Saturday, April 21, 2018

आसिफ़ाचे जग आणि जगातल्या आसिफ़ा

rape victim के लिए इमेज परिणाम

आसिफ़ा नावाची जम्मूच्या जंगल भागातली एक कोवळी पोर. बकरवाल या मेंढपाळ मुस्लिम जातीतली बालिका. इतर वेळी अशी कोण आसिफ़ा आहे वा होती, याची कोणी दखल घेतली नसती. कारण त्या वयाच्या व तशा परिस्थितीतून जाणार्‍या कोट्यवधी बालिका जगात आहेत आणि होत्या. पुढल्याही काळात असतील. मुद्दा त्यांच्या वाट्याला आलेला अनुभव बदलण्याचा आहे आणि नेमक्या त्याच बाबतीत कोणी काहीही बोलायला राजी नाही. प्रत्येकाला या बकरवाल असिफ़ा प्रकरणात न्याय हवा आहे. पण तशी स्थिती कुठल्याही बालिकेवर येऊ नये, याची इच्छा नाही की तशी मागणी होत नाही. हे फ़क्त आपल्या देशातील चित्र नसून पुढारलेल्या व मागासलेल्या सर्वच देशातील वस्तुस्थिती आहे. अमेरिका युरोप या प्रगत देशापासून अराजक माजलेल्या इराक सोमालियापर्यंत त्याचीच प्रचिती येईल. त्यात भरडल्या जाणार्‍या मुली बालिका व महिलांपेक्षा त्यापासून कोसो मैल दूर असलेलेच गदारोळ माजवित असतात आणि न्यायासाठी टाहो फ़ोडत असतात. त्या न्यायाची संकल्पना अशा नरकवासातील बालिकांची मुक्ती करण्याशी निगडित नसून आरोपीला शिक्षा होण्याची जोडलेली आहे. पुढली निर्भया होऊ नये वा आणखी एक आसिफ़ा नको, असे कोणी बोलताना ऐकले आहे काय? नाही! कारण निर्भया आसिफ़ा होतच रहाणार, याची यातल्या प्रत्येकाला खात्री आहे. त्यात भारतातले मेणबत्तीवाले चित्रपटतारे वा बुद्धीमंत येतात, तसेच जगाला कायम शहाणपण शिकवणार्‍या राष्ट्रसंघ व तिथल्याही दिग्गजांचा समावेश होत असतो. आपला चेहरा आरशात बघायची हिंमत नसलेले हे बेशरम लोक, उर्वरीत जगाला शहाणपण शिकवित असतात. राष्ट्रसंघाच्या सचिवांनी तसाच शहाणपणा भारत सरकारला शिकवला आहे. पण त्यांच्याच विविध मदत संस्थांकडून झालेले बलात्कार वा लैंगिक शोषणाचा अहवाल जाहिर करायचा प्रामाणिकपणा त्यांना दाखवता आला आहे काय?

भारतात जम्मूमध्ये वा उत्तरप्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात सामुहिक बलात्कार वा लैंगिक शोषण झाल्याचा सध्या जगभर गाजावाजा चाललेला आहे. तशा घटना भारतात नव्या नाहीत. नित्यनेमाने प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात अशा घटना घडत असतात आणि कुठलाही कायदा त्याला पायबंद घालू शकलेला नाही. मग कायदा वा त्याच्या अंमलबजावणीत कुठेतरी त्रुटी असली पाहिजे, हे का मान्य केले जात नाही? हे भारतातच झाले असे मानायचे कारण नाही. युरोपच्या विविध प्रगत देशांमध्ये दोन वर्षापुर्वी हजारोच्या संख्येने सिरीया इराकमधले निर्वासित घुसले. अंगावरच्या कपड्यानिशी कुठल्याही कागदपत्राशिवात आगमन झालेल्या त्या झुंडींना तिथल्या उदारमतवादी शासनाने आश्रय दिला. त्यांच्यासाठी छावण्या बांधल्या, खाण्यापिण्याची व्यवस्था केली. पुढे त्या भणंग जमावातील काही जणांनी मुक्त जीवन जगणार्‍या युरोपियन मुलींवर सामुहिक बलात्कार करण्याच्या घटना घडल्या. त्यात कोण दोषी आहे? त्या मुली महिला कित्येक वर्षे त्यांचे असेच मुक्त जीवन जगत आहेत. पण ही नवी टोळधाड आली आणि आपल्याच देशात व समाजात त्यांना तितक्या मुक्तपणे हिंडणेफ़िरणे अशक्य होऊन गेले. त्यांच्या माथी असे बलात्कारी कोणी मारले? गुंड गुन्हेगारांची आयात करणारे दोषी असतात की ते गुन्हेगार आरोपी असतात? आपणच घरात उंदिर घुशी आणायच्या आणि नासाडी होते म्हणून त्यांच्यावर आरोप करायचे, हा दांभिकपणा झाला ना? ही जशी युरोपातील अनेक देशातील स्थिती आहे, तितकीच भयंकर दुर्दशा सोमालिया, सुदान वा तत्सम आफ़्रिकन देशांमध्येही झाली आहे. फ़रक इतकाच की युरोपात घुसलेल्या निर्वासितांनी आपल्या चारित्र्याचे कधी डंके पिटले नाहीत. सुदान डारफ़ोर वा अन्य काही देशात निर्वासितांना मदत द्यायला गेलेल्यांनीही त्यापेक्षा वेगळे ‘देवपण’ दाखवलेले नव्हते.

