अखेर २२ वर्षांनी मुंबई बॉम्बस्फ़ोट मालिकेतील एका महत्वाच्या आरोपीला फ़ाशी होणार आहे. म्हणजे आज तरी आपण छातीठोकपणे त्याची हमी देऊ शकत नाही. कारण आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे. सहाजिकच गळफ़ास आवळून माणूस मेला याची खातरजमा, फ़ाशी झाली असे म्ह्णायची कोणाची या देशात बिशाद नाही. अर्थात महाराष्ट्र सरकारने तशी तारीख जाहिर केली आहे. पण म्हणून ती पाळली जाण्याची अजिबात शक्यता नाही. कारण अजून सुप्रिम कोर्टात याकुब मेमनची एक फ़ेरविचाराची याचिका पडून आहे. तिची सुनावणी कुठल्या दिशेने जाते, त्यानुसारच राज्य सरकारला फ़ाशीची अंमलबजावणी करता येऊ शकेल. हा खेळ कित्येक वर्षे चालू आहे आणि तो अफ़जल गुरू व कसाबच्याही बाबतीत झाला होता. दोन्ही वेळी अगदी तारखाही लपवून ठेवल्या गेल्या आणि या कानाचे त्या कानाला कळू देण्यात आलेले नव्हते. त्याचेही कारण आहे. जितक्या जिद्दीने अफ़जलची केस इथल्या मानवतावाद्यांनी जिव्हाळ्याने लढवली होती, तितका ओलावा कसाब किंवा याकुबच्या बाबतीत दाखवलेला नव्हता. पण त्यापैकी अफ़जल हा काश्मिरी होता आणि त्यावरून तिकडे काही प्रतिक्रीया उमटण्याचे भय सरकारला वाटत असावे. कसाबची गोष्ट वेगळी होती. त्याला कोणी वालीच नव्हता. ज्यांनी इथे पाठवले, त्यांना त्याची ब्याद नको होती. तरीही त्या दोन फ़ाशीचा गवगवा खुप झाला होता. राष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून शिवसेनेचा पाठींबा मागायला प्रतिभाताई पाटील मातोश्रीवर गेल्या, तेव्हा बाळासाहेबांनी अफ़जलची थकलेली फ़ाशी उरकून घेण्याचा आग्रह धरला होता. पण पाच वर्षाच्या कारकिर्दीत प्रतिभाताई शब्द पुरा करू शकल्या नाहीत. मात्र प्रणबदांच्या तत्परतेने अफ़जलचा विषय निकालात निघाला होता. त्याच्या कुटुंबियांपेक्षा मानवाधिकाराचे आप्तेष्टच आक्रोश व मातम करत सुटले होते.
याकुबची कहाणी खरे तर शोकांतिका आहे. कारण तो अतिशय सुशिक्षित व सभ्य माणुस होता. धर्मभावनेच्या आहारी जाऊन स्मगलर भावाच्या नादी लागल्याने याकुब यात फ़सलेला होता. त्याला घातपातानंतर सुखरूप कराची पाकिस्तानातही नेण्यात आलेले होते. पण मुंबई व इथल्या वातावरणाशी जडलेले नाते त्याला तिथल्या पिंजर्यात राहू देईना आणि त्याला मुंबईचे डोहाळे लागले होते. त्याच्या परिणामी त्याच्या गळ्याभोवती फ़ास आवळला गेला आहे आणि त्यातले खरे सुत्रधार, त्याचाच भाऊ टायगर मेमन आणि दाऊद मात्र कराचीत मौज करीत आहेत. एकविस वर्षापुर्वी याकुबचा त्याच लोकांनी खरा घात केला. अधूनमधून दाऊद शरण येण्याच्या ज्या गप्पा चालतात, त्या खेळीतला याकुब एक मोहरा होता. दाऊदच्या अटी मान्य होतात किंवा नाही, त्याची चाचपणी करण्यासाठी ‘ट्रायल रन’ म्हणून याकुबला भारताच्या हवाली करण्यात आलेले होते. पण अशा गोष्टी अधिकृत नसतात. म्हणूनच ज्यांच्याशी दाऊदने बोलणी केली होती, त्यांनी अभय मिळण्याची कुठलीच हमी दिलेली नव्हती. पण शक्यता व्यक्त केली होती. ती शक्यता कितपत खरी आहे त्याचीन चाचपणी करण्यासाठी बळीचा बकरा दाऊदला हवा होता. मुंबईची ओढ लागलेल्या याकुब मेमनने ती ऑफ़र स्विकारली आणि तो नेपाळला येऊन भारतीय गुप्तचरांच्या हवाली झाला. मग त्याची पुरेशी चौकशी व छाननी केल्यानंतर दिल्ली रेल्वेस्थानकावर त्याच्या अटकेचे नाट्य रंगवण्यात आलेले होते. त्यावर विसंबून दुबई मार्गे काही मेमन कुटुंबिय भारतात दाखल झाले. मात्र कोर्टाने त्यापैकी कोणालाही कसलीच सवलत द्यायचे नाकारले आणि पुढला दाऊदला अभय देवून भारतात आणायचा प्लान फ़िसकटला. याकुबने त्यासाठी आपल्याच विरोधात वापरली जाऊ शकणारी माहिती दिली होती आणि आपल्याच हाताने गळ्यात फ़ास बांधून घेतला होता.
