Tuesday, March 3, 2020

उचापतखोर मुला-मुलींची गोष्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियातून बाजूला होण्याची इच्छा काल व्यक्त केली आणि मला प्रथमच या माध्यमाची महत्ता लक्षात आली. ही माध्यमे नसती तर कदाचित काही उचापतखोर मुला-मुलींशी माझा परिचय कधीच झाला नसता. त्यांची ओळखपाळख झाली नसती, तर आयुष्यातल्या वेगळ्या आनंदालाही मी मुकलो असतो. कारण आज ज्यांची गोष्ट सांगणार आहे, ते केवळ याच माध्यमातून मला भेटलेले आहेत. आजकाल पुण्यात मुक्काम असला, मग भुकेची चिंता नसते. मधला वेळ असेल तर अंबर कर्वेच्या ‘फ़क्कड’मध्ये जाऊन क्षुधाशांती करून घेता येते आणि संध्याकाळ उलटून गेलेली असेल तर त्याच कर्वेनगरात गुरू सावंतच्या मालवण कट्ट्यावर जाऊन रात्रीचे तुडुंब जेवून ढाराढूर झोपण्याचा मार्ग मोकळा होत असतो. २६ फ़ेब्रुवारीला सांगलीत व्याख्यान होते. ते संपवून सातार्‍याला गावी दोन दिवस गेलो आणि माघारी पुण्यात शनिवारी आलो. घनश्याम पाटील व अक्षय बिक्कड चांदणी चौकातून घरापर्यंत सोडायला आलेले होते. नंतरच्या पिढीतली ही मुले आपापल्या परीने जगाचा जगण्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्नशील असताना बघून खरेच समाधान होते. कारण आमच्या पिढीप्रमाणे शिक्षण आणि नंतर आयुष्यभरात कुठेतरी चिकटण्याचा विषय त्यांच्या मनालाही स्पर्श करून गेलेला नाही. अन्यथा त्यांना असे एकाहून एक अजब उद्योग कशाला सुचले असते? त्यांनी नोकरी शोधण्यापेक्षा आपले वेगळे स्थान जगामध्ये निर्माण करण्यासाठी असे धाडसी प्रयोग कशाला केले असते? वयात मोठा फ़रक असतानाही ही मुले मित्रासारखी माझ्यासोबत रमतात आणि तितक्याच अधिकारात मी त्यांना वडिलधारा म्हणूनही कान उपटण्याचा फ़ायदा उठवत असतो. तर २९ तारखेलाही असे़च झाले. सूर्य मावळताना घरी पोहोचलो होतो आणि घनश्यामला सोबत घेऊन मालवण कट्ट्यावर रात्रीचे जेवण उरकायला गेलो. दुसर्‍या सकाळी लौकर उठून कामे उरकायची होती. पण गुरूने थोडा अजेंडा बदलला. जेवून आहारलो असताना त्याने कर्वेनगरातच एका नव्या हॉटेलला भेट देण्याचा अट्टाहास केला. त्याची मैत्रीण विणा अनेकदा मला कट्ट्यावर भेटलेली. तिनेही फ़ुड जॉइन्ट सुरू केलाय आणि तिथे मला आणायचे गुरूने आधीच मान्य केलेले होते. सहाजिकच अवेळी तिथे जाणे भाग झाले. नाव आहे ‘जोशीज क्विक ट्रीट’.



( स्वाती. विणा, किर्ती)

