Tuesday, December 25, 2018

टीडीपी, एलजेपी आणि शिवसेना

uddhav pandharpur के लिए इमेज परिणाम

कालपरवा म्हणजे आठवडाभरापुर्वी बिहारमधला एक छोटा पक्ष, राष्ट्रीय लोकसमता पक्ष भाजपाप्रणित एनडीए आघाडीतून बाहेर पडला. दोन दिवसातच बिहारच्या लालूप्रणित महागठबंधन आघाडीत सहभागी झाला. मागल्या काही महिन्यापासून त्या पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाहा यांनी आपल्याला आगामी लोकसभेत किती जागा मिळू शकतील, त्यासाठी अमित शहांकडे लकडा लावला होता. आरंभी ही बाब गुपित होती. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा कुशवाहा उघड नाराजी व्यक्त करायला लागलेले होते. पण अमित शहा वा भाजपाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांना जणू आघाडीतून बाहेर पडायची सक्तीच केली. एकदा तुम्ही काही जाहिर भूमिका घेतली, मग नुकसान सोसूनही जपावी व पाळावी लागत असते. कुशवाहा यांचेही तसेच झाले. त्यांना भाजपाने निघून जा असे कधी उघड सांगितले नाही. पण कृतीतून त्यांच्यावर तशीच वेळ आणली. काही प्रमाणात आंध्राचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंची कथा तशीच आहे. त्यांनी आपल्या स्थानिक वा प्रादेशिक राजकारणासाठी भाजपाच्या मोदी सरकारची कोंडी सुरू केली होती. त्याला बळी पडण्यापेक्षा मोदींनी अन्य मार्गाने नायडूंची समस्या निकालात काढायचा प्रयास केला. एका राज्याला विशेष दर्जा देणे कायद्याने शक्य नसल्याने नायडूंचा हट्ट पुर्ण करणे कुठल्याही केंद्र सरकारला शक्य नाही. हे त्यांनी समजून घेतले असते, तर त्यांना एनडीएतून बाहेर पडण्याची वेळ आली नसती. कारण त्या कायदेशीर अडचणीला वळसा देऊन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अधिकचे अनुदान आंध्राला देण्याचा मार्ग दाखवला होता. पण नायडू राजकीय प्रतिष्ठेला चिकटून बसले आणि आधी सरकारमधून व नंतर एनडीएतून बाहेर पडले. पण हे सगळे नंतरचे आहेत. मोदी सरकार स्थापन झाल्यावर अवघ्या सहा महिन्यापासून त्यात सहभागी असलेली शिवसेना नाराज आहे, तिला मात्र मोदी शहांनी कधीच धुप घातला नाही, हा काय विरोधाभास आहे?

यातली संख्याही समजून घेतली पाहिजे. उपेंद्र कुशवाहा यांचा पक्ष तसा बिहारमधला खुप छोटा नगण्य पक्ष आहे, त्याची तिथे शिवसेने इतकीही लक्षणीय शक्ती नाही. एनडीएचा मित्रपक्ष असून भाजपाने विधानसभेच्या भरपूर जागा देऊन त्याला दहाबारा आमदारही निवडून आणता आलेले नव्हते. उलट युती तुटल्यावर सेनेने स्वबळावर आणि मोदींना शिव्याशाप देऊनही ६३ जागा जिंकलेल्या होत्या. दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष होताना महाराष्ट्रात कॉग्रेस राष्ट्रवादीला मतात व जागांमध्येही मागे टाकलेले होते. म्हणूनच कुशवाहांकडे ज्या सहजतेने भाजपा दुर्लक्ष करू शकतो, तितका शिवसेना हा महाराष्ट्रातला छोटा पक्ष नाही. दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभेचे निकाल लागले, तेव्हा त्यातला भाजपाच्या खालोखाल जागा जिंकणारा एनडीएतला पक्ष शिवसेनाच आहे. नायडूंच्या तेलगू देसमला १६ तर सेनेला १८ जागा मिळालेल्या होत्या. शिवाय नायडू भाजपाच्या पाठींब्याशिवाय विधानसभा जिंकून मुख्यमंत्रीही होऊ शकले नव्हते. म्हणूनच शिवसेनेची तुलना टीडीपीशीही होऊ शकत नाही. तरीही नायडूंनी हुलकावणी देताच पंतप्रधान व अर्थमंत्री त्यांची समजूत काढायला धावले होते. पण चार वर्षापुर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांची तयारी सुरू झाल्यापासून शिवसेनेने नाराजीचा सूर लावला असूनही, भाजपा वा मोदींनी त्यांना अजिबात धुप घातलेला नाही. याचे एक कारण सेनेला बाजूला ठेवूनही भाजपा विधानसभेत मोठा पक्ष झाला व सत्तेवरही स्वार झाला. मात्र सत्ता टिकवण्यासाठी त्याला सेनेच्या कुबड्या घ्याव्या लागल्या होत्या. तेही करताना कधीही राजिनामे देण्याची व पाठींबा काढून घेण्याची धमकी सेना देतच राहिली आहे. त्या राजिनाम्याची कथा आता हास्यास्पद होऊन गेली आहे. कारण कुशवाहा आणि नायडूंनी धमक्या दिल्यापासून अल्पावधीतच राजिनामे फ़ेकले व सत्तेला लाथ मारलेली. पण चार वर्षे नुसती कुरबुर करीत सेना भाजपाच्या सत्तेला चिकटून बसलेली आहे.

