माझ्या स्मरणशक्तीचे कौतुक वाचकांना तसेच माझ्या अनेक तरूण पत्रकार मित्रांनाही आहे. मलाही त्याचा थोडा अभिमान आहे. कारण पत्रकारितेत बातमी संदर्भाने अधिक संपन्न व प्रभावी होत असते. पण खरे सांगतो या शनिवारी एक असे स्मरण आले, की माझाच मी काहीसा खजील झालो. कारण दाऊदच्या शरणागतीची बातमी सर्वात आधी मी १९९४ साली दिलेली होती आणि त्याची कोणाला दखलही घ्यावीशी वाटलेली नव्हती. मात्र मलाच त्याचे गेला आठवडाभर स्मरण झाले नाही. अर्थात तेव्हा जेठमलानी यांनीही त्याविषयी मौन घारण केलेले होते. पुढे काही वर्षांनी जेठमलानी याविषयी बोलू लागले आणि अधूनमधून त्यावर धुरळा उडून बसत राहिला. पण कुठलेही गंभीर वा ठोस मुद्दे कोणी समोर आणू शकला नाही. आणूही शकत नव्हता. कारण अशा गोष्टी उघड होत नसतात किंवा सरकारी पातळीवरही हाताळल्या जात नसतात. अन्य मार्गाने त्याच्या हालचाली सुरू असतात. भलतेच कोणी मध्यस्थ त्यात निरोप्याचे काम करीत असतात. मग दोन्ही बाजूंना मान्य होणार्यांना त्यात पुढे केले जाते आणि त्यातली खरी देवाणघेवाण सुरू होते. नुसते जेठमलानींना दाऊदने ऑफ़र देवून पुढे काही होत नसते आणि जे काही होत असते, त्याची जाहिर वाच्यता कोणी करत नाही. त्यातून काही साधले तरी त्यातला सौदा लपवला जात असतो. मग आज शरद पवार वा अन्य कोणी काय खुलासे देतात, त्याला कुठला अर्थ असू शकेल? सहाजिकच ठराविक काळानंतर अशा अडगळीत पडलेल्या शिळ्यापाक्या बातम्यांना फ़ोडणी देवून ऊत आणला जातो. पण ठोस कुठलीच माहिती पुढे येत नाही. मग लोक गोंधळतात, विसरून जातात. पण तेव्हा खरोखरच दाऊदच्या शरणागतीच्या हालचाली निदान त्याच्याकडून चालू होत्या, असे मी तरी नि:संशयपणे सांगू शकतो. कारण त्याचा सज्जड पुरावा माझ्यापाशी आहे. जो खरे तर त्यात गुंतलेल्या कोणीतरी द्यायला हवा होता.
झाले असे, की मलाही ही बाब किंवा माझ्याच बातमीचा संदर्भ आठवला नाही. पण या विषयाला कालपरवा नव्याने हवा मिळाली आणि त्याचा खुलासा करताना कुठेतरी ‘१९९४’ सालचा उल्लेख झाला आणि माझी स्मरणशक्ती कामाला लागली. त्याच वर्षी विजयादशमीच्या मुहूर्तावर मुरलीधर शिंगोटे यांनी ‘आपला वार्ताहर’ ह्या नव्या मराठी दैनिकाची सुरूवात केली. त्याचा आरंभीचा संपादक मीच होतो. तेव्हा आजच्यासारखा वृत्तवाहिन्यांचा पसारा उभा राहिलेला नव्हता. किंबहूना संपुर्ण दिवसभर बातम्या देणारा टिव्ही, ही कल्पनाच भारतात कुणाला सुचलेली नसावी. म्हणून लोकांना छपाई केलेल्या वृत्तपत्रावरच बातम्यांसाठी अवलंबून रहावे लागत असे. वाहिन्या नव्हत्या की मोबाईल आलेले नव्हते. इंटरनेट ही कल्पना मूळ धरत होती. त्यामुळे नवा पेपर मराठीत निघाला. त्याचा खप मिळवण्यासाठी सनसनाटी बातम्या व वेगळेपणाला खुप महत्व होते. त्याच काळात ‘नवाकाळ’ सामान्य माणसाचा लोकप्रिय पेपर होता आणि उद्याचा ‘नवाकाळ’ आज रात्री घरी परतणार्यांना रेल्वे स्थानकात विकला जात असे. उशीरा कामावरून परतणारे उपनगरातले रेल्वेप्रवासी विरंगुळा म्हणून अशा पेपरचे स्वागत करीत. ‘वार्ताहर’ आम्ही त्याच स्पर्धेत उतरवला होता. मात्र नऊच्या सुमारास विक्रेते दादरला व बोरीबंदरला जमा होत आणि मोजक्या प्रति घेऊन प्रत्येक स्थानकावर विकायला जात. असा तो काळ होता. आरंभानंतर दोन महिन्यात म्हणजे आक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान अशीच एक सनसनाटी बातमी माझ्या सुत्रांकडून मला मिळाली. ती धक्कादायक होती. दाऊद शरणागती पत्करून पुन्हा भारतात यायला उत्सुक आहे. मात्र अशा बातमीला कुठलाही ठोस आधार नव्हता, दिल्लीतल्या माझ्या एका ज्येष्ठ पत्रकार लेखकाकडून मिळालेली ही माहिती होती. पण त्यावर विसंबून प्रसिद्धी देण्याची मला हिंमत होत नव्हती.
