Thursday, December 3, 2015

विच्छा माझी पुरी करा१९६० च्या दशकात दादा कोंडके खर्‍या अर्थाने लोकांसमोर आले. ‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाट्याने त्यांना खरी लोकप्रियता मिळवून दिली. पुढे त्याच लोकप्रियतेवर स्वार होऊन त्यांनी चित्रपट माध्यमात शिरकाव केला आणि नाव कमावले. पण त्यांचे वगनाट्य बघितलेली पिढी अजून हयात आहे. ज्यांना कुणाला तेव्हाचे दादा आठवत असतील, त्यांना असे नक्कीच वाटेल, की आज दादा हयात आते तर देशातले महान बुद्धीमंत म्हणून मिरवू शकले असते. कारण कुठल्याही गंभीर वा महत्वाच्या विषयावर हास्यास्पद भाष्य करून हंशा पिकवण्यात दादाचा हातखंडा होता. त्या वगनाट्यातला एक प्रसंग अजून आठवतो. हवालदार दादांचा सहाय्यक शिपाई त्यांना मोठी मदत करतो. तेव्हा दादा त्याचे कौतुक करताना त्याला संत तुकोबाचे बोल ऐकवतात. ‘म्हणून संत तुकोबा म्हणतात, ‘फ़्रेन्ड इन नीड इज फ़्रेन्ड इन्डीड!’ अर्थात हे शब्द तुकोबाचे नाहीत. पण मुद्दा स्पष्ट करण्यासाठी कुणाचेही शब्द वा कुठलाही प्रसंग कुठेही घुसवून थापा मारणे हीच विद्वत्ता असेल, तर दादा कोंडके त्याचे जनक म्हणावे लागतील. आणि आजकाल त्याचेच नमूने देशभर बुद्धीवादी क्षेत्रात बोकाळलेले आहेत. अन्यथा लोकसभेत बोलताना शशी थरूर या बुद्धीमान कॉग्रेस नेत्याने अकलेचे असे प्रदर्शन कशाला घडवले असते? असंहिष्णुता विषयक चर्चेत सहभागी होताना थरूर म्हणाले, या देशात मुस्लिमापेक्षाही गाय अधिक सुरक्षित आहे. यापेक्षा भयंकर विनोद कुठला असू शकतो? बाकीचे जग सोडा आणि देशाचीही गोष्ट बाजूला ठेवा. खुद्द थरूर हे केंद्रातले मंत्री असताना त्यांची पत्नी तरी सुरक्षित होती काय? एका मंत्र्याची पत्नी दिवसाढवळ्या एका पंचतारांकित हॉटेलात मारली गेली आणि कोणी व कशासाठी तिचा मुडदा पाडला, त्याचा शोध अजून लागलेला नाही. त्याचे तरी भान या बुद्धीमान नेत्याने राखायला नको काय?

