Showing posts with label दाऊद. Show all posts
Showing posts with label दाऊद. Show all posts

Tuesday, August 25, 2015

दाऊदच्या गौप्यस्फ़ोटामागचा गर्भित डाव?



भारताच्या गुप्तहेर संस्थेने दाऊद कुठे रहातो याचे पुरावे गोळा केल्यावर त्याचा गवगवा केल्याने खेळी फ़सली आणि अशा गोष्टी उघड करायच्या नसतात. त्यासाठी मिरवायचे नसते, असे आपल्याकडल्या अनेक बुद्धीमंतांना वाटते. म्हणूनच दाऊदचा नवा फ़ोटो वा त्याच्या पत्नीशी झालेल्या संवादाचे मुद्रण ऐकवण्यात भारतीय हेरखात्याने कसा मुर्खपणा केला, त्याचे पांडित्य सांगितले गेले. पण ज्यांनी अशी बातमी देताना आपणच दाऊदच्या पत्नीशी संपर्क साधल्याचे कौतुक करून घेतले त्यांनाही अशा गोष्टी कशासाठी होत असतात, त्याचा पत्ता लागलेला नसावा. पहिली गोष्ट म्हणजे गुप्तहेर खाते वा त्याच्या कारवाया राजकारण व मुत्सद्देगिरीच्या पलिकडचा विषय असतो. व्यापक राजकारणातली व्युहरचना गुप्तहेरांच्या कारवाईतून होत असते. त्यामध्ये काही छुप्या खेळी असतात, तर काही उघड खेळी असतात. दाऊदचा नवा फ़ोटो वा त्याच्या पत्नीशी झालेल्या संवादाला प्रसिद्धी देण्यामागे अशीच काही खेळी असू शकते. मात्र त्याचा विचार करायचीही अनेकांना गरज वाटत नाही. आपल्या समजुती वा भूमिका याच्या पलिकडे जग चालते, त्याचाही अशा लोकांना गंध नसतो. म्हणूनच ऐन मोक्याच्या वेळीच दाऊदविषयी हा गौप्यस्फ़ोट कशाला करण्यात आला, ते त्यांना उमगतही नाही. किंबहूना त्यामागची रणनिती सरकार वा गुप्तहेर खात्याने पत्रकार परिषद घेऊन जाहिर करावी, अशी त्यांची अपेक्षा असावी. अन्यथा त्याच्या परिणामांचा विचार झाला असता. त्यावर वायफ़ळ पांडित्य सांगायची हौस भागवली गेली नसती. मात्र हे पांडित्य सांगून संपण्यापुर्वीच पाकिस्तानात पळापळ सुरू झाली आणि दाऊदला कराचीतील घरातून कुटुंबासह उत्तर पाकिस्तानात सुरक्षित जागी हलवण्यात आल्याची बातमी आली. त्यातून अशा खेळीमागचा डाव लक्षात येऊ शकतो. पण ज्यांना तो समजून घ्यायचा असेल, त्यांनाच तो बघावा असे वाटणार ना?

कुठल्याही गुतहेर खात्याच्या कामात नुसती माहिती काढणे वा घातपात करणे इतकेच काम नसते. मित्र व शत्रू देशातील गुप्तहेर खाती आपापल्या सरकारच्या धोरणाला पुरक ठरेल अशा खेळी करीत असतात आणि त्यानुसार हवी असलेली माहिती व साधनांचा उपयोग करून घेत असतात. सध्या भारताने पाकिस्तानला कोंडीत पकडण्याचे धोरण आखलेले आहे. त्याला पुरक होईल अशाच खेळी मुत्सद्देगिरी व गुप्तचर खात्याकडून खेळल्या जाणार ना? मग त्यात ठरलेली बोलणी फ़िसकटणे. पाकिस्तानने त्यातून माघार घेणे वा पाकिस्तानच्या अंतर्गत गोटात परस्पर शंका-संशयाचे वातावरण निर्माण होणे; अशा अनेक खेळी संभवतात. दाऊदची माहिती उघड करणे त्याचाच एक भाग असू शकतो. नुसता दाऊदचा पत्ता ठाऊक असल्याने त्याला तिथे जाऊन उडवणार असा होत नाही. तर तुम्ही ज्याला लपवून सुरक्षित जागी ठेवला असा दावा आहे. तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो, असे भासवून शत्रूची तारांबळ उडवून देण्य़ाचाही त्यामागे डाव असू शकतो. दाऊदच्या पत्नीचा फ़ोनवर बोलतानाचा व्हीडीओ त्यातला सूचक इशारा असू शकतो. कोणीतरी आतला माणूस फ़ितूर असल्याचे त्यातून भासवले जात असते. कडेकोट बंदोबस्तामध्ये असलेल्या व्यक्तीचे असले चित्रण तिथल्या बंदोबस्तातील त्रुटी सिद्ध करत असते. म्हणून तिथपर्यंत कोणी मारेकरी सहज पोचणे शक्य असते, असे अजिबात नाही. पण बंदोबस्त करणार्‍यांचा आत्मविश्वास खच्ची करायला अशी माहिती वापरण्याचा प्रयास असू शकतो. ती माहिती दाऊदपर्यंत पोहोचण्यासाठी अजिबात निरूपयोगी असली, तरी आत्मविश्वासाला खिळखिळा करायला उपयुक्त असते. नेमका तोच डाव साधला गेला आहे काय? कारण दोनच दिवसात दाऊदला कराचीतून अन्यत्र सुरक्षित जागी हलवण्याची बातमी आलेली आहे. ती बातमी खरी असेल तर ह्या गौप्यस्फ़ोटाचा हेतू सफ़ल झाला असेच म्हणावे लागेल.