यातला मुद्दा असा, की तेलगू देसमचे १६ खासदार आपल्याला सोडून जाऊ नयेत, म्हणून मोदी जेटलींनी प्रयास केले. पण शिवसेनेचे १८ खासदार एनडीए सोडून जातील, अशी भिती त्यांना कधीच वाटलेली नाही. उलट आपल्याला सोडून शिवसेना कुठे जाऊच शकत नाही, अशी जणू भाजपा नेतृत्वाला पक्की खात्री आहे. म्हणूनच १८ खासदार असलेल्या सेनेला कुशवाहांप्रमाणे दुर्लक्षित ठेवूनही अमित शहा निश्चींत आहेत. कारण मागल्या चार वर्षात सेनेने आपली अवस्था गरजते वो बरसते नही, अशी करून घेतली आहे. दुसरीकडे एनडीएतील आणखी एक बिहारी घटक रामविलास पासवान, तसा दांडगा पक्ष नाही. स्वबळावर त्याला बिहारमध्ये कुठले मोठे यश संपादन करता येत नाही. तरीही कुशवाहा बाहेर पडल्यावर त्यांनी आपल्या जागांसाठी आवाज उठवला आणि अमित शहांनी सर्व कामे बाजूला ठेवून लोकजनशक्ती नामे पक्षाला आधी जागा निश्चीत करून दिल्या. उलट शिवसेनेविषयी प्रश्न विचारला, की तेच शहा निर्वेधपणे सांगतात, सेना आमच्याच बरोबर राहील. खुद्द सेना नेतृत्व स्वबळाची भाषा करीत असताना शहांना सेना सोबत रहाण्याची हमी कुठून मिळते? तर ती सेनेच्या डरकाळ्यांमधून मिळत असते. मुंबई महापालिकेत सेनेला भाजपाने पाठींबा दिलेला आहे आणि तो कायम हवा असेल, तर सेनेला विधानसभा व लोकसभेत कितीही अपमानित होऊन भाजपाला पाठींबा कायम राखणे भाग आहे. उलट सेना सोबत नसतानाही मागल्या चार वर्षात भाजपाने राज्यातल्या अनेक महापालिका व जिल्हा तालुका संस्थांमध्ये आपले बळ वाढवून घेतले आहे. मुद्दा इतकाच, की शिवसेना डरकाळ्या फ़ोडणार पण चावणार नाही, याची अमित शहांना खात्री पटलेली आहे. म्हणून पासवान यांना ६ खासदारांसाठी जितकी प्रतिष्ठा आहे, तिचा मागमून सेनेच्या बाबतीत दिसत नाही. ही स्वत:ची दयनीय अवस्था सेना नेतृत्वानेच करून घेतली आहे.

