Monday, July 13, 2015

दाऊदचा डमी तेव्हाच भारतात आला होता ना?

  दाऊदची शरणागती आणि मी  (भाग २)




माफ़ करा मित्रांनो, कालच्या पहिल्या लेखांकात आणखी एक चुक झाली. स्मरणशक्ती जागी असली तरी अनेकदा तपशील दगा देत असतो. दाऊदच्या शरणागतीची बातमी मी ‘आपला वार्ताहर’ दैनिकात प्रसिद्ध केल्याचा दावा गल्लत करणारा  आहे. तसाच त्यात दिवस महिन्यांचाही माझ्याकडून गोंधळ झाला आहे. ही घटना दै. ‘वार्ताहर’ सुरू होण्याच्याही आधीची आहे. १ मे १९९४ रोजी मुरलीधर शिंगोटे यांनी ‘नवाकाळ’ची एजन्सी त्यांच्याकडून गेली म्हणून स्वत:चे ‘मुंबई चौफ़ेर’ हे सांज दैनिक सुरू केले होते. दोनतीन आठवड्यांनी अशोक शिंदे या मित्राने माझी त्यांची गाठ घालून दिली. त्या सांज दैनिकाचे संपादक शिंगोटेच होते. त्यांनी चटपटीत हेडलाईनची मदत करावी असे मला सुचवले आणि मी दोन तास त्यांच्या कार्यालयात जायचो. प्रत्यक्षात त्यांना नव्या दैनिकाच्या आरंभापासून मदत केली ती डॉ. भालचंद्र आकलेकर यांनी. याच दरम्यान माझ्याकडे दाऊदच्या शरणागतीचा मामला जुलै महिन्याच्या आसपास आलेला होता. मात्र अन्य कुठल्या माध्यमात वा वृत्तपत्रांना त्याचा सुगावा लागलेला नव्हता. मुद्दा इतकाच, की आक्टोबर नोव्हेंबर १९९४ असा जो काळ मी पहिल्या लेखात कथन केला आहे, ती माझी गफ़लत आहे. मला तेव्हा मिळालेली बातमी किंवा माहिती अशी होती, की दाऊद पाकिस्तानात राहून कंटाळला आहे आणि त्याच्यासह अन्य बॉम्बस्फ़ोट आरोपींना मायभूमीची आस लागलेली आहे. ते काही अटींचा सौदा करून भारतात यायला तयार आहेत. त्यापैकी एक अट होती, त्याच्यावरचा देशद्रोहाचा आरोप मागे घ्यावा. त्याला फ़ाशी देणार नाही याची हमी मिळावी. अधिक मुंबई पोलिसांच्या तावडीत त्याला देवू नये. दिल्ली वा अन्यत्र तुरूंगात ठेवून खटले चालवावेत. यातली तर्कशुद्ध वाटणारी माहिती म्हणजे हा सौदा झाला तर आधी कोणी अन्य डमी पाठवला जाणार होता.

एक गोष्ट स्पष्ट असते, की असे समझोते अनधिकृत असतात, त्यामुळे त्यात फ़सगत झाल्यास कोणाला जबाबदार धरता येत नाही. म्हणूनच दाऊदची बोलणी वा सौदा अनधीकृतपणे चालू होता आणि त्यात अर्थातच भारताचा गुप्तचर विभाग आपल्या हस्तकांकरवी गुंतलेला असणार हे उघड आहे. गुप्तचर विभाग आपल्या गोष्टी कधीच उघड करत नाही, की त्याविषयी जास्त वाच्यता करत नाही. वेळ आलीच तर त्याविषयी हस्ते परहस्ते खुलासे मात्र देत असतो. दाऊद सारख्या क्रुरकर्म्याला त्याच्याच अटीशर्तीवर मायदेशी आणण्याला मान्यता देणे, सरकारसाठी कपाळमोक्ष ठरणारी बाब होती. मग त्यात अधिकृत कोण कुठले आश्वासन देवू शकणार होता? पण सवलत मिळू शकेल अशी आशा दाऊदला दाखवण्यात आलेली होती आणि त्यालाही आशा वाटलेली असावी. म्हणूनच यात थेट स्वत: मायदेशी येण्यापेक्षा डमी आरोपी इथे पाठवायचा व कितीसा धोका होऊ शकतो, त्या़चा अंदाज घ्यायचा पवित्रा दाऊदने घेतला होता. डमी म्हणजे स्फ़ोट खटल्यातला खरा आरोपी असणार, पण तो अतिशय दुय्यम असणार होता. त्याला जर कोर्ट व सरकारकडून काही सवलत मिळू शकली, तर पुढे दाऊदला माघारी येण्याचा मार्ग प्रशस्त झाला, असे त्यात मानले जाणार होते. कदाचित चकमकीत काटा काढला गेला तर? अशीही भिती नाकारता येत नव्हती. ह्या हालचाली ‘मुंबई चौफ़ेर’ सांज दैनिक दोन महिन्याचे असताना चाललेल्या होत्या. पुढे जे तपशील उघड झाले त्यातून लक्षात आले, की मला माहिती मिळाली तेव्हा प्रत्यक्षात त्यातला ‘डमी’ भारतात आलेला होता आणि भारतीय गुप्तचरांच्या ताब्यातही होता. म्हणजे मला माहिती देणारा दिल्लीतला पत्रकार पक्क्या गोटातल्या बातम्या देत होता. तसाच मुंबईतला उर्दू संपादकही इथल्या दाऊद गोटातल्या माहितीचा आधार घेऊन त्याला दुजोरा देत होता. त्याची प्रचिती लौकरच आली.

