Sunday, March 15, 2020

कोरोना आणि कॉग्रेस

Image may contain: possible text that says 'Tweet Rajeev Shukla @ShuklaRajiv I would like to thank congress president Sonia ji for offering me rajya sabha nomination from Gujarat but currently am focusing on organisational work so reques- ted her to nominate some other person in my place @INCIndia @priyankagandhi @INCGujarat @AhmadPatel @kcvenugopalmp 20:54 12 Mar 20 Twitter for iPhone'

हमको मालूम है जन्नत की हकी़क़त लेकिन
दिल को बहलाने के लिए "ग़ालिब", ये खयाल अच्छा है

विख्यात उर्दू शायर मिर्झा गालिब यांच्या या काव्यपंक्ती आहेत आणि आजच्या कॉग्रेस पक्षाची अवस्था काहीशी तशीच झालेली आहे. कुठल्याही व्यक्तीला नावडत्या गोष्टी ऐकूच नये असे वाटत असते. पण म्हणून त्या गोष्टींच्या परिणामापासून मुक्ती नसते. कारण डोळे बंद करून मांजरी दुध पिते, तरी जग तिच्याकडे बघत असते. तशीच वास्तविकता असते. ती नाकारून परिणाम चुकत नसतात. पण कॉग्रेस हे जागतिक सत्य स्विकारायला तयारच नसेल, तर त्याला बिचारे राहुल गांधी काय करू शकतात? पहिली गोष्ट म्हणजे राहुलपाशी पुर्वजांची पुण्याई पुढे घेऊन जाण्याचे कर्तॄत्व नाही की क्षमता नाही. परिणामी हा माणूसच शतायुषी कॉग्रेस पक्षासाठी मोठी समस्या होऊन बसला आहे. पण ज्यांचे राजकीय भवितव्य राहुलच्याच मर्जीवर अवलंबून आहे, त्यांना राहुल सोडून अन्य काही पर्याय नाही. अशा नेते व कार्यकर्त्यांमुळे कॉग्रेस पक्ष आकार घेत नसतो किंवा चालतही नसतो. पक्ष चालवण्यासाठी कष्ट उपसणार्‍या कार्यकर्त्यांची व नेत्यांची एक फ़ौज असावी लागते. पक्षाकडून फ़क्त लाभ उठवणार्‍यांमुळे पक्ष चालत नाही. पण त्याचे लचके मात्र तोडले जात असतात. चिदंबरम, गुलाम नबी आझाद किंवा कपील सिब्बल वगैरे मंडळी अशा वर्गात येतात आणि राजीव शुक्ला सारखेही त्यातली बांडगुळे असतात. मध्यप्रदेशात पक्षाच्या अल्पमत सरकारला घरघर लागली असताना राजीव शुक्ला यांचे आलेले ट्वीट, त्याचा उत्तम नमूना म्हणता येईल. त्यांना पक्षाने म्हणजे पर्यायाने सोनिया राहुल गांधी कुटुंबियांनी गुजरातमधून राज्यसभेची उमेदवारी देऊ केली होती. पण त्यांनी अतिशय ‘नम्रपणे’ ती नाकारून पक्ष संघटनेसाठी काम करण्याची भूमिका मांडलेली आहे. कोणालाही भारावून टाकणारी ही भूमिका आहे. पण इतके औदार्य दाखवण्यापुर्वी शुक्ला यांनी याआधी पक्ष संघटनेसाठी कुठली महत्वाची भूमिका पार पाडली व किती कष्ट उपसले, त्याचीही साग्रसंगीत माहिती दिली असती, तर पक्षाला तात्काळ थोडी पालवी तरी फ़ुटली असती ना? हे औदार्य आले कुठून?

