Sunday, March 29, 2020

मानवी हव्यासाची समस्या

Damn human greed. : im14andthisisdeep

मानवी समाजाच्या ज्या काही समस्या आहेत, त्याच जगाच्या समस्या आहेत असे आपले एक गृहीत आहे. म्हणजे पृथ्वीतलावर शेकडो देश आणि हजारो लहानमोठे मानवी समुदाय आहेत. त्यांच्या नित्य जगण्यातल्या बहुविध समस्या आहेत. त्यावर हजारो वर्षापासून उपाय शोधले जात आहेत आणि त्या उपाययोजनेतून आणखी नवनव्या समस्याच जन्माला आलेल्या आहेत. अजूनतरी कुठल्याही प्रगत वा मागास देश समाजांनी आपले जीवन परिपुर्ण व समाधानी झाल्याचा दावा केलेला नाही. पण असे मत फ़क्त माणसांचे आहे. माणूस वगळता धरतीवर लाखो लहानमोठे सजीव वास्तव्य करतात आणि त्यांचेही जीवनचक्र अखंड चाललेले आहे. पण त्यांना कुठल्या अडचणी वा समस्या भेडसावतात, त्याची आपल्याला जाणिवच नसते. माहिती असणे दुरची गोष्ट झाली. सहाजिकच त्यांना काही समस्या नाहीत असेही एक गृहीत आहे. पण त्यांना समस्या कशाला भेडसावत नाहीत, त्याचीही विचारपुस आपण कधी करत नसतो. कारण आपण माणसे कमालीची आत्मकेंद्री असतात. आपल्या घरात असताना आपण कुटुंबाच्या समस्यांचा विचार करण्यापेक्षाही त्यात आपल्या व्यक्तीगत समस्यांना प्राधान्य देऊन आकलन करीत असतो आणि कुटुंबाच्या बाहेरचा विषय आला, मग गोतावळा, परिसर, जातपात, भाषा वंश अशा कलाने विचाराला चालना मिळते. जसजसे आपण व्यक्तीपासून कळपाच्या दिशेने सरकत जातो, तसे व्यक्तीगत समस्यांची सांगड जमावाशी घातली जाते आणि त्यालाच मग सामाजिक, सांस्कृतिक वा राष्ट्रीय वगैरे नावे दिली जातात. पण त्यातही कुठे माणसाच्या पलिकडल्या सजीव विश्वाचा विचार येत नाही. याचे कारण तेच गृहीत आहे. समस्या फ़क्त माणूस नावाच्या प्राण्याला असतात आणि बाकीचे सजीव दुय्यम वा नगण्य असतात. मानवी जीवनापलिकडे अन्य कुणा सजीवाच्या जगण्याला काहीही अर्थ व आशय नसतो; हेच ते गृहीत आहे. कारण अगदी स्पष्ट आहे. फ़क्त मानवी समाजच समस्याप्रधान सजीव समूह आहे. पण असे का असावे?

माणूस अनेक गोष्टींचा विचार करतो, पण आपल्याकडे थोडाही बारकाईने बघत नाही. मग त्याने इतर सजीवांकडे तितक्या बारकाईने बघावे, अशी अपेक्षा तरी कशाला करता येईल? एकमेकांच्या वेदना यातनांनी व्याकुळ होणार्‍या माणसाला आपण सहृदय मानतो. पण तितका तो अन्य सजीवांविषयी कधीच सहृदय नसतो. मी एका खेड्यात विश्रांती घ्यायला जात असतो. अगदी सामान्य ग्रामीण जीवनात रमून जातो. ज्यांच्या घरात माझा मुक्काम असतो, त्यांच्याकडे दोन म्हशी होत्या आणि त्यापैकी एकीचे पिल्लू होते. त्यांना चरायला सोडल्यावर पिल्लू गुपचुप दूध पिवून घेते, अशी त्यांच्या मालकीणीची तक्रार होती. तक्रार अशी होती, की दुसरीही म्हैस त्या पिलाला पाजून घेते. सहाजिकच म्हशींना तिने चोरट्यांचा किताब दिला. हे ऐकून मी त्यांना एक सहज सुचलेला प्रश्न विचारला. त्यांच्या म्हशीला बारमाही दुध येते का? दूध केव्हा मिळू शकते आणि कितीकाळ त्या म्हशी दुध देतात? ही माहिती घेतली आणि मलाच प्रश्न पडला, चोर कोणाला म्हणावे? व्यायलेल्या म्हशीला वा गाईला दूधाचा पान्हा फ़ुटतो पिलासाठी. म्हणजेच त्या दुधाचा खरा हक्कदार ते पिल्लू आहे आणि त्याच्या हक्कावर गदा आणून आपण गोवर्धन करणारेच दुधाची चोरी करीत असतो. मात्र त्या माऊलीने आपल्या पिलाला नजर चुकवून दुध पाजले, तर चोरीचा आळ त्याच मातेवर लावतो. हा सगळा युक्तीवाद त्या म्हशीच्या मालकीणीला समजावला आणि तिला पटलाही. पण म्हणाली काय करायचे? दुधासाठी तर म्हैस पाळली आहे. ते दूध विकले तर आमची चुल पेटणार आहे. घरात चार पैसे येऊ शकतील. व्यवसायाला चोरी कशी म्हणता येईल? तिचा दावा व्यवहारी जगात चुकीचा नाही. पण त्या चोरीनंतर म्हैस किती तक्रार करू शकते? कोण तिची दाद घेणार आहे? तिच्या पिलासाठी तिच्या देहाने उत्पन्न केलेले दूध आपला अधिकार असतो. कारण म्हशीसाठी कुठला कायदा नाही वा त्यांचा समूह मिळून आपल्या हक्कासाठी संघर्ष वगैरे करीत नाही ना? पण तेच दुध अपल्या शेजार्‍यापाजार्‍यांनी चोरले मग? तात्काळ आपली भूमिका बदलून जाते. असे का व्हावे? हे कुठले तर्कशास्त्र आहे?