दशकापुर्वी सुदानच्या डारफ़ोर या संघर्षरत भागामध्ये हजारोच्या संख्येने वंशविच्छेदाच्या घटना घडू लागल्या. कृष्णवर्णिय मुस्लिम वस्त्यांमध्ये गावामध्ये उजळवर्णिय अरब मुस्लिम टोळ्या हल्ले करू लागल्या आणि त्यांनी वंशशुद्धीचा नवा फ़ंडा काढला होता. त्यात कृष्णवर्णिय वस्त्या गावांवर हिंसक हल्ले करायचे. तिथल्या वृद्धांना व पुरूषांना ठार मारून टाकायचे आणि महिलांना एकत्र गोळा करून सातत्याने त्यांच्याव बलात्कार करायचे. त्यातून या जननक्षम महिलांना गर्भार करण्याची मोहिमच चालवली गेली. हेतू असा होता की त्यांचा कृष्णवर्ण वंश नेस्तनाबुत करून उजळवर्णीय वंशाची संख्या वाढवायची. त्यात किती हजार व लाख स्त्रियांची अब्रु लुटली गेली त्याचा हिशोब नाही. पण त्यापेक्षा भीषण म्हणजे आप्तस्वकीय कुटुंबिय मारले गेलेले बघायचे आणि त्यांच्या मारेकर्‍यांशीच शरीर संबंध करायचा. मारेकरी असलेल्याचा वंश आपल्या उदरात वाढवायचा. किती क्रुर बाब आहे ना? अशा स्थितीत सुदान डारफ़ोरच्या हजारो महिला गर्भार करून सोडून दिल्या जायच्या. मग त्यांना दिलासा देण्यात राष्ट्रसंघाच्या विविध मदत संस्थांनी पुढाकार घेतलेला होता. अर्थात जगभर अशा संस्था कुठल्याही संकटग्रस्त भागात नेहमी जात असतात व मदतीचा हात देतात, असे डंका पिटून सांगितले जाते. पण खरोखरच त्यांची मदत भूतदया असते का? आपल्यासमोर लाचार अगतिक होऊन आलेल्यांना अशा संस्थांचे कार्यकर्ते दयाळू भावनेने मदत करतात का? त्यात कुठल्याही भानगडी वा शोषण नसते का? ऑक्सफ़ॅम वा तत्सम अनेक संस्था जे मदतकार्य करीत असतात, त्यातही अशा लैंगिक शोषण व बलात्कातराच्या घटना सातत्याने घडलेल्या आहेत. त्याचे पितळ उघडे पडले, मग धावपळ करून झाकपाक केली जात असते. राष्ट्रसंघाने किंवा तत्सम उदारमतवादी टोळीने त्याचा किती जाहिर निषेध केला आहे?