दुसरी बाब अशी, की दाऊदला कराचीत आपण सुरक्षित ठेवू शकत नाही, हे पकिस्तानने कृतीतून मान्य केले, असाही या बातमीचा अर्थ होतो. पुन्हा अशा बातम्या खर्‍या असतील तर शत्रूच्या गोटात आणखी खळबळ उडवून देण्यास पुरेशा असतात. गुप्तहेर खात्याच्या कामात हिंसा वा धमाक्यापेक्षा संशयाची पेरणी अधिक स्फ़ोटक व घातक असते. कारण एकाच संस्था संघटनेतील लोकांमध्ये परस्परांविषयी संशय वाढवण्यास ती बातमी कारण होते. दाऊदला कराचीतून हलवल्याची बातमी खरी असेल, तर तो डाव यशस्वी झाला असेच मानावे लागेल. आणि अशी ही पहिलीच खेळी नाही. गेल्या वर्षाच्या अखेरीस वेदप्रकाश वैदिक नावाच्या तोंडपाटिलकी करणार्‍या ज्येष्ठ पत्रकाराच्या बाबतीत हेच घडले होते. एका पत्रकार पथकासोबत पाकिस्तानात सेमिनारला गेलेला हा वैदिक नावाचा पत्रकार, थेट तोयबाचा प्रणेता सईद हाफ़ीज याच्या घरापर्यंत जाऊन बोहोचला होता. सईदची भेट घेऊन त्याला भारतात येण्याचे आमंत्रण त्याने दिले होते आणि त्याबाबतीत त्याच्या सोबत पाकिस्तानात गेलेले बहुतांश पत्रकार अनभिज्ञ होते. किंबहूना ते अनेकदा तिथल्या आमंत्रणावरून पाकिस्तानला भेट दिलेले व तिथे अनेक मित्र असलेले मुरब्बी पत्रकार होते आणि त्यांनीच वैदिकला तिथे सोबत नेलेले होते. पण त्यांना अंधारात ठेवून वैदिकने केलेल्या कारवायांनी त्याच ‘मुरब्बी’ भारतीय पत्रकारांना चकीत व्हायची पाळी आलेली होती. पण वैदिकच्या त्या पराक्रमाला प्रसिद्धी मिळाली आणि इथल्या पाक-मित्र पत्रकारांची बोबडी वळली होती. तर तिकडे सईद हाफ़ीज पुढले दोन महिने कुठल्या कुठे गायब झालेला होता. मग अशा प्रसिद्धी व गाजावाजा करण्यामागची खेळी समजून घ्यायची असते. त्यामागे शत्रूच्या बालेकिल्ल्यात पुरेशी सुरक्षा नसल्याचे दाखवून खळबळ माजवच्याचा हेतू असतो. तो हेतू समजला तरच अशा खेळीची मजा लक्षात येऊ शकते.

दाऊद विषयीचा मागल्या आठवड्यातील गौप्यस्फ़ोट हा दोन देशातील बोलण्यांवर प्रभाव पाडण्याची खेळी नव्हती. तर पाकिस्तानला विचलीत करण्याची धुर्त खेळी होती. त्यात मग अर्णब वा टाईम्स नाऊ वाहिनीला साळसूदपणे वापरून घेतले जाते. त्याचे श्रेय त्यांना दिले जाते. त्यांना आपणच धक्कादायक बातमी दिल्याची मर्दुमकी गाजवल्याचे समाधान मिळते. पण दुसरीकडे शत्रूला त्याच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडणे किती सोपे आहे, त्याचा साक्षात्कार घडवून भयभीत करता येते. यात दाऊदचा नवा वयस्कर झालेला फ़ोटो कोणा निकटवर्तियाने घेतलेला असू शकतो. त्याचप्रमाणे घरात बंदिस्त असलेल्या दाऊदच्या पत्नीचा असा व्हीडिओही तिच्यापर्यंत पोहोचणे शक्य असल्याचे दाखवून देतो. पण तिथेच गोष्ट संपत नाही. असे चित्रण करणारा बाहेरचा कोणी असण्यापेक्षा आसपास वावरणार्‍यांपैकी असल्याचा संशय बळावतो. मग तिथे परस्परांना संशयाने बघणे सुरू होते. दुसरी गोष्ट नजरकैदेत असलेल्या दाऊदला हलवताना कितीही काळजी घेतली, तरी थोडीफ़ार माहिती फ़ुटतेच. आताही नुरी या जागी त्याला हलवल्याची बातमी खरी असेल, तर त्यातून आणखी संशयकल्लोळ उठणार आहे. त्यामुळे एकुण दाऊद प्रकरणातला गवगवा दोन देशातील बोलण्यांशी संबंधित नाही, हे लक्षात येऊ शकेल. त्या निमीत्ताने माजवलेला तो संशयकल्लोळ आहे. मुत्सद्देगिरी व गुप्तचर कार्य यातला हा फ़रक आहे. पण ते समजून घेण्यासाठी मुळात त्याचा अभ्यास करावा लागतो. त्यातले परस्पर पुरक काम आणि फ़रक दोन्ही लक्षात आले तर त्यामागचे हेतू उमजू शकतात. निव्वळ पुस्तकी पांडित्य त्यात कामाचे नसते. आपली यंत्रणा व सुरक्षा आतून किती पोखरली गेली आहे, याविषयी पाकच्या मनात शंका निर्माण करण्याचा तो डाव असू शकतो. त्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन सांगितली जात नाही, की धुर्त मुत्सद्देगिरीचे हेतूही जाहिरपणे सांगितले जात नाहीत.

