Tuesday, April 24, 2018

ज्याची त्याला प्यार कोठडी

chandrakant dada patil के लिए इमेज परिणाम

गेल्या काही महिन्यापासून राष्ट्रवादी पक्षाने आपली विस्कटलेली घडी सावरण्याचे आटोकाट प्रयास चालविले आहेत. राज्याच्या प्रत्येक विभागात आणि जिल्ह्यात हल्लाबोलचे केलेले आयोजन हा त्याच मोहिमेचा एक भाग आहे. पंधरा वर्षे सत्तेत बसल्यामुळे त्या पक्षाला व त्यांच्या नेतॄत्वाला एक प्रकारची मरगळ येऊन गेली होती. मागल्या लोकसभेत व विधानसभा मतदानात भूईसपाट झाल्यानंतर चार वर्षे त्यांना जाग येण्यास लागली. यावरून हे लोक किती आळसावले होते, त्याचा अंदाज येऊ शकतो. अशा स्थितीत कितीही संयम राखला तरी पराभवाची बोचणी संपत नसते. त्यामुळे आपला पराभव करणार्‍याविषयीची जळजळ व्यक्त होणे स्वाभाविक आहे जिंकणारे आणि हरणारे यांच्यात नेहमीच बाचाबाची होत असते. राजकारणात अशी बाचाबाची शाब्दिक असते. म्हणूनच कोल्हापूर मुक्कामी पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी चंद्रकांत दादा पाटिल यांच्यावर ‘भाष्य करायचे टाळले’ तर ते समजून घेतले पाहिजे. म्हणजे असे झाले की कोणीतरी दादांच्या संदर्भात साहेबांना प्रश्न विचारला, तर त्यांनी दादांवर भाष्य न केलेले बरे असे उत्तर दिले. पण तरीही पवार दादांवर सविस्तर बोलले. दादांचे विधान परिषदेत निव्डून येणे व थेट मतदाराला सामोरे न जाणे, यापासून त्यांच्या कोल्हापुरी असण्यापर्यंत पवार सुचक बोलले. पण त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. हीच तर पवारांची खासियत आहे, ते सर्व काही बोलून टाकतात आणि ‘शोले’तल्या हेमामालीनी सारखे त्यावर भाष्य करायला नको असेही वर सांगु्न टाकतात. मात्र ज्यांच्यापाशी इतके धुर्त चतुर विधान समजून घेण्य़ाची बुद्धी नसते त्यांची मग कोठडी वा दादा असल्या शब्दांचे अर्थ उलगडताना दमछाक होते. तुलनेने चंद्रकांत दादा पवारांसमोर खुपच कोवळे आहेत. पण त्यांच्या एका कोपरखळीवर साहेबांना बोलवे लागले, ही बाब दुर्लक्षित करता येत नाही.

मुंबईत भाजपा कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्यात बोलताना चंद्रकांत दादांनी छगन भुजबळांचा ओझरता उल्लेख केला होता. भुजबळ दिर्घकाळ न्यायालयीन कोठडीत पडलेले आहेत आणि ते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेता आहेत. त्यांना जेव्हा एका प्रकरणात अटक झाली, तेव्हा पवारांनी खुप मोठी डरकाळी फ़ोडलेली होती आणि आपणही अटकेच्या प्रतिक्षेत असल्याचे म्हटलेले होते. मात्र पुढे पक्षातर्फ़े भुजबळांच्या मुक्ततेसाठी कुठलेच प्रयास झाले नाहीत. खालच्या कोर्टापासून सुप्रिम कोर्टापर्यंत शक्य तितक्या पायर्‍या झिजवुन भुजबळ थकून गेले आहेत. मध्यंतरी त्यांची प्रकृती काहीशी खालावली तर कुणी त्यावर लेख लिहीला होता आणि पुन्हा एकदा पवार साहेबांना भुजबळ आठवले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भुजबळांना तुरूंगात काही झाले तर त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशाराही देऊन टाकला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी कोल्हापुरात चंद्रकांत दादांना त्यांची जागा दाखवताना भुजबळांचे स्मरण केले आहे. भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात चंद्रकांत दादांनी गमतीने भुजबळांच्या आसपास दोनतीन कोठड्या मोकळ्या असल्याचे म्हटलेले होते. त्यांचा रोख कोणाकडे होता ठाऊक नाही. पण साहेबांनी ते शब्द मनाला लावून घेतलेले दिसतात. की बोलणारा चंद्रकांत ‘दादा’ आहे म्हणून साहेबांना ते शब्द जास्त झोंबले असतील? ठाऊक नाही की सांगता येत नाही. पण आपल्याला काही झोंबले नाही असे भासवण्याचा प्रयास अधिक बोलका होता. म्हणून तर चंद्रकांत दादांवर भाष्य करायची गरज नाही म्हणतानाच, साहेब नेमके त्यांच्यावरच बोलत होते. दादा विधान परिषदेत आहेत आणि जनतेच्या मतांवर थेट निवडून आलेले नाहीत. त्यांना मंत्रीपदाची संधी प्रथमच मिळालेली आहे किंवा यापुर्वी दिर्घकाळ संधी मिळालेली नाही, हे सगळे संदर्भ बोलके आहेत. एक एक शब्द स्फ़ोटक बोचरा असावा हा योगायोग नाही.

