Wednesday, April 25, 2018

हाती आले धुपाटणे

indian congress cartoon के लिए इमेज परिणाम

घसरगुंडी सुरू झाली मग ती थोपवणे अवघड असते. सध्या पुरोगामी लोकांची तशीच दुर्दशा झालेली आहे. सेनादलाप्रमाणेच राजकारणातली लढाई अनेक आघाड्यांवर लढवली जात असते. त्यात राजकीय मैदानात काही लोक लढत असतात आणि काही लोक वेगवेगळे मुखवटे पांघरून तीच भूमिका पुढे रेटण्याचे काम करीत असतात. पण कितीही झाले तरी मुख्य लढाई सैनिकांनीच लढायची असते आणि बाकीचे घटक मागे राहून त्यांना रसद पुरवण्य़ाचे काम करीत असतात. प्रसंगी धोका पत्करून अशा सहाय्यकांनाही काही धाडसी कामे करावी लागतात. पण लढाई त्यांच्यावर सोपवून सेना वा सेनापत्ती बाजूला होत नाहीत. जेव्हा तसा निर्णय घेतला जातो, तेव्हा त्या सेनेचा पराभव अपरिहार्य होऊन जातो. मग ती लढाई खर्‍याखुर्‍या सेनेतली असो किंवा राजकीय आखाड्यातली असो. भारतीय राजकारणात पुरोगामी म्हणवणार्‍या सेनेची तीच दुर्दशा झालेली आहे. त्यांचे राजकीय सैनिक दुबळे व लुळेपांगळे होऊन गेलेले आहेत आणि रसद पुरवणार्‍या इतर घटकांना लढायचे काम सोपवण्यात आलेले आहे. मोदी पर्वातील राजकीय लढाई करताना पुरोगामी इतके वैफ़ल्यग्रस्त झालेले आहेत, की त्यांनी सोशक मीडिया, साहित्यिक, कलावंत, वकील, प्राध्यापक अशा रसद पुरवणार्‍यांना लढायला पुढे केले आहे. सहाजिकच जागोजागी त्यांचा दारूण पराभव होत चालला आहे. कालपरवाच हिंदू दहशतवादाचा बुरखा फ़ाटला आणि दोन दिवसात लोया प्रकरण उलटलेले आहे. या दोन्ही विषयात न्यायालयीन निकालांनी पुरोगामी राजकारणाचे पुरते दिवाळे वाजवून टाकलेले आहे. मुळात असे विषय घेऊन राजकारण होत नसते. कारण हे तांत्रिक विषय असतात आणि त्यांच्या प्रभावाची व्याप्ती जनमानसावर नसते. मोजक्या मर्यादित लोकांपर्यंत त्याचा प्रभाव पडत असतो आणि बाकीची सामान्य जनता त्यापासून पुर्णपणे अलिप्त असते.