कारण सरळ होते, विषय अतिशय नाजूक तितकाच गंभीर होता. कुठलाही पुरावा नव्हता किंवा सरकारी गोटातून त्याला कुठला आधार मिळत नव्हता. सहासात दिवस तरी ही माहिती माझ्याकडे असून छापायची हिंमत मला होत नव्हती. मग अचानक एकेदिवशी मुंबईतला एक वजनदार उर्दू संपादक भेटला आणि बोलता बोलता तोच संदर्भ सांगून गेला. मी त्याला अधिक छेडत गेलो आणि दिल्लीच्या सुत्रांकडून आलेल्या माहितीवर शिक्कामोर्तब होत गेले. किंचित तपशीलाचा फ़रक होता. दाऊद शरण यायचा प्रयत्न करतोय आणि सौदा करू बघतोय, अशी दिल्लीतून मिळालेली बातमी होती. तर हा उर्दू संपादक त्याच्या पुढली प्रगती सांगत होता. दाऊद थेट शरण येणार नाही. सौदा असा असेल, की आपल्या कोणातरी विश्वासू सहकार्याला तो आधी भारतात पाठवून देईल. त्याच्या बाबतीत अपेक्षेप्रमाणे अटीशर्ती अंमलात आणल्या गेल्यानंतरच दाऊद स्वत: यायला राजी असेल, अशी या उर्दू संपादकाकडून मिळालेली माहिती होती. पण अशा दोन अजिबात दोन टोकाच्या गोटातून माहिती एकच मिळत होती. दाऊद मायदेशी यायचे आणि त्यासाठी काही अटी घालून शरण यायचे प्रयत्न करतोय. दिल्लीचा गोट हा मुत्सद्देगिरीच्या वर्तुळात वावरणारा होता, तर उर्दू संपादक मुंबईच्या मुस्लिम वस्तीतला जाणता होता. म्हणूनच त्याला दाऊद टोळीतल्या हालचालींची बित्तंबातमी मिळत असे. म्हणजेच मला आठवडाभर आधीपासून मिळालेली माहिती अगदीच बिनबुडाची नव्हती. मात्र अशा हालचाली कोणी कबुल करत नाही, की त्याला दुजोरा देत नाही. म्हणूनच आपल्या तारतम्याच्या आधारावरच त्या छापण्याचे धाडस करायचे असते किंवा त्याकडे साफ़ पाठ फ़िरवायची असते. म्हणून तर मी सहासात दिवस तिकडे पाठ फ़िरवली होती. पण उर्दू संपादकाने अधिक तर्कशुद्ध विवरण दिलेले असल्याने मला दिल्ली गोटातली माहिती विश्वासार्ह वाटली.
मग मी धाडस करण्याचा निश्चय केला. धाडस एवढ्यासाठी, की आमचे दैनिक अगदीच नवे आणि वाचकाच्या व पत्रकारितेच्या खिजगणतीत नगण्य होते. कितीही धमाल बातमी असली, तरी त्याची फ़ारशी दखल घेतली जाणे शक्य नव्हते. मात्र रात्रीच्या बाजरात एकाच दिवसात मोठी झेप घ्यायला ती बातमी दमदार ठरणारी होती. पण दुसरीकडे माहिती अगदीच फ़सवी निघाली, तर आमच्या नवजात दैनिकाची मुंडी कायद्याने पिरगाळली असती. शिंगोटे हा उत्तम विक्रेता होता. त्याने माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्या रात्री दुप्पट प्रती छापून आम्ही बाजारात धमाल उडवली. दाऊद आपल्या जवळच्या साथीदारासह भारताला शरण येणार, अशी ती बातमी आम्हाला त्या रात्रीचा मोठा खप मिळवून द्यायला पुरेशी ठरली. पण त्याची अन्य माध्यमांनी कुठे दखल घेतली नाही. ज्या उर्दू संपादकाने ती माहिती मला दिलेली होती, त्याने मात्र दुसर्या दिवशी त्याचे उर्दू भाषांतर प्रसिद्ध केलेले होते. त्यात काही गैरही नव्हते, कारण दाऊद शरण येण्याची कल्पनाच कोणाला पटणारी नव्हती आणि त्याबाबत कुठे चर्चाही नव्हती. इतर माध्यमांनी वा पत्रकारांनी आमच्यावर कशाला विश्वास ठेवायचा? कारण सरकारी पातळीवर तसे कुठे प्रयत्न असल्याची खबर नव्हती, की तशा हालचाली होत असल्याचेही वृत्त नव्हते. मग एका नवख्या दैनिकाच्या हेडलाईनला कोणी कशाला किंमत द्यावी? माझी तशी अपेक्षाही नव्हती. मात्र आपल्यावर पोलिस वा सरकारी बडगा उगारला जाऊ नये, ही अपेक्षा होती. तीही पुर्ण झाली. कारण कुणाची कटकट झाली नाही. मात्र आमची ती बातमी खोटी ठरली नाही. तिचे धागेदोरे समोर येत गेले आणि दाऊदच्या आजही चर्चेचा विषय होणार्या शरणागतीच्या बातमीचा तोच सज्जड पुरावा होता व आहे. ‘आपला वार्ताहर’ ने ती बातमी प्रसिद्ध केली आणि सहाव्या दिवशी एक धमाका झाला. त्याची मात्र अवघ्या भारतातील पत्रकार माध्यमांना दखल घ्यावीच लागली. तीच तर मी दिलेली व ‘जुनी झालेली’ बातमी होती. आज जेठमलानींचा जो गवगवा सुरू असतो, त्याचा तोच ठोस पुरावा आहे. त्याचा तपशील पुढल्या भागात वाचू. तोवर नोव्हेंबर १९९४ च्या खळबळजनक बातम्या आठवून बघा. स्मरणशक्तीला थोडा ताण देवून बघा. (क्रमश:)
भाऊ साक्षेपी पत्रकार होता आपण आणि आता एक मुल्यवान ब्लॉगर!
ReplyDelete