तसे बघायला गेल्यास मी कोणी खवय्या नाही आणि चविष्ट पदार्थांची चर्चा करणाराही नाही. पण काही खाद्यपदार्थ चवीने खाणारा व एखादा पदार्थ आवडला तर त्यानेच पुर्ण भूक भागवणारा एकदम अरसिक पोटार्थी माणूस. मग मनसोक्त सुरमई खाऊन झाल्यावर शाकाहारी जॉइन्टमध्ये जाण्यात काय अर्थ होता. पण गुरूचे मन मोडता आले नाही आणि त्याच्या बाईकवरून साडेनऊच्या सुमारास विणाच्या नव्या प्रयोगाचे दर्शन घ्यायला पोहोचलो. तिथे काहीही खाणे शक्य नव्हते, इतके मासे खाऊन झालेले होते. पण तिच्या आग्रहाखातर चहा घेतला आणि तिची इच्छा पुर्ण करण्यासाठी चार बटाटेवडे घेऊन निघालो. रात्री आहारून निद्रादेवीची प्रार्थना करीत पडलो असताना सहज डोक्यात विचार आला आणि मनापासून भारावून गेलो. ह्या नव्या पिढीतल्या मित्रांनी खिशात दमडा किंवा भांडवली पाठबळाची कुठलीही शाश्वती नसताना थेट हॉटेल वा तत्सम आहारगृहांचे नवनवे प्रयोग करावेत, त्याचे कौतुक वाटले. त्याहीपेक्षा आपल्याला अगत्याने बोलावून आमंत्रित करून खाऊपिऊ घालण्याचे त्यांचे प्रेम भारावून टाकणारे वाटले. पण अकस्मात डोक्यातील विचारांना भलतीच दिशा मिळाली आणि मनातल्या मनात त्याच पोरांना भरपूर शिवीगाळही करून झाली. विचित्र वाटले ना? आधी कौतुक आणि क्षणार्धात शिव्याशाप? आणि तेही कशासाठी, असे मनात यावे ना? त्याचे कारण चमत्कारीक आणि बालीश आहे. आज वयाची सत्तरी उलटून गेल्यावर भुक कमी झाल्यावर ही कारटी प्रेमाने व आग्रहाने खाऊ घालतात. मग जेव्हा खरोखर मनसोक्त खायचे वय होते, तेव्हा कुठे दडी मारून बसले होते सगळे? तीस चाळीस वर्षापुर्वी माझे खाण्याचे वय होते आणि ताव मारून खाता आले असते, तेव्हा हे कशाला माझ्या आयुष्यात आले नाहीत? असा खुळा राग किंवा विचार त्यामागे होता. पण काही क्षणापुरताच. कारण चुक त्यांची नाही वा गुन्हा माझाही नाही. त्यांचा जन्मच नंतरच्या पिढीतला असेल तर माझ्या उमेदीच्या काळात त्यांचे प्रयोग कसे शक्य झाले असते? अशा विचारांनी गाडी पुन्हा रुळावर आली. ह्या तीन हॉटेल वा खाद्यसुखसोयींची वेगळी बाजू सांगणे अगत्याचे वाटले.

अकस्मात काय वाटले आणि उठून दिवा लावला आणि विणाने दिलेला बटाटेवडा मायक्रोवेव्हमध्ये टाकून गरम केला आणि खाल्ला. जिभेला जाग आली आणि विचारांची गाडी रुळावर आली. माझा राग विणा,गुरू वा अंबरवर नव्हता. मनातला क्षोभ माझ्या उमेदीच्या काळातल्या हॉटेल वा खाद्यसुविधांवर होता. कुठेही गेले तरी मसाला, डोसा, इडली, मेदुवडा किंवा चटणी सांबारच्या पलिकडे जाता येत नव्हते. अस्सल मराठी पदार्थाची हॉटेल कुठेही शोधून काढावी लागत होती आणि त्यातही हळुहळू करून उत्तर भारतीय वा दाक्षिणात्य पदार्थांनी घुसखोरी केली होती. त्याचा सगळा राग वाढलेल्या वयामुळे या तिघांवर निघाला होता. तसे बघायला गेल्यास हळुहळू मराठीही हॉटेल निघाली आहेत आणि खास मराठी पदार्थांची रेलचेल आता दिसू लागली आहे. पण बहुतांश मराठी हॉटेल्स अजूनही खानावळ किंवा उडपी पंजाबी पेहरावातच अडकलेली आहेत. त्यातला मराठीपणा शोधावा, इतके त्यातले अमराठीपण बोचणारे असते. भाषा वा प्रांतिय अस्मिता म्हणून ही माझी तक्रार नाही. मराठी पदार्थाची विविधता अन्य कुठल्याही प्रांतीय खानसंस्कृतीमध्ये नाही, असे माझे अडाणी मत आहे. पनीर, राजमा, आलू व ग्रेव्ही म्हणजे उत्तर भारतीय आणि उडीद तांदुळाचे मिश्रण असलेले आंबवलेले पदार्थ म्हणजे दाक्षिणात्य; असे समिकरण होऊन बसले आहे. त्यातच आमच्या पिढीची हॉटेल्स गुरफ़टून गेली. खेरीज खाद्य दुकान वा हॉटेल़चे स्वरूपही ठाशिव. टेबल खुर्च्या सजावट सगळे सारखेच. क्वचित मराठीपणाचा ठळक अविष्कार. कमाई करण्याचा हेतू असावा. पण त्यात येणार्‍या ग्राहकाच्या आनंदाचा वा समाधानाची इच्छा असू नये का? असे कुठेतरी मनातल्या मनात डाचत असावे. त्यातून मग हा राग तयार झालेला असावा. मी खवय्या नाही, हे आरंभीच सांगितले आहे. पण सामान्य माणूस म्हणून भुकेच्या वेळी चविष्ट काही जिभेचे चोचले पुरवायला मिळाले, तर आनंदाला पारावार उरत नाही, इतकीच माझी खानपान संस्कृती मर्यादित आहे. त्या वेदनेला या पोरांनी पहिला छेद दिला.