चौदा वर्षापुर्वी वाजपेयी प्रणीत एनडीएला सत्ताभ्रष्ट करताना असे काही घटक कॉग्रेसला व त्यांच्या नेतृत्वाखालच्या पुरोगामी पक्षांना उपयुक्त ठरलेले होते. पण हे घटक सैनिक नसतात वा लढाई जिंकून देणारे नसतात. याचे भान सुटले आणि हळुहळू पुरोगाम्यांनी आपली सगळी लढाईच अशा घटकांच्या माथी मारून टाकली. त्यात विविध वर्तमानपत्रे, संपादक, पत्रकार, वाहिन्या, साहित्यिक कलावंत यांना भाजपाला संपवण्याच्या सुपार्‍या देण्यात आल्या. जोवर ही लढाई दिल्लीपुरती मर्यादित होती, तोपर्यंत त्यात यश मिळू शकले. पण दिल्लीच्या दरबारी राजकारणाला शह देणारा कोणी बाहेरचा योद्धा आव्हान म्हणून समोर येईल, ही अपेक्षा नव्हती. सहाजिकच दिल्लीत व तथाकथित प्रतिष्ठीत वर्तुळात भाजपाला नामोहरम करण्यात हे घटक कमालीचे यशस्वी ठरले. आपण युद्धपट बघतो, त्यात बाकीच्या सैन्याला शत्रूगोटात घुसण्याची सोय करून देण्यासाठी हेरांचा वापर केला जात असे. त्यांनी तटबंदी मोडून द्यायची आणि मग सैन्याने घुसून निर्णायक लढाई करावी, अशी रणनिती असते. पण इथे युपीएला सत्ता मिळाल्यापासून पुरोगाम्यांना कधी लढाई करायची गरज वाटली नाही. सैन्याची जमवाजमव करण्याची इच्छा राहिली नाही. त्यांच्यासाठी हेच काम मग माध्यमे व इतर घटक नित्यनेमाने पार पाडू लागले. भाजपाचे नेतृत्व मोदींकडे आले त्याच्या आधीपासूनच मोदींना लक्ष्य करण्यात आलेले होते. त्याचा अनुभव गाठीशी बाधूनच मोदींनी या पुरक रसदकार पुरोगामी सेनेला खच्ची करण्याची पुर्ण तयारी केलेली होती. या पुरोगामी फ़ळीला नामोहरम करण्यासाठी मोदींनी नव्याने आलेल्या सोशल मीडियाचा खुबीने वापर करून घेतला आणि क्रमाक्रमाने माध्यमांसह विचारवंत कलावंत त्यांची महत्ताच संपून गेली. जेव्हा त्यांच्या शब्दांची धार बोथट झाली, तेव्हा खर्‍या सैन्याने लढायची वेळ आली होती. पण हे सैन्य आळसावलेले होते व निष्क्रीय होऊन गेलेले होते.

अशा कॉग्रेसी पुरोगामी सेनेची रसद पुरवणारी फ़ौज आधीच मोदींचे निर्दालन करण्यासाठी कार्यरत झालेली होती. त्यात पत्रकार व वकील यांचा मोठा भरणा होता. त्यांनी गुजरात दंगलीपासून विविध लहानसहान गोष्टीत मोदींची कोडी करण्याचा सपाटा लावलेला होता. चकमकी, दंगलीचे बळी वा तत्सम अनेक बाबतीत खटले उभे करून मोदींची कोंडी चालविली होती. त्याचा वापर करून मोदी दिल्लीच्या राजकारणात आले आणि त्यांनी दिल्ली काबीज केल्यावर पुरोगाम्यांकडे लढणारा कोणी राजकीय योद्धाच शिल्लक राहिला नाही. सहाजिकच शेवटची फ़ळी म्हणून वकील व माध्यमांना ती लढाई करावी लागलेली आहे. मोदी पंतप्रधान झाले त्यानंतर सहा महिन्यात लोया यांचा मृत्यू झालेला होता आणि त्यात काही संशयास्पद होते, तर त्याचा गाजावाजा तेव्हाच व्हायला हवा होता. ही काही छुपी गोष्ट नव्हती. मग आज इतक्या वर्षांनी त्यात न्यायाचे नाटक रंगवण्याची काय गरज होती? तर साडेतीन वर्षे उलटून गेल्यावरही मोदींच्या विरोधात लढाईला कुठले निमीत्त मिळत नसल्याने कबरीतून लोया मृत्यू उकरून काढण्यात आला. त्या शिळ्या कढीला ऊत देण्यात आला. सराईतपणे आधी एका नियतकालिकात तो गौप्यस्फ़ोट करण्यात आला आणि एकामागून एक पुरोगामी पत्रकारांनी तो उचलून धरला. मग जनहित याचिकावाले वकील मैदानात आले आणि अखेरीस त्यांच्याच पठडीतले चार न्यायाधीशही मैदानात आणले गेले. खटले, बातम्या, अपप्रचार अशी जुनीच लढाई नव्याने सुरू झाली. ती तोंडघशी पडणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची वा वैज्ञानिकाची गरज नव्हती. फ़क्त आवया व अफ़वा पसरवून त्या खर्‍या ठरवता येत नाहीत, की त्यासाठी कोणाला फ़ाशी देता येत नाही. त्यातून खळबळ माजवणे शक्य असले तरी त्याचे तारू साक्षी व पुराव्याच्या खडका्वर येऊन फ़ुटणारच होते. गेल्या गुरूवारी तेच तारू फ़ुटले आणि अवघे पुरोगामी जग गटांगळ्या खाऊ लागले.

