Saturday, November 15, 2014

उद्धवनी नेपोलियनचे ऐकावे.



Never interrupt your enemy when he is committing suicide.  -Napoleon Bonaparte

लोकसभा निवडणूकीचे निकाल लागल्यापासून देशात नेमका कोणता फ़रक पडला? कुठले अच्छे दिन आले? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. पण त्याचे समोर दिसणारे उत्तर मात्र कोणाच्या लक्षात आलेले नाही. अगदी मतमोजणीपर्यंत एक विषय अगत्याने बोलला गेला. तब्बल बारा वर्षे त्याच विषयाची पारायणे चालू होती. तो विषय होता गुजरातच्या दंगलीचा. त्या दंगलीचे निमीत्त करून सतत भाजपाला खिजवण्याची माध्यमात व सेक्युलर राजकारण्यात स्पर्धा चालली होती. मोदी म्हणजे हिंसाचारी आणि मोदी सरकार म्हणजे दंगल, असाच अखंड प्रचार चालू होता. आज कोणाला तरी गुजरात दंगल आठवते काय? सहा महिन्यात सगळे गुजरात दंगल विसरून गेले ना? हा फ़रक नाही? त्याबद्दल खुद्द नरेंद्र मोदी यांनी एकदाही कधी तक्रार केली नाही. त्यानी अशा आरोपांकडे सराईतपणे दुर्लक्ष केले आणि आपले काम चालू ठेवले. याच संदर्भात एबीपी नेटवर्कला दिलेल्या मुलखतीमध्ये त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. सातत्याने होत असलेल्या या जहरी टिका व खिल्लीबद्दल मोदींचे आकलन काय होते? बहूधा ‘माझा’चे संपादक राजू खांडेकर यांनी तसा प्रश्न केला होता. त्याला मोदींनी दिलेले उत्तर मोठे मार्मिक व चपखल होते. ‘जोपर्यंत मोदी पराभूत होत नाही, तोपर्यंत अशी टिका चालूच राहिल आणि ती अधिकच जहरी होत जाईल. कारण इतकी टोकाची व भेदक टिका करूनही मोदीच्या अंगाला ओरखडाही उठत नसेल, तर आरोप करणार्‍यांचा तोल जाणारच ना? ते अधिकच चिडून आणखी जोराने हल्ला करणारच ना? मग त्यांना कशाला थांबवायचे?’ किती मोदीभक्तांनी त्याचे मर्म समजून घेतले आहे? मोदी नावाचा नवा मसिहा भाजपासाठी या देशात कुठून व कशामुळे उदयास आला, हे भाजपावाल्यांना तरी कितपत उमगले आहे? असते तर त्यांनी त्याच मसिहाची जादू संपवण्याचा विडा कशाला उचलला असता?

याच संदर्भात मोदींचे उजवे हात व निकटवर्ति सहकारी अमित शहांचेही एक निवेदन लक्षात घेण्यासारखे आहे. लोकसभा निवडणूक ऐन भरात असताना येत असलेल्या मतचाचण्यांच्या विश्लेषणाच्या एका कार्यक्रमात शहा सहभागी झालेले होते. उत्तर प्रदेशात चाचणीत मोदीलाट दिसू लागली होती, तर कॉग्रेस देशभर पिछडताना दिसत होती. तेव्हा स्नुपगेटवर चौकशी आयोग नेमण्याची घोषणा तात्कालीन कायदामंत्री कपील सिब्बल यांनी केली होती. त्याच अनुषंगाने शहांना प्रश्न विचारण्यात आला होता. तर शहा त्या चौकशीच्या परिणामांबद्दल बोलताना म्हणाले, ‘कॉग्रेसवाल्यांना त्यांचा पराभव कशाला होतो आहे, त्याचे अजून भान आलेले नाही.’ मात्र त्याबद्दल पुढे उपप्रश्न विचारला गेला नाही, की शहांनी त्याचे स्पष्टीकरणही दिले नाही. पण जाणत्यांना त्याचा अर्थ समजू शकत होता. नकारात्मक कारवाया करून कॉग्रेसला आपली बुडती नौका वाचवता येणार नाही, उलट ती अधिकच बुडत जाईल, असेच शहा यांना सुचवायचे होते. मोदी व शहा यांची देशव्यापी ख्याती त्यांच्या कर्तृत्वापेक्षा बदनामीतून झाली. जितकी म्हणून त्यांची हेटाळणी व खिल्ली उडवली गेली आणि त्यांना टिकेचे लक्ष्य बनवण्यात आले, त्यातून त्याच दोघांविषयी सर्वत्र सहानुभूती वाढत गेली. ज्या व्यक्ती वा संघटनेची अशी कोंडी केली जात असते, त्याच्याविषयी समाजात सहानुभूती आपोआप तयार होत जाते. त्या व्यक्तीला त्यासाठी फ़ारसे प्रयास करावे लागत नाहीत. मात्र त्याच्यापाशी सहानुभूतीचा लाभ उठवण्याची क्षमता असायला हवी. सहा महिने प्रचाराचे रान उठवताना मोदींनी नेमकी तीच चतुराई दाखवली. त्याचा त्यांना व पर्यायाने भाजपा मोठा लाभ मिळाला. कॉग्रेस व सेक्युलर मंडळींनी आपल्या हाती असलेल्या अधिकार, सत्ता व साधनांच्या मदतीने मोदींच्या विरोधात उघडलेल्या आघाडीने जी सहानुभूती निर्माण केली, तिलाच आज मोदीलाट म्हणतात.