विधानसभेत युती तुटली वा तोडली गेली, हे खरे आहे आणि त्यात भाजपाने आपला मतलब साधून घेतला; हे कोणी नाकारू शकत नाही. पण त्यासाठी शिव्याशाप देत बसण्य़ापेक्षा सेनेने विधानसभेत मिळालेल्या मतांचा व जनतेच्या पाठींब्याचा उपयोग आपले हातपाय पसरण्यासाठी करून घ्यायला हवा होता, तर जिल्हा महापालिका लढाईत भाजपाला दणका देऊन युतीची गरज पटवून देता आली असती. त्यापेक्षा नुसत्या डरकाळ्या फ़ोडणे अखंड चालू आहे. दरम्यान भाजपा सेनेशिवाय राज्याच्या अनेक भागामध्ये आपले पाय घट्ट रोवून उभा राहिला आहे. आपल्या मदतीशिवाय स्वबळावर लढणे सेनेला शक्य नाही, ही स्थिती त्यातूनच भाजपाने निश्चीत करून घेतली आहे. युती आपल्या लाभाची असेल, पण तुटली तरी नुकसानाची ठरू नये; इतकी तयारी भाजपाने मागल्या चार वर्षात करून घेतली आहे. म्हणून मग तेलगू देसमच्या १६ आणि पासवानांच्या ६ खासदारांपेक्षा सेनेने १८ खासदार भाजपा वा मोदींना भयभीत करू शकत नाहीत. याखेरीज आणखी एक मुद्दा सेनेने कधीच विचारात घेतला नाही, तो आघाडीच्या राजकारणाचा आहे. कॉग्रेस राष्ट्रवादीला शिवसेना भाजपाच्या विरोधात हवी असली तरी सोबत मात्र नको आहे. त्यामुळे भाजपाची साथ सोडायची तर शिवसेनेला अन्य कोणी सहकारी मित्रपक्ष मिळू शकत नाही. हेही भाजपा जाणून आहे. त्याचे भान राखले असते तर चार वर्षे शिव्याशाप व हुलकावण्या देण्यात खर्ची घालण्यापेक्षा सेनेने संघटना मजबूत करून स्थानिक निवडणूकीत भाजपाला शरणागत व्हायची पाळी आणली असती. ते करायची वेळ आता निघून गेली आहे. कारण आपली शक्ती संख्येत असूनही शिवसेना नायडू वा पासवान यांच्यापुढे फ़िकी पडली आहे. नायडूंना महागठबंधनात तरी स्थान आहे. सेनेला नाही. कुशवाहा लालूंच्या सोबत जाऊ शकतात, सेनेला कोण सोबत घेणार? चार वर्षापुर्वी राज्यातला दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष आज चौथ्या क्रमांकावर नेतृत्वाचा दिवाळखोरीने आणून ठेवला आहे.

23 comments:

 1. बाळासाहेबांचा मुलगा असणे महत्त्वाचे, कर्तृत्व नाही.

  ReplyDelete
 2. Zanzanit lekh Bhau. Shivsena netratva ajun divalkhorit nighel jar tyani yuti nahi Keli tar. Phir to na ghar ke na ghat ke

  ReplyDelete
 3. पंढरपूरच्या सभेत जागा वाटपाचा मुद्दा घेतला, तिथेच सगळ्यांना समजले .....युती होणारच...

  ReplyDelete
 4. भाउ याच विषयावर लेखाची प्रतिक्षा होती

  ReplyDelete
 5. श्री भाऊ, एक गोष्ट तुम्ही सांगितली नाहीत, जर पाठींबा काढून घेतला आणि पक्ष फुटला तर

  ReplyDelete
 6. शिवसेना, नारायण राणेंचा स्वाभिमान पक्ष आणि आम आदमी पार्टीसारखे पक्षांवर कोणीही विश्वास ठेवत नाही. त्यांना कोणत्याही गठबंधनात आमंत्रण नाही आणि त्यांच्या धमक्यांमूळे कोणीही घाबरत नाही.

  ReplyDelete
 7. परखड आणि वस्तुस्थितीला धरून केलेले हे विश्लेषण आहे,आता वेळ गेली आहे, या मताशी पूर्णपणे सहमत आहे

  ReplyDelete
 8. As per recent Sena reduced to mere 8% voteshare & BJP increased its vote share upto 38 % in Maharashtra. CONG NCP combine would get 42 % vote share. Actually there is no benefit for BJP as a Shivsena ally.

  ReplyDelete
 9. BJP can expand its presence in Maharashtra by going with smaller parties. Shivsena has lost its credibility due to improper guidance.

  ReplyDelete
 10. Shivsena got 63 seats alone in assembly elections becuase BJP Sena departed just before 30 days ahead of polling. It was also benificiery of Modi Effect. People thought they would combine after election. But this time if they fought seperately, BJP would be major beneficiary.

  ReplyDelete
 11. आता उद्धवरावांनी कापुसकोंड्याची गोष्ट सांगायला सुरुवात करावी.

  ReplyDelete
 12. BJP is increasing its vote share by negative politics of Shivsena.

  ReplyDelete
 13. सर्व मुद्दे बरोबर. एक मुद्दा अजून आहे असे वाटते. युती तुटल्यानंतर शिवसेनेनी थो...डासा संयम बाळगायला हवा होता.