(गुरू कट्ट्यावर)

यातला पहिला होता गुरू सावंत. त्याने नोकरी सोडून व्यवसायात पडण्याचा विचार केला, तेव्हा मलाही मागल्या पिढीतला असल्याने चुकचुकल्यासारखे वाटले होते. पण ते कधी बोलून दाखवले नाही. मात्र किती शक्यता आहेत आणि हिशोब किती जुळणार आहे, हे आडून आडून बोलत त्याला सावध प्रोत्साहन देत राहिलो. दोन वर्षापुर्वी त्याने कर्वेनगरात मालवणी माश्यांच्या पदार्थांचे हॉटेल सुरू करण्याचे धाडस केले, तेव्हा धीर देण्यापलिकडे काही केले असे मला म्हणता येणार नाही. पण त्याच्या यशाविषयी मला खात्री वाटत होती आणि त्याचे एकमेव कारण होते, गुरूची खाऊगिरी. सोशल मीडियात त्याच्या पोस्ट यायच्या, त्यात हटकून घरातल्या जेवणातले मासे असायचे आणि त्याची वर्णने असायची. मग एकेदिवशी त्याने मलाही घरात पकवलेले मासे आणून दिले आणि नंतर अनेक प्रसंगी त्याचा रतीब चालू राहिला. दरम्यान त्याची घरपोच सेवा सुरू झालेली होती आणि दोन वर्षापुर्वी केर्वेनगर येथे पहिला ‘कट्टा’ सुरू झाला. तिथे जम बसायला वेळ लागला. पण त्याची पत्नी स्मिता व वहिनी अजिताच्या हाताला चव असल्याची चुणूक मलाच मिळालेली होती. मालवणी वा माशाचे पदार्थ अनेक जागी मिळत असतील. पण कट्टा वेगळा एका बाबतीत आहे. तिथे कोणीही प्रस्थापित व्यावसायिक ‘शेफ़’ नाही. गुरूच्या घरात जे पदार्थ बनायचेम, ते तसेच्या तसे कट्ट्यावर आताही मिळतात. ज्या दिवशी तिथे शेफ़ येईल त्या दिवशी तिथली चव संपलेली असेल, याची मी खात्री देतो. आता मी ताव मारून मासे खाऊ शकत नसेन, पण स्मिताचे मासे म्हणजे खर्‍याखुर्‍या अस्सल मालवणी पदार्थाची चंगळ. यात गुरूचे नुसते नाव नाही. स्मिता, अजिताच्या हाताला असलेली चव जगाला कथन करून खायला भाग पाडण्याची कला गुरूपाशी आहे. त्यापेक्षाही गुरू स्वत:च एक उत्तम खवय्या आहे. हॉटेल सुरू होण्यापुर्वीच्या त्याच्या पाचसहा वर्षातल्या सोशल मीडियातल्या पोस्ट तपासल्या, तरी त्याच्यातला जीताजागता ‘अन्नदाता’ सहज डोळ्यात भरू शकतो.