मध्यप्रदेशात माजी केंद्रीय मंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे, यांना सोनियांनी राज्यसभेची उमेदवारी साफ़ नाकारली होती. त्यामुळे अस्वस्थ होऊन त्यांनी आपल्या गटातर्फ़े बंडाचा पवित्रा घेतला. तेव्हा त्यांना राज्यात फ़ारसे स्थान नसल्याचे सांगायला अनेक कॉग्रेसनेते किंवा सोनियानिष्ठ सरसावून पुढे आले. पण त्याच काळामध्ये राजीव शुक्ला यांना गुजरातमधून राज्यसभेची उमेदवारी देणार्‍या सोनियांनी त्यांचे गुजरात राज्यातले कुठले काम बघितले होते, त्याचे स्पष्टीकरण दिले नाही. जो निकष शिंदे यांना मध्यप्रदेशात लावला जातो, तोच गुजरातमध्ये शुक्ला यांना लागायला नको काय? चिदंबरम यांना महाराष्ट्रातून उमेदवारी देताना कुठला निकष लावलेला होता? असो, पण शुक्ला यांनी ‘नम्रपणे’ उमेदवारी नाकारून मोठेपणा दाखवला. त्या मोठेपणामागे मध्यप्रदेशातले बंड कारणीभूत होते. शिंदे यांच्या बंडामुळे कॉग्रेस पक्षाच्या विविध राज्यातील नाराजांना बळ मिळाले आणि म्हणूनच शुक्ला यांना औदार्याचा झटका आलेला आहे. शुक्लांना उमेदवारी देण्यासाठी गुजरातच्या दिर्घकालीन पक्षनिष्ठांना वंचित ठेवण्यात आलेले होते. अशा उपटसुंभांना निवडून दिले जाणार नाही, असे थेट श्रेष्ठींना कळवण्य़ाची हिंमत गुजरातच्या कॉग्रेस नेत्यांना शिंदे यांच्या बंडानंतर आली. थोडक्यात सोनियांना गुजरात कॉग्रेसच्या डोक्यावर शुक्ला लादायचे होते. पण पराभूत होण्यासाठी शुक्लांना उभे रहायचे नव्हते. म्हणून त्यांची मान ‘नम्रतेने’ झुकलेली होती. त्यांना औदार्याचा झटका आलेला होता. मात्र तोपर्यंत व्हायचे ते दुष्परिणाम होऊन गेले होते. म्हणून तर शुक्लांचे औदार्य जगजाहिर झाल्यावर दोनतीन दिवसात गुजरात कॉग्रेसमध्ये फ़टाके फ़ुटू लागलेले आहेत. तिथे रविवारी अकस्मात चार कॉग्रेस आमदारांनी आपल्या पक्षाचे व पदाचे राजिनामे देऊन टाकलेले आहेत. आता यात राहुल गांधींची चुक कुठली? त्यांचा गुन्हा काय असेच कोणीही विचारणार ना?

राहुल गांधींची चुक इतकीच आहे, की त्यांनी मागल्या तीनचार वर्षात कॉग्रेस पक्ष व त्याच्या संघटनेला राजकीय कोरोनाच्या विळख्यात गुरफ़टून टाकलेले आहे. तसे बघायला गेल्यास अवघे जग आजकाल कोरोनाच्या भयगंडाने पछाडलेले आहे. हा विषाणू कुठून येऊन आपल्या प्राणाशी संकट होईल त्याच्या भयाने अमेरिकेतही घबराट पसरलेली आहे. पण हा कोरोना व्हायरस थेट कुठल्या माणसाचा बळी घेत नाही, किंवा जीवावर उठत नाही. तर ज्यांचे वय अधिक आहे आणि ज्यांच्या देहातली प्रतिकारक शक्ती दुबळी झालेली आहे, त्यांना कोरोनाची बाधा प्राणघातक टोकाला घेऊन जात असते. आतापर्यंत जगभर ज्यांचे बळी कोरोनाने घेतले असे म्हटले जाते, त्यात प्रामुख्याने वयोवृद्धांचा भरणा आहे. एका बाजूला वाढलेले वय आणि थकलेले शरीरावयव, अधिक कुठल्या ना कुठल्या घातक आजाराची बाधा असली, मग कोरोना प्राणघातक ठरत असतो. मधूमेह, रक्तदाब, किंवा श्वसनाचा कुठलाही आजार कोरोनाला प्राणघातक बनवित असतो. सहाजिकच अशा कुठल्याही वयोवृद्धांना वा आजाराने थकलेल्यांना संसर्गापासून दुर ठेवणे, हा उपाय मानला गेलेला आहे. उलट तसा धोका पत्करणे म्हणजे संकटाला आमंत्रण देणेच आहे. जी स्थिती माणसाची तीच राजकीय पक्ष, संघटना वा संस्थेची असते. कारण या संघटना माणसांनीच बनलेल्या व चाललेल्या असतात. कॉग्रेस हा राजकीयदृष्ट्या थकलेला वार्धक्याने वाकलेला पक्ष आहे. त्याला सत्ताभ्रष्टता, अंतर्गत बेबनाव, गटबाजी किंवा बेबंदशाही अशा आजारांनी बेजार केलेले आहे. अशावेळी कुठल्याही बाह्य आघाताला सोसण्याची प्रतिकारक शक्ती कॉग्रेस गमावून बसलेली आहे. त्यामुळे तसे संकट पक्षावर येऊ नये, याची सावधानता बाळगणे अगत्याचे आहे. पण राहुल गांधी पदोपदी पक्षाला अशा बाह्य संकट वा आघाताच्या परिघात घेऊन जातच असतात. पक्षासाठी घातक असलेले मुद्दे घेऊन पुढे जाणे आणि जनमानसातील पक्षाची प्रतिमा अधिकाधिक मलीन करणे; हा राहुल गांधींचा एक कलमी कार्यक्रम राहिला आहे. त्यालाच आपण कोरोनाच्या संपर्कात जाणेही म्हणू शकतो.

