Friday, December 14, 2018

ऑगस्टाने राफ़ायल पाडले

sinha shourie bhushan के लिए इमेज परिणाम

तीन दशकापुर्वी बोफ़ोर्सच्या तोफ़ा खरेदीतला घोटाळा गाजत होता, त्यातून जी अनेक नावे सर्वतोमुखी झाली, त्यातले एक नाव होते अरूण शौरी. कारण विविध माध्यमातून त्यातला घोटाळा समोर आणला व उलगडला जात होता. त्यात शौरी बिनीचे शिलेदार होते. त्यांनी इंडीया टुडे वा इंडियन एक्सप्रेस अशा माध्यमात अनेक लेख लिहून अशा नव्या-जुन्या घोटाळ्यांचा उहापोह चालविला होता. पुढल्या काळात एक अभ्यासू व्यासंगी पत्रकार म्हणून त्यांची खुप ख्याती झाली. त्याच पुण्याईवर त्यांना राजकारणत प्रतिष्ठा मिळाली व त्यांच्या शब्दाला किंमत आली. ही सगळी पुण्याई शौरींनी मागल्या काही महिन्यात धुळीस मिळवून घेतली आहे. तेच नाहीत, तर त्याच बोफ़ोर्स लाटेवर स्वार होऊन प्रशासकीय सेवेतून राजकारणात आलेले यशवंत सिन्हाही शुक्रवारी जमिनदोस्त होऊन गेले. परराष्ट्रमंत्री वा अर्थमंत्री म्हणून त्यांनी वाजपेयी सरकारमध्ये काम केले होते. अशा जबाबदार पदावर काम केलेल्यांना शासकीय काम व सरकारच्या निर्णय प्रक्रीयेची जाण असते. निदान सामान्य लोकांचा तरी तसा समज असतो. अशा लोकांचा सुप्रिम कोर्टाने शुक्रवारी पुरता पर्दाफ़ाश करून टाकला. त्यांनी जी याचिका केलेली होती, ती फ़ेटाळून लावताना राफ़ायल विमान खरेदीत कुठलाही घोटाळा नाही व ती खरेदी देशहितासाठीच झाली असल्याचा निर्वाळा, कोर्टानेच दिलेला आहे. कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची अपप्रचार मोहिम जमिनदोस्त करण्याची मोठी कामगिरी या दोघांनी बजावली आहे. कारण आता लोकसभा प्रचारात राहुलसह कॉग्रेस किंवा अन्य विरोधी पक्षांना राफ़ायलवर बोलायची सोय राहिलेली नाही. उलट याच कालखंडात युपीए व कॉग्रेस यांनी केलेल्या ऑगस्टा वेस्टलॅन्ड हेलिकॉप्टर खरेदीतल्या दलालीचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे आणि त्यातला मुख्य दलाल सीबीआयच्या कस्टडीत आहे. त्याच्याकडून उघड केल्या जाणार्‍या तपशील व घोटाळ्याचे खुलासे देताना राहुल सोनियांची दमछाक होणार आहेच. पण त्याविषयात सिन्हा, शौरी व त्यांचे जाणकार वकील प्रशांत भूषण कशाला गप्प होते, त्याचेही उत्तर अवघड होऊन बसलेले आहे.