गुरूमुळेच चारपाच वर्षापुर्वी अंबर कर्वेची ओळख झाली. हा दुसरा गुरूच. त्याच्या बोलण्यात निम्मे शब्द तरी खाऊगिरीचे असतात. जगातल्या कुठल्या भागातले कुठे पदार्थ कसे आहेत? त्याचवेळी आपले मराठी पदार्थ कसे व कुठल्या मोसमात चविष्ट असतात. वातावरण व परिस्थिती पदार्थाला कशी चविष्ट बनवते, त्याचा पाढा अंबर नेहमी वाचत असतो. खरे तर अंबर मिसळवेडा. पहिल्यांदा भेटला तेव्हा मिसळ हा पदार्थ ग्लोबल बनवण्याचा चंग बांधलेला लढवय्या, असा माझा त्याच्या विषयीचा चेहरा पक्का झालेला. त्यानंतर त्याने मिसळ उत्सव किंवा मेळावे असे अनेक प्रयोग चालविले होते. अगदी मॅगीसारखी तयार मिसळ पाकिटे बनवण्यापर्यंत त्याने नाना उद्योग केले आणि वर्षभरापुर्वी त्यानेही गुरूच्या मागे आपला क्रमांक लावला. त्यानेही कर्वेनगरात आपले एक स्थान निर्माण केले. ‘फ़क्कड’ हा जॉइन्ट सुरू केला. त्याने कितीही आग्रह केला म्हणून त्याच्या दुकानात लगेच उठून जाणे मुंबईकर असल्याने जमले नव्हते. मग एके दिवशी तो योग आला. कट्ट्यावर स्मिताने मला माझ्या आजीपासून जुन्या माशाच्या चवींची आठवण करून दिली होती आणि अंबरच्या ‘फ़क्कड’मध्ये पहिल्यांदाच गेलो आणि तो मला पन्नास वर्षे मागे घेऊन गेला. १९७० च्या जमान्यात पुण्याला फ़ेरी पडली, तर अगत्याने मंडईच्या त्या हमालांसाठी चालणार्‍या हॉटेलातला सॅम्पल पाव खाल्ल्याशिवाय कधी मुंबईला परतलो नव्हतो. इतका झणझणीत रस्सा आणि पाव असायचा, की नाका डोळ्यातून पाणी यायला हवे. दोनचार महिन्यातून एकदा त्याची चव घेतली मग तिखट खाण्याची गरज नसे. अंबरने मला त्या काळात नेवून सोडले. वर्षभरात फ़क्कडच्या माध्यमातून अंबर वेगवेगळे प्रयोग करतोय. लाखो रुपये ओतावेत असे त्यालाही भांडवलाचे पाठबळ नाही. पण इच्छाशक्ती हेच आजच्या या पिढीचे खरे भांडवल आहे. खरे तर आपली मराठी खाद्यसंस्कृतीची विविधता हेच मराठी माणसाचे हॉटेल धंद्यात उडी घेण्यासाठीचे खरे भांडवल आहे, हे ओळखणारी ही मुले असावीत. अन्यथा त्यांनी रिकाम्या खिशावत विसंबून असे धाडस कशाला केले असते?



(अंबरचा अड्डा)

आता त्यांच्यात विणा जोशी, किर्ती जोशी आणि स्वाती कुलकर्णी अशा तिघा मुलींची भर पडली आहे. कर्वेनगरात गेल्या आठवड्यात त्याच तिघींनी ‘जोशीज क्विक ट्रीट’ नावाचे अन्नकेंद्र सुरू केले आहे. वास्तविक त्याला फ़ुड जॉइन्ट असे म्हणणे योग्य असले तरी व्यवहारात ते अन्नकेंद्र आहे. कारण त्याचा पेहराव पाश्चात्य असला तरी चवीसह त्याचा आत्मा स्वैपाकघरातून सुटणार्‍या घमघमाटाचा आहे. अर्धी जागा भटारखाना व काऊंटरनेच व्यापली आहे आणि उरलेल्या अर्ध्या जागेसह बाहेरची उघडी मोकळी जागा उभ्या उभ्या क्षुधाशांती करणार्‍यांसाठी आहे. तिथे ऐसपैस बसून पदार्थावर ताव मारता येणार नाही. पंगतीसारखा वेळकाढूपणा नाही. आजकालची मुले मोटरबाईक घेऊन घाईगर्दीने येतात आणि उदरभरण नोहे अशा गडबडीने पोटाची आग शांत करण्याच्या स्थितीत असतात. त्यांना चांगले चवदार सकस खाऊ घालण्याचा उद्देश या तीन मुलींनी ठेवलेला दिसतो. प्रत्येक बाबतीत कुठेतरी गडबडीने निघालेल्या या पिढीची घाई बहुधा आजवरच्या अन्य मराठी खाद्यविक्रेत्यांना उमजलेली नसावी. तिचा वेध या मुलींनी घेतलाय. म्हणून तर अस्सल मराठी पण अमेरिकेतल्या स्टारबक्स वा मकडोनाल्ड शैलीतला हा जॉइन्ट त्यांनी उभा केलाय. माझ्या बालपणी जो बटाटेवडा खाल्लाय त्याचे स्मरण त्यांच्या वड्याने करून दिले. ह्यातली खरी गंमत म्हणजे विणा स्वत: फ़ुडब्लॉगर आहे. अंबरही तसाच. गुरू तसा लेखक वगैरे नाही. पण त्याच्या घरातच सुगरणी बसलेल्या आहेत. त्यामुळे ह्या तिघांची खरी खासियत त्यांच्या भटारखान्यात कोणीही प्रशिक्षित शेफ़ नाही. ही पदार्थ अस्सल घरगुती व पारंपारिक असल्याची हमी असते. त्याहीपेक्षा त्यांच्या पदार्थाची चव त्यांनाच आवडणारी असावी लागते. खायला येणार्‍याच्या जिभेची चिंता त्या ग्राहकापेक्षाही या मुलांना असते. हे वेगळेपण मोठे आहे. गल्ल्यात जमा होणार्‍या रोखीपेक्षाही खाणार्‍याच्या जिभेवरून दुरदुरपर्यंत दरवळणार्‍या चवीची चिंता करणारे असे कोणी आपल्या उमेदीच्या काळात कशाला नव्हते? हे माझे दुखणे त्या रात्री शिव्याशापाचे खरे कारण होते.