  ReplyDelete
 14. भाऊ अतिशय योग्य विश्लेषण केले आहे खरं तर शिवसेना पक्ष प्रमुखांना योग्य तो सल्ला देण्यासाठी शिवसेनेत हयात घालवलेले अनेक नेते आहेत पण शिवसेना वाढीत ज्याचा फुटक्या कवडीचाही सहभाग नाही जो कधीही प्रत्यक्ष नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून येऊ शकत नाही अशा एका पत्रकाराच्या सल्ल्यानुसार शिवसेनेची वाटचाल चालू आहे हे कार्यकारी संपादक आरामात मागच्या दाराने राज्यसभेत जातात आणि रोजच्या रोज सामना मधून स्वबळाची भाषा करत असतात असे असताना आपण जे चौथ्या क्रमांकाचे भाकीत केले आहे त्यात अजिबात अतिशयोक्ती नाही

  ReplyDelete
 15. 1990 मधे जेंव्हा सेना भाजप युती झाली तेव्हा विधानसभेला सेना मोठा भाऊ आणि लोकसभेला भाजप मोठा भाऊ अशी वाटणी झाली होती त्यानुसार सेना 170 आणि भाजप 118 अशा जागा 1990 ते 2009 लढवत होते मात्र याच काळात शिवसेनेने लोकसभेच्या वाटपात भाजपच्या असलेल्या ठाणे बुलढाणा नाशिक अशा जागा हिसकावून घेतल्या शिवाय विधानसभेला लढवलेल्या जागा आणि जिंकलेल्या जागा यात भाजपला 40 टक्के तर सेनेला 25 टक्के असे यश मिळाले त्यामुळे 2014 ला या दोघांमध्ये ज्या कुरबुरी झाल्या त्यात 25 वर्षात सेना कधीच जिंकू शकली नाही अशा काही जागा भाजप मागत होता त्यात तडजोड न झाल्याने युती तुटली आणि जो स्वबळाचा प्रयोग झाला त्यात भाजप सेनेपेक्षा दुपटीने मोठा ठरला आता काही जण याचे श्रेय मोदी लाटेला देतात पण हे लक्षात घ्यावे लागेल की संघटनेची ताकद असेल तरच कोणत्याही लाटेचा फायदा घेता येतो मुळातच 1990 मध्ये जे जागा वाटप झाले होते त्यात सेनेला ताकदी पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या आणि त्याचे प्रत्यन्तर ठाणे वगळता मुंबईसह सर्व महापालिकांमध्ये 2014 नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये आले एकीकडे सरकारमध्ये सहभागी होऊन शिवसेना त्याच सरकारवर दुगाण्या झाडत राहिली तर भाजपा मात्र पद्धतशीरपणे राज्यात संघटनेच्या प्रयत्नातून हातपाय पसरत राहिली त्यामुळेच आपण म्हणता तसे मोदी शहा सेनेच्या धमक्यांना अजिबात धूप घालत नसावेत

  ReplyDelete
 16. खिशातल्या राजीनाम्याने तर पार सेनेची इज्जतच धुळीला मिळाली आहे...तो तर टवाळीचाच विषय झालाय...पंढरपुरात पण त्याचीच पुनरावृत्ती झाली..राहुल गांधी नंतर आता उध्दवाची किव यायला लागली आहे....उध्दवाला त्याचं मजबुरीचं राजकारण लखलाभ...

  ReplyDelete
 17. एकदा मुंबईची महानगरपालिका शिवसेनेच्या हातातून गेली तर मग शिवसेनेचा मनसे होण्याला वेळ नाही लागणार।शिवसेनेला जर टिकायचे असेल तर पाहिले त्यांनी संजय राउतला गप केलं पाहिजे। पण आता काही फायदा नाही वेळ कधीच निघून गेली आहे। आपल्या एका पण भाषणामध्ये शिवसेनेने लोकांसाठी काय केल, याची माहिती दिली नाही (मुळात यांनी लोकांसाठी काही केलंच नाही) - फक्त प्रत्येक भाषणामध्ये मोदींच्या नावाने बोट मोडायची। किती शिवसेनेचा पोरकटपणा - जनता याला उत्तर देणार।

  ReplyDelete
 18. सेनानेतृत्वाची दिवाळखोरी ही त्यांच्या सभोवताली असणाऱ्या चांडाळ चौकडी मुळे आहे,ते राज ठाकरे आधी पासुन बोंब मारून सांगत होते कोणीही ऐकलं नाही. हा उद्धव तर छायाचित्रकार असून पण जर त्याला जवळचा 'निगेटीव्ह' दिसत नसेल तर काय डोंबळाचा फायदा..असं झालं तर हे पिल्लू कर्माने जाणार स्वतःच्या!!

  ReplyDelete
 19. Sir good and statistically report.without alliance shivsena lose M.P.no and market share.the way they are going like this.

  ReplyDelete
 20. माझे काही जुने शिवसैनिक मित्र आहेत, अगदी बाळासाहेबांच्या वेळेपासुन. ते तर म्हणतात लोकांना तोंड देता देता जेरीला आलेत. सुशिक्षीत वर्ग तर हसतो म्हणे आम्हाला.

  ReplyDelete