कुठल्याही शस्त्रास्त्र खरेदीत विक्रेता देश आणि खरेदीदार देश यांच्यात एक गोपनीयतेचा करार होत असतो. कारण इतक्या महागड्या सुविधा उपकरणे विकली खरेदी केली जात असताना मोठी सौदेबाजी होते. ती गोपनीयता घोटाळ्यासाठीच असते असे नाही. अनेकदा एकच वस्तु विविध देशांना उत्पादक विभिन्न किमतीला पुरवित असतात. त्यातली काही रक्कम दलाली-लाच म्हणून दिली घेतली जाणार असेल, त्याप्रमाणे किंमतीत वाढ किंवा घट होते असते. त्याचा उत्तम नमूना बोफ़ोर्स प्रकरणात शौरी यांनीच पुराव्यासहीत मांडला होता. तेव्हा योगायोगाने देशाचे राष्ट्रपती व्यंकटरामन होते आणि ते तामिळनाडूचे अर्थमंत्री असतानाचा एक किस्साच शौरी यांनी आपल्या लेखातून सादर केलेला होता. १९६० च्या दशकात तामिळनाडू सरकारने जपानला आठ सुतगिरण्या उभारण्याचे कंत्राट दिलेले होते आणि त्याविषयी खुप प्रश्न विचारले गेलेले होते. तो काळ राहुलचा नव्हता म्हणून नुसते आरोप होत नसत, तर पुरावे आणि संदर्भ देऊन प्रश्न विचारले जात. सहाजिकच तामिळनाडू विधानसभेत त्याच सुतगिरण्यांच्या कंत्राटावर प्रश्न विचारला गेला होता. तो इतका नेमका होता, की राज्याचे अर्थमंत्री व्यांकटरामन यांना उत्तर नाकारता आले नाही. ज्या जपानी कंपनीकडून या सुतगिरण्यांशी खरेदी वा उभारणीचे कंत्राट झाले होते, त्या कंपनीचे मुळ किंमतीवर साडेबारा टक्के दलाली देण्याचे धोरण होते. त्याचा आधार घेऊन कोणी प्रश्न विचारला होता, की आठ सुतगिरण्या ठरल्या किंमतीलाच उभारल्या जाणार असतील, तर त्यातली दलाली कुणाला मिळाली आहे? सरकारने त्या दलालीची अट कशाला नाकारली नाही? याला व्यंकटरामन यांनी मोठे मार्मिक उत्तर दिले होते. या व्यवहारात साडेबारा टक्के दलाली सरकारने सोडलेली नाही, तर घेतलेली आहे आणि त्या दलालीच्या रुपाने जपानी कंपनी नववी सुतगिरणी उभारून देते आहे. हेच ते उत्तर होते.

आपल्या भ्रष्टाचार विरोधातल्या लेखात अरूण शौरी यांनी इतका सुंदर संदर्भ दिला होता आणि बोफ़ोर्स काळात राष्ट्रपती असलेल्या व्यंकटरामन यांना सत्याच्या जवळ कारभार जावा, म्हणून आवाहन केलेले होते. आपल्या शोध पत्रकारितेला इतक्या उंचीवर घेऊन जाणार्‍या अरुण शौरी यांनी राफ़ायल प्रकरणात घेतलेली भूमिका, म्हणूनच त्यांची संपुर्ण प्रतिष्ठा लयास घालवणारी ठरली आहे. कारण एका बिनबुडाच्या पोरकट आरोपाचे समर्थन करताना राजकीय द्वेषबुद्धीने शौरी वहावत गेले. त्यांनी राफ़ायल विरोधातल्या याचिकेतला अर्जकर्ता म्हणून पुढाकार घेतला. त्यामुळे एकेकाळचा हा बुद्धीमान व्यासंगी पत्रकार राहुल गांधीच्या रांगेत येऊन बसला आहे, आज स्वर्गातून राहुलचे पिताश्री राजीव गांधी किती समाधानी असतील ना? कारण तीन दशकापुर्वी याच शौरींच्या मुद्देसुद आरोपांनी राजीव गांधींचे पंतप्रधानपद गोत्यात आले होते आणि आज नरेंद्र मोंदीचे पंतप्रधानपद गोत्यात घालण्याच्या हट्टापायी शौरी आपली प्रतिष्ठा विश्वासार्हता गमावून बसले आहेत. ज्याने आपली पंतप्रधानकी बोफ़ोर्सची तोफ़ डागून जमिनदोस्त केली, त्यालाच आपल्या पुत्राने आरोपांच्या कागदी विमानात बसवून संपवलेले बघून कुठला पिता समाधानी नसेल? अर्थात सुपुत्राला आपण काय बाजी मारली, त्याचाही कधी पत्ता नसतो की काय बुडवले, त्याचाही थांग नसतो, ही गोष्ट वेगळी. दया शौरी-सिन्हा अशा बुजुर्गांची येते. सोनियांना खुश करण्यासाठी राहुलची भलामण करणेही एकवेळ समजू शकते. कालपरवाच तीन राज्याचे निकाल बघून सिन्हा म्हणाले होते, राहुलना पप्पू म्हणण्य़ापुर्वी शंभरदा विचार करा, असे सल्ले देण्यापुर्वी खुद्द सिन्हा कसला विचार करतात? सोनियांच्या लाडक्याचे कौतुक करायला हरकत नाही. पण त्यासाठी त्या लाडक्याने बनवलेल्या कागदी आरोपांच्या विमानात बसून सुप्रिम कोर्टाचा फ़ेरफ़टका मारण्याची हौस कशाला हवी होती? 

