Saturday, December 15, 2018

‘नोटा’च्या कपाळी गोटा"You can avoid reality, but you cannot avoid the consequences of avoiding reality."   - Ayn Rand

सत्य नाकारले किंवा त्याकडे पाठ फ़िरवली म्हणून ते संपत नाही, की त्याचे परिणाम भोगण्यातून सुटका नसते. हेच सतत कॉग्रेस करत आली आणि त्यावर पडदा घालण्यासाठी माध्यमांसहीत बुद्धीमंतांचा उपयोग कॉग्रेसने केला, म्हणून त्या पक्षाची दुर्दशा झालेली आहे. ताज्या निवडणूकीतून तो पक्ष सावरत असताना भाजपाने तीन राज्ये गमावली आहेत. पण त्याकडे डोळेझाक करून कॉग्रेसचे समर्थक आपल्याला तीन राज्यात निर्णायक सत्ता मिळाल्याचा आनंदोत्सव करण्यात गर्क आहेत. निदान आरंभीच्या दोनतीन दिवस त्यांना त्यातून सवलत द्यावी लागेल. कारण विजयाचा आनंद घेताना त्यांनी दु:खाचा सोहळा साजरा करावा, अशी अपेक्षा कोणी करू शकत नाही. पण त्यांच्याकडून भाजपाचे अनेकजण काही धडा शिकलेले दिसत नाहीत. कारण आजवर आपल्या अपयश वा पराभवावर कॉग्रेस जशी पांघरूण घालत राहिली, तसाच काहीसा प्रकार मंगळवारच्या निकालानंतर भाजपाच्याही समर्थकांकडून होत आहे. तुम्ही तीन राज्यातली सत्ता गमावली हे व्यवहारी सत्य आहे आणि नोटा वा तत्सम काही कारणे दाखवून विजय हुकल्याचे दावे निरर्थक आहेत. लोकसभेच्या पराभवानंतर कॉग्रेसचे समर्थक हेच करत बसले आणि एकामागून एक राज्ये कॉग्रेसला गमावण्याची पाळी आली. कधी इव्हीएम वा कधी धनशक्तीचे आरोप करून कॉग्रेसने आपल्या पराभवावर पांघरूण घातलेले होते. त्यातून युक्तीवाद जरूर साधला गेला. पण येणारे पराभव टाळता आले नाहीत. आता असले युक्तीवाद बाजूला ठेवून तीन राज्यातील भाजपाच्या विरोधातला किरकोळ असंतोष संघटित केला, म्हणून त्यांच्या हाती निसटती सत्ता लागलेली आहे. आणि तोच अशा बाबतीतला धडा असतो. पण समाजमाध्यमे वा अन्यत्र भाजपाचे समर्थक तो धडा शिकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. अन्यथा ‘नोटा’मुळे मध्यप्रदेश व राजस्थानात सत्ता कशी गेली, त्याचे युक्तीवाद ऐकायला मिळाले नसते.

कॉग्रेसच्या समर्थकांनी इव्हीएमवर शंका घेऊन मागली दिडदोन वर्षे काहुर माजवले होते. म्हणून मतदान यंत्रे बदलली गेली नाहीत, किवा कर्नाटक वा गुजरातमध्ये कॉग्रेसला यश संपादन करता आलेले नव्हते. असे आरोप वा युक्तीवाद लोकांचे मनोरंजन करायला लाभदायक नक्की असतात. पण त्यामुळे सामान्य मतदाराचे मन जिंकता येत नाही. त्यानेच तर मतदान केलेले व बदल घडवलेले असतात. म्हणूनच त्या आरोपाचा वा काहूर माजवण्याचा राजकीय लाभ कॉग्रेसला मिळू शकला नव्हता. त्याचप्रमाणे त्यांची टवाळी करण्यात कालापव्यय करणार्‍या भाजपा समर्थकांना आपल्या पक्षाला चार मते मिळवून देणेही शक्य झालेले नाही. तसे असते तर तीन राज्यात भाजपाला सत्ता गमावण्याची पाळी आलीच नसती. ती आली कारण यंत्रातील ‘नोटा’ असे बटन नसून पक्षात आलेली मरगळ किंवा खोटा आत्मविश्वास त्याला जबाबदार आहे. कोणीतरी मध्यप्रदेशच्या अकरा मतदारसंघातले आकडे दिलेले आहेत आणि तिथे नोटा बटन दाबलेल्यांनीच भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला, असा दावा केलेला आहे. नोटा म्हणजे जे उमेदवार उभे आहेत, त्यापैकी कुणालाही पसंती नसल्याचा कौल असतो. म्हणजे मतदार मत द्यायला येतो आणि सर्वच्या सर्व उमेदवारांना नाकारून जातो. सहाजिकच त्याचे मत गणतीमध्ये येत नाही. त्याने आपली एकूण उमेदवार किंवा सर्वच राजकीय पक्षांविषयी नाराजी नोंदवलेली असते. तो आपले मत वाया घालवतो, असा त्यातला दावा आहे. ते बटन जर सर्वांना नाकारणारे असेल, तर ते भाजपाच्या बाजूचे होते आणि गणतीत नसल्याने आपल्याच पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचे गृहीत, आपलीच फ़सगत करणारे आहे. कारण मतदाराला आपली नापसंतीच व्यक्त करायची होती आणि त्याने ते काम केले आहे. जर त्याने तेच मत भाजपाविषयी नाराजी म्हणून कॉग्रेस वा अन्य कुणाला दिले असते, तर निकालात फ़रक पडणार होता काय?