ह्यातून मोदीलाट उभी रहात असल्याचे तेव्हाच दिसत होते. पण ज्यांनी मोदींना लक्ष्य केले होते, त्यांना कुठे भान होते? त्यांनी दिवसेदिवस अधिकच अतिरेक केला व त्याचाच कडेलोट सेक्युलर व कॉग्रेसी राजकारणाचे पानिपत होण्यात झाला. ती अतिरेकी मोदीविरोधावर उमटलेली प्रतिक्रीया होती. आज महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूकीनंतर वा आधी भाजपाने ज्याप्रकारे शिवसेना या आपल्या जुन्या मित्राची राजकीय कोंडी केली आहे, त्याचा तात्पुरता लाभ निकालातून भाजपाला जरूर मिळाला आहे. पण तसे लाभ मागल्या दहा वर्षात मोदींना लक्ष्य करणार्‍या कॉग्रेस व सेक्युलरांनाही मिळालेच होते. पण २००४ च्या त्या विजयानंतर यशावर स्वार होऊन काही चांगले करण्यापेक्षा त्यांनी मोदी विरोधाचा अतिरेक केला आणि त्याचीच जबरदस्त किंमत त्या पक्षांना सहा महिन्यांपुर्वी मोजावी लागली आहे. जरा बारकाईने बघितले, तर त्याच चतुराईच्या खेळ्या व डावपेच आज भाजपा खेळू लागला आहे. सत्तेची मस्ती व आगावूपणाचा अतिरेक करताना आपण कशामुळे जिंकलो, त्याचे भान या पक्षाला व नेत्यांना राहिलेले नाही. जशी मोदींची कोंडी झाली होती, तशी उद्धव किंवा शिवसेनेची कोंडी करण्यात आज धन्यता मानली जात आहे. पण त्यातून आपण एका राज्यात का होईना नवा मोदी उदयास आणतो आहोत आणि त्याच्याविषयी सहानुभूती निर्माण व्हायला हातभार लावत आहोत, याचेही भान भाजपाला उरलेले नाही. अशावेळी उद्धव किंवा शिवसेनेने काय करावे? भाजपाच्या अतिरेकाला शरण जावे? तोच सुटकेचा मार्ग असता, तर दहा वर्षापुर्वी मोदींनीही सेक्युलर दडपणापुढे शरणागती पत्करायला हवी होती. पण त्यांनी तसे केले नाही. आपल्या विरोधकांना अतिरेक करू दिला आणि आपला हकनाक बळी घेतला जातो आहे, असले चित्र उभे करण्याची रणनिती मोदींनी राबवली. ती एका जगप्रसिद्ध सेनापतीची रणनिती होती.