शौरी वा सिन्हा यांच्याविषयी असे काही लिहीण्यात अजिबात आनंद नाही. मनाला वेदनाच होतात. पण म्हणून सत्य बदलत नाही. या लोकांनी मागल्या चार वर्षात स्वत:ची करून घेतलेली दुर्दशा बघितली, मग कींव येते. तशीच ती प्रशांत भूषण यांचीही येते. युपीए काळात त्यांच्या अनेक जनहित याचिकांनी सरकारला घाम फ़ोडला होता आणि आज त्यांच्या प्रत्येक याचिकेला धुळ चाटावी लागते आहे. काही काळापुर्वी त्यांना काश्मिर विषयक भूमिकेमुळे काही तरूणांनी मारहाण केली होती. त्यांना ती खुप भावलेली असावी. पण हल्ली कोणी गुंडपुंड येत नसल्याने बहुधा त्यांनी कोर्टकडून थपडा खायचा निर्धार केलेला असावा. आजकाल जितक्या याचिका करतात तितक्या उलटत आहेत. कारण त्यांची न्यायप्रियता संपलेली असून राजकीय सुडबुद्धीने त्यांनाही घेरलेले आहे. म्हणून आधी सीबीआयच्या प्रमुखपदी आलोक वर्मांना नेमल्यावर विरोध करणारे भूषण नंतर आलोक वर्मांचे गुणगान करीत त्यांनाच आपल्या जागी कायम राखण्यासाठीही याचिका करतात आणि कोर्टाची थप्पड खातात. हा नवाकोरा पायंडा बनू लागला आहे. पण या सगळ्यावर राफ़ायलची खरेदी रद्द करणे व त्याविषयात विशेष पथकाकडून चौकशी करणे, हा कळस होता. अर्थात असल्या खुळेपणात रमण्याचा प्रशांत भूषण यांचा छंद नवा नाही. काहीकाळ त्यानी केजरीवालच्या पोरखेळात सहभाग घेतला आणि गटांगळ्याही खाल्लेल्या आहेत. अति बुद्धमान लोक असेच कागदी घोडे नाचवून उघडे पडतात. बुद्धीचेही अपचन त्याला कारण असते. पण सिन्हा भुषणांच्या पंगतीत शौरी जाऊन बसले त्याचा खुप खेद होतो. कारण आता राफ़ायल विषय निकालात निघाला आहे आणि हेच महाभाग ऑगस्टा वेस्ट्लॅन्ड बाबतीत मूग गिळून का गप्प होते, असे प्रश्न त्यांनाही यापुढे विचारले जातील. पण त्याचे समर्पक उत्तर त्यांच्यापाशी नसेल. राहुलचे ठीक आहे. तो आजही बच्चाच आहे. या तीन महामहोपाध्यायांचे काय? कारण राहुलला हेलिकॉप्टर वा लढावू विमन यातला फ़रक कळत नाही. यांनाही कागदी विमान आणि भक्कम पुराव्यातला फ़रक समजत नाही काय?

14 comments:

  1. कोर्टाच्या निर्णयाने राहुलचा रफाल विमानाचा प्लान पडला .त्याचप्रमाणे माइकल christian च्या प्रत्यर्पणने कॉंग्रेसचे नेते चांगलेच कोर्टच्या कचाट्यात सापडले .
    थोडक्यात तीन राज्यात सत्ता मिळाली म्हणून विमान आठ दिवसात जमिनीवर आले .

    ReplyDelete
    Replies
    1. Since winning the elction in MP, Rajasthan and Chhattisagadh Rahul Gandhi is already backpeddling on the issue of loan waiver for the farmers. He will take a similar decision on paying Rs. 10000 to all unemployed youth. Now the voters will realise that Rahul Gandhi is not only an economic illiterate he is also stupid.

      Delete
    2. एका राज्यातच निर्भेळ सत्ता आहे । बाकी दोन राज्यांमध्ये खरंतर परीस्थिती अतिशय दोलायमानाच आहे । Congress victory is a myth that media is creating. It is a setback for BJP for sure...

      Delete
  2. आता कोल्हेकुई करण्यासाठी नवीन विषय शोधतील.

    ReplyDelete
  3. अतिशय छान लेख भाऊ....या गोष्टी आमच्या पिढीला माहीत नव्हत्या

    ReplyDelete
  4. सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुध्दा याला मान्य नाही अशा पपपूला लोक कसे काय मानतात हे समजत नाही. महणजे हा पपपू आहे की लोक पपपू आहेत हेच कळत नाही.