एकूण मतदानाची टक्केवारी बघितली व त्यातली पक्षनिहाय टक्केवारी बघितली, तरी भाजपाची मते पुर्वीच्या तुलनेत काहीशी घटलेली आहेत. म्हणजेच पुर्वी भाजपालाच आपले मत देणार्‍या अनेकांनी कॉग्रेस वा भाजपा सोडून अन्य कोणाला तरी मत दिलेले आहे. भाजपावरची नाराजी अन्य पक्षाला मत देण्यातून व्यक्त होते किंवा कुठल्याही पक्षाला मत न देण्यातूनही व्यक्त होते. ती फ़क्त नोटातूनच व्यक्त होत नाही. शिवाय आपले मत परिस्थिती व अनुभवानुसार बदलणे हा मतदाराचा अधिकार आहे. तो नोटातून व्यक्त होऊ शकतो, त्यापेक्षा अधिक घातक परिणाम दुसर्‍या पक्षाला मत देण्यातून होतो. सहाजिकच नोटा बटन दाबणार्‍यांनीच भाजपाला पाडले, असला दावा मतदाराचा आणि लोकशाहीचाही अपमान करणारा आहे. कॉग्रेसची मते वाढली वा भाजपाची कमी झाली, म्हणजेच काही हजार मतदारांनी यावेळी भाजपाकडे पाठ फ़िरवली आहे. ती फ़िरवताना त्यांनी अन्य पक्षांना कौल दिला असेल, तर त्याला गुन्हेगार समजणे लोकशाहीला घातक असते. किंबहूना आपलीच फ़सवणूक करून घेणे असते. मोदींच्या थापा किंवा मार्केटींग व प्रचाराला मतदार भुलला, असे २०१४ पासून कॉग्रेसवाले म्हणत आलेले आहेत. कारण त्यांची मते कमालीची घटली आणि पैकी काही मते भाजपाच्या पारड्यात येऊन पडलेली होती. पण ते सत्य कॉग्रेस समर्थकांना वा त्यांच्या प्रचारक संपादकांना लपवायचे होते. पण ते लपवल्यामुळे कॉग्रेसचेच लोक गाफ़ील राहिले आणि त्यांनी जनतेमध्ये जाऊन मतदाराला चुचकारण्यात आळस केला. म्हणून मते आणखी कमी होत गेली आणि एकामागून एक राज्ये हातून निसटली. त्यातून आता कॉग्रेसला जाग आलेली दिसते. म्हणूनच त्यांनी जनतेत जाऊन मतदाराला प्रभावित करण्याचा मार्ग चोखाळला. त्याचा लाभ त्यांना थोडासा मिळाला आहे. अजून भाजपाविषय़ी जनमत तितके विरुद्ध गेलेले नाही. पण असल्या नोटा विरोधातल्या भूमिकेने समर्थकच भाजपा़चे अधिक नुकसान करतील.