कुठला तरी एक जुना हिंदी सिनेमा आहे. संजीव कुमार आणि शर्मिला टागोरचा. त्यात शर्मिलाची दुहेरी भूमिका आहे. तरूणपणी त्या दोघांचे प्रेम जमते आणि त्यातून तिला दिवस जातात. पुढे कुठल्या कारणाने परदेशी गेलेला संजीव कुमार व शर्मिलाची फ़ारकत होते आणि त्याच्या प्रेमाने वेडी झालेली शर्मिला एका बाळाला जन्म देते ती दुसरी शर्मिला. पुढे वयात आलेल्या या पोरीला गावातला एक दलाल पळवून नेवून कुंटणखान्यात विकतो. दोन दशकानंतर परतलेला संजीव कुमार आपल्या प्रेमाचे ते उमललेले फ़ुल शोधत त्या कुंटणखान्यापर्यंत पोहोचतो. पैसे मोजून आपल्याच मुलीच्या बिछान्यावर बसतो. पण ज्या पद्धतीत तो तिला वागणूक देतो, त्याने चिडलेली वेश्या मुलगी त्याला खुप सुनावते. तो बाप असल्याचे तिलाही ठाऊक नसते. पण त्या संवादात शर्मिला एक वाक्य बोलते ते खुप मोलाचे आहे. आपल्याला या कुंटणखान्यात आणुन ज्याने विकले, त्याच्यावर आपला राग नाही. तो त्याचा धंदाच होता. पण ज्याने प्रेमात पाडून आपल्या जन्मदातीला वार्‍यावर सोडले, तोच माझा खरा गुन्हेगार आहे, असे ती म्हणते आणि तेच जागतिक सत्य आहे. तेच मानवी समाजातील भीषण सत्य आहे. खरे गुन्हेगार दोषी नाहीत, इतके त्या श्वापदांच्या तोंडी निरपराधांना आणून सोडणारे गुन्हेगार असतात. जे आपल्या शाब्दिक व मुखवट्याच्या भुलभुलैयाने निष्पाप मुली माणसांना राक्षसाच्या तोंडी आणून सोडत असतात. जे देखवे उभे करून सामान्य माणसाला बळीच्या वेदीवर आणून उभे करीत असतात. आज आसिफ़ाच्या नावाने गळा काढणारे बहुतांश त्याच वर्गातले आहेत. राष्ट्रसंघाच्या सचिवांपासून मुंबईतल्या चित्रतार्‍यांपर्यंत, संपादकांपर्यंत कोणीही धुतल्या तांदळाचा नाही. जी अमानुष राक्षसी व्यवस्था आसिफ़ा वा अन्य कुठल्या बालिका महिलेची अब्रु लुटत असते व त्यांना मारत असते, ती सापळ्यासारखी व्यवस्था याच भामट्यांनी उभी केलेली आहे.

डारफ़ोरच नव्हेतर हायतीचा भूकंप, कॉगो देशातील नरसंहार अशा प्रत्येक ठिकाणी जे कोणी मदत कार्याचा मायावी राक्षस होऊन गेलेले होते, त्यांनी तिथे लाचार, गरजू व असहाय मुली महिलांचे कसे लैंगिक शोषण केले, त्याचे अनेक अहवाल आहेत. त्याच्या चौकशा झाल्या आहेत. पण त्यातले सत्य जगासमोर आणायला यापैकी कोणीही तयार नाही. त्यातल्या मुख्य व वरीष्ठ अधिकार्‍यांना बाजूला करण्यात आले. पण कोणती शिक्षा देण्यात आली? त्यांचे गुन्हे काय वा दोष काय? इत्यादीवर कायमचा पडदा पाडला गेला. वारंवार विचारणा करून त्याची उत्तरे दिली जात नाहीत. आसिफ़ाला कोणीतरी आमिष दाखवून अपहरण केले असणार, त्यावरून कहुर माजवले जाते आणि राष्ट्रसंघाचा सचिव अन्टोनिओ गटरेस यांनी कठुआप्रकरणी भारतावर ताशेरे झाडलेले आहेत. पण त्यांनी ऑक्सफ़ॅम वा तत्सम संस्थांनी ज्या गरजू मुलींचे विविध देशात आसिफ़ा सारखेच शोषण व अत्याचार केले, त्याविषयी आपले तोंड कधी उघडले आहे काय? जो उठतो तो भारताला शहाणपण शिकवतो. आयसिसच्या अशा लैंगिक शोषण अत्याचाराच्या कहाण्या रंगवून पेश केल्या जातात. पण त्याच यातनातून विव्हळणार्‍या मुली महिलांचे मदतीच्या नावाने झालेले
शोषण अत्याचार झाकून ठेवले जातात. जे अशा अगतिक मुलींचे मागास देशात दुर्दैव आहे, तेच जगभर झगमगणार्‍या हॉलिवूडचे सत्य आहे. त्याच्यावरून कुजबुज चालते. पण अंगावर जाऊन कोणी अशा प्रतिष्ठीतांची कॉलर पकडली आहे काय? आसिफ़ाच्या वाट्याला आलेले अत्याचारी तरी बिनचेहर्‍याचे नादान लोक आहेत. त्यापैकी कोणी समाजाला न्यायावरून प्रवचने दिलेली नाहीत. अन्य कुणाकडे बोट दाखवण्याचे उद्योग केलेले नाहीत वा प्रेषित असल्याचा देखावा उभा केलेला नाही. पण जावेद अख्र्तरपासून थेट हॉलिवुडच्या महान कलावंतांपर्यंत उजळमाथ्याने फ़िरणारे कधी आपल्याच आसपासच्या अशा घटनांनी शरमिंदे झाले आहेत काय?

इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. अत्याचार आसिफ़ावरचा असो किंवा श्रीमंत सुखवस्तु घरातला असो, तो अत्याचारच असतो आणि त्यात भरडली जाणारी स्त्री वा बालिका अबला म्हणूनच चिरडली जात असते. तिची जात धर्म वा त्वचा वर्ण यामुळे तिच्यावर अन्याय होत नसतो. दुबळेपणा हा तिचा गुन्हा असतो आणि म्हणून सबळांना आपल्या मर्दुमकीचे प्रदर्शन मांडण्याची भेकड संधी मिळत असते. जे बेछूट तो गुन्हा करतात व पचवतात, ते प्रतिष्ठीत असतात आणि पकडले जाणार्‍यांवर राक्षस म्हणून आरोप करणारे देव वगैरे नसतात. ते पकडले जात नाहीत म्हणून सभ्य असतात व त्याच सभ्यपणाचा तमाशा मांडण्यासाठी आवेशपुर्ण आरोप करीत असतात, हनि इराणी ही जावेद अख्तर यांची पहिली पत्नी, तिने अलिकडेच आपण बाल कलाकार असताना कोवळ्या वयात सोसलेल्या अत्याचाराची कथा सांगितलेली आहे. तिचा अनुभव आजही शेकडो नव्या मुली चित्रसृष्टीत घेतच असतात. त्याविषयी कधी जाहिर चर्चा होते काय? काही वर्षापुर्वी अशा गोष्टी चव्हाट्यावर आल्या त्यात पडद्यावर खलनायक म्हणून काम करणार्‍या शक्तीकपूरचे नाव होते. किती चित्रतारे तेव्हा आपण याच चित्रसृष्टीत असल्याची लाज सांगायला समोर आलेले होते? आसिफ़ासाठी ज्यांचा जीव तिळ तिळ तुटतो, त्यांना तेव्हा शक्तीकपूरवर झालेल्या आरोपाचा अभिमान वाटला होता काय? उलट तेव्हा जो गौप्यस्फ़ोट झाला त्यातल्या आरोपींच्या समर्थनाला एकाहून एक नामवंत कलावंत पुढे सरसावले होते. आसिफ़ासाठी जो न्याय असतो, तोच चित्रसृष्टीत नाडल्या जाणार्‍या मुलींच्या अब्रुसाठी गर्भगळित कशाला होतो? यातला दुटप्पीपणा लक्षात घेतला पाहिजे आणि यातले मायावी राक्षस ओळखले पाहिजेत. आपली पापे झाकण्यासाठी त्यांना आसिफ़ाचा विषय ओरडून सांगावा लागत असतो. त्यातली आसिफ़ा निमीत्त असते. तिच्या न्यायापेक्षा आपली पापे झाकायला प्राधान्य असते.