मला दोन्हीकडून मिळालेल्या माहितीचे धागे जुळत होते म्हणून मी जुलैच्या शेवटी वा ऑगस्टच्या आरंभी ती बातमी प्रसिद्ध करून टाकली. ‘दाऊद आपल्या निकटच्या साथीदारांसह शरण येणार.’ ती तशीच एका उर्दू पेपरातही छापून आली. मात्र पुढे काहीच झाले नाही आणि आपण फ़सलो की काय, अशी माझी धारणा झाली. पण त्याच दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होते आणि एके संध्याकाळी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी लोकसभेला चकीत केले. महत्वाची घोषणा गृहमंत्री करणार असल्याचे सभापतींनी सांगितले आणि त्याच संध्याकाळी, तासाभरापुर्वी मुंबई बॉम्बस्फ़ोटातला महत्वाचा आरोपी दिल्ली रेल्वे स्थानकावर पकडल्याची घोषणा चव्हाणांनी केली. तात्काळ देशभर खळबळ माजली. सगळ्या माध्यमे व वृत्तपत्रातून तपशील गोळा करण्याची तारांबळ उडाली होती. दुसर्‍या दिवशीचे बहुतांश पेपर त्याच बातमीने भरलेले व रंगलेले होते. गृहमंत्री चव्हाणांच्या घोषणेसह रेल्वे स्थानकातील पोलिस चातुर्याच्या रसभरीत कथा बहुतेकांनी प्रसवल्या होत्या. तेव्हाच्या त्या बातमीत ‘नवाकाळ’ने प्रत्यक्षदर्शी असे वर्णनच कथन केलेले होते. संशय आल्यावर त्या आरोपीला हटकले आणि एका पोलिसाने लाथ मारल्यावर तो संशयित बारा फ़ुट हवेत उडाला, वगैरे. इतरत्रही वर्णने कमीअधिक अशीच व पोलिस पराक्रमाने भरलेली होती. मात्र त्यानंतर काही वेळातच मला त्या उर्दू संपादक व दिल्लीच्या मोठ्या पत्रकाराचे फ़ोन आले. त्यांनी मला माहिती कशी खरी ठरली त्याचे स्मरण करून दिले. त्याची गरजही नव्हती. माझा जीव भांड्यात पडला. कारण मुळची सहासात दिवस आधी प्रकाशित केलेली माझी बातमी खोटी पडली नव्हती. पण त्याचीच दुसरी बाजू अशी होती, की जे काही वर्णन अटकेच्य दुसर्‍या दिवशी सर्वत्र प्रसिद्ध झाले, ते धादांत खोटे होते. सरकारने व परिणामी वर्तमानपत्रांनी वाचकांची चक्क दिशाभूल केलेली होती.

तारीख होती ६ ऑगस्ट १९९४. मुंबई बॉम्बस्फ़ोटातील महत्वाचा आरोपी याकुब मेमनला अटक झाल्याची ती बातमी होती. दाऊदचा त्या कारस्थानातील निकटचा साथीदार व प्रत्यक्षात इथे स्फ़ोटके वितरीत करणार्‍या टायगर मेमनचा हा धाकटा भाऊ. स्फ़ोट घडले त्याच संध्याकाळी ही मेमन कुटुंबिय मंडळी बायकापोरांसह अन्य साथीदारांना घेऊन दुबईला पळून गेलेली होती. याकुब त्यापैकीच एक होता. विमानाची तिकीटे मिळवण्यापासून स्फ़ोटके मुंबईत आणायची वाहतुक व्यवस्था त्यानेच केल्याचा आरोप होता. म्हणजेच पोलिसांच्या वा सीबीआयच्या गळाला अगदीच छोटा मासा लागलेला नव्हता. सहाजिकच त्यासाठी त्यांचे कौतुक स्वाभाविकच होते. मात्र आमच्या ‘मुंबई चौफ़ेर’ने सर्वच वृत्तपत्रांना छेद देणारी बातमी तेव्हा दिलेली होती. किंबहूना सरकारने व केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेल्या संसदेतील घोषणेचे खंडन मी त्या            बातमीतून केलेले होते. पसरवण्यात आलेली बातमी दिशाभूल करणारी असून याकुबला सीबीआयने शिताफ़ीने पकडलेले नाही. तोच स्वेच्छेने कायद्याच्या हवाली झालेला आहे, अशी माझी बातमी होती. किंबहूना त्याच्याही पुढे जाऊन ‘चौफ़ेर’मध्ये मी पुढला खुलासा केला होता. किमान दोन आठवडे तरी याकुब मेमन भारतीय गुप्तचरांच्याच ताब्यात होता आणि पुरेशी झाडाझडती झाल्यावरच त्याला कागदोपत्री अटक झाल्याचे नाटक रंगवण्यात आलेले आहे. इतकी आक्रमक बातमी देण्याचे धाडस माझ्यात आले होते. कारण मला माहिती देणार्‍या गोटावर माझा आता पक्का विश्वास बसला होता आणि तिथूनच मला हा तपशील उपलब्ध झाला होता, त्या बातमीत मी खोटा पडलो नाहीच. कारण अवघ्या चोविस तासात दंडाधिकार्‍या समोर हजर केल्यावर खुद्द याकुब मेमननेच माझ्या बातमीला दुजोरा दिला होता. आपण १९ जुलैपासून पोलिसांच्या ताब्यात असल्याचे त्याने कोर्टात पहिल्याच दिवशी सांगून टाकले. दाऊदच्या शरण येण्याच्या मुळ हालचाली व ऑफ़रचा हा एकमेव सज्जड पुरावा आहे. पण आजही त्याबद्दल कोणी स्वच्छपणे खुलेपणाने बोलत नाही, की त्याची संगतवार मांडणी करत नाही. ती मांडणी कशी होऊ शकते? (क्रमश:)

No comments:

Post a Comment