कुठल्या चॅनेलवर किंवा पाकशास्त्राच्या पुस्तकात यांच्या रेसिपी मिळणार नाहीत. कारण अंबर, गुरू वा विणाच्या अन्नछत्रामध्ये तयार होणार्‍या पदार्थाच्या रेसिपी कोणी कुठे लिहून ठेवलेल्या नाहीत. जितकी मला माहिती आहे, त्यानुसार याही मुलांनी त्याचे कुठे डॉक्युमेन्टेशन केलेले नाही वा कुठून शिकून घेतलेले नाही. आपल्या आज्या मावश्या, आई काकू वा आत्याच्या आसपास घोटाळताना जे काही शिकता आले वा निरीक्षण करता आले, त्यातून त्यांनी आत्मसात केलेल्या किंवा त्यात आपल्या बुद्धीनुसार घातलेल्या भरीतून जन्माला आलेल्या ह्या रेसिपी आहेत. कारण लोकांना आवडण्यासाठी वा गल्ला गोळा करण्यासाठी योजलेल्या त्या रेसिपी नाहीत. आपल्याला खाण्यात मिळणारा आनंद इतरांच्याही चेहर्‍यावर दृगोचर होताना बघण्याच्या अतीव इच्छेतून त्यांनी हे धाडस केलेले आहे आणि प्रयोग आरंभलेले आहेत. त्यांना आर्थिक यश किती मिळाले, ते मला ठाऊक नाही. पण आपला उदरनिर्वाह करताना इतरांच्या जीवनात आनंदाचा उदभव करण्याची इच्छा मात्र त्यातून लपत नाही. म्हणूनच नवनवे काही करण्यासाठी त्यांचे डोके कायम व्यस्त असते आणि त्यांच्याशी गप्पा करताना ते जाणवते. परेश मोकाशी हे नाव तुम्हीही ऐकले असेल. तो चित्रपट दिग्दर्शक आहे. त्याची आई श्रीया अशीच सुगरण आहे. आम्ही १९७०-८० च्या कालखंडात त्यांच्या घरी टोळीने जायचो आणि मुक्काम असायचा. तेव्हा पहिल्या रात्री पिठलं-भात करावा हा माझा आग्रह श्रीयाला संतप्त करायचा. पण तिच्या हाताने बनवलेल्या पिठल्याची चव मला जगात कुठे अनुभवता आली नाही. तिचाही स्वभाव या तिघांसारखा घरी आलेला कोणही असेल, त्याने समाधानाने ढेकर दिलेला ऐकल्याशिवाय तिचे कधी समाधान होत नसे. या पोरांचे हे नवे प्रयोग म्हणून मला पुर्वायुष्यात घेऊन जातात आणि ‘उदरभरण नोहे जणिजे यज्ञकर्म’ ही उक्ती पटवून देतात. तेव्हा खाण्याचे वय होते आणि श्रीया एकटीच लाड करायची. आज असे नवनवे तरूण मित्र मैदानात येत आहेत आणि आपले खाण्याचे वय निघून गेल्याचा राग मग त्यांना शिव्याशाप देण्याचे कारण होतो.