राजस्थान वा मध्यप्रदेशात कॉग्रेसला लोकांनी भरभरून मते दिलेली नाहीत. किंवा भाजपाला निर्णायक रितीने नाकारलेले नाही. २०१३ सालात जसे प्रचंड मतधिक्याने कॉग्रेसला नाकारलेले होते, तसे आज भाजपाला त्याही राज्यात लोकांनी झिडकारलेले नाही. दोन्ही पक्षांची मते व टक्केवारी तुल्यबळ आहे, अशाच मतदाराची भाजपाला पुन्हा लोकसभेतही मते हवी आहेत. तर दुरावलेल्य मतदाराला चुचकारून परत आणण्याला प्राधान्य असायला हवे. त्यापेक्षा आपल्या पराभवाचे खापर नोटासारख्या बटन वा मतदारावर फ़ोडणे आत्मघातकी आहे. मग भाजपा आणि कॉग्रेस यांच्यात फ़रक काय उरला, असेच लोक म्हणतील ना? जितके असे लोक नाराज होतील तितका मग त्याचा मतदानावर अधिक परिणाम होऊ शकतो. कारण नोटा बटन दाबल्याने भाजपाचा उमेदवार पडलेला नसतो, किंवा कॉग्रेसचाही विजयी झालेला नसतो. आज कॉग्रेसला एव्हीएम यंत्राविषयी शंका नाही आणि पराभवाच्या वेळीच असायची. तोही यंत्राचा नव्हेतर मतदाराचाच अवमान होता. कारण दृष्टीआड सृष्टी म्हणतात तसा व्यवहार नसतो. व्यवहारात सामान्य माणूस समोर दिसणारे सत्य सहज स्विकारत असतो. त्याला सत्य स्विकारण्यासाठी कुठल्या युक्तीवादाची गरज नसते. नोटा बटन दाबणारे मतदानालाच आले नसते, तर भाजपाच्या मतात वाढ किंवा घट होणार नव्हती. मग उगाच त्यांच्याविषयी आगपाखड कामाची नाही. आणि तसेच करायचे असेल तर कॉग्रेसपेक्षा भाजपा वेगळा कुठे उरतो? असाही विचार सामान्य लोकांच्या मनात येणारच. आज जितका आपला विजय कॉग्रेस डंका पिटून मोठा करून दाखवते आहे वा त्यांचे समर्थक दाखवीत आहेत, तितका तो निर्णायक विजय नक्कीच नाही. पण त्यासाठी भाजपावालेही अशाच बिनबुडाच्या युक्तीवादाच्या आहारी गेले, तर लोकांची नाराजी त्यांना आणखीनच गाळात घेऊन जाऊ शकते. कारण सत्य समोर असते. आणि दृष्टीआड सृष्टी म्हणून सत्याकडे पाठ फ़िरवता येत नसते.

16 comments:

 1. पन ते बटनच नकोय खर तर यंत्रावर.

  ReplyDelete
 2. भाऊ, कालच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत पण काही तरी लिहा.

  ReplyDelete
 3. भाऊ माझ्या मते एक नक्कीच आहे की, जुनी पेन्शन योजना कर्मचारी यांना दिल्ली राज्य सरकारने लागु केली आहे. सरकारी कर्मचारी यांनी पाट्या रंगवून नकारात्मक भावना दाखवून दिल्या ही एक बाब.
  दुसरे शेतकरी वर्गाला सरसकट कर्ज माफी.
  या दोन्ही बाबतीत विचार आज जरूर करण्यात यायला पाहिजे.
  अर्थात वैयक्तिक माझ्या मते.

  ReplyDelete
 4. Bhau ekdum sahi vishleshan.
  Bjp samarthakani yapudhe play vicharache look wadhavnyachi garaj ahe
  Konalatari dish deun parabhavche khapar itranvar phodne chukiche ahe
  Apla pksh kuthe kamipadla yche vishleshan avshyak ahe
  Itranna dosh denypurvi aplya chuka samjne garjeche ahe

  ReplyDelete
 5. भाऊ social media वर नोटा मुळे पराभव झाला असा प्रचार करणारे सर्वसामान्य भाजप समर्थक असावेत ते पक्षासाठी संघटन क्षेत्रात काम करणारे कार्यकते नसावे कारण भाजपमध्ये संघातून संघटन महासचिव दिले जातात ते संघ पध्दतीने प्रत्येक विजयाचा किंवा पराजयाचा आढावा घेत असतात केवळ भाजप नव्हे तर संघ परिवारातील अन्य संघटनांशीही संपर्क ठेवण्यासाठी संघाने पालक अधिकारी नेमलेले असतात ते वेळोवेळी या संस्थांच्या अडचणी समजावून घेत असतात.या निवडणूक निकालानंतर पंतप्रधानांनी केरळच्या आणि तामिळनाडूच्या बुथ कार्यकर्त्यांशी व्हिडिओ conferncing द्वारे संपर्क केल्याचे वृत्त आले आहे हाच फरक काँगेस आणि भाजपमध्ये आहे म्हणूनच बिहारमध्ये दारुण पराभव झाल्यावर भाजपने आसाममध्ये आणि उत्तर प्रदेशात भव्य दिव्य असा विजय मिळवला होता त्यामुळे जोपर्यंत भाजप संघाशी बांधीलकी मानतो आहे तोपर्यंत त्याची काँग्रेस होणार नाही हे मात्र नक्की

  ReplyDelete
 6. नोटांमुळे काँग्रेसची margin ही कमी झाली असे विचार का करत नाही भाजपला मते कमी पडली हे मान्यच करायला हवे जास्त मतदानाविषयी प्रयत्न करावयास हवा

  ReplyDelete
 7. नोटावाले मतदार म्हणजे ज्यांंचा मतदानावर विश्वास आहे पण उमेदवारांवर नाही. भाजप जर आपल्या कार्यकर्त्यांचा एवढा अभिमान बाळगत असेल तर नोटावाल्यांना आपल्या बाजूला वळवणेही त्यांचीच जबाबदारी आहे.