गेल्या काही विधानसभा निवडणुकीत सोनिया किंवा राहुल प्रचारालाही फ़िरकले नाहीत. मरगळल्या पक्षाने जेवढी शक्ती उरली आहे, त्यावर प्रयास करून सत्ता मिळवणे वा आमदार निवडून आणण्याची कार्यकर्त्यांनी पराकाष्टा केलेली आहे. महाराष्ट्र व हरयाणासह झारखंडातील मतदान त्याचा पुरावा आहे. पण तिथे तितके यश मिळताच सोनिया व राहुल यांनी पुढल्या राजकीय प्रक्रीयेत हस्तक्षेप करून कॉग्रेसला अधिकच अडचणीत आणलेले आहे. मरणासन्न किंवा आजारी व्यक्तीला रोगाच्या सान्निध्यात घेऊन जाणे, म्हणजेच कोरोनाच्या परिघात घेऊन जाणे नाही काय? मग दुबळ्या बहूमतावर कमलनाथ सरकार चालवित असताना दिग्विजयसिंग यांचा खुळेपणा पोसणे, किंवा राहुलनी अकारण सावरकरांच्या बदनामीचे उद्योग करण्याने काय वेगळे चालले होते? शाहीनबाग धरण्यात सगळी कॉग्रेस कामाला जुंपणे, म्हणजे अन्यत्र कॉग्रेस कार्यकर्त्यांना लोकांमध्ये हिंडणे फ़िरणेही अशक्य करून सोडणेच नाही काय? कार्यकर्त्यांनी एकाकी झुंज देऊन आमदार निवडून आणायचे आणि राहुल सोनियांनी आपल्या लाडक्या नाकर्त्या बांडगुळांना तिथून राज्यसभेत पाठवण्याचा पोरखेळ चालवायचा, ह्याला काय म्हणायचे? दुबळ्या कॉग्रेसला अधिकाधिक असह्य विषाणूंच्या हवालीच करणे नाही काय? मध्यप्रदेशात तारांबळ उडालेली असताना गुजरात कॉग्रेसच्या माथी राजीव शुक्ला याच्यासारखा नाकर्ता माणूस मारणे, म्हणजे आणखी काय असते? राजथानात गेहलोटला पुढे करून दिवसरात्र राबलेल्या सचिन पायलटला खाली ढकलणे. कमलनाथ यांना पुढे करून मध्यप्रदेशात शिंदे यांना दाबून ठेवणे, कशासाठी होते? आपण अजूनही देशात लोकप्रिय आहोत आणि पुर्वजांच्या पुण्याईवर काहीही करू शकतो, हा समज ठिक आहे. त्या समजूतीच्या स्वर्गात रमायलाही काही हरकत नाही. पण ती वस्तुस्थिती नसते ना? त्या भ्रमात पक्ष चालवता येत नाही. मन रमवण्यासाठी स्वर्गाच्या गोष्टी ऐकायला खुप छान असतात. पण वस्तुस्थिती तशी नसते ना? गालिब तेच म्हणतोय. पण राहुल सोनियांना गालीब समजावणार कोण?