15 comments:

  1. गुरु, अक्षय, घनश्याम...
    मजा आली तिघांची आठवण इथे काढलीत...🙏🙏

    ReplyDelete
  2. डोळयात पाणी आले भाऊ .

    ReplyDelete
  3. अगदी खाल्ल्यासारखं वाटलं!

    ReplyDelete
  4. नवउद्यमी आणि त्यातही मराठी माणसांना प्रोत्साहित केलंत खूप बरं वाटलं, हल्ली लोकसत्तेतही सोमवारी लेख येत आहेत,खाऊ घालणे हा जसा तसाच नवीन क्षेत्रात मराठी माणसांनी घेतलेली भरारी उत्साहित करते

    ReplyDelete
  5. im happy and inspired that our boys doing gr8 and will rock in future too.....maintain passion ....sky is the limit

    ReplyDelete
  6. भाऊ, फार दिवसानी एका वेगळ्या विषयावर लेखन केलेत. वय झाले तरीही तुम्ही तरुण आहात भाऊ म्हणूनच तुम्ही लोकसभा निवडणुकीत तरुणांचे मन ओळखू शकलात व त्याप्रमाणे यश कोणाचे ते छातीठोकपणे सांगू शकलात. तसेच सध्याचे मराठी तरुण व्यवसायात उतरत आहेत तेही आत्मविश्वासाने हे ही छान आहे व तीच तरुणाई आपल्याला मित्र मानते हेच तुमच्या तारुण्याचे यश आहे.

    ReplyDelete
  7. अक्षय बिक्कडला जरा व्यायाम करायला सांगा भाऊ तुमच्या वयाचा होईपर्यंत टिकला पाहिजे

    ReplyDelete
  8. भाऊ मी पक्का पुणेरी शुद्ध शाकाहारी, पूर्वी अमुक ठिकाणची मिसळ खास आहे असे कळलेकी आम्ही मित्रमंडळी तिकडे जाऊन धाड टाकत असू,आता वय व पथ्यपाणी यामुळे वारंवार जाणे होतेच असे नाही.पण आता तुम्ही वर्णन केलेल्या ठिकाणी जाऊन मिसळ, वडे वगैरेची चव चाखून नक्की येऊ.नवीन विषयव्ही माहित बद्धल धन्यवाद@

    ReplyDelete
  9. Bhau, Please give addresses of all these mentioned joints.

    ReplyDelete
  10. खाण्याची गरज आणि आवड या दोन सर्व सजीवांत साधारण गोष्टी .पाकशास्त्र आणि भाषेप्रमाणे दर कोसावर बदलणारी त्याची रूपे हा माणसांचा वेगळेपणा . खाण्याशिवाय दुसरे आहेच काय जीवनात, त्याच्यासाठी तर सारे काही असे पुष्कळाच्या तोंडून अनेकवेळा ऐकू येणारे पूर्णपणे खरे नसले तरी अगदीच खोटेही म्हणता येणार नाही .खाद्यपदार्थांचे आवाहन सार्वत्रिक असते .बालकवी थोड्याना माहित असतील पण बटाटेवडा सर्वाना माहित असतो आणि रुचतो हे गमतीचे आहे की नाही ?

    ReplyDelete
  11. भाऊंनी किती सुरेख पद्धतीने या तिघांची नव्याने ओळख करून दिली .. धन्यवाद भाऊ

    ReplyDelete
  12. भाऊ, आज एकदम भलतीच मेजवानी. नेहमी इतकीच चवदार चविष्ट आणि सकस ही. या पिढीची हीच खासियत. आपल्यासारखे मध्यमवर्गीय मुळमुळीत नाही. Rebellion Practical आणि एकदम बिनधास्त. प्रयत्नशील. आणि धाडशी सुध्दा.

    या सर्व मुला मुलींना खुप खूप शुभेच्छा.
    ॥ शुभं भवतु ॥

    ReplyDelete
  13. श्री भाऊ इथे ठाण्यात श्री किरण भिडे यांनी "मेतकुट" नावच उपहारगृह चालु केलंय, कुठेतरी नौपाडा भागात आहे आपण जरूर भेट द्या

    ReplyDelete
  14. 👌👌👌👌👍👍👍👍

    ReplyDelete