आता महाराष्ट्र सरकारने ज्या फ़ाशीची तारीख नक्की केली आहे, त्याची सुरूवात १९ जुलै १९९४ रोजी नेपाळमच्ये काठमांडू येथील विमानतळावर झालेली होती. तिथे पाकिस्तानातून आलेल्या विमानातून याकुब मेमन उतरला आणि भारतीय गुप्तचरांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याच सांगण्यावरून बाकीचे कुटुंबिय दुबई मार्गे भारतात आलेले होते आणि सर्वांनाच मग आरोपी करण्यात आलेले होते. त्यातल्या काहीजणांना कोर्टाने पुरावे तपासून मुक्तही केले. पण याकुब मात्र फ़सला. आपण निव्वळ भावाच्या बोलण्याला फ़सून त्यात सामील झालो असा त्याचा दावा होता. म्हणूनच आपल्याला शिक्षा झाली तरी फ़ाशी होणार नाही, अशी त्याला खात्री होती. मात्र टाडा कोर्टाने त्याचा दावा फ़ेटाळून लावला आणि त्याला दोषी ठरवून फ़ाशी दिले. इतकी वर्षे झाल्यानंतरही गुप्तचर विभाग व याकुब यांच्यात नेमके काय करारमदार झाले होते, त्याविषयी कमालीची गुप्तता दोन्ही बाजूंनी पाळलेली आहे. सरकारी पक्षाने टाडा कोर्टात त्याविषयी मौन पाळणे समजू शकते. कारण कोर्टातल्या मामल्याविषयी सरकार वा पोलिस कुठल्याही आरोपीशी सौदेबाजी करू शकत नाहीत. म्हणूनच याकुबला गुप्तचर विभागाने काही हमी दिलेली असली, तरी त्यला नुसता शब्द म्हणता येईल. आपण फ़सलो असे त्याला वाटले असते, तर त्याने उर्वरीत कुटुंबाला मायदेशी यायला सांगितले नसते, की त्यांच्या आणण्याची व्यवस्था भारतीय गुप्तचर विभागाकडून करून घेतली नसती. विषय कुठलाही असो, सख्खा भाऊ टायगर व दाऊदने यात याकुबचा बळी दिलेला आहे. कारण सौदा दाऊदचा होता आणि त्यात ‘ट्रायल रन’ म्हणून याकुबला धाडण्यात आलेले असणार. आजपर्यंत त्याच्या अटकेविषयी दिलेल्या माहितीतील तफ़ावत भरून काढण्याचे कष्ट याकुब व गुप्तचर विभाग अशा कुठल्याही बाजूने घेतलेले नाहीत हे नक्की.
आता सवाल इतकाच आहे की पुन्हा एकदा सुप्रिम कोर्टात असलेल्या फ़ेरविचाराच्या याचिकेचे काय होणार? २१ जुलै रोजी त्याची सुनावणी व्हायची आहे. त्यात पुढली तारीख मिळाली तरी याकुबला आणखी एक जीवदान मिळून जाईल. पण आहे तशीच याचिका फ़ेटाळली गेली, तर राज्य सरकारने जाहिर केलेल्या तारखेला पृथ्वीतलावर याकुबचा तो शेवटचा दिवस असेल. कारण मग फ़ाशी जाण्याला पर्याय शिल्लक उरत नाही. त्याच्या फ़ाशी जाण्याने ज्यांचे आयुष्य उध्वस्त झाले किंवा जे हकनाक मारले गेले, त्यांची कुठलीच भरपाई होऊ शकणार नाही. पण यानिमीत्ताने याकुब वा टायगर कशाला निर्माण होतात आणि त्यांच्यात असा सैतान कशामुळे संचारतो, त्याचा नव्याने विचार होईल, अशी अपेक्षाही बाळगता येत नाही. झालेल्या दंगलीने वा त्यातल्या हिंसाचाराची आग अशा लोकांच्या मनात भडकते, हा फ़सवा युक्तीवाद आहे. दंगलीने मने दुभंगतात आणि ती एकत्र सांधली जायला दिर्घकाळ लागतो. पण अशा अनुभवातून जाणार्यांच्या दुखावलेल्या मनाच्या होमकुंडात जे सतत अन्याय होत असल्याचे तेल ओतत रहातात, तेच मग सूडाची आग भडकवत असतात. त्यातून टायगर वा याकुबसारखे सैतान निर्माण होतात. जखमेवर मीठ चोळण्यातून वेदना कडव्या प्रतिकाराला व प्रतिहल्ल्याला चिथावणी देत असते. भारतातील मुस्लिमांना सातत्याने इथल्या खोट्या राजकीय सहनुभूतीदारांनी अशा सूडाच्या आगीत ढकललेले आहे. त्यातून मग अन्यथा सामान्य समंजस वाटणार्या धर्मश्रद्ध मुस्लिमात हिंसेचा अग्नी प्रज्वलीत होतो आणि त्यातून दंगली भडकतात. जिहादी दहशतवादाला खतपाणी घातले जात असते. म्हणून मग अफ़जल गुरू कायद्याने पुराव्यानिशी गुन्हेगार ठरला असला तरी त्याचे उदात्तीकरण अलिगड विद्यापिठातले मुस्लिम विद्यार्थी करू धजले. त्यातूनच मग याकुब जन्माला येतात.
No comments:
Post a Comment