शशी थरूर मंत्री होते आणि तेव्हाच त्यांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे. त्याच्या आधी त्यांचे आपल्या पत्नीशी सतत भांडण व्हायचे आणि त्यांना कुठेही भांडताना बघितल्याचे अनेक साक्षीदार आहेत. फ़ार कशाला आपल्या पतीवर पाकिस्तानी महिला ‘जादू’ चालावण्याच्या प्रयत्नात आहे आणि तिचा पाक हेरसंस्थेची संबंध आहे, असाही जाहिर आरोप थरूर पत्नी सुनंदा पुष्कर यांनी केला होता. त्यानंतर अवघ्या दोन दिवसात सुनंदाचा शंकास्पद मृत्यू झाला आहे. अशा भानगडीत गुंतलेला माणूस इतक्या बेधडक मुस्लिमांपेक्षा गाय या देशात सुरक्षित असल्याचे विधान करतो, तेव्हा त्याचा गुरू दादा कोंडके असावा. किंवा थरूर नव्याने ते वगनाट्य रंगवण्याच्या तयारीत असावेत, असेच म्हणायला हवे ना? किंबहूना असंहिष्णुता असो किंवा अन्य कुठल्याही बाबतीत आजकाल आपल्या देशातला बुद्धीवादी युक्तीवाद बघितला, तर थेट थापेबाजीच्या स्तरावर जाऊन पोहोचला आहे. आपल्याला ठाऊक नसलेल्या गोष्टी बेधडक वस्तुस्थिती म्हणून कथन केल्या जातात. किंवा पुरावा म्हणून सादर केला जात असतो. सामान्य जनता सत्यापासून वंचित असल्याच्या विश्वासाने ही थापेबाजी चालू असते. म्हणून जग आता तितके आंधळे व अनभिज्ञ राहिलेले नाही, याचेही भान अशा दिवाळखोरांना उरलेले नाही. आता सोशल माध्यम म्हणून जी सुविधा लोकांच्या हाती आलेली आहे, त्यामुळे जगाच्या कुठल्याही कानाकोपर्‍यात घडणारी घटना काही मिनीटात या माध्यमातून दुसर्‍या टोकाला जाऊन पोहोचत असते. त्यामुळे देशात कोण सुरक्षित आहे किंवा कोण असुरक्षित आहे, त्याचे दाखले वा हवाले थरूर यांनी देण्याची गरज उरलेली नाही. कारण भारतात किती धार्मिक सुरक्षितता वा संहिष्णुता नांदते, त्याचे दखले जगातले कोणीही देऊ शकतो, इतकी इथल्या संहिष्णूतेची ख्याती जगभर पसरलेली आहे. त्यासाठी बुद्धीमंतांवर विसंबून रहाण्याची लोकांना गरज राहिलेली नाही.

खलाफ़ अल हरबी नावाचा एक उदारमतवादी लेखक सौदी अरेबियामध्ये आहे. तो अरब मुस्लिम आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सध्या धर्मांधता व इसिसच्या हिंसाविषयक जिहादची टवाळी करणारा त्याचा टिव्ही कार्यक्रम अरबी देशात खुप लोकप्रिय झालेला आहे. धर्माशी थोडी जरी गफ़लत झाली, तरी आपली मुंडी छाटली जाईल याची पुरेपुर खात्री असलेला हा खलाफ़ भारताविषयी काय लिहीतो, ते थरूर वा तत्सम अडाणी भारतीय बुद्धीमंतांनी थोडे जाणून घ्यायला हरकत नाही. जगाच्या पाठीवर सर्वात जुना व आजही तितकाच पक्का संहिष्णू देश, असा त्याने भारताचा गौरव केला आहे. तिथेच न थांबता भारतात आपल्याच गुणवत्तेविषयी असलेल्या न्युनगंडावरही त्याने हल्ला चढवला आहे. तो म्हणतो, ‘‘भारतात शंभरावर धर्म आहेत अणि शंभरावर भाषा आहेत. तरीही तिथले लोक शांतता व सौहार्दाने जगतात. आपल्या देशाला विकसित करण्यासाठी हे सर्व लोक एकजुटीने राबतात आणि कपडे शिवण्याच्या सुईपासून मंगळावर जाणारे रॉकेट बनवण्यापर्यंत त्यांनी झेप घेतली आहे. मला त्यांचा (भारतीयांचा) हेवा वाटतो, हे कबुल करायला हवे. कारण मी अशा जगातला आहे, जिथे एकच धर्म आणि एकच भाषा आहे. तरीही तिथे बघाल त्या दिशेला नुसताच रक्तपात व हिंसा बघायला मिळते. जग संहिष्णूतेबद्दल काय बोलते, त्याला अर्थ नाही. भारत हे जगाला शांतता व संहिष्णुता शिकवणारी सर्वात जुनी शाळा आहे. वांशिक, धार्मिक, सामाजिक भिन्नतेच्या पलिकडे जाऊन सौहार्द शिकवणारा तोच एकमेव देश आहे. जगातले सर्व अरब उचलून एक प्रयोग म्हणून भारतात नेवून सोडले, तर तिथे दखलपात्र म्हणावेत इतकीही त्यांची संख्या होणार नाही. ते तिथल्या निर्भय मानवी सागरात मिसळून जातील. त्यांचा भाषिक व राष्ट्रीय अहंकार तिथे विरघळून जाईल आणि आपल्याच भावाबहिणींना मारण्यासाठी कुठलेही न्याय्य कारण असू शकत नाही, हा साक्षात्कार त्यांना होईल.’