सवाल समजावण्याचाही नसतो. सामान्य अडाणी लोकांनाही जे चटकन समजू शकते, ते शहाण्यांना समजावणे अवघड अशक्य असते. कारण त्यांना आपल्या समजुतीतून बाहेर पडायचीही भिती वाटत असते. सोनिया राहुल व पक्षापेक्षाही कुटुंबाशी अधिक निष्ठा असलेल्या कॉग्रेसजनांना, त्या समजुतींच्या विळख्यातून बाहेर काढणे अवघड काम होऊन बसले आहे. म्हणून तर कर्नाटकात नाराजीचे परिणाम अनुभवलेले असतानाही मध्यप्रदेशात त्यांची अक्कल ठिकाणावर आली नाही. मध्यप्रदेशात गडबड चालू असतानाही गुजरातमध्ये पोरखेळ करण्याचा मोह आवरलेला नाही. अशा गोष्टी तात्काळ सावरायच्या असतात आणि त्याच्याशी खेळत बसण्याला अर्थ नसतो. मध्यप्रदेशात २२ आमदारच फ़ुटलेले नाहीत. त्यातले सहा मंत्रीही होते. त्यांना भाजपा प्रत्येकी मुख्यमंत्रीपद देण्याची शक्यता नव्हती. तरीही त्यांनी पक्ष सोडण्यापर्यंत मजल मारली, तर कॉग्रेसच्या कार्यशैलीत कुठेतरी चुकतेय, इतके लक्षात यायला हवे. येणार नसेल, तर कॉग्रेसला भवितव्य असू शकत नाही. म्हणून तर मध्यप्रदेश गडबडला असताना गुजरात राज्यात डिवचण्याचा खेळ झाला आणि शुक्लांनी औदार्य दाखवले तरी चार आमदार पक्ष सोडून गेले आहेत. तेव्हा भाजपावर घोडेबाजार किंवा आमिषाचा आरोप करून प्रसिद्धी मिळेल, किंवा मन रमवताही येईल. पण परिणाम चुकत नाहीत ना? त्याचे परिणाम भाजपाला भोगावे लागत नसतात. कॉग्रेसच्या वाट्याला येत असतात. मग असे खोटेनाटे बोलून सोनिया, राहुल वा त्यांचे भाटभक्त कोणाची फ़सवणूक करीत असतात? भाडोत्री पत्रकार किंवा समर्थक त्याला फ़सतही नाहीत. मेहरबानी म्हणून त्या खुळेपणाचे समर्थनही करतात. पण त्यामुळे आजकाल सामान्य माणसाचीही दिशाभूल होत नाही. मध्यप्रदेश कोसळण्याच्या कडेलोटावर उभा आहे आणि तिथे सावरणे शक्य नसताना गुजरात कॉग्रेसश्रेष्ठींनीच भाजपाच्या शिकार्‍यांना सावज म्हणून बहाल केला आहे. त्यांनी शिकार करणे म्हणजे लोकशाहीची हत्या बिलकुल नाही. कारण तेच तर सत्तास्पर्धेतले राजकारण असते. अन्यथा महाराष्ट्र राज्यात कॉग्रेसला शिवसेनेची साथ कशाला मिळू शकली असती?

