्होटबॅन्क उभी राहिल, याची शंका आहे. पण त्या दलित व्होटबॅन्केसाठी जे प्रयास चालू आहेत, त्यातून पर्यायाने आपण सवर्ण म्हणवून घेणार्‍यांचेही धृवीकरण करत असल्याचे कोणाला अजिबात भान राहिलेले नाही. देशातल्या कुठल्याही राज्यात गेलात तरी दलितांच्या शेकडो जाती उपजाती असून, त्यांच्यातही एकवाक्यता नाही. पण त्यांनी रौद्ररुप धारण केल्यावर उरलेले सर्व लोक मिळून अकारण त्याच दलितांकडे शंकेने बघू लागतात. महाराष्ट्रातला मराठा मोर्चा किंवा उत्तरेतील गुज्जर सेना, राजपूत सेना त्याची लक्षणे आहेत. दलित व्होटबॅन्केविषयी शंका असणार्‍यांच्या मनातील प्रतिक्रीया, त्यांना दुसर्‍या बाजूला ढकलू लागत असते.

मागल्या लोकसभेच्या वेळी मोदींनी एका मौलवीची टोपी नाकारली व मुस्लिमांचा अवमान केला म्हणून सतत गाजावाजा करण्यात आला होता. त्याची हिंदूवर प्रतिक्रीया कशी उमटेल, त्याचा विचारही झाला नाही. आताही मागल्या तीन महिन्यात, प्रामुख्याने भीमा कोरेगावच्या घटनेनंतर देशाच्या कानाकोपर्‍यात दलितांचे शेकड्यांनी कैवारी उदयास आलेले आहेत. पण त्यामुळे उदभवणारे हिंसक प्रसंग उर्वरीत समाजघटकांमध्ये काय भावना निर्माण करीत आहेत? त्याची कोणाला फ़िकीर वा जाणिव तरी आहे काय? ज्यांच्याकडे सवर्ण म्हणून बघितले जाते वा बोट दाखवले जाते, ते त्या अर्थाने उच्चवर्णिय नसून मधल्या किंवा दुय्यम वर्ण जातीचे लोक आहेत. त्यांच्या विरोधात दलितांना उभे केल्यावर खर्‍याखुर्‍या उच्चवर्णिय जाती वर्णाच्या सोबत, या इतर घटकांना सक्तीने जोडले जात असते. संभाजी भिडे यांच्यावर ब्राह्मण म्हणून अनेक आक्षेप घेतले गेले असले, तरी त्यांच्या समर्थनार्थ निघालेल्या जिल्हावार सन्मान मोर्चातील उपस्थिती बारकाईने तपासली, तर ती बिगरदलित वा बिगर बौद्ध अशीच आढळून येईल. ह्याला राजकीय संदर्भात धृवीकरण म्हणतात. ते पाप भिडे गुरूजी वा संघ भाजपाने केलेले नाही. भीमा कोरेगाव ज्यांनी पेटवले व बंदच्या हिंसेतून शंकेला जागा निर्माण केली, त्यांनीच हे धृवीकरण घडण्याला चालना दिलेली आहे. त्याचा खेड्यापाड्यापर्यंत पडणारा प्रभाव दिसत असल्यामुळेच नित्यनेमाने फ़ुले शाहू आंबेडकरांची जपमाळ ओढणार्‍या कॉग्रेस राष्ट्रवादी पक्षांनाही सन्मान मोर्चाच्या बाबतीत मूग गिळून गप्प बसावे लागले. एकीकडे त्यांना फ़ुले शाहू आंबेडकरांची जपमाळ सोडायची नाही आणि दुसरीकडे डोळ्यासमोर बिगरबौद्ध होत चाललेले धृवीकरण थांबवताही येत नाही. अशी त्यांची कोंडी झालेली आहे. ऐन लोकसभा निवडणूकीपुर्वी होणार्‍या या हालचाली, २०१९ सालात पुन्हा नरेंद्र मोदी व भाजपाचे काम सोपे करत चालल्या आहेत.