ज्यांना आयुष्यात कधी संधी मिळाली नाही ते सकाळ दुपार संध्याकाळ ‘संधी घेत’ आहेत. ‘राज्यात भाजपची सत्ता आहे, मग ते कोठड्या भरण्यासाठी कशाची वाट बघत आहेत?’ माणूस एकदा तुरुगांत जाऊन आला की पुढची निवडणूक त्याला सोपी जाते. अशी काही विधाने मनातली वेदना स्पष्ट करणारी आहेत. इतके बोलूनही भाष्य न केलेले बरे, असे आणखी सांगणे अधिक मोठे भाष्य होत नाही काय? आयुष्यभर कुठलीही निवडणूक पराभूत न झालेले व सतत सहज निवडणूका जिंकणारे शरद पवार, यांचा अनुभव मोठा आहे. म्हणून मग काही प्रश्न पडतात. तुरूंगात जाऊन आल्यावर पुढली निवडणूक सोपी जाते, हा सिद्धांत कुठून आला? धुळ्याच्या अनिल गोटे यांच्या अनुभवावर आधारीत तो निष्कर्ष आहे काय? कारण खुद्द साहेबांनी आधीच्या वा पुढल्या निवडणूका जिंकण्यासाठी कधी तुरूंगाची वारी केलेली नाही. विरोधी पक्षाला नेहमी कमी संधी मिळतात आणि आयुष्य संपत आले तरी अनेकदा संधी मिळत नाहीत. पण ज्यांना सतत संधी मिळाली असे सुदैवी शरद पवार आहेत. त्यांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने कसे केले, त्याचाही खुलासा याच संवादात केला असता तर पुढल्या पिढीतील अनेक राजकारण्यांना त्याचा लाभ मिळवता आला असता. त्यांचे बोट धरून मोदी पंतप्रधानपदी जाऊन बसले, तर त्याचीही मिमांसा या निमीत्ताने व्हायला काय अडचण होती? विधान परिषदेत अप्रत्यक्ष निवडणूक असते म्हणून चंद्रकांत दादांना मागल्या दाराने सत्तेत आलेले म्हणायचा पवारांचा प्रयास समजला नाही. कारण तब्बल दहा वर्षे ते मागल्या दाराने पंतप्रधानपदी बसलेले मनमोहन सिंग यांच्या हाताखाली काम करत होते. मनमोहन सिंग व चंद्रकांत दादा यांच्या ‘निवडून येण्यात’ नेमका कोणता गुणात्मक व घटनात्मक फ़रक आहे? तेही या निमीत्ताने सांगता आले असते. पण साहेब तशा भानगडीत सहसा पडत नाहीत.

कोठड्या भरा तुमचीच सत्ता आहे, असल्या बोलण्यातून गदिमांचे एक जुने सुंदर गीत आठवले. ‘जगाच्या पाठीवर’ या अर्धशतकापुर्वी गाजलेल्या चित्रपटात सुधीर फ़डके यांनी स्वरबद्ध केलेले व गायलेले गीत आहे, ‘जग हे बंदीशाला’. त्यात कोठडीचा उल्लेख फ़ार सुंदर आलेला आहे. ‘ज्या़ची त्याला प्यार कोठडी, कोठडीतले सखे सवंगडी, जो आला तो रमला, जग हे बंदीशाला.’ चंद्रकांत दादांची कोपरखळी व शरद पवारांची वेदना, याच गीताच्या आशयामधून समजून घेता येऊ शकेल. राजकारणही आता आपापली कोठडीच झाली आहे. त्यात विविध कोठड्या आहेत आणि विविध पक्षांची वा भूमिकांची एक एक कोठडी होऊन गेली आहे. त्यात येऊन फ़सलेल्यांना आपली विवेकबुद्धी वापरून स्थान बदलता येत नाही की हालचाल करता येत नाही. प्रत्येकाला आपापली कोठडी खुप प्यारी असते आणि त्यातून बाहेर पडायचीही भिती वाटत असते. याच गीतामध्ये गदिमा पुढे म्हणतात, ‘सुटकेलाही मन घाबरते’. खुद्द शरद पवार मागल्या पन्नास वर्षाच्या राजकारणात आपल्याच अशा एका सैद्धांतिक कोठडीत बंदिस्त करून बसलेले नाहीत काय? एका बाजूला ते पुरोगामी राजकारणाच्या कोठडीत बंदिस्त झाले आहेत आणि संधी मिळत असूनही त्या कोठडीतून बाहेर पडायला, ते कायम घाबरलेले आहेत. कधीतरी ते एखादे पाऊल उचलून अशा वैचारिक कोठडीच्या बाहेर पडायला पुढे होतात आणि पुढल्याच क्षणी त्यांना बाहेरच्या हवेची भिती वाटते. ते उचललेले पाऊल तसेच तात्काळ विचारपुर्वक मागे घेतात. सार्वजनिक जीवनात आणि वैचारिक जगण्यात अनेक कोठड्या असतात आणि त्यात बंदिस्त झाले, मग कुठल्या कोर्टातून जामिन मिळत नाही की सुटकाही होत नाही. तसला समजुतीचा तुरूंग फ़ोडून, त्याच्या काल्पनिक भिंती भेदून बाहेर पडावे लागते. पवारांना दिर्घकाळ त्या समजुतीच्या कोठडीतून बाहेर पडायची हिंमत झाली नाही, ही त्यांची शोकांतिका आहे. त्याचा राग बिचार्‍या चंद्रकांत दादांवर काढून काय मिळणार?

1 comment:

  1. भाऊ ते कडवे असे आहे. ज्याची त्याला प्यार कोठडी,कोठडीतले सखे सवंगडी, हातकडी हि अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला, जग हे बंदी शाळा. अगदी नितांत सुंदर गीत.

    ReplyDelete