राष्ट्रसंघ, विविध जागतिक मदत संस्था वा धर्मदाय संस्था यांच्यापासून जगभरचे सृजनशील लेखक कलावंत कुठल्याही सामान्य गुन्हेगार गुंडापेक्षा किंचीतही वेगळे नाहीत व नसतात. तेही त्याच भवतालाचे घटक असतात आणि त्यांच्यात सगळे विकार तितकेच ठासून भरलेले असतात. सोशल मीडियापासून कुठल्याही विचारमंथन चर्चांचे स्वरूप बघितले, तर त्यात हलक्याफ़ुलक्या शब्दात महिलांविषयी व्यक्त होणारी मते व वक्तव्ये लैंगिक नसतात काय? महिलादिनी पुरूष म्ह्णून आपण बळीचे बकरे असल्याची उपरोधिक टिका स्त्रीविषयक सन्मानाची नसते, तर हेटाळणीयुक्त असते. सभ्यतेचा मुखवटा चढवून रंगवलेले नाटक असते. या नाटकात जो अधिक कुशल कलाकार असतो, तो बेमालूम महिलांचा उद्धारकर्ता असल्याचे पात्र रंगवित असतो. गांधीजी म्हणत हिंसेची कुवत नसल्याने हात न उचलणारा अहिंसक नसतो. हिंसेची पुर्ण क्षमता असताना मनावर नियंत्रण राखून दाखवलेला संयम म्हणजे अहिंसा! नेमकी तीच गोष्ट इथेही लागू होते. पुरूषातला नर म्हणून जी पाशवी प्रवृत्ती असते, ती प्रत्येक क्षणी संधी शोधत असते. ती संधी घेण्याची हिंमत नसल्याने कोणी सभ्य होत नाही. तशी संधी असतानाही त्याला अन्याय अत्याचार समजून दूर रहाण्याची कुवत, ही सभ्यता असते. किंबहूना असे कोणी करायला धजावला तर त्याला पुढे येऊन रोखण्य़ाची इच्छाशक्ती, ही संस्कृती असते. प्रत्येकाने आपापला चेहरा आरशात बघावा आणि आपल्यात यापैकी कुठली कुवत आहे, ते तपासून घ्यावे. ह्या असल्या नाटकी संस्कृतीने हजारो वर्षात स्त्रीला तिचा सन्मान मिळू शकला नाही की सुरक्षेची हमी मिळू शकलेली नाही. तेजपालसह त्याच्या वर्तुळातील प्रतिष्ठीतांनी कृतीतून त्याची ग्वाही दिलेली आहे. म्हणूनच आसिफ़ाच्या न्यायाचे नाटक पुरे झाले. अन्य कुणाकडे न्याय मागण्यापेक्षा प्रत्येकाने आपणच न्यायमुर्ती होऊन आपलाच न्याय करण्याची हिंमत दाखवली, तरी जगभरच्या आसिफ़ा सुरक्षित होऊ शकतील. कारण पुरूषात दबा धरून बसलेले श्वापद खरा धोका असतो.

7 comments:

 1. Khray bhau aaj Jo to uthatoy bharat sarakala modina sunawatoy.Europe america madhye tar far wait awastha ahe mule wa mulinchi.karan pratekache sawatra aai baap asatat the sawatra mulla mulinwar ghratchch atyachar karatat.tysathi tethil sarakare swatach ghrat lakhsha thewatat tari pan he hotach ahe.tyawishyi koni bolat nahi.

  ReplyDelete
 2. अनेक रोमन केथोलिक ' पाद्र्यांवर ' लहान लहान मुलांवर अत्याचार केल्याचे आरोप झाले आहेत. सुरुवातीला या पाद्र्यांनी हे आरोपच नाकारले. परंतु मुलांच्या आई वडिलांनी हे प्रकरण लावून धरल्यावर पोप महाशयांनी या विषयावर तोंड उघडले. या अनेक चर्चेसमधील पाद्र्यांनी तेथिल काम करणाऱ्या ' नन्स ' नाही सोडले नाही. केरळमधील एका नन्सनेच या बद्दल तिच्या स्वतःच्या अनुभवांवर पुस्तक लिहिले आहे. हा बहुराष्ट्रीय ढोंगीपणा आहे.....काय म्हणे तर जगातील तथाकथित ६०० विचारवंतांनी मोदींना या विषयावर टिक्का टिपणी करणारी पत्रे पाठविली आहेत...... कोण कोठले ' विचारवंत ' आणि त्यांचा काय भारतात घडणाऱ्या घटनांशी काय संबंध ?? हे सर्वदूर अनेक राष्ट्रात पसरलेले ढोंगी ...' निधर्मी ' म्हणवणारी मंडळीच आहेत.

  ReplyDelete
 3. संजीव कुमार चा तो चित्रपट मौसम.

  ReplyDelete
 4. "हिंसेची कुवत नसल्याने हात न उचलणारा अहिंसक नसतो. हिंसेची पुर्ण क्षमता असताना मनावर नियंत्रण राखून दाखवलेला संयम म्हणजे अहिंसा! नेमकी तीच गोष्ट इथेही लागू होते. पुरूषातला नर म्हणून जी पाशवी प्रवृत्ती असते, ती प्रत्येक क्षणी संधी शोधत असते. ती संधी घेण्याची हिंमत नसल्याने कोणी सभ्य होत नाही. तशी संधी असतानाही त्याला अन्याय अत्याचार समजून दूर रहाण्याची कुवत, ही सभ्यता असते. किंबहूना असे कोणी करायला धजावला तर त्याला पुढे येऊन रोखण्य़ाची इच्छाशक्ती, ही संस्कृती असते"

  Apratim Lekh Bhau, Hats off!!!!

  ReplyDelete
 5. जबरदस्त सर. ञिवार नमस्कार. आपणच आपल्याला आरशात पहावे. हे उत्तम.

  ReplyDelete