Wednesday, July 15, 2015

याकुब मेमनच्या फ़ाशीच्या निमीत्ताने



अखेर २२ वर्षांनी मुंबई बॉम्बस्फ़ोट मालिकेतील एका महत्वाच्या आरोपीला फ़ाशी होणार आहे. म्हणजे आज तरी आपण छातीठोकपणे त्याची हमी देऊ शकत नाही. कारण आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे. सहाजिकच गळफ़ास आवळून माणूस मेला याची खातरजमा, फ़ाशी झाली असे म्ह्णायची कोणाची या देशात बिशाद नाही. अर्थात महाराष्ट्र सरकारने तशी तारीख जाहिर केली आहे. पण म्हणून ती पाळली जाण्याची अजिबात शक्यता नाही. कारण अजून सुप्रिम कोर्टात याकुब मेमनची एक फ़ेरविचाराची याचिका पडून आहे. तिची सुनावणी कुठल्या दिशेने जाते, त्यानुसारच राज्य सरकारला फ़ाशीची अंमलबजावणी करता येऊ शकेल. हा खेळ कित्येक वर्षे चालू आहे आणि तो अफ़जल गुरू व कसाबच्याही बाबतीत झाला होता. दोन्ही वेळी अगदी तारखाही लपवून ठेवल्या गेल्या आणि या कानाचे त्या कानाला कळू देण्यात आलेले नव्हते. त्याचेही कारण आहे. जितक्या जिद्दीने अफ़जलची केस इथल्या मानवतावाद्यांनी जिव्हाळ्याने लढवली होती, तितका ओलावा कसाब किंवा याकुबच्या बाबतीत दाखवलेला नव्हता. पण त्यापैकी अफ़जल हा काश्मिरी होता आणि त्यावरून तिकडे काही प्रतिक्रीया उमटण्याचे भय सरकारला वाटत असावे. कसाबची गोष्ट वेगळी होती. त्याला कोणी वालीच नव्हता. ज्यांनी इथे पाठवले, त्यांना त्याची ब्याद नको होती. तरीही त्या दोन फ़ाशीचा गवगवा खुप झाला होता. राष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून शिवसेनेचा पाठींबा मागायला प्रतिभाताई पाटील मातोश्रीवर गेल्या, तेव्हा बाळासाहेबांनी अफ़जलची थकलेली फ़ाशी उरकून घेण्याचा आग्रह धरला होता. पण पाच वर्षाच्या कारकिर्दीत प्रतिभाताई शब्द पुरा करू शकल्या नाहीत. मात्र प्रणबदांच्या तत्परतेने अफ़जलचा विषय निकालात निघाला होता. त्याच्या कुटुंबियांपेक्षा मानवाधिकाराचे आप्तेष्टच आक्रोश व मातम करत सुटले होते.

याकुबची कहाणी खरे तर शोकांतिका आहे. कारण तो अतिशय सुशिक्षित व सभ्य माणुस होता. धर्मभावनेच्या आहारी जाऊन स्मगलर भावाच्या नादी लागल्याने याकुब यात फ़सलेला होता. त्याला घातपातानंतर सुखरूप कराची पाकिस्तानातही नेण्यात आलेले होते. पण मुंबई व इथल्या वातावरणाशी जडलेले नाते त्याला तिथल्या पिंजर्‍यात राहू देईना आणि त्याला मुंबईचे डोहाळे लागले होते. त्याच्या परिणामी त्याच्या गळ्याभोवती फ़ास आवळला गेला आहे आणि त्यातले खरे सुत्रधार, त्याचाच भाऊ टायगर मेमन आणि दाऊद मात्र कराचीत मौज करीत आहेत. एकविस वर्षापुर्वी याकुबचा त्याच लोकांनी खरा घात केला. अधूनमधून दाऊद शरण येण्याच्या ज्या गप्पा चालतात, त्या खेळीतला याकुब एक मोहरा होता. दाऊदच्या अटी मान्य होतात किंवा नाही, त्याची चाचपणी करण्यासाठी ‘ट्रायल रन’ म्हणून याकुबला भारताच्या हवाली करण्यात आलेले होते. पण अशा गोष्टी अधिकृत नसतात. म्हणूनच ज्यांच्याशी दाऊदने बोलणी केली होती, त्यांनी अभय मिळण्याची कुठलीच हमी दिलेली नव्हती. पण शक्यता व्यक्त केली होती. ती शक्यता कितपत खरी आहे त्याचीन चाचपणी करण्यासाठी बळीचा बकरा दाऊदला हवा होता. मुंबईची ओढ लागलेल्या याकुब मेमनने ती ऑफ़र स्विकारली आणि तो नेपाळला येऊन भारतीय गुप्तचरांच्या हवाली झाला. मग त्याची पुरेशी चौकशी व छाननी केल्यानंतर दिल्ली रेल्वेस्थानकावर त्याच्या अटकेचे नाट्य रंगवण्यात आलेले होते. त्यावर विसंबून दुबई मार्गे काही मेमन कुटुंबिय भारतात दाखल झाले. मात्र कोर्टाने त्यापैकी कोणालाही कसलीच सवलत द्यायचे नाकारले आणि पुढला दाऊदला अभय देवून भारतात आणायचा प्लान फ़िसकटला. याकुबने त्यासाठी आपल्याच विरोधात वापरली जाऊ शकणारी माहिती दिली होती आणि आपल्याच हाताने गळ्यात फ़ास बांधून घेतला होता.