एका वाहिनीवर कोरोनाच्या संदर्भातली चर्चा ऐकली. त्यात डॉ. प्रताप रेड्डी नावाच्या एका वैद्यक क्षेत्रातील दिग्गजाची मुलाखत होती. त्यांनी कोरोनाच्या निमीत्ताने एक सुंदर वाक्य कथन केले. ते म्हणाले, अशा कालखंडात जे लोक उपाययोजनेचे घटक नसतात. ते आपोआप समस्येचा हिस्सा होऊन जात असतात. कॉग्रेसच्या बाबतीत राहुल किंवा सोनियांसह संपुर्ण गांधी कुटुंबाची स्थिती नेमकी तशीच आहे. कॉग्रेसला संकटातून बाहेर काढायला अनेक कार्यकर्ते वा नेतेही प्रयत्नशील असतात. शिंदेच नाहीत, तर हेमंतो विश्वशर्मा, जयंती नटराजन, जयराम रमेश किंवा टॉम वडक्कन अशा अनेकांनी आपापल्या परीने समस्येचा उहापोह केलेला आहे. त्यावरचे उपाय योजायला मार्ग सुचवले आहेत आणि पुढाकारही घेतलेला होता. पण त्यांना समजून घेणे राहिले बाजूला आणि त्यांच्यावरच पक्षातून बाहेर पडण्याची पाळी आणली गेली. अशा परिस्थितीत कॉग्रेसने लोकशाहीला आवश्यक असलेला विरोधी पक्ष म्हणून उभे रहायचे तरी कसे? एका बाजूला त्याला गांधी कुटुंबनिष्ठांचा विळखा पडलेला आहे आणि पर्यायाने त्या वार्ध्यक्यात थकलेल्या पक्षाला नवी संजिवनी नाकारली जात आहे. तसे बघायला गेल्यास कोरोना हा व्हायरस नवा असला तरी त्याच्यावर जुन्याच पद्धतीने उपचार करून झुंज द्यावी लागत आहे. डॉक्टरही चाचपडत आहेत. पण निदान हे डॉक्टर व आरोग्य विभागाचे लोक अपाय होऊ नये, याची तरी काळजी घेतात. कॉग्रेसची स्थिती अतिशय दुर्दैवी आहे. चुकीच्या उपचार व उपाययोजनामुळे तो पक्ष अधिकाधिक गाळात खचत चालला आहे. म्हणून तर राहुलनी लोकसभा पराभवानंतर अध्यक्ष पदाचा राजिनामा दिल्यापासून सात महिन्यात नव्या अध्यक्षाची निवडही करण्याचे त्राण पक्ष संघटनेत उरलेले नाही. पण जो कोणी उपाय सुचवेल किंवा दुखण्यावरच बोट ठेवील, त्यालाच मारेकरी ठरवण्याची व्हायरस होऊन बसलेल्या निष्ठावंतांची स्पर्धा चालू आहे. त्यांच्या मते कॉग्रेस स्वर्गात आहे. सर्वकाही छानपैकी चालले आहे. चिंतेचे कारण नाही. पण परिणाम मात्र विपरित होतानाच दिसत आहे.

9 comments:

  1. भाऊ,

    मराठी माणसाच्या हक्काची ५४ वर्षे घोषणा देताना शिवसेना सातत्याने मराठी उमेदवार डावलून अमराठी उमेदवार राज्यसभेत का पाठविते व त्या अमराठी उमेदवारांनी (राम जेठमलानी, प्रीतिश नंदी, मुकेश पटेल, चंद्रिका केनिया, संजय निरूपम, राहुल बजाज, धूत आणि आता प्रियांका चतुर्वेदी) शिवसेनेची बाजू राज्यसभेत व पर्यायाने राष्ट्रीय पातळीवर किती मांडली यावर सविस्तर लिहा.

    ReplyDelete
  2. बेस्ट विश्लेशण

    ReplyDelete
  3. पण भाऊ आजपर्यंत कुणीही अस म्हटलेल नाही कि काँग्रेसने देशद्रोह्याना साथ दिलीय...370 हटवाण्यासाठी विरोध केला...सतत हिंदुविरोधी भुमिकाघेतली....टुकडे टुकडे गँगला समर्थनले....पाकिस्तानच्या सुरात सुर मिसळून CAA ला विरोध केला....आणी या सर्वाचा निषेध म्हणुन आम्ही काँग्रेस सोडत आहोत....अस जर या काँग्रेस सोडलेल्या लोकांनी केलं असत तर त्याला वजन प्राप्त झालं आसत आन् काँग्रेसला पण चपराक बसुन देशहिताच्या निर्णयावर मोदीला समर्थन केल असतं. कारण आता समान नागरी कायदा व लोकसंख्या नियंत्रण कायदा मोदी सरकार लवकरच आणेल त्यालाही विरोध करुन काँग्रेस लवकरच गर्तेत जाईल, येण्यार्या कायद्याला सपोर्ट केला तर काँग्रेस थोडाफार जगु शकेल....नाहीतर मरण अटळ असेल.

    ReplyDelete
  4. खरेतर भारतीय लोकशाहीत ' राज्यसभा ' ही संस्था स्वतःच एक मोठे बांड़गूळ आहे. जीथे जनतेतून निवड़ून येण्यास अपात्र चमच्यांची सोय केली जाते.

    ReplyDelete
  5. Congress deserves to perish.भारत टिकवायचा असेल तर काँग्रेस,ती मानसिकता गेली पाहिजे

    ReplyDelete