२०१४ सालच्या मतदानात मोदी हा माणूस मुस्लिमांचे लांगूलचालन करणार नाही, याच्या खात्रीने त्यांना मोठ्या प्रमाणात तटस्थ मतदाराचा कौल मिळाला. त्यातूनच मुस्लिम व्होटबॅन्क नावाचा भ्रम निकालात निघालेला होता. आज तोच जुना जुगार दलित व्होटबॅन्केच्या रुपाने खेळला जाताना दिसतो आहे आणि त्यासाठी प्रकाश आंबेडकरांना मोहर्‍याप्रमाणे वापरले जात आहे. आपल्या शब्दाने वा प्रकृतीनुसार लोकमत उसळते, अशा भ्रमात सहासात वर्षापुर्वी अण्णा भारावून गेले होते आणि अजून त्यातून बाहेर पडू शकलेले नाहीत. पण त्यांना वापरून घेणार्‍यांनी उपयोग संपल्यावर अण्णांना वार्‍यावर सोडून दिले होते. तेव्हाचे अण्णा व आजचे प्रकाश आंबेडकर यांची यांची नुसती तुलना करून बघितली, तरी गंमत लक्षात येईल. सध्या विविध कारणांनी चाललेल्या धुमाकुळाने प्रकाशजी सुखावलेले आहेत आणि सनसनाटी विधाने करीत आहेत. पण तशा विधानातून ते दलितांची व्होटबॅन्क भलत्याच लोकांसाठी उभी करत असून, पर्याय म्हणून सवर्णांची व्होटबॅन्कही धृवीकरणातून उभी करून देत आहेत. अर्थात या दोन्ही घडामोडीविषयी प्रकाशजी किती जागरुक आहेत, ठाऊक नाही. त्यांचा आडोशाने उपयोग करून घेणारे किती सावध आहेत, माहिती नाही. पण जो घटनाक्रम चालू आहे, त्यातून दलित व प्रामुख्याने आंबेडकरवादी मतदार एकाकी पडत चालला आहे. त्याच्यापासून अन्य जातीपातीचा मतदार दुरावत चालला आहे. त्याची वेगळी व्होटबॅन्क या दलित व्होटबॅन्केला कायमची दिवाळखोरीत घेऊन जाणार आहे. मायावतींनी उत्तरप्रदेशात त्याची किंमत आधीच मोजली आहे आणि आंबेडकर तोच फ़सलेला प्रयोग आपले अस्तित्व नव्याने उभारण्यासाठी करू बघत आहेत. पण त्यातून त्यांचा अण्णा होण्यापलिकडे काहीही साध्य होणार नाही. अण्णांना ‘अण्णा’ झाल्याचे कित्येक वर्षे उलटून गेल्यावरही उमजत नसते, असा ताजा इतिहास आहे.

12 comments:

 1. आता तर मुस्लिम दलित ऐक्य ची पण पोस्टर लागलित... मुस्लिम कधीही दुसऱ्या धर्मा ला स्वीकार नाहीतच.. शिया आणि सुन्नी यांचे नाही जमत तर दलितांचे का्य...

  ReplyDelete
 2. Bhau mi pan toch vichar karat hote jar morchyat hinsa zali nasati tar sahanubhuti milali asati pan to zali ani bahujan samajachi sympathy gamawali parat karan tar shulakach hote ani bjp cha that kahi samabadh nawata.bhima koregaov petwun denare scst act band veli Maharashtra shant hota tyanche karan maratha votebank ahe karan maratha morchachi hich magani ahe

  ReplyDelete
 3. 2019 ला डोळ्यासमोर धरून ही अराजकता मांडत आहेत मग ते पटेल आंदोलन असो की मराठा मोर्चा कि भीमा कोरेगाव किंवा 2 एप्रिलचा बंद हे सर्व 2019 च्या निवडणुकीची तयारी आहे.

  ReplyDelete
 4. "पण अंधश्रद्धा विचारवंतांची असेल तर त्यातून बाहेर पडणे खुप अवघड असते."
  काय टोला मारलाय भाऊ. अतिशय समर्पक.

  ReplyDelete
 5. भाउ साहेब BJP कडे झुकलेले दिसतात. खरीी गंमत अशी आहे की RSS नी चालवलेल्या जातीय राजकारण भाउसाहेबाना दिसत नाही . ४ वर्षात मागास जातीवर अन्यायाची मालिकाच सुरु आहे . हे थांबवायला संघी सरकार अपयशी ठरतय. पिडीत शाेषीत कधीच अन्याय करत नाहीत आणि विरोध केला तर पोटसुळ उठतो .
  थांबवा हे सगळ मानुस म्हणुन जगु द्या .
  संधी नी लोकाच्या लहान मुलाच्या हातात काठ्या दिल्या हे भाउसाहेबाना दिसत नाही का ? याच काठ्या मानवतेच डोक फोडत आहेत म्हणुन प्रकांश आंबेडकर म्हणतात या देशाचा सिरिया व्हायला वेळ लागणार नाही.  ReplyDelete
  Replies
  1. दलितांवर काय अन्याय चाललाय देशात??
   दलितांच्या राष्ट्रपती करणे हा? का मंत्री करणं हा? आरक्षणाचे लाभ उठवणे हा?? नक्की कोणता अन्याय??

   Delete
  2. @ SANJAY,

   Geli 04 Varshe Anyayachi Malika Chalu Aahe Yache Purave/Dakhale Dyavet Nustich Bombabomb Kaay Kamachi ?? 04 Varshapurvi Magas Jati INDRACHE SWARGIYA EISHWARYA Upbhogat Hotya Kaay ?? Tumcha Ajenda Sudnya Vachkanchya Kevhach Lakshat Aalay.

   Geli 92 Varshe SANGHACHYA SWAYMSEVAKANCHYA HATAT Kathya Aahet Tya Deshvirodhi Lokanchi Doki Thikanavar Aannyasathich, Tyachi Tumhala Bhiti Kadhipasun Vatu Lagali ??

   Delete
  3. काय अन्याय झाला सांगता येईल का?

   Delete
  4. शाबास संजय हे घे तुझे 100 रुपये

   Delete
  5. स्वतःला मागास, पीडित सिद्ध करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना कुणीही भीक घालत नाही याला ते अन्याय समजत असावेत...

   Delete
 6. भाऊ आपण लिहिल्या प्रमाणे समाजात खरच हाच अनुभव येत आहे.

  ReplyDelete
 7. saransh

  अण्णांना ‘अण्णा’ झाल्याचे कित्येक वर्षे उलटून गेल्यावरही उमजत नसते, असा ताजा इतिहास आहे.,

  ReplyDelete