आता महाराष्ट्र सरकारने ज्या फ़ाशीची तारीख नक्की केली आहे, त्याची सुरूवात १९ जुलै १९९४ रोजी नेपाळमच्ये काठमांडू येथील विमानतळावर झालेली होती. तिथे पाकिस्तानातून आलेल्या विमानातून याकुब मेमन उतरला आणि भारतीय गुप्तचरांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याच सांगण्यावरून बाकीचे कुटुंबिय दुबई मार्गे भारतात आलेले होते आणि सर्वांनाच मग आरोपी करण्यात आलेले होते. त्यातल्या काहीजणांना कोर्टाने पुरावे तपासून मुक्तही केले. पण याकुब मात्र फ़सला. आपण निव्वळ भावाच्या बोलण्याला फ़सून त्यात सामील झालो असा त्याचा दावा होता. म्हणूनच आपल्याला शिक्षा झाली तरी फ़ाशी होणार नाही, अशी त्याला खात्री होती. मात्र टाडा कोर्टाने त्याचा दावा फ़ेटाळून लावला आणि त्याला दोषी ठरवून फ़ाशी दिले. इतकी वर्षे झाल्यानंतरही गुप्तचर विभाग व याकुब यांच्यात नेमके काय करारमदार झाले होते, त्याविषयी कमालीची गुप्तता दोन्ही बाजूंनी पाळलेली आहे. सरकारी पक्षाने टाडा कोर्टात त्याविषयी मौन पाळणे समजू शकते. कारण कोर्टातल्या मामल्याविषयी सरकार वा पोलिस कुठल्याही आरोपीशी सौदेबाजी करू शकत नाहीत. म्हणूनच याकुबला गुप्तचर विभागाने काही हमी दिलेली असली, तरी त्यला नुसता शब्द म्हणता येईल. आपण फ़सलो असे त्याला वाटले असते, तर त्याने उर्वरीत कुटुंबाला मायदेशी यायला सांगितले नसते, की त्यांच्या आणण्याची व्यवस्था भारतीय गुप्तचर विभागाकडून करून घेतली नसती. विषय कुठलाही असो, सख्खा भाऊ टायगर व दाऊदने यात याकुबचा बळी दिलेला आहे. कारण सौदा दाऊदचा होता आणि त्यात ‘ट्रायल रन’ म्हणून याकुबला धाडण्यात आलेले असणार. आजपर्यंत त्याच्या अटकेविषयी दिलेल्या माहितीतील तफ़ावत भरून काढण्याचे कष्ट याकुब व गुप्तचर विभाग अशा कुठल्याही बाजूने घेतलेले नाहीत हे नक्की.

आता सवाल इतकाच आहे की पुन्हा एकदा सुप्रिम कोर्टात असलेल्या फ़ेरविचाराच्या याचिकेचे काय होणार? २१ जुलै रोजी त्याची सुनावणी व्हायची आहे. त्यात पुढली तारीख मिळाली तरी याकुबला आणखी एक जीवदान मिळून जाईल. पण आहे तशीच याचिका फ़ेटाळली गेली, तर राज्य सरकारने जाहिर केलेल्या तारखेला पृथ्वीतलावर याकुबचा तो शेवटचा दिवस असेल. कारण मग फ़ाशी जाण्याला पर्याय शिल्लक उरत नाही. त्याच्या फ़ाशी जाण्याने ज्यांचे आयुष्य उध्वस्त झाले किंवा जे हकनाक मारले गेले, त्यांची कुठलीच भरपाई होऊ शकणार नाही. पण यानिमीत्ताने याकुब वा टायगर कशाला निर्माण होतात आणि त्यांच्यात असा सैतान कशामुळे संचारतो, त्याचा नव्याने विचार होईल, अशी अपेक्षाही बाळगता येत नाही. झालेल्या दंगलीने वा त्यातल्या हिंसाचाराची आग अशा लोकांच्या मनात भडकते, हा फ़सवा युक्तीवाद आहे. दंगलीने मने दुभंगतात आणि ती एकत्र सांधली जायला दिर्घकाळ लागतो. पण अशा अनुभवातून जाणार्‍यांच्या दुखावलेल्या मनाच्या होमकुंडात जे सतत अन्याय होत असल्याचे तेल ओतत रहातात, तेच मग सूडाची आग भडकवत असतात. त्यातून टायगर वा याकुबसारखे सैतान निर्माण होतात. जखमेवर मीठ चोळण्यातून वेदना कडव्या प्रतिकाराला व प्रतिहल्ल्याला चिथावणी देत असते. भारतातील मुस्लिमांना सातत्याने इथल्या खोट्या राजकीय सहनुभूतीदारांनी अशा सूडाच्या आगीत ढकललेले आहे. त्यातून मग अन्यथा सामान्य समंजस वाटणार्‍या धर्मश्रद्ध मुस्लिमात हिंसेचा अग्नी प्रज्वलीत होतो आणि त्यातून दंगली भडकतात. जिहादी दहशतवादाला खतपाणी घातले जात असते. म्हणून मग अफ़जल गुरू कायद्याने पुराव्यानिशी गुन्हेगार ठरला असला तरी त्याचे उदात्तीकरण अलिगड विद्यापिठातले मुस्लिम विद्यार्थी करू धजले. त्यातूनच मग याकुब जन्माला येतात.

Monday, July 13, 2015

दाऊदचा डमी तेव्हाच भारतात आला होता ना?