ही बाब जन्मजात अधिकाराची वा न्यायाची नसून मालकी हक्काची आहे. जे मालकी हक्क मानवाने जन्माला घातलेले आहेत. त्या म्हशीची मालकी ज्याच्याकडे असेल, त्याचा तिच्या दुधावर, पिलावर आणि म्हशीच्या जगण्यावरही अधिकार असतो. खुद्द त्या म्हशीवर तिची स्वत:ची मालकी असू शकत नाही. म्हैसच कशाला कुठलाही पाळीव प्राणी असो वा अन्य सजीव निर्जीव गोष्टी असोत, त्यांचे काही अधिकार असतात काया? सगळे अधिकार हक्क मानवाने स्वत:कडे घेऊन ठेवलेले आहेत आणि अन्य सजीवांना आपले गुलाम करून टाकलेले आहे. एकूण पृथ्वीतलावर मानवाने आपली मालकी सिद्ध केलेली आहे आणि त्यानुसार माणसे व्यक्तीगत, सामाजिक, राष्ट्रीय अशा हक्कासाठी संघर्ष करीत असतात. नियम कायदे बनवित असतात आणि त्यातून एकमेकांचे हक्क मिळवणे किंवा नाकारणे; असा संघर्ष सुरू होत असतो. समस्या प्रश्न निर्माण होत असतात. उत्तरे शोधली जातात आणि त्या उत्तरातून आणखी नव्या प्रश्न समस्यांना जन्म दिला जात असतो. बाकीच्या सजीवांना त्यापैकी कुठल्याही समस्या नसतात, किंवा त्याची उत्तरेही शोधावी लागत नसतात. उदाहरणार्थ त्या म्हशीच्या दुधाची चोरी मालकिणच करते, हे त्यांनाही मान्य असले वा मला तसे वाटले म्हणून बिचारी ती म्हैस उठून लढायला उभी राहिली नाही. आरंभी तिचे पिलू स्तनपानाला सोडून मग बाजूला केल्यावरही ती दुध काढू देते. संघर्षाला सज्ज होत नाही. कारण अशा गोष्टी म्हशीच्या वा अन्य प्राण्यांच्या डोक्यातही येत नाहीत. त्यांना विचार नावाच्या आजाराची बाधा झालेली नसल्याने त्यांना कुठल्याही समस्या नसतात आणि त्याची उपाययोजनाही शोधावी लागत नसते. ही बाब फ़क्त म्हशीपुरती नाही. मानव वगळता अन्य सर्व प्राणिमात्रांच्या बाबतीत तितकीच सत्य आहे. समस्या फ़क्त माणसाला असतात. कारण मालकी हक्काची कल्पना माणसाने विकसित केली असून निसर्गाने जसे घडवले वा वागवले त्याला झुगारून आपले काही वेगळे जग उभारण्याची कुवत फ़क्त माणसातच आहे. त्यामुळेच समस्या ही मुळातच मानवी कल्पना आहे.