सभ्यतेच्या काही मर्यादा असतात आणि त्याचा अतिरेक झाला मग सभ्यपणा बाजूला ठेवून पेकाटात लाथ घालावी लागत असते. गुरूवारी सुप्रिम कोर्टाच्या खंडपीठाने नेमके तेच काम केलेले आहे. मागल्या चार महिन्यापासून लोया मृत्यूचा चाललेला कांगावा खंडपीठाने फ़ेटाळून लावलाच. पण त्या निमीत्ताने काळा कोट चढवून वकील असल्याचे नाटक करणार्‍या छुप्या राजकारण्यांना फ़टकारले आहे. जनहित याचिका हा धंदा झाला असून काही नामवंत वकील त्यात आपली पोळी भजून घेत आहेत. त्यातून न्यायपालिकेचा बहूमोल वेळ वाया घालवित आहेत, असे ताशेरेच निकालात आलेले आहेत. आता ह्या वकीलांच्या फ़ौजेत गुजरात दंगलीपासून याकुबच्या फ़ाशी वगैरेपर्यंत गुंतलेले वकीलच असावेत, याला योगायोग मानता येत नाही. वकिली व न्यायव्यव्स्था याचा आडोसा घेऊन त्यांनी चालविलेल्या राजकारणाचा मुखवटाच या निकालातून न्यायालयाने फ़ाडलेला आहे. तेवढ्यावर न थांबता हे वकील व त्यांचे चाळे न्यायव्यवस्थेला बाधा आणतात व न्यायाचीच टवाळी करीत असल्याचाही आक्षेप या निकालात घेतला गेलेला आहे. त्यातून पुरोगाम्यांनी आपली रसदकार फ़ळीच उघडी करून टाकलेली आहे. यापुढे अशा वकीलांनी कितीही खरे व गंभीर आरोप केले व त्यासाठी पुरावे आणले, तरी त्यावर सामान्य जनता विश्वास ठेवणार नाही. कारण सुप्रिम कोर्टानेच या वकीलांना व त्यांच्या न्यायाआडून चाललेल्या सुडाच्या राजकारणाला नग्न करून टाकलेले आहे. २०१९ पुर्वी हा पुरोगाम्यांचा मोठा पराभव आहे. कारण त्यातून पुरोगामी फ़ौजेकडे लढण्यासारखा कोणी योद्धा नाही. जिंकू शकेल असा कोणी सेनापती शिल्लक राहिला नसल्याची ही साक्ष आहे. हे प्रकरण एक असले तरी ही पुरोगाम्यांची निकराची लढाई होती आणि त्यातला पराभव आता पुढल्या लोकसभेतील पराभवावर शिकामोर्तब करणारा ठरणार आहे. जिहादींवर लढाई सोपवून पाकिस्तानी सेना जशी दुबळी होऊन गेली, तशी पुरोगामी राजकारणाच्या लढाईत आता कुठलीही व्यावसायिक नेत्यांची फ़ौज शिल्लक राहिलेली नाही. मग २०१९ मध्ये काय होईल? कारण लोया प्रकरणात अतिरेक करणार्‍यांच्या हाती धुपाटणे आले आहे. मग ते वकील असोत, राजकीय पक्ष असोत की संपादक असोत.

3 comments:

  1. भाऊ खूप सुंदर लेख लिहिला

    ReplyDelete
  2. भाऊ आपले विचार प्रेरणादायक आहेत.आपली लेखणी अशीच तळपत राहो.

    ReplyDelete