खलाफ़ हरबी इथे कोणाला वाचायला मिळणार नाही. कारण त्याची मते इथे लोकांपर्यंत गेली, तर मग ह्या नव्या कोंडकेवादी विनोदवीर बुद्धीमंतांची दुकाने बंद पडतील ना? भारतीय बुद्धीमंतांना खलाफ़पेक्षा बगदादी आवडतो. त्याने चालविलेला अविचारी रक्तपात त्यांना खूणावतो. त्याची ओळख करून द्यायला त्यांच्यात स्पर्धा चालते. पण खलाफ़ हरबी मात्र वाचक श्रोत्यांपुढे आणला जात नाही. बगदादी व लादेन यांच्या रक्तपाती मानसिकतेतून अरबांना बाहेर काढायला हरबी जगातल्या तमाम अरबांना भारतात आणून संहिष्णुता शिकवण्याचा प्रयोग करायचा सुचवतो आहे. तर आमचे इथले बुद्धीमंत शांततावादी नसलेल्या असंहिष्णूतेचा डंका जगभर पिटत फ़्रिरत आहेत. मग वाटते दादांच्याच शब्दात सांगायचे तर तो अबु बगदादी आपल्या साथीदारांना सांगत असेल, हे भारतीय बुद्धीमंत म्हणजे इसिससाठी फ़्रेन्ड इन नीड म्हणून फ़ेन्ड इन्डीड आहेत. जिहादचा रक्तपात आणखी रक्तरंजित करण्यासाठी यांच्यासारखे मित्र जगाच्या पाठीवर कुठे मिळणार नाहीत. स्वर्ग आणि नरक यातला हा फ़रक असतो. स्वर्गात असणार्‍यांना नरक ठाऊक नसतो, म्हणून त्यांना स्वर्गातच नरक दिसू शकतो, त्यांना नरकाचे डोहाळे लागतात. तशी इथल्या बुद्धीमंत वर्गाची अवस्था आहे. उलट नरकात जगणारा व त्याच्या वेदना असह्य झालेला हरबी आहे. त्याला भारतातला स्वर्ग खुणावतो आहे. तो आपल्या सहकारी अरब बांधवांना जन्नत कुठे असेल, तर ती भारतात असल्याचे हवाले देतो आहे. आणि हे काम त्याच्यासाठी सोपे नाही. भारतीय बुद्धीमंतांप्रमाणे तो कांगावा करणारा नाही. प्रत्यक्षात त्याच्या विरोधात फ़तवे काढले जात आहेत आणि त्याला धमक्या दिल्या जात आहेत. खर्‍या धमक्या व खरे धोके समोर उभे राहिले, मग संहिष्णूतेची किंमत कळते आणि भ्रमातच जगणार्‍यांना कोणी वाचवू शकत नाही. तेव्हा हे बगदादी नरकात जाण्याची भारतीय बुद्धीमंतांची ‘विच्छा पुरी कर!’

15 comments:

 1. भाऊ,बगदादीने आजचा भारतातल्या असहिष्णुतेचे उदाहरण म्हणून दादरीचा उल्लेख केला आहे.वेडा आहे तो.त्याचे प्रवक्ते सेक्युलर चोला परिधान करून गेले सहा महिने हेच काम करते आहेत.खरे म्हणजे या सगळ्या।ना बगदादीचे,इसिसचे अग्रदूत म्हणून अधिक्रुत नेमायला पाहिजे.