    ReplyDelete
  5. पण कोर्टाने निकाल राखुन ठेवुन निवडनुका संपल्यावरच का दिला? त्याचा फायदा झाला ना कांगरेसला थोड्या फरकाने का होइना जिंकायला.सुनावणी तर आधीच पुर्ण झाली होती ना.

    ReplyDelete
  6. What would have happened if the Court decision had come before voting? Is the highest court partial?

    ReplyDelete
  7. खरोखरच सुंदर लेख पण ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणारे कोण शंभर वेळा बोललेलं खोटं लोक खरं समजतात आता त्याला आपण काय करणार

    ReplyDelete
  8. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये शौरी यशवंत सिन्हा जसवंत सिंह ब्रिजेश मिश्र अशा बाहेरच्या लोकांचे बरेच वर्चस्व होते. या मंडळीना पक्ष कार्यकर्ते संघटना यांच्याशी काहीही घेणे देणे नव्हते.रा स्व संघाचे आणि या लोकांचे अजिबात जमले नाही त्यामुळे वाजपेयींच्या विरोधात स्वदेशी जागरण मंच भारतीय मजदूर संघ या संघ परिवारातील संघटना रस्त्यावर आल्या होत्या.2004 च्या वाजपेयींच्या पराभवामागे हे एक मोठे कारण होते. लालकृष्ण अडवाणी यांची सोन्यासारखी कारकीर्द सुधींद्र कुलकर्णी यांच्या मुळे कराचीत जिना स्तुतीमुळे बरबाद झाली.मोदी यांनी या उपटसुंभ मंडळींना खड्या सारखे बाजूला काढले आहे त्यामुळेच यशवंत सिन्हा अरुण शौरी शत्रुघ्न सिन्हा रोजच्या रोज उठून मोदी आणि शहा यांना शिव्या शाप आणि तळतळाट देत आहेत मात्र या लोकांना जनतेत फुटक्या कवडीची देखील किंमत नसल्याने मोदींनी या लोकांना अक्षरशः अनुल्लेखाने मारले आहे

    ReplyDelete
  9. भाजप सरकारने कोर्टाला खोटी माहिती दिली आहे आता मोदींचा काही खर नाही स्वतःच्या हाताने पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे आता भाजपचे खऱ्या अर्थाने बुरे दिन सुरू झाले आहेत

    अमितG

    ReplyDelete
  10. यशवंत सिन्हा , शत्रूघन सिन्हा , अरुण शौरी हे तीन पदर पावटे आहेत. यशवंत सिन्हा हे गोव्यामध्ये साल २०१३ मध्ये पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी भाजपा कार्यकारिणीची बैठक चालू होती तेंव्हा तेथे फिरकले न्हवते. वर तोंड वर करून त्यांना स्वतःला ' नमोनिया ' झाला नाही म्हणून सर्व जगाला सांगत होते. परंतु श्री. नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून ' शपथ विधी ' झाल्यावर हाच ' निर्लज्ज ' माणूस मोदींकडून मंत्रिपदाची अपेक्षा करत होता. याला खरं तर ' भाजपा ' मधून लाथा घालून बाहेर काढलं पाहिजे. दुसरा पावटा ' शत्रुघन ' यालाही माहिती आहे की २०१९ च्या निवडणुकीत त्याला भाजपचे तिकीट मिळणार नाही. कदाचित नितीशकुमार यांच्या पक्षाकडून त्याला तिकीट मिळू शकेल. अरुण शौरी तर ' सहारा ' कंत्राटामुळे प्रसिद्धीस आले. यांचे निवडणुकीतील कर्तृत्व काय तर मोठा ' भोपळा ' .................पुढच्या निवडणुकीनंतर हे तिघेही ' अर्थशून्य ' होतील हे निश्चित.गोंदियातील ' पटोले ' तर कधीच विस्मरणात गेले आहेत.