  दाऊदची शरणागती आणि मी  (भाग २)




माफ़ करा मित्रांनो, कालच्या पहिल्या लेखांकात आणखी एक चुक झाली. स्मरणशक्ती जागी असली तरी अनेकदा तपशील दगा देत असतो. दाऊदच्या शरणागतीची बातमी मी ‘आपला वार्ताहर’ दैनिकात प्रसिद्ध केल्याचा दावा गल्लत करणारा  आहे. तसाच त्यात दिवस महिन्यांचाही माझ्याकडून गोंधळ झाला आहे. ही घटना दै. ‘वार्ताहर’ सुरू होण्याच्याही आधीची आहे. १ मे १९९४ रोजी मुरलीधर शिंगोटे यांनी ‘नवाकाळ’ची एजन्सी त्यांच्याकडून गेली म्हणून स्वत:चे ‘मुंबई चौफ़ेर’ हे सांज दैनिक सुरू केले होते. दोनतीन आठवड्यांनी अशोक शिंदे या मित्राने माझी त्यांची गाठ घालून दिली. त्या सांज दैनिकाचे संपादक शिंगोटेच होते. त्यांनी चटपटीत हेडलाईनची मदत करावी असे मला सुचवले आणि मी दोन तास त्यांच्या कार्यालयात जायचो. प्रत्यक्षात त्यांना नव्या दैनिकाच्या आरंभापासून मदत केली ती डॉ. भालचंद्र आकलेकर यांनी. याच दरम्यान माझ्याकडे दाऊदच्या शरणागतीचा मामला जुलै महिन्याच्या आसपास आलेला होता. मात्र अन्य कुठल्या माध्यमात वा वृत्तपत्रांना त्याचा सुगावा लागलेला नव्हता. मुद्दा इतकाच, की आक्टोबर नोव्हेंबर १९९४ असा जो काळ मी पहिल्या लेखात कथन केला आहे, ती माझी गफ़लत आहे. मला तेव्हा मिळालेली बातमी किंवा माहिती अशी होती, की दाऊद पाकिस्तानात राहून कंटाळला आहे आणि त्याच्यासह अन्य बॉम्बस्फ़ोट आरोपींना मायभूमीची आस लागलेली आहे. ते काही अटींचा सौदा करून भारतात यायला तयार आहेत. त्यापैकी एक अट होती, त्याच्यावरचा देशद्रोहाचा आरोप मागे घ्यावा. त्याला फ़ाशी देणार नाही याची हमी मिळावी. अधिक मुंबई पोलिसांच्या तावडीत त्याला देवू नये. दिल्ली वा अन्यत्र तुरूंगात ठेवून खटले चालवावेत. यातली तर्कशुद्ध वाटणारी माहिती म्हणजे हा सौदा झाला तर आधी कोणी अन्य डमी पाठवला जाणार होता.

एक गोष्ट स्पष्ट असते, की असे समझोते अनधिकृत असतात, त्यामुळे त्यात फ़सगत झाल्यास कोणाला जबाबदार धरता येत नाही. म्हणूनच दाऊदची बोलणी वा सौदा अनधीकृतपणे चालू होता आणि त्यात अर्थातच भारताचा गुप्तचर विभाग आपल्या हस्तकांकरवी गुंतलेला असणार हे उघड आहे. गुप्तचर विभाग आपल्या गोष्टी कधीच उघड करत नाही, की त्याविषयी जास्त वाच्यता करत नाही. वेळ आलीच तर त्याविषयी हस्ते परहस्ते खुलासे मात्र देत असतो. दाऊद सारख्या क्रुरकर्म्याला त्याच्याच अटीशर्तीवर मायदेशी आणण्याला मान्यता देणे, सरकारसाठी कपाळमोक्ष ठरणारी बाब होती. मग त्यात अधिकृत कोण कुठले आश्वासन देवू शकणार होता? पण सवलत मिळू शकेल अशी आशा दाऊदला दाखवण्यात आलेली होती आणि त्यालाही आशा वाटलेली असावी. म्हणूनच यात थेट स्वत: मायदेशी येण्यापेक्षा डमी आरोपी इथे पाठवायचा व कितीसा धोका होऊ शकतो, त्या़चा अंदाज घ्यायचा पवित्रा दाऊदने घेतला होता. डमी म्हणजे स्फ़ोट खटल्यातला खरा आरोपी असणार, पण तो अतिशय दुय्यम असणार होता. त्याला जर कोर्ट व सरकारकडून काही सवलत मिळू शकली, तर पुढे दाऊदला माघारी येण्याचा मार्ग प्रशस्त झाला, असे त्यात मानले जाणार होते. कदाचित चकमकीत काटा काढला गेला तर? अशीही भिती नाकारता येत नव्हती. ह्या हालचाली ‘मुंबई चौफ़ेर’ सांज दैनिक दोन महिन्याचे असताना चाललेल्या होत्या. पुढे जे तपशील उघड झाले त्यातून लक्षात आले, की मला माहिती मिळाली तेव्हा प्रत्यक्षात त्यातला ‘डमी’ भारतात आलेला होता आणि भारतीय गुप्तचरांच्या ताब्यातही होता. म्हणजे मला माहिती देणारा दिल्लीतला पत्रकार पक्क्या गोटातल्या बातम्या देत होता. तसाच मुंबईतला उर्दू संपादकही इथल्या दाऊद गोटातल्या माहितीचा आधार घेऊन त्याला दुजोरा देत होता. त्याची प्रचिती लौकरच आली.