  ReplyDelete
 2. Dada Kondake;at least entertained people by using intellect.But these pseudo seculars are nowhere in comparison and not of that much use.

  ReplyDelete
 3. सर, काय शालुतले जोडे मारलेत हो....एकदम मस्तच...तमाम ढोंगी बुद्धीवाद्यांची नरकाची इच्छा पुरी होऊ दे रे मेरे अल्ला... :)

  ReplyDelete
 4. भाऊ, खलाफ़ अल हरबी यांचं लिखाण कुठे वाचायला मिळेल? लिंक देऊ शकाल का आपण? हा लेखक खरच वाचनीय लेख लिहित असावा.

  ReplyDelete
  Replies
  1. तुम्ही फक्त खलाफ़ अल हरबी हे नाव Google केल की तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल. दुर्दैव्याने Saudi Gazette च्या website वर जुलै २०१५ पर्यन्तच archieves आहेत. हा लेख मे २०१५ चा असल्यामुळे तुम्हाला कदाचित Saudi Gazette च्या website वर सापडणार नाही पण हा संपूर्ण लेख तुम्हाला Google केल्या केल्या मिळेल.

   Delete
 5. भाऊ वाचन वेड तुमच्यामुळे जोपासल गेलय खूप छान विवेकी लेखनी आहे तुमची अशीच वर्धिष्णु असू दया. जगण्यात एक मजा येते आपले लेखन वाचून

  ReplyDelete
 6. http://www.msn.com/en-in/news/national/saudi-arabian-columnist-khalaf-al-harbi-calls-india-the-most-tolerant-nation-in-the-world/ar-BBjkbuq

  ReplyDelete
 7. त्या बगदादी पेक्षा असले फेक्यूलर्स आणि फुरोगामी जास्त धोकादायक आहेत

  ReplyDelete
 8. हरब़ म्हणजे शत्रू ... होय ना !! : D

  ReplyDelete
 9. ह्याच शशी थरूरनी वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी Tufts University सारख्या university तून PhD मिळवली व Robert B. Stewart Prize for Best Student सारखा सन्मानही मिळवला. सर्व पत्ते व्यवस्थित पडते तर हा खरोखरीच कर्तुत्ववान माणूस २००७ साली UNO चा Secretary General सुद्धा झाला असता.

  उच्च शिक्षण विवेक बुद्धी सुद्धा देते अस आपण समजतो, पण अश्या बुद्धिमत्तेचा माणूस सोनिया-राहुलच्या Congress मध्ये आहे हे सोडूनच द्या पण जेव्हा एखाद्या दिग्विजय सिंग, आझम खान किंवा राहुल गांधीसारखा बडबडतो तेव्हा आश्चर्य व्यक्त करायचे की खेद की संताप हेच कळत नाही.

  ReplyDelete
 10. साष्टांग नमस्कार रिंग मास्टर भाऊ… :-)
  जीध्नासू साठी खलाफ़ अल हराबी च्या लेखनाच्या लिंक्स….
  -मंजीत

  http://satyavijayi.com/india-is-the-most-tolerant-nation-saudi-arabian-columnist-khalaf-al-harbi/

  http://eastcoastdaily.in/2015/11/17/saudi-arabian-liberal-thinker-khalaf-al-harbi-describes-india-as-the-most-tolerant-country-in-the-world/

  ReplyDelete
 11. तेव्हा हे बगदादी नरकात जाण्याची भारतीय बुद्धीमंतांची ‘विच्छा पुरी कर!’ Mast analysis

  ReplyDelete
 12. Bhau please Dadanchi upma ya bangdya ghalnaryana deonaka.yanatar Quisling sarkhe deshdrohi tharun Count Ciano pramane golya ghatlya paijet

  ReplyDelete
 13. Dada Kondake was a great person and much ahead of his time. One of his movies talked about conversions. A father makes him wear cross, he wears. At the end of the movie Dada tries to make him wear Hanuman and the father runs away.

  ReplyDelete
 14. खलाफ़ हरबीची माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद

  ReplyDelete