  ReplyDelete
 8. भाऊ 2019 मधे मोदी पूर्णपणे स्वतःच्या बहुमताने सत्तेत यावेत असे मनापासून वाटते अशा सर्वांना या तीन राज्यातील निवडणूक निकालानंतर आनंदच झाला आहे कारण कारण केवळ मोदी प्रचारसभा घेतील आपण काही न करता त्या जीवावर निवडून येऊ अशा सर्वांचे जमिनीच्या वर चालणारे रथ जमिनीवर आले आहेत 2014 नंतर ज्यांनी केवळ मोदींचे यशच पाहिले आहे ते लोक social मीडियावर अस्वस्थ झाले आहेत परंतु भाजपच्या आधी जनसंघ आणि नंतर भाजप दीनदयाळ जी अटलजी जगन्नाथराव जोशी रामभाऊ म्हाळगी कुशाभाऊ ठाकरे वसंतराव भागवत अशा अनेक निस्वार्थी प्रचारकांच्या पुण्याई वर मोठा झाला आहे स्वतः मोदीनी मुख्यमंत्री होण्याआधी अशाच प्रकारे पक्ष संघटनेचे काम केले आहे त्यामुळे आत्ता झालेल्या चुका दुरुस्त करून लोकसभा निवडणुकीत भाजपा नक्कीच यश मिळवेल त्यामुळे ज्यांनी वर्षानुवर्षे निस्वार्थीपणे संघाचे काम केले आहे ते काही राज्यात आलेल्या अपयशाने न डगमगता स्वयंसेवक असलेल्या मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान केल्याशिवाय राहणार नाहीत

  ReplyDelete
 9. Nota बटण SC/ST act विरोधात दाबले गेले आहे. मध्यम प्रदेशात चर्या कायद्याच्या विरोधात मोठी नाराजी होती. भाजपचे हक्काचे मतदार नाराज झाले.

  ReplyDelete
 10. 'नोटा'चे बटन दाबले नसते तर ते मत भाजपाच्या मतांच्या परावर्तीत झाले असते असे समजणेच चुकीचे आहे. जी आहे ती परिस्थिती मान्य करुन आपल्या चुका सुधारणे,हाच राजमार्ग आहे. तसे संख्याबळ कांही कमी नाही आहे सरकारच्या चुकीच्या निर्णयास विरोध करणे,जनतेत जाणे व लोकसभेची तयारी करणे हे उद्दीष्ठ भाजपाने ठेवणे अगत्याचे वाटते.

  ReplyDelete
 11. BJP MADHALYA VACHAL LOKANNA AAVARAYALA HAVE

  ReplyDelete
  Replies
  1. Very true ! Kay ani kase bolate hyachi karyashala ghyaychi tivra garaj ahe Ani hey kaam Nitin Gadkari uttam kartil

   Delete
 12. Bhau
  Disagree with you here. The NOTA voters are 90% BJP voters earlier & they intentionally Pressed NOTA this time as they dont want to vote for CONG or any one else too.

  These are the BJP voters who are not happy with BJP as BJP haven't taken any of core issues to Conclusion. Again there were few decisions of BJP govt during last 4.5 yrs that made few BJP voters to stay away from BJP.

  If you remember this pattern was observed in Gujraat elections too, There were also considerable NOTA votes had been casted but as BJP could make the win with Majority this topic was ignored by people like you too.

  So NOTA is definitely a headache for BJP & if they want to overcome this, They need to do some considerable work on few of Core Issues. Few Popular Decisions also needs to be taken by BJP in coming 4 months to reduce this NOTA factor damage in Loksabha 2019 is my Genuine Opinion based on observations & reactions I saw.

  ReplyDelete
 13. If bsp had alliance with congress , bjp would have got below 65 and 50 seats in mp and rajsthan

  ReplyDelete
 14. मागच्या वेळी नोटा वाले किती होते ??
  ते आकडे आणि आताचे आकडे घेऊन विश्लेषण केले तर जास्ती परिणामकारक आणि निष्कर्ष पण काढता येईल.

  आणि नोटाला मतदान ठराविक टक्क्यांपेक्षा जास्ती झाले तर त्यावेळी उभा राहिलेल्या सर्व उमेदवांवर अजन्म निवडणूक लढण्यासाठी बंदी घातली पाहिजे. पण असे नियम करण्याची धमक ना भाजप मध्ये आहे ना काँग्रेस मध्ये.....

  ReplyDelete