मला दोन्हीकडून मिळालेल्या माहितीचे धागे जुळत होते म्हणून मी जुलैच्या शेवटी वा ऑगस्टच्या आरंभी ती बातमी प्रसिद्ध करून टाकली. ‘दाऊद आपल्या निकटच्या साथीदारांसह शरण येणार.’ ती तशीच एका उर्दू पेपरातही छापून आली. मात्र पुढे काहीच झाले नाही आणि आपण फ़सलो की काय, अशी माझी धारणा झाली. पण त्याच दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होते आणि एके संध्याकाळी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी लोकसभेला चकीत केले. महत्वाची घोषणा गृहमंत्री करणार असल्याचे सभापतींनी सांगितले आणि त्याच संध्याकाळी, तासाभरापुर्वी मुंबई बॉम्बस्फ़ोटातला महत्वाचा आरोपी दिल्ली रेल्वे स्थानकावर पकडल्याची घोषणा चव्हाणांनी केली. तात्काळ देशभर खळबळ माजली. सगळ्या माध्यमे व वृत्तपत्रातून तपशील गोळा करण्याची तारांबळ उडाली होती. दुसर्‍या दिवशीचे बहुतांश पेपर त्याच बातमीने भरलेले व रंगलेले होते. गृहमंत्री चव्हाणांच्या घोषणेसह रेल्वे स्थानकातील पोलिस चातुर्याच्या रसभरीत कथा बहुतेकांनी प्रसवल्या होत्या. तेव्हाच्या त्या बातमीत ‘नवाकाळ’ने प्रत्यक्षदर्शी असे वर्णनच कथन केलेले होते. संशय आल्यावर त्या आरोपीला हटकले आणि एका पोलिसाने लाथ मारल्यावर तो संशयित बारा फ़ुट हवेत उडाला, वगैरे. इतरत्रही वर्णने कमीअधिक अशीच व पोलिस पराक्रमाने भरलेली होती. मात्र त्यानंतर काही वेळातच मला त्या उर्दू संपादक व दिल्लीच्या मोठ्या पत्रकाराचे फ़ोन आले. त्यांनी मला माहिती कशी खरी ठरली त्याचे स्मरण करून दिले. त्याची गरजही नव्हती. माझा जीव भांड्यात पडला. कारण मुळची सहासात दिवस आधी प्रकाशित केलेली माझी बातमी खोटी पडली नव्हती. पण त्याचीच दुसरी बाजू अशी होती, की जे काही वर्णन अटकेच्य दुसर्‍या दिवशी सर्वत्र प्रसिद्ध झाले, ते धादांत खोटे होते. सरकारने व परिणामी वर्तमानपत्रांनी वाचकांची चक्क दिशाभूल केलेली होती.

तारीख होती ६ ऑगस्ट १९९४. मुंबई बॉम्बस्फ़ोटातील महत्वाचा आरोपी याकुब मेमनला अटक झाल्याची ती बातमी होती. दाऊदचा त्या कारस्थानातील निकटचा साथीदार व प्रत्यक्षात इथे स्फ़ोटके वितरीत करणार्‍या टायगर मेमनचा हा धाकटा भाऊ. स्फ़ोट घडले त्याच संध्याकाळी ही मेमन कुटुंबिय मंडळी बायकापोरांसह अन्य साथीदारांना घेऊन दुबईला पळून गेलेली होती. याकुब त्यापैकीच एक होता. विमानाची तिकीटे मिळवण्यापासून स्फ़ोटके मुंबईत आणायची वाहतुक व्यवस्था त्यानेच केल्याचा आरोप होता. म्हणजेच पोलिसांच्या वा सीबीआयच्या गळाला अगदीच छोटा मासा लागलेला नव्हता. सहाजिकच त्यासाठी त्यांचे कौतुक स्वाभाविकच होते. मात्र आमच्या ‘मुंबई चौफ़ेर’ने सर्वच वृत्तपत्रांना छेद देणारी बातमी तेव्हा दिलेली होती. किंबहूना सरकारने व केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेल्या संसदेतील घोषणेचे खंडन मी त्या            बातमीतून केलेले होते. पसरवण्यात आलेली बातमी दिशाभूल करणारी असून याकुबला सीबीआयने शिताफ़ीने पकडलेले नाही. तोच स्वेच्छेने कायद्याच्या हवाली झालेला आहे, अशी माझी बातमी होती. किंबहूना त्याच्याही पुढे जाऊन ‘चौफ़ेर’मध्ये मी पुढला खुलासा केला होता. किमान दोन आठवडे तरी याकुब मेमन भारतीय गुप्तचरांच्याच ताब्यात होता आणि पुरेशी झाडाझडती झाल्यावरच त्याला कागदोपत्री अटक झाल्याचे नाटक रंगवण्यात आलेले आहे. इतकी आक्रमक बातमी देण्याचे धाडस माझ्यात आले होते. कारण मला माहिती देणार्‍या गोटावर माझा आता पक्का विश्वास बसला होता आणि तिथूनच मला हा तपशील उपलब्ध झाला होता, त्या बातमीत मी खोटा पडलो नाहीच. कारण अवघ्या चोविस तासात दंडाधिकार्‍या समोर हजर केल्यावर खुद्द याकुब मेमननेच माझ्या बातमीला दुजोरा दिला होता. आपण १९ जुलैपासून पोलिसांच्या ताब्यात असल्याचे त्याने कोर्टात पहिल्याच दिवशी सांगून टाकले. दाऊदच्या शरण येण्याच्या मुळ हालचाली व ऑफ़रचा हा एकमेव सज्जड पुरावा आहे. पण आजही त्याबद्दल कोणी स्वच्छपणे खुलेपणाने बोलत नाही, की त्याची संगतवार मांडणी करत नाही. ती मांडणी कशी होऊ शकते? (क्रमश:)

Saturday, July 11, 2015

दाऊदची शरणागती आणि मी (भाग १)