    ReplyDelete
  11. My comments on Bhau Torsekar article
    Article by Bhau Torsekar Must read
    भाऊ खुप छान लेख त्याकाळात घेऊन गेला.
    यात यशवंत सिन्हा हे भावी महागठबंधन चे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणुन काही पुरोगामी प्रेझेंट करतात. अशा उमेदवाराला प्रसिद्धी साठी हे केले गेले असावे. यात सिन्हांचा वैयक्तिक स्वार्थ व मोदी सरकार मध्ये स्थान मिळाले नाही म्हणुन नाराजी चा परिणाम आहे. हे रफाल प्रकरण न्यायालयात करताना मोठा हेतु होता तो तरी साध्य झालेला आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दोन आठवडे ऊशीरा देत मतदारांचे ध्रुविकरण करण्याचा हेतु या याचीक्या करत्यांचा सर्वोच्च न्यायालयाने पुर्णोत्वाला नेला आहे.
    मोदी शहा नी भारतीय लोकशाही ओळखली नाही हे त्यांचे पण दुर्दैव आहे व देशाचे पण.
    कांदा बटाटा वर झुरणारी ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे हे परत परत सिद्ध होते आहे.
    70 वर्षा वरिल राजकारण्याला मंत्रीपद द्यायचे नाही या ऊदात्त हेतुचा पाला पाचोळा मतदारांनी करुन दाखवला.
    पण या खंडप्राय देशातील परिस्थितीची व मतदारांची स्वार्थी मेंटालीटी जाण या धुरंदर जोडीला नाही असेच वाटते.
    अनेक उदात्त धोरणे भारतीय लोकांना पेलणारी नाहीत हे पण मतदार वारंवार दाखवतात.
    कारण फार मोठ्या प्रमाणात मतदार हे स्वार्थी व अशिक्षीत आहेत हे वारंवार आठवण करुन देणारा अलार्म दर तासाल मोदी शहा ना लावून ठेवणे आवश्यक आहे. व केतकरी जोतीषी तत्वज्ञाना प्रमाणे मोदी शहा जर धुर्त असतील तर अशा घटनातुन नक्कीच शिकतील.
    पण यात मिडियावालेंचा भुलभुलैया मोठा आहे. कारण हेच मिडियावाले मोदी शहानी गोळा बेरजेचे राजकारण केले तर थयथयाट करून चारी मुंढ्या चीत करतील. यामुळे मोठ्या विचीत्र चक्रयुहात भाजप सापडला आहे. व यातुन ते अभिमन्यू होतात का श्रीकृष्ण होतात हे 2019 ला समजेल.
    पेट्रोल डिझेल किंमती या द्वारे सुद्धा मोठा निधी ऊभा करुन ऑईल कंपन्या मजबूत करणं व हा निधी रोड व ईतर ईन्फरास्टकचर ऊभे करण्यासाठी वापरला हा मोठा जुगार भाजप चे मोदी शहा व जेटली खेळले आहेत. पण मतदारांनी खंजीर खुपसला आहे. पण याला आता खुप ऊशीर झाला आहे. या तीन मिहीन्यात काय करणार हा मोठा जुगार आहे. कारण अशा उदात्त धोरणे जनते पर्यंत न्यायला एकतर सक्षम व ईम्पार्शल मिडियावाले पाहिजेत व साहित्यिक लेखक पुरोगामी पाहिजेत. पण हे सर्व विकले गेलेले आहेत. यांचा स्वार्थ भ्रष्टाचारी व शेअर देणारे सरकार पाहिजे यात आहे. आणि यात केवळ हा हेतू नाही या बरोबर मोठा हेतू भारता सारख्या सुजलाम सुफलाम देशाला कायम पंगु ठेऊन विदेशी मदतीवर कायम अवलंबून ठेवायचे. व कर्ज देऊन परत दुष्टचक्रात ठेवायचे हा विघातक हेतु यात आहे.
    यातुन देश बाहेर पडण्याची आशा मोदी मुळे वाटत आहे पण याला सुरुंग लागु शकतो हे मोठे दुर्दैव आहे. पण या तीन महिन्यात (आचार सहींता) लागु होण्या आधी भारतीय मतदारांचे अनेक लंगुचालन करणारे निर्णय घेतात काय? हे पहावे लागेल व असे निर्णय मिडियावाले कसे ऊलटे फिरवण्याचा प्रयत्न करतात यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे. कारण मोदी सारखा खंबीर धुर्त व जिगरबाज बहुजन नेता परत देशाला मिळण्या साठी तीन चार दशक थांबावे लागेल. आणि तो पर्यंत या देशाची काय दैना झाली असेल याची कल्पना करणे पण अशक्य आहे.

    ReplyDelete
  12. मुद्देसूद मांडणी केल्यामुळे नेमकं भारतीय राजकारणात काय चालले हे सामान्यांना कळतं आहे. खुप छान.. भाऊ

    ReplyDelete