काही वर्षापुर्वी एक इंग्रजी सिनेमा बघायला मिळाला होता. तसा तो चित्रपट नव्हता तर पुर्ण लांबीचा माहितीपट होता. ‘द ब्युटिफ़ुल पिपल’ असे त्याचे नाव होते. गंमत अशी होती, की त्यात फ़ारशी कोणी माणसे नव्हती वा त्यात कोणी अभिनय वगैरे केलेला नव्हता. डझनभर छायाचित्रकारांनी आफ़्रिकेच्या घनदाट जंगलात अनेक वर्षे खपून जे जंगली पशूंचे चित्रण व अभ्यास केला, त्याची काटछाट करून हा माहितीपट बनवण्यात आलेला होता. त्याच पशूंच्या सहवासात वावरणार्‍या काही आदिवासी कृष्णवर्णियांची गावे आणि माणसे त्यात दिसली. बाकी नुसती श्वापदे, पशू वा शिकारी प्राणी होते. एका प्रसंगी पाणवठा धरून बसलेला सिंहांचा कळप होता. आसपास झेब्रे हरणे मुक्तपणे चरत बागडत होती. पण त्यांना कुठेही सिंहाच्या कळपाची भिती दिसली जाणवली नाही. त्यापैकी कोणी चरणारा प्राणी पाणवठ्याच्या वा सिंहांच्या जवळ आला; तर एखादी सिंहीण वा छावा उठून त्यांचा पाठलाग करून पळवून लावत होता. मग पुन्हा सिंहांचा आराम व हरणांचे चरणे चालू व्हायचे. हा धागा धरून चित्रपटाचा निवेदक म्हणाला, किती सुंदर संस्कृती आहे बघा. पोट भरलेला सिंह वा श्वापद आपली उगाच शिकार करणार नाही, याची किती खात्री त्या हरणांना आहे ना? भुकेलेले उपाशी श्वापदच शिकार करते. रिकामे पोट त्याला शिकार करायला प्रवृत्त करते. पोट भरलेले असेल तर तो कुणाला उगाच जीवानिशी मारत नाही. शिकार करत नाही. पण माणसाचे काय? माणसाची भूक कधी संपणार आहे? माणसाचे पोट कधी भरणार आहे? माणसाची न संपणारी भूक ही आपली खरी समस्या आहे. भूक म्हणजे पोटाचीच नाही. नैसर्गिक नाही. ज्याला हव्यास म्हणता येईल अशी ती भूक आहे. ज्याला मानवी भूक म्हणतात. कधीच समाधानी होऊ शकत नाही, त्याला मानवी भूक म्हटले जाते आणि तीच खरीखुरी मानवी समस्या आहे. तिचे उत्तर कितीही शोधले तरी हजारो वर्षापासून मिळालेले नाही. कधी मिळेल अशी अपेक्षाही आपण करू शकत नाही.

हव्यास ही एक बाब अशी आहे, की त्यातून सगळ्या मानवी समस्यांचा जन्म झाला आहे. त्याच मानवी हव्यासाचे उदात्तीकरण करण्याला अर्थशास्त्र असे गोंडस नाव देण्यात आलेले आहे. त्याचा उदभव कसा व कधी झाला, तेही शोधून काढावे लागेल. पृथ्वीचा आरंभ झाला किंवा इथे सजीव सृष्टी निर्माण झाली, तेव्हा सगळे व्यवहार निसर्गाने लावून दिलेल्या नियमानुसार चालले होते. त्या सजीवातला सर्वात दुबळा प्राणी माणुस होता. बाकीच्या प्राण्यांना निसर्गाने वा असल्यास देवाने सुरक्षेसाठी काहीतरी अवयव किंवा कवच दिलेले होते. कोणाला नख्यांचा पंजा दिला तर कोणाला धारदार दात-सुळे शिकारीसाठी दिले. हत्तीला अगडबंब देह दिला तर सापासारख्या प्राण्याला हातपायांच्या ऐवजी विषारी दंश करण्याची कुवत बहाल केली. तुलनेने माणसापाशी असे कुठलेही भेदक हत्यार वा अवयव नाही. मग ती त्रुटी भरून काढण्यासाठी असेल निसर्गाने माणसाला विचार करण्याची, तारतम्याने कृती करण्याची बुद्धी दिली. अधिक त्या बुद्धीतून गगनाला गवसणी घालण्यासाठी मनाचे पंखही दिले. त्याचा उपयोग अन्य सजीवांप्रमाणे आपला बचाव आणि जगण्याच्या सुविधा साध्य करण्यासाठी व्हावा, हीच अपेक्षा असू शकेल. आपल्या आवश्यकता व गरजेपलिकडे माणुस या क्षमतेचा गैरवापर करणार नाही, अशीच निसर्गाची अपेक्षा असणार. निदान निसर्गाच्या कृपेने उदभवलेल्या अन्य सजीवांनी तरी मिळालेल्या सुविधेचा कधी गैरवापर केला नव्हता. मग त्यापैकीच एक असलेल्या मानवाकडून बुद्धी व मनाचा गैरवापर होण्याची चिंता निसर्गाला तरी कशाला असेल ना? पण माणूस मल्ल्या किंवा तत्सम बुद्धीचा असतो. याचा शोध बहुधा तेव्हा लागलेला नसावा. त्याने कशी कर्जाची सुविधा वापरून घेतली आणि मग परतफ़ेडीची वेळ आल्यावर हात झटकून पळ काढला. त्यापेक्षा एकूण मानव जातीचे पृथ्वीतलावरचे वर्तन वेगळे झालेले नाही. (अपुर्ण)