माझ्या स्मरणशक्तीचे कौतुक वाचकांना तसेच माझ्या अनेक तरूण पत्रकार मित्रांनाही आहे. मलाही त्याचा थोडा अभिमान आहे. कारण पत्रकारितेत बातमी संदर्भाने अधिक संपन्न व प्रभावी होत असते. पण खरे सांगतो या शनिवारी एक असे स्मरण आले, की माझाच मी काहीसा खजील झालो. कारण दाऊदच्या शरणागतीची बातमी सर्वात आधी मी १९९४ साली दिलेली होती आणि त्याची कोणाला दखलही घ्यावीशी वाटलेली नव्हती. मात्र मलाच त्याचे गेला आठवडाभर स्मरण झाले नाही. अर्थात तेव्हा जेठमलानी यांनीही त्याविषयी मौन घारण केलेले होते. पुढे काही वर्षांनी जेठमलानी याविषयी बोलू लागले आणि अधूनमधून त्यावर धुरळा उडून बसत राहिला. पण कुठलेही गंभीर वा ठोस मुद्दे कोणी समोर आणू शकला नाही. आणूही शकत नव्हता. कारण अशा गोष्टी उघड होत नसतात किंवा सरकारी पातळीवरही हाताळल्या जात नसतात. अन्य मार्गाने त्याच्या हालचाली सुरू असतात. भलतेच कोणी मध्यस्थ त्यात निरोप्याचे काम करीत असतात. मग दोन्ही बाजूंना मान्य होणार्‍यांना त्यात पुढे केले जाते आणि त्यातली खरी देवाणघेवाण सुरू होते. नुसते जेठमलानींना दाऊदने ऑफ़र देवून पुढे काही होत नसते आणि जे काही होत असते, त्याची जाहिर वाच्यता कोणी करत नाही. त्यातून काही साधले तरी त्यातला सौदा लपवला जात असतो. मग आज शरद पवार वा अन्य कोणी काय खुलासे देतात, त्याला कुठला अर्थ असू शकेल? सहाजिकच ठराविक काळानंतर अशा अडगळीत पडलेल्या शिळ्यापाक्या बातम्यांना फ़ोडणी देवून ऊत आणला जातो. पण ठोस कुठलीच माहिती पुढे येत नाही. मग लोक गोंधळतात, विसरून जातात. पण तेव्हा खरोखरच दाऊदच्या शरणागतीच्या हालचाली निदान त्याच्याकडून चालू होत्या, असे मी तरी नि:संशयपणे सांगू शकतो. कारण त्याचा सज्जड पुरावा माझ्यापाशी आहे. जो खरे तर त्यात गुंतलेल्या कोणीतरी द्यायला हवा होता.

झाले असे, की मलाही ही बाब किंवा माझ्याच बातमीचा संदर्भ आठवला नाही. पण या विषयाला कालपरवा नव्याने हवा मिळाली आणि त्याचा खुलासा करताना कुठेतरी ‘१९९४’ सालचा उल्लेख झाला आणि माझी स्मरणशक्ती कामाला लागली. त्याच वर्षी विजयादशमीच्या मुहूर्तावर मुरलीधर शिंगोटे यांनी ‘आपला वार्ताहर’ ह्या नव्या मराठी दैनिकाची सुरूवात केली. त्याचा आरंभीचा संपादक मीच होतो. तेव्हा आजच्यासारखा वृत्तवाहिन्यांचा पसारा उभा राहिलेला नव्हता. किंबहूना संपुर्ण दिवसभर बातम्या देणारा टिव्ही, ही कल्पनाच भारतात कुणाला सुचलेली नसावी. म्हणून लोकांना छपाई केलेल्या वृत्तपत्रावरच बातम्यांसाठी अवलंबून रहावे लागत असे. वाहिन्या नव्हत्या की मोबाईल आलेले नव्हते. इंटरनेट ही कल्पना मूळ धरत होती. त्यामुळे नवा पेपर मराठीत निघाला. त्याचा खप मिळवण्यासाठी सनसनाटी बातम्या व वेगळेपणाला खुप महत्व होते. त्याच काळात ‘नवाकाळ’ सामान्य माणसाचा लोकप्रिय पेपर होता आणि उद्याचा ‘नवाकाळ’ आज रात्री घरी परतणार्‍यांना रेल्वे स्थानकात विकला जात असे. उशीरा कामावरून परतणारे उपनगरातले रेल्वेप्रवासी विरंगुळा म्हणून अशा पेपरचे स्वागत करीत. ‘वार्ताहर’ आम्ही त्याच स्पर्धेत उतरवला होता. मात्र नऊच्या सुमारास विक्रेते दादरला व बोरीबंदरला जमा होत आणि मोजक्या प्रति घेऊन प्रत्येक स्थानकावर विकायला जात. असा तो काळ होता. आरंभानंतर दोन महिन्यात म्हणजे आक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान अशीच एक सनसनाटी बातमी माझ्या सुत्रांकडून मला मिळाली. ती धक्कादायक होती. दाऊद शरणागती पत्करून पुन्हा भारतात यायला उत्सुक आहे. मात्र अशा बातमीला कुठलाही ठोस आधार नव्हता, दिल्लीतल्या माझ्या एका ज्येष्ठ पत्रकार लेखकाकडून मिळालेली ही माहिती होती. पण त्यावर विसंबून प्रसिद्धी देण्याची मला हिंमत होत नव्हती.