नेपोलियन बोनापार्ट हा इतिहास घडवणारा सेनापती म्हणतो, ‘तुमचा शत्रू आत्महत्या करीत असेल, तर त्यात हस्तक्षेप करू नका.’ याचा अर्थ उतावळेपणाने आत्महत्या केल्यासारखा शत्रू वागत असेल, तर त्याला त्याच्या गतीने धावू द्यावे. त्याच्याशी लढायची गरज नाही. तो स्वत:लाच संपवायला सिद्ध झालेला असतो, त्याला त्यासाठी मोकाट रान देणे, हीच उत्तम रणनिती असते. शहा-मोदींनी तेच केले आणि आपल्यावर अन्याय होत असल्याची लोकसभावना व्हायला उलट हातभार लावला. आज महाराष्ट्रात अपुरी व अर्धवट सत्ता हाती आल्यावर भाजपा आपल्या जुन्या मित्राशी जो उंदीरमांजराचा खेळ करते आहे, त्यातून कोणाच्या वाट्याला सहानुभूती जाते आहे? सेनेला बाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचा बाहेरून पाठींबा घेऊन सत्तारूढ झालेल्या भाजपाविषयी लोकमत कसे होणार आहे? लोकांच्या अपेक्षा भाजपा पुर्ण करतो आहे, की लोकांचा त्यातून अपेक्षाभंग होतो आहे? कालपर्यंत ज्यांच्यावर राज्य बुडवल्याचा आरोप केला व मते मागितली, त्यांच्याच मदतीने त्यांचाच भ्रष्टाचार संपवाण्याच्या वल्गना आत्मघातकी नाहीत काय? शिवाय यातून जनमानसात भाजपाविषयी प्रतिमा निर्माण होते आहे, ती आत्महत्याच नाही काय? मग त्यापासून भाजपाला उद्धवनी वाचवावे, की डावपेच म्हणून त्याला प्रोत्साहन द्यावे? जितकी सेना सत्तेच्या बाहेर राहिल व भाजपाला राष्ट्रवादी सोबत जायला भाग पाडेल, तितकी ती भाजपासाठी आत्महत्याच ठरणार ना? उलट कितीही मोठ्या सत्तापदासाठी सत्तेत जाणे, म्हणजे भाजपाला आत्महत्येपासून परावृत्त करणे ठरेल. सेनेला भाजपावर राजकीय मात करायची असेल, तर उद्धवनी मोदी-शहा यांच्याप्रमाणेच नेपोलियनची रणनिती अवलंबायला हवी. भाजपा सुसाट वेगाने आत्महत्या करायला धावत सुटला आहे, त्यापासून त्याला परावृत्त करण्यापेक्षा त्यासाठी त्याला प्रोत्साहन द्यावे. सत्तेपासून दूर रहावे आणि आपले आमदार फ़ुटाणार असतील वा फ़ोडले जाणार असतील, तरी त्यालाही हातभार लावावा. कारण त्यातून भाजपा जनमानसातून संपत जाईल. दुबळी कॉग्रेस, नकोशी राष्ट्रवादी आणि पथभ्रष्ट भाजपा असे निकालात निघाल्यास लोकांना सेनेखेरीज अन्य पर्याय कुठे उरतो? तापुरती सत्ता की काही वर्षात स्वबळावर संपुर्ण सत्ता? उद्धव यांना यातून आपला पर्याय निवडायचा आहे.

7 comments:

  1. Excellent, he Uddhav ni wachayela pahijet tumche lekh. He should not worry about party split.

    ReplyDelete
  2. भाऊराव,

    भविष्यात शिवसेना सत्तेत येईलही. पण उद्धव ठाकऱ्यांना भ्रष्ट शिवसेना आमदारांवर आजपासून, नव्हे आत्तापासून, वचक ठेवायला हवा. पुढे सत्ता हाती येईल तेव्हा ती राबवायला स्वच्छ हात हवेत. त्याचीही तरतूद करणे महत्त्वाचे आहे.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  3. He uddhav sahebanni wachayla hawe....pan ataprayant udhhav sahebanni changle fadle bjp la...bjp chi kondi zali ahe ani ata parat charcha karat ahet...harli ahe bjp.

    ReplyDelete
  4. महाराष्ट्र् म्हटले की शिवसेना हे समीकरण कायम राहणार

    ReplyDelete
  5. Bhau.. ekdum perfect analysis kela ahe. BJP ni lokancha vishwas jinkun ghayaychi pahilicha sandhi gamavli ahe.. NCP barobar ghetlyamule lok atishay naraz ahet BJP var, vishwasghat kelyachi bhavana ahe lokanmadhe, especially tarun matadaranmadhe!. Shivseneni hyavar barik laksha thevun patience cha khel karayla hava. Kharatar jagavatap aso kinva satta-sthapana, BJP la Sena nakocha hoti. Tyanna besavadh thevun yuti todli aani lokana asa bhasavla ki Senechya admuthepana mule yuti tutli; amhala tar havi hoti... Ti sahanbhuti tyanna gamvaychi navhti.. Pan aata techa he visrat ahet aani Senala hycha fayda milu shakto.. Udhhav ni paksha vyavasthit chalavla ahe.. fakta dharsod pana kami karun patience tactics thevlya pahijet.

    ReplyDelete
  6. Satta milavane sope pan tikvane kathin.Shivsena netrutvane yacha yogy vichar karun pavle takavi.Janata maf karat nahi joparyant tumhi farak ghadvun anat nahi.

    ReplyDelete
  7. भाजपने स्टूल ठेवलाय! गळफासाची दोरी बांधली आहे! फास गळ्यात अडकवला आहे! आता स्टूल संभाळत बसले आहेत!

    ReplyDelete