13 comments:

  1. अतिशय सुंदर लेख भाऊ...🙏🙏

    ReplyDelete
  2. "ब्युटीफुल पीपल" वरुन आणखी एक आठवण झाली. ह्या चित्रपटाचे चित्रीकरण दक्षिण आफ्रिकेतील जंगलात झाले होते ह्या विचित्र भूमिकेत शिरुन, सरकारने ह्या चित्रपटाचे प्रदर्शन भारतात होऊ दिले नव्हते.

    ReplyDelete
  3. कुठल्याही प्राण्यात किंवा पक्षात ,मादीने स्वीकृती दिल्या शिवाय ,कुठलाही नर तिच्यासोबत मीटिंग करू शकत नाही.. माणसं बलात्कार करतात.. या पृथ्वी तलावर सर्व सजीव निसर्गाशी प्रामाणिक राहतात,निसर्गाला जपतात.. एक फक्त मनुष्य असा आहे जो स्वतःला फार हुशार समजतो, आणि म्हणूनच स्वतःची आणि या निसर्गाची वाट लावून बसला आहे

    ReplyDelete
  4. ब्लॉग साठी छान विषय निवडला आहे...
    आणि आताची वेळ ही उचित आहे...

    ReplyDelete
  5. भाऊ, फार सुंदर पद्धतीने मानवाचे या प्रुथ्वीवरील वागणे आणि मानसिकता चित्रण केली आहात. पुढच्या लिखाणाची वाट पहातोय.

    ReplyDelete
  6. भाऊराव,

    म्हशीच्या बाबतीत युक्तिवादच करायचा झाला तर उलट्या दिशेनेही करता येईल. म्हशीच्या मालकाने तिला जुगवली म्हणूनंच तिला रेडकू झालं ना? रेडकू झालं म्हणूनंच ती दुभती आहे ना?

    रेडक्यास पाजून झाल्यावर अतिरिक्त दूध मालकाने काढणे हा माझ्या मते न्याय्य मार्ग आहे. मात्र तो अनुसरता येईलंच याची हमी केवळ मालकंच देऊ शकतो.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
    Replies
    1. सांभाळले नाही तर म्हशीला रेडकू होणार नाही असं वाटत का आपल्याला

      Delete
  7. Bhau kya baat hai भाउ मला तर इतके कौतुक करावेसे वाटते की आपण या जगाकडे कुठल्या दृष्टी ने बघता आणि अशा अफलातून कल्पना कशा आपणास सुचतात खरेच माझ्या सारख्या नगण्य माणसाच्या आकलन शकती बाहेर आहे ही खरोखर देवाची देणगी आहे आपल्याला

    ReplyDelete
  8. Aprateem bhau. Changlya vishayala hat ghatlat

    ReplyDelete
  9. अप्रतिम लेख भाऊ!अगदी मनातले लिहिलेत आपण.

    ReplyDelete
  10. अगदी खरय. या पृथ्वीवर 800 कोटी मानव असणे हीच एक अनैसर्गिक वस्तुस्थिती आहे, असे मला वाटते. ज्याला "मन" आहे, असा एकच प्राणी निसर्गाने बनवला. माणसात आणि इतर प्राण्यांमधे हा एकुलता एक फरक आहे. मानवाने त्याचा उपयोग वैज्ञानिक प्रगती साठी केला. तसे करतांना संपूर्ण जगाचा विचार मानवाने मात्र केला नाही. विज्ञानाच्या माध्यमातून एक तर माणसाने स्वत:च्या भौतिक सुखसोयी वाढवल्या किंवा आपल्या आयुष्याची सरासरी लांबी वाढवली. माणसाच्या या कृत्यामुळेच इतर जीवांच्या तुलनेत माणसाची संख्या 'अनैसर्गिक' प्रमाणात वाढली आहे. याचे जर समीकरण मांडले तर ते माझ्या मते काहीसे असे राहील निसर्ग(0) × विज्ञान(1) = परीणाम(0). माणसाला हे समीकरण जितके लवकर समजेल तेवढे त्याच्या साठीच बरे राहील. व्हायरस हा निसर्ग(0) असून त्याच्या विरुध्द माणसाचे प्रयत्न हे विज्ञान(1) आहे.त्यामुळे निसर्गाला हे समीकरण खरे करायला एक क्षण सुध्धा पुरेसा आहे.

    ReplyDelete