कारण सरळ होते, विषय अतिशय नाजूक तितकाच गंभीर होता. कुठलाही पुरावा नव्हता किंवा सरकारी गोटातून त्याला कुठला आधार मिळत नव्हता. सहासात दिवस तरी ही माहिती माझ्याकडे असून छापायची हिंमत मला होत नव्हती. मग अचानक एकेदिवशी मुंबईतला एक वजनदार उर्दू संपादक भेटला आणि बोलता बोलता तोच संदर्भ सांगून गेला. मी त्याला अधिक छेडत गेलो आणि दिल्लीच्या सुत्रांकडून आलेल्या माहितीवर शिक्कामोर्तब होत गेले. किंचित तपशीलाचा फ़रक होता. दाऊद शरण यायचा प्रयत्न करतोय आणि सौदा करू बघतोय, अशी दिल्लीतून मिळालेली बातमी होती. तर हा उर्दू संपादक त्याच्या पुढली प्रगती सांगत होता. दाऊद थेट शरण येणार नाही. सौदा असा असेल, की आपल्या कोणातरी विश्वासू सहकार्‍याला तो आधी भारतात पाठवून देईल. त्याच्या बाबतीत अपेक्षेप्रमाणे अटीशर्ती अंमलात आणल्या गेल्यानंतरच दाऊद स्वत: यायला राजी असेल, अशी या उर्दू संपादकाकडून मिळालेली माहिती होती. पण अशा दोन अजिबात दोन टोकाच्या गोटातून माहिती एकच मिळत होती. दाऊद मायदेशी यायचे आणि त्यासाठी काही अटी घालून शरण यायचे प्रयत्न करतोय. दिल्लीचा गोट हा मुत्सद्देगिरीच्या वर्तुळात वावरणारा होता, तर उर्दू संपादक मुंबईच्या मुस्लिम वस्तीतला जाणता होता. म्हणूनच त्याला दाऊद टोळीतल्या हालचालींची बित्तंबातमी मिळत असे. म्हणजेच मला आठवडाभर आधीपासून मिळालेली माहिती अगदीच बिनबुडाची नव्हती. मात्र अशा हालचाली कोणी कबुल करत नाही, की त्याला दुजोरा देत नाही. म्हणूनच आपल्या तारतम्याच्या आधारावरच त्या छापण्याचे धाडस करायचे असते किंवा त्याकडे साफ़ पाठ फ़िरवायची असते. म्हणून तर मी सहासात दिवस तिकडे पाठ फ़िरवली होती. पण उर्दू संपादकाने अधिक तर्कशुद्ध विवरण दिलेले असल्याने मला दिल्ली गोटातली माहिती विश्वासार्ह वाटली.

मग मी धाडस करण्याचा निश्चय केला. धाडस एवढ्यासाठी, की आमचे दैनिक अगदीच नवे आणि वाचकाच्या व पत्रकारितेच्या खिजगणतीत नगण्य होते. कितीही धमाल बातमी असली, तरी त्याची फ़ारशी दखल घेतली जाणे शक्य नव्हते. मात्र रात्रीच्या बाजरात एकाच दिवसात मोठी झेप घ्यायला ती बातमी दमदार ठरणारी होती. पण दुसरीकडे माहिती अगदीच फ़सवी निघाली, तर आमच्या नवजात दैनिकाची मुंडी कायद्याने पिरगाळली असती. शिंगोटे हा उत्तम विक्रेता होता. त्याने माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्या रात्री दुप्पट प्रती छापून आम्ही बाजारात धमाल उडवली. दाऊद आपल्या जवळच्या साथीदारासह भारताला शरण येणार, अशी ती बातमी आम्हाला त्या रात्रीचा मोठा खप मिळवून द्यायला पुरेशी ठरली. पण त्याची अन्य माध्यमांनी कुठे दखल घेतली नाही. ज्या उर्दू संपादकाने ती माहिती मला दिलेली होती, त्याने मात्र दुसर्‍या दिवशी त्याचे उर्दू भाषांतर प्रसिद्ध केलेले होते. त्यात काही गैरही नव्हते, कारण दाऊद शरण येण्याची कल्पनाच कोणाला पटणारी नव्हती आणि त्याबाबत कुठे चर्चाही नव्हती. इतर माध्यमांनी वा पत्रकारांनी आमच्यावर कशाला विश्वास ठेवायचा? कारण सरकारी पातळीवर तसे कुठे प्रयत्न असल्याची खबर नव्हती, की तशा हालचाली होत असल्याचेही वृत्त नव्हते. मग एका नवख्या दैनिकाच्या हेडलाईनला कोणी कशाला किंमत द्यावी? माझी तशी अपेक्षाही नव्हती. मात्र आपल्यावर पोलिस वा सरकारी बडगा उगारला जाऊ नये, ही अपेक्षा होती. तीही पुर्ण झाली. कारण कुणाची कटकट झाली नाही. मात्र आमची ती बातमी खोटी ठरली नाही. तिचे धागेदोरे समोर येत गेले आणि दाऊदच्या आजही चर्चेचा विषय होणार्‍या शरणागतीच्या बातमीचा तोच सज्जड पुरावा होता व आहे. ‘आपला वार्ताहर’ ने ती बातमी प्रसिद्ध केली आणि सहाव्या दिवशी एक धमाका झाला. त्याची मात्र अवघ्या भारतातील पत्रकार माध्यमांना दखल घ्यावीच लागली. तीच तर मी दिलेली व ‘जुनी झालेली’ बातमी होती. आज जेठमलानींचा जो गवगवा सुरू असतो, त्याचा तोच ठोस पुरावा आहे. त्याचा तपशील पुढल्या भागात वाचू. तोवर नोव्हेंबर १९९४ च्या खळबळजनक बातम्या आठवून बघा. स्मरणशक्तीला थोडा ताण देवून बघा. (क्रमश:)